राजगुरू, शरद नरहर : (२६ नोव्हेंबर १९३३). विख्यात भूवैज्ञानिक व आद्य भारतीय भूपुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून भूविज्ञानात एम. एस्सी. ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते डेक्कन कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून रुजू झाले (१९६०) आणि तेथूनच त्यांनी भारतीय पुरातत्त्वशास्त्रात भूरूपशास्त्रीय विश्लेषण करण्याचा पाया रचला.

जी. जी. मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरूंनी ‘पुणे जिल्ह्यातील मुळा-मुठा नदीचा प्लाइस्टोसीन काळातील निक्षेपांचा इतिहासʼ या विषयावर पीएच. डी. साठीचे संशोधन सुरू केले. त्यांनी प्लाइस्टोसीन काळात झालेले भूशास्त्रीय आणि भूरूपीय बदल जाणून घेण्यासाठी शास्त्रीय आणि सखोल क्षेत्रीय संशोधनावर भर दिला. त्यांच्या संशोधनाचा भौगोलिक प्रदेश मुळा-मुठा नद्यांची खोरी हा होता; परंतु त्यांनी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नद्यांच्या खोऱ्यांत क्षेत्रीय संशोधन केले. या काळात डेक्कन कॉलेजमधील पुरातत्त्व विभागातर्फे गंगापूर, नेवासा, चिरकी या ठिकाणी करण्यात आलेल्या आद्य अश्मयुगीन स्थळांच्या पुरातत्त्वीय उत्खननात सक्रिय सहभाग घेऊन प्राचीन काळात नद्यांचे स्वरूप कसे होते, याविषयी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. याच काळात १९६०-६१ मध्ये डेक्कन कॉलेजच्या निमंत्रणावरून प्रसिद्ध भूपुरातत्त्वज्ञ एफ. ई. झॉयनर भारतात दुसऱ्यांदा आले आणि राजगुरूंना त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय संशोधन करण्याचे प्रशिक्षण मिळाले. या प्रशिक्षणामुळे राजगुरूंच्या संशोधनात भूरूपशास्त्रीय ज्ञानाचे नवे दालन उघडले आणि पर्यायाने डेक्कन कॉलेजमध्ये प्रागैतिहासिक संशोधनामध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. १९७० मध्ये पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त केल्यांनतर राजगुरूंनी आपल्या क्षेत्रीय संशोधनाची व्याप्ती महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यांत वाढवली. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन करण्यासाठी त्यांची निवड झाली होती (१९७३). त्या वेळी त्यांनी तेथील वाळवंटामध्ये संशोधन केले.

भारतातील आद्य भूपुरातत्त्वज्ञ म्हणून राजगुरूंनी देशभर नद्या-नाले, नद्यांची खोरी, दऱ्या, पठारे, सागर किनारे आदी भूपृष्ठांचा विकास कसा झाला, यावर महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदविली. वीरेंद्रनाथ मिश्र आणि राजगुरू यांच्या नेतृत्वाखाली डेक्कन कॉलेजतर्फे दीडवाना, नागौर जिल्हा, राजस्थान येथील २० मी. उंच वाळूच्या टेकडीचे (sand dune) उत्खनन करण्यात आले. हा प्रकल्प बहुविद्याशाखीय संशोधनाचे एक उत्तम उदाहरण आहे. याशिवाय राजगुरूंनी  ६० वर्षांहून अधिक काळ दख्खनच्या पठारावरील भीमा, गोदावरी, कृष्णा आणि त्यांच्या अनेक उपनद्यांच्या खोऱ्यांतून भूपुरातत्त्वीय क्षेत्रीय संशोधन केले आणि या भागाचा प्लाइस्टोसीन काळातील इतिहास अचूकपणे मांडला. यामुळे भारतीय प्रागैतिहासात एक वेगळा दृष्टिकोन मांडला गेला. याबरोबरच राजगुरू हे पहिले असे भूपुरातत्त्वज्ञ आहेत, ज्यांनी निरपेक्ष कालमापनाचा उपयोग केला. राजगुरूंनी जांभा खडकाचा सखोल अभ्यास करून त्याच्या उत्पत्तीविषयी प्रारूप मांडले. भीमा खोऱ्यात बोरी आणि मोरगाव या आद्य पुराश्मयुगीन स्थळांवर ज्वालामुखीय राखेचा शोध आणि नंतर त्याचे कालमापन हा राजगुरूंच्या संशोधनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. राजगुरू आणि आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रदीर्घ संशोधनावर आधारित १५० हून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानांकित नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले असून देशविदेशांत त्यांच्या संशोधनाला मान्यता मिळालेली आहे.

राजगुरू जिओआर्किऑलॉजी या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाचे अतिथी संपादक (गेस्ट एडिटर) होते. तसेच ते नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस, अलाहाबाद, या प्रतिष्ठित संस्थेचे निवडलेले सभासद (elected fellow) आहेत. एशियाटिक सोसायटी, कोलकाता यांच्या तर्फे राजगुरूंना सुवर्णपदक देऊन त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा गौरव केला गेला (२००८). तसेच इंटरनॅशनल युनियन फॉर क्वाटर्नरी रिसर्च (INQUA) या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांची आजीवन सदस्य म्हणून निवड केली (२०११).

निवृत्तीनंतरही राजगुरूंचे क्षेत्रीय संशोधन अविरतपणे चालू असून भूपुरातत्त्वामधील संशोधनाचा प्रदीर्घ अनुभव आणि त्यांनी दिलेले सातत्यपूर्ण योगदान अभ्यासकांसाठी एक मापदंड ठरले आहे.

संदर्भ :

  • Wadia, Statira; Korisettar, Ravi; Kale, Vishwas S. Eds., Quaternary Environments and Geoarchaeology of India: Essays in Honour of Professor S. N. Rajaguru, Geological Society of India Memoir 32, Bangalore, 1995.
  • जोशी, प्रकाश, ‘शरद नरहर राजगुरूʼ, आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण  :शिल्पकार चरित्रकोश, खंड ८, भाग १ (संपा., पाठक, अरुणचंद्र), पृष्ठे ३७७-३७८, भारतीय इतिहास अनुसंधान परिषद (आयसीएचआर), नवी दिल्ली, २०१८.

                                                                                                                                                                             समीक्षक : प्रमोद जोगळेकर