लक्ष्मीश : (सोळावे शतक). कन्नडमध्ये जैमिनि-भारताची (कृष्णचरितामृत) रचना करणारा प्रख्यात वैष्णव कवी. त्याचे मूळ गाव व त्याचा काल यांविषयी अभ्यासकांत एकमत नाही. सूरापूरजवळील देवपूर, की चिकमगळूर जिल्ह्यातील कडूर तालुक्यातील देवनूर, असा त्याच्या मूळ गावाविषयी वाद आहे. या दोन गावांतील हुबळी अर्सिकेरे रेल्वेमार्गावर लागणारे देवनूर त्याचे मूळ गाव असावे, असे बहुतांश अभ्यासकांचे मत आहे. त्याचप्रमाणे त्याच्या जीवनावधीबाबतही साधारणपणे ११३७ ते १७६० ह्या दरम्यान विविध मते व्यक्त केली जातात तथापि १५५०च्या आसपासचा काळ बव्हंशी ग्राह्य मानला जातो. विजया नगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय याने १५२० ते १५२१ च्या दरम्यान विजयानगरात विठ्ठलमूर्तीची पुनःस्थपना केली. साधारण ह्या सुमारास लक्ष्मीश कवीने त्याच्या जैमिनिभारत ह्या महाकाव्याची रचना केली असावी, असा एक विचार द. रा. बेंद्रे यांनी मांडला होता. त्या अनुरोधाने संशोधन करता हे महाकाव्य १५१० ते १५१५ या कालावधीत रचले गेले असावे.
हा कवी श्रीवैष्णव वडगळे संप्रदायाचा असून त्याने भागवत संप्रदायानुसारी हे महाकाव्य रचलेले आहे. ‘लक्ष्मीकांत हेब्बार’ या नावाने हा कवी ओळखला जात होता. कडूर-देवनूर मधील लक्ष्मीकांत देवळात या कवीची शिलामूर्ती आजही पूजिली जाते. संत तुकारामांच्या सदेह वैकुंठगमनाच्या आख्यायिकेप्रमाणेच कवी लक्ष्मीकांतही देवाच्या मूर्तीत विलीन झाला, असे भाविक मानतात. कडूर-देवनूर मधील चालीरीती पाहिल्यास वरील आख्यायिकेस पृष्टीच मिळते. श्रीधर कवीने १६३७ मध्ये अश्वमेध काव्य लिहिले. नामा पाठक ह्यांनी १४५०-१५०० च्या दरम्यान मराठीत अश्वमेध लिहिले. १२४७ ते १३४३ ह्या दरम्यान जैमिनीच्या मूळ संस्कृत जैमिनिमहाभारताची रचना झाली आणि हे संस्कृत काव्य मूलाधार मानून महाकवी लक्ष्मीशाने १५१० ते १५१५ च्या सुमारास कन्न्डमध्ये जैमिनि-भारताची रचना केली असावी.
श्रीधररचित मूळ संस्कृत अश्वमेध पर्वाबरोबर कन्नड जैमिनिभारताची तुलना करता, कन्नड जैमिनि-भारत काव्य अधिक सरस वाटते. जैमिनीच्या संस्कृत भारतातील अश्वमेधकथा व कुमारव्यासांच्या कुमारव्यासभारतातील अश्वमेधकथा या संपूर्णपणे वेगळ्या आहेत. श्रीधर व लक्ष्मीश यांनी संस्कृत जैमिनि-भारतातील अश्वमेधकथेवरून आपली काव्ये रचली. संस्कृत जैमिनि-भारत ६८ अध्यायांचे आहे तर कन्नड जैमिनि-भारत ३४ अध्याय व १९०७ कडव्यांचे आहे. या काव्याचा छंद वाधर्क षट्पदी आहे.
लक्ष्मीश कवीत कथालेखकाचे सर्व उत्तम गुण सामावलेले आहेत. त्याने संस्कृत काव्याचा सारांश थोडक्यात, पण रसरशीत केलेला आहे. या काव्यातील नादमाधुर्य, अलंकारसृष्टी, रचनाशैली, रसपरिपोष इ. गुणंना कन्नड रसिक पंडितांकडून मान्यता मिळालेली आहे. त्याच्या शैलीत देशी व मार्ग शैलींचा सुंदर समन्वय आढळतो. युधिष्ठिराचा अश्वमेध यज्ञ हा या काव्याचा विषय असल्याने त्यात विपुल व वैविध्यपूर्ण युद्धवर्णने आली आहेत. तसेच त्यात कृष्णभक्तीला प्राधान्य आहे. व्यास-भारतातील अश्वमेध-पर्वकथा कर्मप्रधान असून, विरोधी वीरांचा संहार रंगविण्यात गढलेली आहे पण कन्नड जैमिनि-भारतातील अश्वमेधकथा भक्तिप्रधान असून प्रतिस्पर्धी वीरांत मैत्री प्रस्थापित करण्यात रंगलेली आहे. या काव्यांत २५ कथा रेखाटल्या आहेत. त्यांतील ‘सुधन्वा’, ‘बभ्रुवाहन’, ‘सीतापरित्याग’ आणि ‘चंद्रहास’ ह्या कथा कलात्मकतेच्या दृष्टीने विशेष सरस व उल्लेखनीय होत. त्यांतही शेवटची मोठी कथा चंद्रहासाची आहे. ही कथा म्हणजे ‘कर्णपीयूष’ असे लक्ष्मीशच म्हणतो. चंद्रहास हा श्रेष्ठ कृष्णभक्त होता. ह्या दुःखमय जीवनप्रवाहात तारणारी एकमेव शक्ती म्हणजे श्रीकृष्ण, हा या कथेचा गाभा आहे. चंद्रहासाच्या कथेचा प्रभाव जनमानसावर पडून तशा सत्त्वाचे, शीलाचे लोक निर्माण व्हावेत, हीच महाकवी लक्ष्मीशविरचित जैमिनि-भारताची सिद्धी म्हणावी लागेल. त्याला ‘कविचूतवचनचैत्र’ असा किताब प्राप्त झाला होता. तसेच तो ‘नादलोल लक्ष्मीश’ म्हणूनही प्रसिद्ध आहे.
लक्ष्मीश कवीने या काव्याव्यतिरिक्त अनेक कीर्तनाख्यानांची रचना केली असावी. तसेच पुरुषामृग प्रसंग भामिनीषट्पदी या मात्रा वृत्तात रचण्याचा प्रयत्न केला असावा, असे दिसते. लक्ष्मीश कवीचे जैमिनि-भारत हे अत्यंत प्रभावी व लोकप्रिय काव्य असून त्याचा प्रभाव यक्षगान नृत्यनाटयप्रकारावर प्रामुख्याने पडलेला आहे. हे काव्य गमक पद्धतीने गाऊन दाखवणारे लोक कर्नाटकात खेडोपाडी आजही आहेत.
संदर्भ :