हमिंग पक्ष्यांचा समावेश अॅपोडिफॉर्मिस गणाच्या ट्रोचिलीडी कुलात होतो. हे रंगीबेरंगी पक्षी आकारमानाने सर्वांत लहान पक्षी असून त्यांच्या सु. ३३८ जाती आहेत. सर्व हमिंग पक्षी दक्षिण व उत्तर अमेरिका येथील स्थानिक आहेत. दक्षिण अमेरिकेत ते अधिक संख्येने आढळत असून त्याखालोखाल ते उत्तर अमेरिका तसेच कॅरिबियन देशांत आढळतात.
विविध जातींनुसार हमिंग पक्ष्यांच्या शरीराची लांबी ५ ते २० सेंमी. असते. पंख इतर पक्ष्यांहून वेगळे असतात आणि ते खांद्यापासून सर्व दिशांत फिरू शकतात. त्यामुळे त्यांची उडण्याची पद्धत इतर पक्ष्यांपेक्षा वेगळी असते. त्यांच्या आगळ्यावेगळ्या पंखांमुळे तो डोके स्थिर ठेवून घिरट्या घालू शकतो आणि न वळता उलट दिशेला उडू शकतो. एका क्षणी हा पक्षी हवेतून तीरासारखा पुढे जातो व पुढच्या क्षणाला फुलाभोवती घिरट्या घालताना दिसतो. उडताना या पक्ष्यांचे पंख अतिशय जलदपणे म्हणजे सेकंदाला ७० ते ९० वेळा फडफडतात आणि ते पुसटसेच दिसतात. त्यांच्या पंखांचा फडफडण्याचा आवाज मधमाशी किंवा भुंगे यांच्या पंखांच्या आवाजासारखा ‘गूंSSगूंSS’ असतो. म्हणून त्यांना हमिंग म्हणजे गुंजन किंवा गुंजारव करणारा पक्षी असेही म्हणतात.
हमिंग पक्ष्याचे पाय आखूड असून चोच लांब असते. यांच्या काही जातींमध्ये चोच शरीरापेक्षा लांब असते. जीभ नळीसारखी असून ती शरीरापेक्षा लांब व गुंडाळलेली असते. हमिंग पक्षी फुलांतील मधुरस (मकरंद) व कीटक खातात. जेथे फुले मुबलक असतात अशा भागात ते राहतात. तसेच वेगवेगळ्या फुलांसाठी मर्यादित क्षेत्रात ते उडत जातात. फुलांत खोलवर पोहोचण्यासाठी चोच व जीभ यांचे अनुकूलन झालेले असते. चोच किंवा जीभ फुलांच्या आत घालून ते फुलपाखरांप्रमाणे मकरंद व लहान कीटक शोषून घेऊन खातात. मकरंद गोळा करताना शरीर फुलांना घासले गेल्याने फुलांतील परागकण त्यांच्या पिसांना चिकटतात आणि उडताना परागकण इतरत्र पसरून परागण घडून येते.
हमिंग पक्ष्यांची घरटी झाडाच्या दोन फांद्यांच्या बेचक्यात, झाडांच्या मोठ्या पानांवर, खडकांवर, तर कधीकधी झाडाला टांगलेली दिसून येतात. घरट्याचा आकार कपासारखा असून ते वनस्पतींचे धागे, दगडफूल, कोळ्याचे जाळे, प्राण्यांचे केस यांपासून तयार केलेले असते. मादी घरट्यामध्ये एक किंवा दोन पांढऱ्या रंगाची अंडी घालते. अंड्यांचा उबवण कालावधी १५–२० दिवसांचा असतो. अंडी उबविण्याचे तसेच पिलांच्या संगोपनाचे काम मादी एकटीच करते. हमिंग पक्ष्यांचे शरीर लहान असले, तरी त्यांचे पंख जलदपणे फडफडत असल्याने त्यांना अधिक प्रमाणात ऊर्जा लागते. म्हणून ते सतत अन्न खात असतात. परिसराचे तापमान घटले की, ते सुस्त होतात. अशा वेळी ते अल्पकालीन शीतनिष्क्रियतेत जातात आणि ऊर्जेची बचत करतात. फारच थोडे हमिंग पक्षी अन्नाच्या शोधासाठी किंवा थंड हवामान टाळण्यासाठी स्थलांतर करतात. उदा., रूबी थ्रोटेड हमिंग (आर्चिलोकस कोलूब्रिस) उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागांतून पनामापर्यंत स्थलांतर करतो. हे अंतर सु. १,४०० किमी. असून मेक्सिकोचे आखात तो एका दमात पार करतो; रूफोज हमिंग (सेलॅस्फोरस रुफस) हा उत्तर अमेरिकेतील रॉकीज पर्वतांच्या रांगाचे सु. ३,२०० किमी. अंतर पार करतो.
विविध जातींनुसार हमिंग पक्ष्यांच्या रंगांमध्ये विविधता आढळते. सामान्यपणे नर मादीपेक्षा अधिक आकर्षक असतो. उदा., रूबी थ्रोटेड (आर्चिलोकस कोलूब्रिस) नराची डोक्यावरील, पाठीकडील बाजू चकचकीत हिरवी, तर पोटाकडील बाजू फिकट तपकिरी करडी असून त्यावर पांढरट छटा असतात. गळ्याभोवतीचा रंग मखमली लाल असतो. मादीची पाठीकडील बाजू हिरवट रंगाची असून गळा व पोटाकडील बाजू फिकट करड्या रंगाची असते.
जायंट हमिंग (पॅटॅगोना गिगॅस) हा आकाराने सर्वांत मोठा हमिंग पक्षी असून तो पश्चिम-दक्षिण अमेरिकेत आढळतो. याच्या शरीराची लांबी सु. २० सेंमी. आणि वजन सु. २० ग्रॅ. असते. क्युबामध्ये आढळणारी बी हमिंग (मेलिशुगा हेलेनी) ही जाती सर्वांत लहान हमिंग पक्षी असून तिच्या शरीराची लांबी सु. ५.५ सेंमी. आणि वजन सु. २ ग्रॅ. असते. हा जगातील सर्वांत लहान हमिंग पक्षी आहे. मॅग्निफिसंट हमिंग (यूजेनिस फुलगेन्स), ॲनाज् हमिंग (कॅलिप्टे ॲना), ब्रॉड टेल्ड हमिंग (सेलॅस्फोरस प्लॅटिसेर्कस), वायर क्रेस्टेड थॉर्नटेल हमिंग (पॉपेलेरिया पॉपेलेरी), सोअर्डबिल हमिंग (एन्सिफेरा एन्सिफेरा), बीअरडेड हेल्मेटक्रेस्ट हमिंग (ऑक्सिपोगॉन गरिनी), मार्व्हलस स्पॅट्युलटेल हमिंग (लोड्डिजेशिया मिराबिलिस), ब्लॅक-टेल्ड् ट्रेनबिअरर हमिंग (लेसाबिया व्हिक्टोरीई) ही काही वैशिष्ट्यपूर्ण हमिंग पक्ष्यांची उदाहरणे आहेत. हमिंग पक्ष्यांचा आयु:काल ३–५ वर्षांचा असतो. कावळे व बहिरी ससाणा हे त्याचे नैसर्गिक शत्रू आहेत.