इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सेस : (स्थापना – १९८९ ) ओडिशा शासनाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सेस (आयएलएस) या स्वायत्त संस्थेची स्थापना भुवनेश्वर येथे झाली. २००२ साली केंद्र शासनाच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडे ही संस्था स्थलांतरीत करण्यात आली. भारताचे त्यावेळेचे पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी यांनी जुलै २००३ मध्ये या संस्थेचे लोकार्पण केले.
‘जैव प्रौद्योगिकी विभागाच्या (DBT Department of Biotechnology) नियंत्रणाखाली असलेल्या ‘जीवन विज्ञान संस्थान’ या संस्थेचे उद्दिष्ट जीव विज्ञानातील बहुशाखीय संशोधन एकाच संस्थेमध्ये करणे हे आहे. मानवी आरोग्य, मानवी आयुष्यकाल वृद्धी, कृषी आणि पर्यावरण इत्यादीवर येथे संशोधन केले जाते. जीव विज्ञानाचा वापर करून उच्च दर्जाची संशोधन साधने व मनुष्यबळ तयार करण्यासाठी संस्थेमध्ये प्रारंभी (मलेरिया व फायलेरिया) हिवताप आणि हत्तीरोग यासारखे डासाकडून पसरले जाणारे आजार यावर संशोधन हाती घेण्यात आले. त्यानंतर, विषाणू संसर्ग, कर्करोग विज्ञान, अधिहर्षता (allergy), स्वयंप्रतिक्षमता आजार (ऑटो इम्यून डिसऑर्डर), जनुकीय आजार आणि कृषी उत्पादन वृद्धी यावर संशोधन करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी केली. यासाठी जिनोमिक्स आणि प्रोटिओमिक्स प्रयोगशाळा, फ्लो सायटोमेट्री (वृद्धी मिश्रणातील पेशी मोजण्याची यंत्रणा), सूक्ष्म चित्रण यंत्रणा, अद्ययावत प्राणी गृह (अॅनिमल हाऊस), काच गृहे, वनस्पती उतक प्रयोगशाळा, झीब्रा मासे सुविधा आणि अद्ययावत संगणक उपलब्ध करून दिले. केंद्र शासनाच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने हे शक्य झाले.
संशोधनासाठी पेशी विज्ञान, जनुक कार्य आणि नियमन, रचनात्मक जीवविज्ञान, प्रतिक्षमता, प्रतिक्षमता आनुवंशिकशास्त्र, स्वयंप्रतिक्षमता जनुके, वनस्पती प्रतिक्षमता, वनस्पती जैवतंत्रज्ञान,पर्यावरणीय जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीव जैवतंत्रज्ञान, भ्रूणविकास जीवविज्ञान, अब्जांशतंत्रज्ञान, अब्जांश औषधविज्ञान, जैव माहिती तंत्रज्ञान,कंप्युटेशनल बायॉलॉजी व बायो इन्फर्मेटिक्स अशा शाखेमधील २६ कुशल संशोधकांच्या नेमणूका केल्या. या संशोधकांना भारताबाहेरील संशोधन संस्थातील संशोधनाचा अनुभव आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी संशोधकांनी एकत्र येऊन ठरवलेल्या विषयावर संशोधन करण्याचे अवघड काम करण्यास प्रारंभ केला. राउरकेला इस्पात रुग्णालयाच्या सहकार्याने सांसर्गिक आजारावर संशोधन करण्याचे इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्सेसने ठरवले. परिसरातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅंड रिसर्च भुवनेश्वर (NISER), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भुवनेश्वर (IIT), ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस भुवनेश्वर(AIIMS), नॅशनल राइस रिसर्च इन्स्टिट्यूट भुवनेश्वर (NRRI), कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी भुवनेश्वर (KIIT), रिजनल प्लॅंट रिसोर्स सेंटर भुवनेश्वर (RPRC) व इतर संशोधन संस्था एकत्र येऊन भारतातील एक मोठे संशोधन संकुल बनवणे हे आव्हान सहज पेलले गेले. उत्कल, मणिपाल आणि कलिंगा युनिव्हर्सिटी व इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील संशोधक मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले. परिणामी शंभराहून अधिक विद्यार्थी सध्या पीएच्.डी. व पोस्ट डॉक्टरेट संशोधन करीत आहेत. एवढ्या वर्षात इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्सच्या विद्यार्थ्याकडून ४५० शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आले. संस्थेतील नऊ विषयतज्ञ हे रामलिंगस्वामी / रामानुजन फेलो तर दोन वेलकम ट्रस्ट डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी फेलो आहेत. तीन संशोधकांना टाटा फेलोशिप, ८० विद्यार्थ्यांना पीएच्.डी. देण्यात आली आणि सत्तावीस स्वामित्व (पेटंट) अर्ज संस्थेमार्फत सादर केलेले आहेत.
संसर्गजन्य आजार, कर्करोग जनुके, टी-लसिका पेशी, मलेरिया, परम सीमा जीव म्हणजे आत्यंतिक पर्यावरणीय स्थितीत (एक्स्ट्रिमोफिल) जिवंत राहणाऱ्या जीवाणूतील जनुके, कृषी जैवतंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात संशोधन करून या संस्थेने जैवतंत्रज्ञान क्षेत्रात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे.
संसर्गजन्य आजार जैव विज्ञान (Infectious Disease Biology): इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सेसच्या अनेक कामांपैकी एक काम म्हणजे मानवी आरोग्य आणि भारतातील संसर्गजन्य आजारावर लक्ष केन्द्रित करणे. या संशोधनाचे अनेक पैलू आहेत उदा रोग जीवविज्ञान, (Pathogen Biology), रोगकारक जीवाणू – आश्रयी यामधील संबंध, प्रतिक्षमता नियम, दाह आणि प्रतिक्षमता रोगविज्ञान (Immunopathology), प्रतिजैविके प्रतिकार (antibiotic resistance), योग्य औषधांचा शोध, आश्रयी प्रतिसाद, संसर्गजन्य आजाराचा प्रारंभ, रेणू ऊती पातळीवरील प्रतिसाद, योग्य त्या औषधांचा आजारावर होणारा परिणाम यावरील संशोधन आजार आटोक्यात आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. जवळच्या रुग्णालयातून या संस्थेच्या उपायांच्या चाचण्या होत असतात.
कर्करोग जीवविज्ञान (Cancer Biology): इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या अंदाजानुसार २०१६ पर्यंत भारतात नव्याने १४.५ लाख कर्करोग रुग्णांची भर पडेल असा होता. दरवर्षी ६.८ लाख रुग्णांचा २०२० पर्यंत कर्करोगामुळे मृत्यू होईल. मुळात कर्करोग गुंतागुंतीची व्याधी आहे. रुग्णावर केले जाणारे उपचाराचे पुरेसे ज्ञान उपलब्ध नाही. आयएलएसने सर्वांत अधिक आढळणाऱ्या रक्तकर्करोग (ल्यूकेमिया), तोंडाचा कर्करोग, पुरस्थ ग्रंथी कर्करोग (prostate cancer), आणि स्तनांचा कर्करोग यांच्या चाचण्या आणि उपचार यावर भर देण्याचे ठरवले आहे. यामध्ये वेळीच निदान, उपचार व प्रतिबंध अशा तीन पातळ्यावर काम करण्याचे ठरवले आहे. यासाठी प्रयोगशाळेत वृद्धी मिश्रणात वाढवलेल्या मानवी ऊती आणि प्रयोगशाळेत वाढवलेल्या प्राण्यांवर चाचणी उपचार करण्यावर भर दिला आहे. हे कार्य किती किचकट आहे हे कर्करोगावर परिणाम करणारी फक्त चार नवी औषधे विकसित करण्यास पंचवीस वर्षे लागली आहेत यावरून लक्षात येईल.
आनुवंशिक व स्वयंप्रतिक्षम आजार (Genetic & Autoimmune Diseases): स्वयंप्रतिक्षम आजार समाजातील काही व्यक्तींमध्ये लक्षणीय प्रमाणात आढळून येतात. यातील बऱ्याच आजारांना आनुवंशिक पार्श्वभूमी आहे. जनुकीय पूर्वस्थिती व आजाराची प्रगती यांचा सरळ संबंध आहे. बहुतेक स्वयंप्रतिक्षम आजार गुंतागुंतीची जनुकीय कारणे व आनुषंगिक पर्यावरणीय बाह्य कारणे यामुळे वाढत जातात. समाजातील विशिष्ट समूहातील व्यक्तीमध्ये यांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळल्याने त्यांची तीव्रता कमी करण्याचे किंवा प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न आयएलएस करत आहे. योग्य त्या व्यक्तींचे जनुकीय समुपदेशन केल्यास अशा आजारांना आळा घालता येतो.
वनस्पती व सूक्ष्मजीव जैवतंत्रज्ञान (Plant & Microbial Biotechnology): समाजाच्या प्रगतीचे दोन मुख्य घटक कृषी व औद्योगिक वाढ आहेत. कृषी क्षेत्र कृषी उत्पादनावर अवलंबून असते. सध्या अनेक उद्योग जीवाणू व जीवाणूजन्य उत्पादनावर आधारित आहेत. एका अंदाजानुसार मानवी लोकसंख्या आजच्या ७३० कोटीवरून २०५० पर्यंत ९६० कोटी पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मागणीच्या प्रमाणात अन्नधान्य उत्पादन होणे आवश्यक आहे. जगातील २३% लोकसंख्या आपली कर्बोदकांची गरज भाताद्वारे भागवते. आजच्या ५८५ कोटी टनांचे उत्पादन ८०० कोटी टनापर्यंत वाढले तरच हे शक्य आहे. औद्योगिक वाढीसाठी सूक्ष्मजीव उत्पादन वाढ झाली तर इंधने, वीज, खते, औषधे अशा क्षेत्रात प्रगती होणार आहे. त्यासाठी आयएलएसने भविष्यात सूक्ष्मजीव तंत्रज्ञान विकसित करण्यावर अधिक भर देण्याचे ठरवले आहे.
संदर्भ :
- Institute of Life Sciences, BBSR, Department of Biotechnology
- ils.res.in
समीक्षक : किशोर कुलकर्णी