इसाप : (इ. स. पू. सहावे शतक). ग्रीक नीतिकथाकार. हिरॉडोटसच्या मते हा बुद्धाचा समकालीन होय. इसाप हा एक गुलाम होता. त्याच्या मालकाचे नाव इआडमॉन. इसापने त्याच्या कथा बहुधा कधीच लिहून काढल्या नसाव्यात. प्लेटोच्या मताप्रमाणे सॉक्रेटीसने तुरुंगातील जीवनाचे अखेरचे काही तास इसापच्या काही कथांना पद्यरूप देण्यात घालवले. ॲरिस्टॉटलचे एक विधान पाहता, इसापच्या मालकाने त्याला काही काळानंतर गुलामगिरीतून मुक्त केले होते, असे दिसते. इसापच्या नीतिकथांचे लॅटिन भाषांतर फाबुले एसोपियाने  ह्या नावाने रोममध्ये प्रसिद्ध झाले (१४७६). प्लान्यूडीझ याने संपादिलेली १४४ कथांची ग्रीक आवृत्ती मिलान येथे १४८० मध्ये छापली गेली. इंग्‍लंडमध्ये कॅक्‌स्टनने द फेबल्स ऑफ इसाप  हा ग्रंथ छापला. इसापच्या अनेक नीतिकथांची मराठीतही भाषांतरे झाली आहेत.

संदर्भ :