व्हॅटिकनच्या धर्मपीठाने जेज्वीट धर्मगुरूंना १६१५ साली बायबलचे देशी भाषांत अनुवाद करण्याची परवानगी दिली होती. यूरोपमधील जेज्वीट धर्मगुरूंनी तिचा लाभ घेतला नाही. मात्र इंग्लंडहून महाराष्ट्रात आलेले फादर थॉमस स्टीफन्स यांनी त्या संधीचे सोने केले. त्यांनी क्रिस्तपुराण (१६१६) या आपल्या महाकाव्यात संपूर्ण बायबलचे कथानक साकार केले. या ग्रंथाची ओवीसंख्या १०,९६२ असून भाषा अस्सल संत एकनाथकालीन आहे. मराठी भाषेचे हे एक अलौकिक लेणे आहे. या महाकाव्याच्या १६४९ आणि १६५४ मध्ये आणखी आवृत्त्या निघाल्या.

पंडिता रमाबाई यांनी बायबलचे केलेले मराठी भाषांतर (मुद्रित शीर्षकपृष्ठ, १९२४).

बायबलच्या मराठी भाषांतराचा सविस्तर आणि अभ्यासपूर्वक आढावा देवदत्त नारायण टिळक यांनी बायबलची तोंडओळख या पुस्तकात घेतला आहे. त्याचा गोषवारा पुढीलप्रमाणे : विल्यम कॅरी यांनी १८०४ साली पंडित वैजनाथ यांच्या सहकार्याने बायबलच्या भाषांतराला प्रारंभ केला. १८०५ मध्ये कॅरींनी बंगालमधील सेरामपूर येथे संत मॅथ्यूंचे शुभवर्तमान (गॉस्पेल) हे पुस्तक मोडी लिपीत प्रसिद्ध केले. मराठीमधील पहिल्या छापील पुस्तकाचा मान संत मॅथ्यूंच्या या शुभवर्तमानाला मिळतो. १८०७ साली त्यांनी ‘नवा करार’ प्रसिद्ध केला. अन्य भारतीय भाषांत बायबलचे भाषांतर करणे सुलभ व्हावे म्हणून त्यांनी १८०८ या वर्षी ‘नव्या करारा’चे संस्कृत भाषांतर प्रसिद्ध केले; तर १८१८ साली कोकणी भाषांतर प्रसिद्ध केले. त्याला मोठा जनाश्रय मिळाला. कॅरींनी बायबलच्या काही भागांचे किंवा संपूर्ण बायबलचे भाषांतर ४० भारतीय भाषांत करण्याचा किंवा करवून घेण्याचा विश्वविक्रम केला आहे.

अमेरिकन मिशनने १८१६ साली मुंबईला छापखाना सुरू केला. १८१७ साली त्यांनी संत मॅथ्यूंचे शुभवर्तमान हे पुस्तक प्रसिद्ध केले. महाराष्ट्रात छापलेले ते पहिले मराठी पुस्तक आहे. त्यानंतर अमेरिकन मिशनने कॅरींचे भाषांतर बाजूला ठेवून मूळ ग्रीकवरून ‘नव्या करारा’चे भाषांतर करण्यास सुरुवात केली. १८१७ साली अमेरिकन मिशनने संत मॅथ्यूंच्या शुभवर्तमानाचे नवे भाषांतर प्रसिद्ध केले.

त्यानंतर जॉन टेलर यांनी स्वतंत्रपणे संत मॅथ्यूंच्या शुभवर्तमानाचे भाषांतर तयार केले. ते पुढे बायबल सोसायटीने छापले. १८२६ साली अमेरिकन मिशनने संपूर्ण ‘नवा करार’ मराठीत प्रसिद्ध केला. ते भाषांतर लोकप्रिय झाले नाही. १८३६ साली मराठी बायबलची सुधारित आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली. संपूर्ण मराठी बायबल (‘जुना’ आणि ‘नवा करार’) १ मार्च १८४७ रोजी अमेरिकन मिशनच्या छापखान्यात छापण्यात आले.

बायबल सोसायटीने मखिकन यांच्या अध्यक्षतेखाली भाषांतर सुधारणा समिती नेमली. बाबा पदमनजी, रेव्हरंड जस्टीन ॲ‍बट यांचा त्या समितीत समावेश होता. बाबा पदमनजी यांच्या मृत्यूनंतर एक वर्षाने ‘नव्या करारा’ची सुधारित आवृत्ती १९०७ साली प्रसिद्ध झाली. या समितीवर काम करणारे बाबा पदमनजी हे पहिले देशी ख्रिस्ती होते.

इसवी सन १९२० साली रेव्हरंड डी. एल. जोशी या भारतीय ख्रिस्ती विद्वानाने अथक प्रयत्न करून तयार केलेली बायबलची सुधारित आवृत्ती १९२४ साली प्रसिद्ध झाली (त्यानंतर किरकोळ दुरुस्त्या करून बायबलच्या आवृत्त्या प्रसिद्ध होत आहेत).

बायबलचे एकहाती, एकटाकी भाषांतर करणाऱ्या पंडिता रमाबाई या जगातील एकमेव महिला असाव्यात. त्यांनी १८ वर्षे अहोरात्र मेहनत करून १९२२ साली हिब्रू व ग्रीक या मूळ भाषांतून बायबलचे मराठी भाषांतर पूर्ण केले. बायबलची छपाई करण्यासाठी त्यांनी पुण्याजवळील केडगाव येथील आश्रमात खास छापखाना घातला. बायबलच्या शेवटच्या पुस्तकातील शेवटच्या वाक्याचे भाषांतर त्यांनी पूर्ण केले आणि त्याच रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे भाषांतर १९२४ साली मुद्रित झाले. बायबलमधील धार्मिक, भाषिक व तात्त्विक संकल्पना शुद्ध ठेवता याव्यात म्हणून पंडिता रमाबाई यांनी हिंदू संकल्पनांशी निगडित शब्दांचा वापर कटाक्षाने टाळला आहे. उदा., परमेश्वर, पुत्र आदी शब्दांना त्यांचा विरोध होता. परमेश्वर म्हणजे परम ईश्वर, महादेव (शंकर), तसेच ‘पूत नावाच्या नरकापासून वाचवणारा तो पुत्र’ म्हणून तशा प्रकारचे शब्द त्यांनी टाळले. परमेश्वरासाठी त्यांनी यहोवा हा हिब्रू शब्द आणि पुत्रासाठी मुलगा हा शब्द वापरला आहे.

संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी संत जॉन यांच्या शुभवर्तमानाचे भाषांतर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काम सुरू केले. काही परिच्छेद संदेशमध्ये प्रसिद्धही केले; परंतु त्यांच्या निधनामुळे तो प्रकल्प पुरा होऊ शकला नाही. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी ‘नव्या करारा’तील काही निवडक वचनांचे रूपांतर केले होते. केळकरांनी रूपांतर करताना अतिस्वातंत्र्य घेतले. त्यामुळे मूळ अर्थापासून ते खूप दूर गेले होते. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी उत्पत्ती (Genesis) या पुस्तकातील ३७ ते ४८ या अध्यायांचे इंग्रजीवरून रूपांतर केले.

बायबलच्या भाषांतरावर बसलेला ‘मिशनरी मराठी’ हा शिक्का पुसून काढण्यासाठी बा. ना. आठवले यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक ‘नव्या करारा’चे शुद्ध आणि प्रौढ मराठीत भाषांतर केले. ग्रीक जाणणाऱ्या पंडितांप्रमाणेच त्यांनी मराठी पंडितांचेही सहकार्य घेतले. श्रीपाद म. वर्दे, कृष्णाजी लक्ष्मण आपटे, भवानीशंकरशास्त्री सुखटणकर आदींचे मार्गदर्शन त्यांना लाभले. त्यांचे भाषांतर अप्रतिम आहे. आठवले यांनी केलेल्या ‘नव्या करारा’च्या भाषांतराची पहिली आवृत्ती १९३१ साली प्रसिद्ध झाली.

ख्यातनाम कवी मंगेश पाडगावकर यांनी ‘नव्या करारा’तील चार शुभवर्तमानांचे इंग्रजीवरून अप्रतिम मराठी भाषांतर केले आहे. बायबलच्या मराठी भाषांतराच्या इतिहासातील ही उल्लेखनीय बाब आहे. येशू ख्रिस्त यांच्या जीवनावर त्यांनी केलेल्या मुक्तचिंतनात त्यांच्या कविहृदयाचे आणि अध्यात्मशीलतेचे प्रतिबिंब पडलेले दिसते. मराठी अनुवादित साहित्यात पाडगावकरांनी ही मोलाची भर टाकली आहे.

‘बायबल सोसायटी ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केलेले पवित्र शास्त्र या संपूर्ण बायबलची सतत पुनर्मुद्रणे होत आहेत. ख्रिस्ती समाजात त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. पंडिता रमाबाईंच्या भाषांतराचाही मोठा वाचकवर्ग आहे.

बायबलचा मराठी काव्यानुवाद : वास्तविक बायबलचा पहिला काव्यानुवाद फादर स्टीफन्स यांनी १६१४ साली केला; परंतु त्यानंतर बायबलच्या भाषांतरात कॅथलिकांचे योगदान अत्यल्प राहिले आहे. फादर मॅक्समिलियन झिन्सर या जर्मन धर्मगुरूंनी १९५० च्या दरम्यान ‘नव्या करारा’तील संत मार्क यांच्या शुभवर्तमानाचा मराठीत अनुवाद केला. त्यांनी त्याला येशू असे नाव दिले. पुढे येशूदास या नावाने १९५९ साली कॅथलिकांनी प्रथमच नवीन करार, सुवार्ता आणि प्रेषितांची कृत्ये हे सटीप पुस्तक प्रसिद्ध केले.

पुण्याच्या ‘जीवन वचन प्रकाशना’ने १९८२ साली पवित्र शास्त्र : सुबोध भाषांतर ही संपूर्ण बायबलची सुगम मराठी आवृत्ती प्रसिद्ध केली. तिचे चांगले स्वागत झाले. कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट यांनी संयुक्तपणे १९८७ साली बायबलची आवृत्ती प्रसिद्ध केली; पण ती फारशी लोकप्रिय होऊ शकली नाही.

मराठी सारस्वतांवर बायबलचा प्रभाव : इंग्रजी साहित्याच्या वाचनामुळे अनेक देशी लेखक, कवी आणि विचारवंत यांचा बायबलशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिचय झाला. महात्मा फुले यांना ख्रिस्ती धर्मातील समतेचा विचार भावला होता. येशू ख्रिस्त हेच बळीराजा आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. इंग्रजी काव्याचे वाचन आणि रेव्हरंड टिळकांचा सहवास यांमुळे केशवसुतांचा बायबलशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आलेला असावा. त्यांच्या काही कवितांत ख्रिस्ती विचारांचे प्रतिबिंब पडलेले जाणवते. रेव्हरंड ना. वा. टिळक आणि कवी केशवसुत यांच्या गाठीभेटी झाल्या होत्या. केशवसुतांचा नवा शिपाई सांगतो,

“शांतीचे साम्राज्य स्थापू बघत काळ जो आहे,

प्रेषित त्याचा नव्या दमाचा शूर शिपाई मी आहे”.

‘शांतीचे राज्य’, ‘प्रेषित’ या संकल्पना ‘नव्या करारा’त आढळतात. ‘नियमन मनुजासाठी, मानव नसे नियमनासाठी’ ही काव्यपंक्ती ‘नव्या करारा’तील ‘द सॅबथ (लॉ) वॉज मेड फॉर द सेक ऑफ मॅन अँड नॉट मॅन फॉर द सॅबथ (लॉ)’ या वाक्याचा काव्यानुवाद आहे.

कवी केशवसुत आपल्या एका कवितेत सांगतात, ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे’. त्याच अर्थाचे ‘अनलेस यू बिकम लाइक लिटिल चिल्ड्रेन, यू विल नॉट एन्टर द किंगडम ऑफ हेव्हन’ असे येशू ख्रिस्त यांचे वचन प्रसिद्ध आहे. वरील काव्यपंक्तीवर येशू ख्रिस्त यांच्या वचनाचा प्रभाव नाकारता येत नाही. रेव्हरंड ना. वा. टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक, देवदत्त टिळक यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. त्यामुळे त्यांच्या लेखनावर बायबलचा ठसा उमटणे साहजिकच आहे. टिळक पितापुत्रांनी व लक्ष्मीबाई टिळक यांनी तयार केलेल्या ख्रिस्तायन (१९३८) या ग्रंथाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. नागपूरचे सुधाकर गायधनी यांच्या बायबलच्या संकल्पनेवर आधारित अप्रतिम कविता आहेत.

सदानंद रेगे यांनी ख्रिस्तांवरील कवितांचे एक दालनच मराठी साहित्यात उघडले आहे. बायबलमधील व्यक्ती आणि प्रतिमा यांचा त्यांनी आपल्या कवितांत मुक्तपणे वापर केला आहे. उदा., गॉलगोथा, बेथलेहेमचा सुतार, मरियम मग्दालिना, कोकरू, सफरचंदी सुख इत्यादी. जी. ए. कुलकर्णी यांच्या पिंगळावेळ कथासंग्रहातील ‘यात्रिक’ ही कथा येशू ख्रिस्त यांचा विश्वासघात करणाऱ्या ज्युडास या शिष्याच्या शोकांतिकेवर आधारलेली आहे. ‘क्रूस वाहणे’, ‘मिशनरी वृत्ती’ हे वाक्प्रचार मराठी माणसांच्या मनात रुजले आहेत. बालकवी, बा. भ. बोरकर, विनोबा भावे, भाऊ धर्माधिकारी, अरुण कोलटकर, वि. ज. बोरकर आदींचा बायबलशी परिचय होता, असे दिसून येते. (‘बायबल आणि मराठी साहित्य’ हा स्वतंत्र शोधनिबंधाचा विषय ठरला आहे).

संदर्भ :

  • पाडगावकर, मंगेश, बायबल : नवा करार, भाषांतर व मुक्तचिंतन, मुंबई, २००८.
  • फलकाव, नेल्सन, ख्रिस्तपुराण, बंगळुरू, २००९.
  • लिविंग बायबल इंटरनॅशनल, पवित्र शास्त्र : सुबोध भाषांतर, पुणे, १९८२.

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया