मिश्रा, विद्याधर : (३ जुलै १९४१ – २१ सप्टेंबर २०२०). विख्यात भारतीय पुरातत्त्वज्ञ. गंगेच्या खोऱ्यातील प्रागितिहासाचे विशेष संशोधक. व्ही. डी. मिश्रा या नावानेही परिचित. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यामधील (पूर्वीचा वाराणसी जिल्हा) बंकटभिखारी रामपूर या गावात झाला.

मिश्रा यांनी ग्यानपूर येथील काशी नरेश शासकीय महाविद्यालयातून इंग्रजी साहित्य, संस्कृत आणि इतिहास या विषयांमध्ये बी. ए. पदवी घेतली (१९५९). तसेच अलाहाबाद विद्यापीठातून प्राचीन इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व या विषयांत एम. ए. पदवी प्रथम वर्गात प्राप्त केली (१९६१). तेथेच ते व्याख्याता झाले (१९६१) व पुढे ते प्रपाठक झाले (१९७१). १९८७ पासून सेवानिवृत्तीपर्यंत त्यांनी प्राध्यापक म्हणून अलाहाबाद विद्यापीठात अध्यापन केले. या कालावधीत ते विभागप्रमुख होते (१९९७-२००१). अलाहाबाद विद्यापीठात त्यांनी अनेक प्रशासकीय पदे भूषवली. अलाहाबाद युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनचे ते अध्यक्ष होते (१९९२).

केवळ पुरातत्त्वच नव्हे, तर प्राचीन इतिहास व संस्कृती यांचे सर्व पैलू शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. तसेच त्यांनी दीर्घकाळ स्पर्धा परीक्षांसाठी आधुनिक इतिहास आणि राजकीय व सामाजिक इतिहास या विषयांवर मार्गदर्शन केले. प्राचीन काळातील घटनांच्या तार्किक आणि वैज्ञानिक विश्लेषणाबद्दल त्यांची ख्याती होती. त्यांची व्याख्याने त्यांच्या अध्यापनाची शैली आणि शुद्ध हिंदी भाषेमुळे नेहमीच आकर्षक असत. त्यांनी प्रागितिहास, आद्य इतिहास, कला इतिहास, प्राचीन धर्म इत्यादी पुरातत्त्वाच्या विविध शाखांमधील २१ संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मिश्रा यांनी १३ पुस्तके आणि ८० पेक्षा अधिक शोधनिबंध प्रकाशित केले.

मिश्रा आणि आर. के. वर्मा, डी. मंडल, बी. बी. मिश्रा, जयनारायण पांडे व जे. एन. पाल या त्यांच्या तेवढ्याच तोलामोलाच्या सहकाऱ्यांच्या योगदानामुळे गंगेच्या व विंध्य पर्वतातील प्रागितिहासाच्या संशोधनाला चालना मिळाली. विशेषतः मध्याश्मयुगीन कालखंडाचे त्यांचे संशोधन महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी अभ्यासलेल्या व उत्खननात सहभाग घेतलेल्या पुरातत्त्वीय स्थळांमध्ये लेखाहीया (१९६४), चोपनी मांडो (१९६६-६७), सराय नाहर राय (१९७२-७४), कोल्डीहवा (१९७९), महादहा (१९७८-७९), कुंझुन (१९८२), दमदमा  (१९८३-८७), धनुही शैलाश्रय (१९९६), अमिलकोनी (१९९८), टोकवा (२०००) आणि झुसी (१९९५-२००२) यांचा समावेश आहे. या पुरातत्त्वीय अन्वेषणांमध्ये मिश्रा यांनी वैज्ञानिक कामांसाठी बीरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओसायन्सेस, लखनौ आणि डेक्कन कॉलेज, पुणे या संस्थांची मदत घेतली. सोन, बेलन व अडवा या नद्यांच्या खोऱ्यांतील अश्मयुगीन संस्कृती व तत्कालीन पर्यावरण यांच्यासंबंधी भूपुरातत्त्वीय संशोधनात त्यांचा मोलाचा वाटा होता.

मिश्रा हे १९९८ मध्ये इंडियन आर्किऑलॉजिकल सोसायटी, दिल्ली आणि २००५ मध्ये इंडियन सोसायटी फॉर प्रिहिस्टॉरिक अँड क्वाटर्नरी स्टडीज, पुणे या संस्थांचे अध्यक्ष होते. २०१० ते २०१२ या दरम्यान ते टागोर नॅशनल फेलो होते. त्यांच्या पुरातत्त्वातील उल्लेखनीय योगदानाबद्दल इंडियन सोसायटी फॉर प्रिहिस्टॉरिक अँड क्वाटर्नरी स्टडीज या संस्थेने आर. के. शर्मा या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले (२०१९).

अलाहाबाद येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Misra, V. D. & Pal, J. N. Eds., Mesolithic India, Allahabad : University of Allahabad, 2002.
  • Misra, V. D.; Pal, J. N.; Gupta, M. C. & Joglekar, P. P. Excavations at Jhusi, New Delhi : Indian Archaeological Society, 2009.

                                                                                                                                                                                               समीक्षक : सुषमा देव