होंग लौ मंग : ही चार सर्वोत्कृष्ट चीनी कादंबर्यांपैकी एक कादंबरी. या कादंबरीला इंग्रजी भाषेत द ड्रीम ऑफ रेड चेंबर आणि द स्टोरी ऑफ स्टोन असेही म्हणतात. १८ व्या शतकाच्या मध्यात छिंग राजवंशाच्या कालखंडात ही कादंबरी लिहिली गेली. ही कादंबरी चीनी साहित्यातील सर्वोत्तम काल्पनिक कादंबरी मानली जाते. त्साओ शुएछिन या कादंबरीचा लेखक आहे. होंग लौ मंग या शीर्षकाचे रेड चेंबर ड्रीम आणि ए ड्रीम ऑफ रेड मॅनशन असे पण पुढे भाषांतर केले गेले. १७९१ पर्यंत ह्या कादंबरीची हस्तलिखिते वेगवेगळ्या शीर्षकांसह वितरित केली गेली. १७९१-९२ मध्ये काओ अ या लेखकाने व त्याचा मित्र छंग वईयुआन याने या कादंबरीची पहिली आणि दुसरी छापील आवृत्ती प्रकाशित केली. यानंतर ४० नवीन प्रकरणे घातली गेली आणि एकूण १२० प्रकरणे असलेली ही एक दीर्घ कादंबरी तयार झाली.
ही कादंबरी मुळ लेखक त्साओ शुएछिन यांचे आत्मचरित्र असल्याचे मानले जाते. त्याच्या आयुष्यातील चढ उतारावर आधारित प्रसंग या कादंबरीमध्ये आहेत. जास्तीची प्रकरणे घातल्यानंतर छिंग राजवटीच्या चढ उतारावर आधारित ही कादंबरी असल्याचे म्हटले जाऊ लागले. लेखकाने पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात नमूद केले आहे की, ही कादंबरी लेखकाच्या तारुण्यात त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया, मित्र, नातवाईक यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आहे. कादंबरीमध्ये चित्रित केलेल्या पात्रांमुळे १८ व्या शतकातील चीनी समाजाचे आणि मानवी जीवनाचे हुबेहूब वर्णन केले आहे. या प्रकारचे चित्रण चिनी साहित्यात या आधी आलेले दिसत नाही त्यामुळे ही कादंबरी असाधारण आहे असे मानले जाते.
त्साओ शुएछिनला चीनी कविता आणि पारंपरिक स्थानिक चीनी भाषा अवगत होत्या. कादंबरीमधील संवाद बीजिंगमध्ये बोलल्या जाणार्या भाषेत तर इतर मजकुर ग्रांथिक भाषेमध्ये आहे. २० व्या शतकात जेव्हा चीनी शब्दकोश तयार केला गेला तेव्हा भाषातज्ज्ञांनी या कादंबरीचा आधार घेतला होता. या कादंबरीच्या मजकुरा बाबत थोडा वाद आहे. त्साओ शुएछिन याने १७४० मध्ये कादंबरी लेखनाला सुरुवात केली आणि १७६३ पर्यंत कादंबरीची ८० प्रकरणे लिहून झाली. उर्वरित प्रकरणांचा आराखडा तयार केला. त्साओ हयात असताना कादंबरीची हस्तलिखिते वितरित केली गेली. बाजारात ही हस्तलिखिते मोठ्या किमतीला विकली गेली. १७९१ छंग वईयुआन आणि काओ अ यांनी कादंबरीची पहिली लिखित आवृत्ती नवीन प्रकरणांसह म्हणजे एकूण १२० प्रकरणांची कादंबरी प्रकाशित केली. पण पुस्तकातील नवीन मजकुराला लेखकाची मान्यता नव्हती. त्यामुळे कादंबरीचा मुळ लेखक त्साओने शेवटची काही प्रकरणे आधीच नष्ट केली असावीत असे म्हटले जाते.
बीजिंगमधील चिया वंशाची गोष्ट कादंबरीमध्ये आहे. चिया कुटुंब दोन मोठ्या घरांमध्ये वास्तव्याला असते. त्यांचे पूर्वज सरदार असतात. या प्रतिष्ठित कुटुंबाला राजदरबारी मान असतो. चिया कुटुंबातील एका मुलीचा विवाह राजघराण्यात होतो. पण अखेर या कुटुंबाला राजाचा रोष पत्करावा लागतो. चिया कुटुंबाच्या चढ उताराची गोष्ट या कादंबरीमध्ये आहे. ४० प्रमुख पात्रे आणि ४०० सहायक पात्रे यामध्ये यातील घटना घडतात. कादंबरीमध्ये मुख्य पात्र पौगंडावस्थेमधील तरुण चिया पाओयू हे आहे. त्याचा जन्म झाला तेव्हा त्याच्या तोंडात रत्नाचा एक तुकडा होता. त्याच्या एका चुलत बहिणीशी त्याचे घट्ट नाते होते. पण त्याला त्याच्याच दुसर्या एका चुलत बहिणीशी लग्न करावे लागते आणि या तिघांच्या नात्याची गोष्ट कादंबरीमध्ये आहे. बीजिंग मधील प्रतिष्ठित कुटुंबाची झालेली वाताहत या पार्श्वभूमीवर या तिघांच्या प्रेमातील द्वंद आणि मैत्री अशी या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना आहे. ह्या कादंबरीस चिनी साहित्यातील सर्वोत्कृष्ट साहित्यकृती आणि अतिशय उत्तम दर्जाची कादंबरी समजले जाते. १९२९ मध्ये याचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध झाले. २०१६ मध्ये याचे ऑपेरा पद्धतीने सादरीकरणही करण्यात आले.
संदर्भ :
- Wilt Idema and Lloyd Haft, A Guide to Chinese Literature, Centar for Chinese studies the university of Michigan,1997.
- https://www.britannica.com/topic/Dream-of-the-Red-Chamber
- https://www.cliffsnotes.com/literature/d/dream-of-the-red-chamber/about-dream-of-the-red-chamber.
समीक्षण : चंदा कानेटकर