स्वीडनच्या अखत्यारितील बाल्टिक समुद्रातील बेट व प्रांत. गॉटलंड बेटाचा अक्षवृत्तीय विस्तार ५६° ५४’ उ. ते ५७° ५६’ उ. व रेखावृत्तीय विस्तार १८° ६’ पू. ते १९° ७’ पू. रेखांश आहे. याची ईशान्य-नैर्ऋत्य लांबी १०८.७ किमी. व रुंदी ३.२ किमी. ते ४५ किमी. असून याचे आतून क्षेत्रफळ ३,१४० चौ. किमी. आहे. लोकसंख्या ५८,५९५ (२०२७ अंदाजे) असून लोकसंख्येची घनता दर चौ. किमी १८.२ इतकी आहे. हे बेट स्वीडनच्या मुख्य भूमीपासून पूर्वेस ९० किमी. वर आहे. गॉटलंड या नावाचा स्वीडनचा प्रांत असून यामध्ये फोर, गॉटलंड, गॉट्स्का सेंडन व कॅरिसो या बेटांचा समावेश होतो. लॉस्टा हेड हे गॉटलंडवरील सर्वोच्च उंचीचे ठिकाण आहे. व्हिस्बे हे येथील प्रमुख व मोठे शहर असून गॉटलंड प्रांताचे मुख्यालय येथे आहे. अनेक ऐतिहासिक स्मारकांसाठी हे बेट प्रसिद्ध आहे.
अश्मयुगापासून या बेटावर मानवी वस्ती असून येथील हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे ख्रि. पू. ३०० ते ६०० दरम्यान येथील लोकसंख्येत घट झाली होती. सुमारे इ. स. ९०० पासून हे स्वीडनच्या अधिपत्यात आले. येथील लोक स्वीडनला संस्थानासाठी वार्षिक अट देत असत; मात्र थाबा संस्कृती या दृष्टीने हे बेट स्वतंत्र होते. नॉर्वेचा राजा सेंट ओलाफच्या कारकिर्दीत इ. स. १०३० मध्ये येथील लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. डेन्मार्कचा राजा चौथा वॉल्देमार याच्या अधिपत्यात हे इ. स. १३६१ मध्ये होते. तदनंतर इ. स. १६७० मध्ये हे हॅन्सिऍटिक लिगच्या अमलात होते. इ. स. १५७० मध्ये पुन्हा डेन्मार्कच्या ताब्यात होते; मात्र इ. स. १६४५ पासून यावर स्वीडनचा अंमल आहे.
बाल्टिक समुद्रातील मोक्याच्या स्थानामुळे गॉटलंड बेटास फक्त यूरोपमध्ये व्यापार व लष्करी इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. बाँझ यूगापासून येथील लोकांचे बाल्टिक समुद्राच्या दक्षिण व पूर्व किनाऱ्यावरील लोकांशी व्यापारी संबंध होते. तदनंतर त्यांच्या रोम, इस्लामिक व बायझंटिन साम्राज्यातील लोकांशी संपर्क आला. बाराव्या शतकाच्या अखेरीस रशिया व प. यूरोप या व्यापारी मार्गावर यांचे वर्चस्व होते. यामुळे जर्मन व्यापारी या बेटाकडे आकर्षित झाले. तसेच या बेटाच्या व्यापारी महत्त्वामुळे हॅन्सिऍटिक लिगने (व्यापारी संघ) गॉटलंडवरील व्हिझ्बे शहरात व्यापारी वखार स्थापन केली. संरक्षणासाठी शहरात तटबंदी केली होती.
गॉटलंट बेटाच्या किनारी अनेक उपसागर तसेच किनारी व अंतर्गत भागात चुनखडक आढळतात. येथे शेतमालावर आधारित उद्योगधंदे, साखर, बीट निर्मिती, सिमेंट, खाणकाम, लाकूडकाम, मासेमारी इत्यादी व्यवसाय चालतात. येथील समशीतोष्ण हवामान, सुंदर पुळणी, ऐतिहासिक स्मारके, चर्च यांमुळे हे बेट पर्यटकांचे आकर्षण आहे. येथील हिझ्बे शहराचा जागतीक वारसा स्थळात समावेश होतो (१९९५).
समीक्षक : वसंत चौधरी