अटलांटिक महासागरातील मेक्सिकोच्या आखाताचा एक फाटा. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी अ‍ॅलाबॅमा राज्यात या उपसागराचा विस्तार झालेला आहे. नैर्ऋत्य भागात उपसागराचा निर्गममार्ग असून त्याद्वारे हा उपसागर मेक्सिकोच्या आखाताशी जोडलेला आहे. या निर्गमद्वाराच्या मध्यभागी डॅफ्नी बेट आहे. आखाताच्या नैर्ऋत्य भागातील निर्गमद्वारापासून ते अगदी उत्तर भागातील मोबील नदीच्या मुखापर्यंतची या उपसागराची लांबी ५६ किमी. असून कमाल रुंदी ३९ किमी. आणि क्षेत्रफळ १,०७० चौ. किमी. आहे. सरासरी खोली ३ मी. आहे. डॅफ्नी बेट आणि मोबील पॉइन्ट या दोन ठिकाणांदरम्यानच्या उपसागराची रुंदी १३ ते २९ किमी. असून त्यातून खोदलेल्या कालव्याची (चॅनेलची) खोली १४ मी. आणि रुंदी ९० ते १५० मी. आहे. कधीकधी कालव्यामधील पाण्याची खोली २३ मी. पर्यंतही वाढताना आढळते. अ‍ॅलाबॅमा नदी व टॉमबिग्बी नदी यांच्या संगमाने तयार झालेली मोबील नदी आणि टेनसॉ या दोन प्रमुख नद्या उपसागराच्या उत्तर टोकाशी उपसागराला मिळतात. किंबहुना, त्यांच्यामुळेच निर्माण झालेली ही नदीमुखखाडी आहे. त्यामुळे हा उपसागर म्हणजे एक नदीमुखखाडीच असून ती अमेरिकेची संयुक्त संस्थानांतील चौथ्या क्रमांकाची मोठी नदीमुखखाडी आहे. त्याशिवाय इतरही अनेक नद्या या उपसागराला येऊन मिळतात. त्यांपैकी डॉग, डिअर, फाउल या पश्चिमेकडून मिळणाऱ्या; तर फिश ही पूर्वेकडून मिळणारी प्रमुख नदी आहे.

उपसागराच्या उत्तर किनाऱ्यावरील मोबील आणि अंतर्गत भागातील बर्मिंगहॅम या शहरांदरम्यानच्या व्यापारी वाहतुकीसाठी ब्लॅक वॉरीअर-टॉमबिग्बी या नदीप्रणालीचा वापर केला जातो. आंतर-किनारी जलमार्गाने मेक्सिकोच्या आखातावरील किनाऱ्याच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील बंदरे एकमेकांशी जोडलेली आहेत. मोबील या बंदरातून सागरी तसेच अंतर्भागातील जलमार्गांनी दूरपर्यंत वाहतूक केली जाते. उपसागराच्या अगदी उत्तरेकडील शिरोभागी मोबील शहर, उपसागराच्या अगदी दक्षिण भागात फोर्ट मॉर्गन, तर पूर्व किनाऱ्यावर स्पॅनिश फोर्ट, डॅफ्नी, फेअरहोप, पॉइन्ट क्लिअर, बॉन सकुर ही शहरे वसली आहेत. मोबील उपसागराच्या शिरोभागात दोन पूल बांधण्यात आले असून त्यांमुळे मोबील शहर उपसागराच्या पूर्व किनाऱ्याशी जोडले आहे. निर्गम मार्गातील डॅफ्नी बेटावरील डॅफ्नी शहर आणि पूर्वेकडील फोर्ट मॉर्गन शहर यांदरम्यान फेरी वाहतूक चालते. तसेच दक्षिणेकडील डॅफ्नी बेट आणि उत्तरेकडील सीडर पॉइंट (भूशिर) यांदरम्यानच्या सागरी भागात पूल बांधण्यात आला आहे. इ. स. १८८५ पासून या उपसागराच्या मध्यभागी दीपगृह आहे. या उपसागर भागाला अनेकदा हरिकेन वादळाचा तडाखा बसलेला आहे. इ. स. १९७९ आणि २००५ मधील हरिकेन्स ही सर्वांत अलीकडील विनाशकारी वादळे ठरली आहेत.

इसवी सन १५०० मध्ये स्पॅनिश समन्वेषक या उपसागर भागात आले होते. तेव्हापासून या सागरी भागाचा इतिहास ज्ञात होऊ लागला. या भागाचे सखोल समन्वेषण द्येगो मिरूएलो (इ. स. १५१६), ऑलॉन्सो आल्व्हारिझ दे पिनेदा (इ. स. १५१९) आणि एर्नांदो दे सोतो (इ. स. १५३९) या समन्वेषकांनी केले. स्पॅनिशांचा या परिसरात अधूनमधून वावर होता; परंतु ते या परिसरात वसाहत करू शकले नाहीत. फ्रेंचांनी मात्र इ. स. १७०२ मध्ये डॅफ्नी बेटाजवळ खोल सागरी बंदराची निर्मिती करून मोबील नदीकाठी मोबील ही पहिली कायमस्वरूपी वसाहत केली; परंतु त्यानंतर वारंवार आलेल्या पुरामुळे इ. स. १७११ मध्ये मोबील शहराचे मूळ ठिकाण बदलून उपसागराच्या शिरोभागी नव्याने मोबील शहराची स्थापना केली. अमेरिकन यादवी युद्धामधील ५ ते २३ ऑगस्ट १८६४ या कालावधित लढले गेलेले नाविक युद्ध मोबील उपसागर परिसरात लढले गेले. या युद्धात या उपसागरामध्ये अनेक युद्धनौका बुडाल्या किंवा नाश पावल्या.

समीक्षक : माधव चौंडे