(मुव्हमेंट ऑफ प्लांट्स). सजीव आणि निर्जिव यांच्यातील मुख्य फरक म्हणजे हालचाल. वनस्पती सजीव असल्यामुळे त्यांच्यामध्येही हालचाल दिसून येते. सजीवांच्या पेशीतील जीवद्रव्य बाह्य घटकांना संवेदनशील असते. पाणी, प्रकाश, गुरुत्वाकर्षण, काही रसायने इ. पेशीद्रव्याला उद्दीपित करतात आणि परिणामी पेशींची हालचाल होते. बहुपेशीय सजीवांमध्ये पेशींच्या हालचाली एकत्रित व समन्वयित होत असल्याने त्याच्या एखाद्या अवयवाची किंवा संपूर्ण सजीवाची हालचाल होते. ही हालचाल एका विशिष्ट दिशेने किंवा विशिष्ट प्रकारे होते. सजीवांच्या किंवा त्यांच्या अवयवांच्या बाह्य उद्दीपनाला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला ‘क्षोभ संवेदना’ म्हणतात. या क्षोभ संवेदनेचे प्रकटन हालचालीत होते. अशी हालचाल सजीवांना उपकारक असते, कारण हालचालींमुळे त्यांना बाह्यावरणाशी अनुकूलता साधता येते.

सजीवांची हालचाल दोन प्रकारांची असते; चलन (मुव्हमेंट ऑफ लोकोमोशन) आणि वलन (मुव्हमेंट ऑफ कर्व्हेचर). सजीव किंवा त्यांच्या अवयवाचे स्थानांतर म्हणजे चलन आणि असे स्थानांतर न होता एकाच जागी झालेली हालचाल म्हणजे वलन. मनुष्य एका जागेपासून दुसऱ्या जागी जातो, हे चलनाचे उदाहरण आहे. परंतु तोच मनुष्य एका जागी बसून हात वा पाय हलवतो, हे वलनाचे उदाहरण आहे. सर्व प्राणी व वनस्पतींमध्ये चलनवलन दिसून येते. सामान्यपणे जमिनीवरील वनस्पतींमध्ये संपूर्ण वनस्पतींचे चलन होत नाही, मात्र त्यांच्या अवयवांमध्ये चलन दिसून येते. उदा., वनस्पतींच्या बिया किंवा बीजाणू वाऱ्यामुळे किंवा पाण्यामुळे स्थानांतरित होतात. वनस्पतींमध्ये वलन मात्र अनेकदा दिसून येते. उदा., फूल उमलणे, सूर्यफुलाचे सूर्याच्या दिशेने वळणे.

हालचालींचा चलन प्रकार

हालचालींच्या या प्रकारात पेशीतील पेशीद्रव्याची हालचाल, अनावृत पेशीद्रव्याचे, संपूर्ण एकपेशीय सजीवाचे किंवा संपूर्ण बहुपेशीय सजीवाचे किंवा त्यांच्या इंद्रियाचे खुले स्थानांतर यांचा समावेश होतो. या प्रकारच्या हालचाली उत्स्फूर्त किंवा प्रेरित असू शकतात.

(१) उत्स्फूर्त चलन : अशा हालचाली स्वेच्छेने घडून येतात. त्यांच्यावर कोणत्याही बाह्य घटकांचा प्रभाव नसतो. उदा., पक्ष्माभिकाधारी युग्मके, चलबीजाणू यांच्या हालचाली; केवळ पेशीद्रव्ययुक्त शरीर असलेल्या अमीबाची हालचाल, पेशीद्रव्याचे पेशींतर्गत अभिसरण किंवा घूर्णन.

(२) प्रेरित चलन : अशा हालचाली सूक्ष्म इंद्रियांच्या किंवा संपूर्ण सजीवाच्या असू शकतात. या हालचालींवर बाह्य घटकांचा जसे रसायने, प्रकाश आणि उष्णता यांचा प्रभाव असून हे घटक उद्दीपक म्हणून कार्य करतात. बाह्य घटकांमुळे घडून आलेल्या अशा हालचालींना अनुचलन म्हणतात आणि या हालचाली विशिष्ट उद्दीपनाच्या स्वरूपावर अवलंबून असतात.

(अ) रसायन अनुचलन : विशिष्ट रसायनांमुळे सजीवांची किंवा त्यांच्या इंद्रियाची हालचाल घडून येते. उदा., काही जीवाणू जेथे ऑक्सिजन उपलब्ध असतो तेथे आकर्षित होतात. शेवाळांत स्त्रीधानींद्वारे स्रवलेल्या सुक्रोज या शर्करेकडे पुमणू आकर्षित होतात. याचकरिता नेच्यांमध्ये मॅलिक आम्ल स्रवले जाते.

(आ) प्रकाश अनुचलन : या हालचाली प्रकाशामुळे घडून येतात. उदा., शैवाल सौम्य प्रकाशाकडे कलतात, तर प्रखर प्रकाशापासून ती दूर जातात. हरितद्रव्याचे प्रखर प्रकाशात अपघटन होत असल्याने हरितलवके पानांमध्ये एकावर एक रचली जाऊन स्वत:चे रक्षण करतात. मात्र सौम्य प्रकाशात ती अशी रचली जातात, की त्यामुळे प्रकाशसंश्लेषण घडून येते.

(इ) ताप अनुचलन : उष्णतेमुळेही वनस्पतींची किंवा त्यांच्या इंद्रियांची हालचाल होते. पेशींना उष्णता दिल्यास त्यांच्यातील पेशीद्रव्याचे घूर्णन किंवा अभिसरण वाढलेले दिसते. उदा., व्हॅलिसनेरिया वनस्पतीच्या पानाच्या छेदाला पेटलेल्या आगकाडीने उष्णता देऊन तो छेद सूक्ष्मदर्शीखाली पाहिल्यास त्यातील पेशीद्रव्य अधिक वेगाने घुसळताना दिसते.

हालचालींचा वलन प्रकार

वनस्पतींना एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाता येत नाही. मात्र त्यांचे अवयव आपली वक्रता (कर्व्हेचर) बदलतात, म्हणजे वाकतात आणि दिशा किंवा आकार यांत बदल करतात. वनस्पतींचे कार्य नीट घडून येण्यासाठी त्यांचे वलन घडून येते. वलन यांत्रिक किंवा जैविक असू शकते.

(१) यांत्रिक वलन : वनस्पतींच्या काही निर्जीव अवयवांमध्ये यांत्रिक हालचाली दिसून येतात. जसे, स्फुटनशील फळे तडकतात, नेच्यांची बीजाणुधानी आणि इतर तत्सम संरचना तडकतात, काही फळे सुकली की अचानक फुटतात (इंपेशन्स प्रजातीतील वनस्पती), कोरांटी, चंबळ इ. काही फळे पाणी शोषून घेतले की फुटतात. उदा., रुलिया प्रजातीतील वनस्पती.

वन्य ओट (ॲव्हेना स्टेरिलीस) आणि इतर काही गवताच्या वाळलेल्या ओंब्या पाण्याच्या संपर्कात येताच त्यांना पीळ बसू लागतो. एक्व‍िसीटम बीजाणूंचे क्षेपक जलशोषी असतात; हवेत बाष्प असते तेव्हा ते बीजाणूंभोवती सर्पिलाकार गुंडाळले जातात; हवा कोरडी असते तेव्हा ते उलगडले जातात आणि बीजाणूंपासून वेगळे ताठ उभे राहतात.

(२) उत्स्फूर्त वलन : या वनस्पतींच्या काही अवयवांच्या हालचाली स्वेच्छेने घडून येणाऱ्या हालचाली आहेत. अशा हालचालींवर कोणत्याही बाह्य घटकांचा प्रभाव नसतो. त्यांचे दोन प्रकार करता येतात.

(अ) बदलांमुळे झालेले वलन : या हालचाली वनस्पतींच्या पूर्ण वाढलेल्या भागातील पेशींच्या फुगीरपणात झालेल्या बदलामुळे घडून येतात आणि जलद होतात. बदलांमुळे झालेल्या उत्स्फूर्त हालचाली क्वचितच दिसून येतात; अशा हालचाली बाह्य घटकांच्या प्रभावामुळे होतात. कोडॅरिओकॅलिक्स माटारिअस (इंडियन टेलिग्राफ) या आशियात आढळणाऱ्या झुडपाच्या पानांच्या तीन पर्णिकांपैकी बाजूच्या दोन पर्णिका उत्स्फूर्तपणे वर-खाली होतात. यावेळी टोकाची पर्णिका स्थिर राहते. सामान्यपणे सूर्यप्रकाशात सकाळपासून संध्याकाळपर्यंत या पर्णिका वर-खाली होत राहतात; कधीकधी रात्री उशीरापर्यंत अशी हालचाल होत राहते. या हालचाली पानांच्या देठातील पेशी फुगल्यामुळे होतात.

(आ) वाढीमुळे होणारे वलन : वनस्पतींच्या भागांची वाढ होताना, त्यांची वाढ असमान झाल्याने अशा हालचाली होतात. या हालचाली मंद असतात आणि बहुधा सरपटणाऱ्या वनस्पतींमध्ये दिसतात. त्यांच्यात एका वेळी खोडाच्या एका बाजूला वाढ वेगाने होते आणि दुसऱ्या बाजूची वाढ नंतर होताना दिसते; खोडाचे टोक एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला वळलेले दिसते. अशा परिस्थितीत, खोड लांब आणि वेडेवाकडे वाढते (शिखावर्तन–न्युटेशन). वाढ जर खोडाभोवती नियमित झालेली असेल, तर ते प्रताणे किंवा वल्लरी यांच्याप्रमाणे वेटोळे घेते (परिशिखावर्तन–सर्कमन्युटेशन). कोवळ्या पानांमध्ये वेगळ्या प्रकारची वाढ दिसून येते. त्यांच्यात पानांच्या खालच्या बाजूला सुरुवातीची वाढ वेगाने होते आणि म्हणून त्यांच्या वरचा भागावर घड्या किंवा वळ्या पडलेल्या असतात (उपरिकुंचन–हायपोनॅस्टी). नंतर पानांच्या वरच्या पृष्ठभागाची वाढ वेगात झाल्याने पाने खुलतात आणि पाने सपाट व सरळ होतात (अधोकुंचन–एपिनॅस्टी). नेच्यांच्या पानांत, उपरिकुंचनामुळे पानांना वेटोळे पडतात, तर नंतर अधोकुंचनामुळे पानांचे वेटोळे उलगडले जाऊन ती सरळ होतात.

(३) प्रेरित वलन : वनस्पतीच्या काही भागांच्या हालचाली बाह्य घटकांद्वारे प्रेरित करता येतात. अशा हालचाली दोन प्रकारच्या असतात : (अ) अनुवर्तनी (ट्रॉपिझम) आणि (आ) अनुकुंचनी (नॅस्टिक). उद्दीपन पुढील स्वरूपाचे असू शकते; स्पर्श, प्रकाश, गुरुत्व, तापमान, विशिष्ट रसायने आणि आर्द्रता.

(अ) अनुवर्तनी हालचाल : वनस्पतींच्या भागांच्या अशा हालचाली सहसा उद्दीपनाच्या दिशेने होतात आणि वनस्पतींचे भाग उद्दीपनाच्या दिशेने कलतात किंवा त्यापासून दूर जातात.

(अ. १) स्पर्श अनुवर्तन : वनस्पतीचा एखादा भाग बाह्य स्थायूच्या स्पर्शाने उद्दीपित झाल्यास त्याला स्पर्श अनुवर्तन म्हणतात. वेटोळेकार खोड आणि प्रताणे इ. याची उदाहरणे आहेत. हे भाग बाह्य पदार्थाच्या स्पर्शाला संवेदनशील असतात, परंतु त्यांची प्रतिक्रिया खूप हळू होते. त्यामुळे हालचाल घडून येण्यासाठी स्पर्श कालावधी दीर्घ असावा लागतो. काही प्रताणे (तत्काळ काही मिनिटांत) प्रतिक्रिया देतात. वनस्पतीचे भाग एखाद्या आधाराला किंवा कठीण वस्तूला चिकटतात, तेव्हा स्पर्श झालेल्या भागांची वाढ थांबते आणि वनस्पतीचा स्पर्श झालेला भाग त्या वस्तूभोवती गुंडाळला जातो. ही वरवर चढण्याची यंत्रणा आहे. काही वेली (आरोहिनी) उदा., डायोस्फोरिया अलाटा (गोराडू/याम) घड्याळ्याच्या काट्यांच्या दिशेने हालतात, तर डा. बल्बिफेरा (करांदा/वन्य याम) घड्याळ्याच्या काट्यांच्या उलट दिशेने फिरतात. त्यांच्या हालचालीत मुद्दाम बदल केल्यास त्यांची वाढ थांबते.

प्रकाश अनुवर्तन

(अ. २) प्रकाश अनुवर्तन : वनस्पतीच्या काही अवयवांची हालचाल त्यांच्यावर पडलेल्या प्रकाशाच्या दिशेनुसार घडते. वनस्पतीचे काही भाग प्रकाशाच्या दिशेने वाढतात, तर काही भाग प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने वाढतात उदा., मुळे. पाने, धुमारे प्रकाशाच्या दिशेने काटकोनात वाढतात, त्यामुळे पानांचा पृष्ठभाग प्रकाशाकडे राहतो. घरात कुंडीत लावलेले रोप याच कारणाने खिडकीच्या दिशेने वळलेले दिसते. या हालचालींसाठी वनस्पतींमधील संप्रेरके कारणीभूत असतात.

गुरुत्व अनुवर्तन

(अ. ३) गुरुत्व अनुवर्तन : वनस्पतीच्या काही अवयवांची हालचाल गुरुत्वाकर्षणामुळे होते. उदा., वनस्पतीचे प्राथमिक मूळ पृथ्वीच्या गुरुत्वाच्या दिशेने वाढते, तर कोंब (प्ररोह) गुरुत्वाच्या विरुद्ध दिशेने वाढतात. तसेच बाजूची मुळे, खोडाच्या फांद्या प्राथमिक मुळाशी / खोडाशी काटकोन करून फुटतात.

(अ. ४) ताप अनुवर्तन : तापमान कमी झाल्यास किंवा वाढल्यास वनस्पतींच्या अवयवांचे वलन घडून येते. उदा., एखाद्या खोक्यात एका बाजूला रोप ठेवले आणि दुसऱ्या बाजूचे तापमान वाढविले, तर वनस्पतीचे भाग उबदार भागाकडे वळलेले दिसतात.

(अ. ५) रसायन अनुवर्तन : काही रासायनिक पदार्थामुळे वनस्पतीमध्ये वलन झाल्यास त्याला रसायन अनुवर्तन म्हणतात. उदा. ड्रॉसेरा (सनड्यू) या वनस्पतीची स्पर्शके (टेंटॅकल) त्यांच्या पानांवर नायट्रोजनयुक्त पदार्थ असल्यास प्रतिसाद देतात. अशा प्रकारे पानांवर विद्राव्य प्रथिन ठेवल्यास किंवा मांसाचा लहान तुकडा ठेवल्यास त्यातील काही भाग शोषला गेल्यानंतर स्पर्शकांच्या हालचाली होतात, पेशीद्रव्य उद्दीपित होऊन ते लगतच्या स्पर्शकांना प्रेरक आवेग पाठवते आणि सर्व स्पर्शके प्रथिनाच्या किंवा मांसाच्या तुकड्याला वेढा घालतात. त्यामुळे एखादा कीटक ड्रॉसेराच्या स्पर्शकांच्या कात्रीत सापडला, की त्याच्यातील प्रथिने शोषली जाईपर्यंत तो जखडलेल्या स्थितीत राहतो.

(अ. ६) आर्द्रता अनुवर्तन : पाण्याच्या उद्दीपनामुळे वनस्पतींच्या अवयवांची हालचाल होते. त्याला आर्द्रता अनुवर्तन म्हणतात. वनस्पतींची मुळे ओलाव्याच्या स्रोतांच्या दिशेने वळतात.

(आ) अनुकुंचनी हालचाल : अनुवर्तनी हालचालींप्रमाणेच वनस्पतींच्या अवयवांच्या अनुकुंचनी हालचाली स्पर्श, प्रकाश आणि उष्णता इ. बाह्य घटकांच्या उद्दीपनांमुळे घडून येतात. परंतु या हालचाली आणि ज्या दिशेने बाह्य घटकाची उद्दीपने वनस्पतीवर येतात, यांत संबंध नसतो. म्हणजे अनुकुंचनी हालचाली निदेशक नसतात; बाह्य घटक ज्या अवयवाला उद्दीपित करतात त्या अवयवाचे सर्व भाग प्रभावित होतात आणि उद्दीपन कोणत्या दिशेने आले तरी त्या अवयवाची हालचाल ठराविक दिशेनेच होते. वनस्पतींची पाने, पाकळ्या अशा दोन्ही बाजूंनी सपाट अवयवांमध्ये अशा हालचाली दिसून येतात.

कंपकुंचन हालचाल

(आ. १) कंपकुंचन : या हालचाली यांत्रिक उद्दीपनांमुळे घडून येतात. जसे इतर प्राण्यांचा स्पर्श, कठीण वस्तूने टोचणे, पावसाचे थेंब, वाऱ्याचा झोत इत्यादींचा स्पर्श लाजाळूच्या पानांना झाला, की पाने मिटतात. स्पर्श, धक्का यांसारख्या उद्दीपनांची तीव्रता किती आहे त्यानुसार या हालचाली घडतात. उदा., लाजाळूच्या पानांच्या टोकाला हलकासा स्पर्श केल्यास काही पर्णिका मिटतात, परंतु हाच स्पर्श जोराने केल्यास सर्व पर्णिका एकाच वेळी मिटतात. व्हिनस फ्लाय-ट्रॅप या वनस्पतीत असेच घडते. या वनस्पतींच्या पानांच्या दोन दलांवर केस असतात, जे स्पर्शाला संवेदनशील असतात. जेव्हा या केसांना कीटकाचा स्पर्श होतो तेव्हा ती दले लागलीच बंद होतात.

(आ. २) प्रकाश अनुकुंचनी : प्रकाशाच्या तीव्रतेत बदल झाल्यामुळे वनस्पतींच्या भागांमध्ये बदल होतात. अनेक फुले प्रकाश तीव्र असताना उमलतात आणि अंधार पडला किंवा कृत्रिमरित्या अंधार केला की बंद होतात. उदा., नून फ्लॉवर (पेंटापिटीस प्रजाती). काही फुले सकाळच्या कोवळ्या प्रकाशात उमलतात, परंतु प्रकाशाची तीव्रता वाढली की बंद होतात. उदा., गार्डन पर्सलेन (पोर्ट्युलाका ग्रँडिफ्लोरा). काही फुले रात्री अंधारात उमलतात, परंतु दिवस होताच बंद होतात (पारिजातक). वनस्पतींच्या पानांतील पर्णछिद्रे सूर्यप्रकाशात उघडतात, परंतु प्रकाश नसला की बंद होतात.

(आ. ३) ताप अनुकुंचन : तापमानाच्या तीव्रतेत बदल झाल्यामुळे वनस्पतींच्या काही अवयवांची हालचाल होते. अनेक फुले तापमान वाढले की, जलदपणे उमलतात आणि तापमान घटले की बंद होतात. असाच परिणाम फॅबेसी, ऑक्सॅलिस प्रजातीच्या वनस्पतींच्या पानांमध्ये दिसून येतो. जेव्हा तापमान खूप वाढते किंवा कमी होते, तेव्हा पाने मिटतात आणि तापमानाची पातळी अनुकूल झाली की ती उघडतात.

(आ. ४) निशा अनुकुंचन : दिवस आणि रात्र यांच्यातील बदलामुळे वनस्पतींच्या काही अवयवांची हालचाल घडून येत असते. पाने आणि फुले यांच्यावर निशा अनुकुंचनाचा प्रभाव दिसून येतो. निशा अनुकुंचन हे प्रकाश आणि तापमान अशा दोन्ही घटकांमुळे घडून येते; यात प्रकाशाचा प्रभाव अधिक असतो. फॅबेसी कुलातील वनस्पतींची पाने संध्याकाळ झाली की मिटतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उघडतात. चाकवत, जरबेरा, चिनी गुलाब इ. वनस्पतींमध्ये निशा अनुकुंचन दिसून येते.