सुब्बाराव, बेंडापुडी : (१९२१ — २९ मे १९६२).  प्रसिद्ध भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील वॅाल्टेअर (विशाखापट्टनम) येथे झाला. सुब्बाराव यांचे महाविद्यालयीन शिक्षण आंध्र विद्यापीठात झाले.  बी. ए.  पदवीसाठी त्यांना आंध्र विद्यापीठाचे ‘लक्ष्मणराव’ सुवर्णपदक मिळाले. पदवीचे शिक्षण घेत असताना एका अपघातात त्यांना आपला उजवा हात गमवावा लागला. तरी त्यांनी त्याचा आपल्या कोणत्याही कामावर परिणाम होऊ दिला नाही. पुढील शिक्षणासाठी ते लखनौ विद्यापीठात गेले आणि तेथून प्राचीन भारतीय इतिहास या विषयात एम. ए. पदवी प्राप्त केली (१९४५). त्यानंतर सुब्बाराव पुणे येथे डेक्कन कॉलेजमध्ये पीएच. डी पदवीसाठी दाखल झाले आणि ह. धी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठाची पीएच.डी पदवी मिळवली (१९४९). ’स्टोन एज कल्चर्स ऑफ बळ्ळारी’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. प्रबंधासाठी संशोधन करताना त्यांनी कर्नाटकातील बळ्ळारी शहराजवळच्या संगनकल्लू येथे छोटे पण शिस्तबद्ध असे उत्खनन केले.

पीएच.डी. पदवीसाठी संशोधन करत असतानाच त्यांना हडप्पा, ब्रह्मगिरी, कोल्हापूर आणि लांघनज येथे उत्खनन करण्याचा अनुभव मिळाला. या काळात त्यांना ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ सर मॅार्टिमर व्हीलर (१८९०—१९७६) यांच्याकडे मिळालेले प्रशिक्षण बहुमूल्य ठरले. त्यांना १९४९ मध्ये विख्यात भूपुरातत्त्वज्ञ एफ. ई. झॅायनर (१९०५—१९६३) यांच्याबरोबर देशभरात अनेक ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. त्यातून त्यांची पर्यावरणीय पुरातत्त्वीय विज्ञानाचा उपयोग करण्याची दृष्टी विकसित झाली. सुब्बाराव यांना झॅायनर यांच्याबरोबर काम करण्याचा फायदा गुजरातमधील लांघनज या स्थळाच्या उत्खननात झाला. तेथे मिळालेले मानवी सांगाडे हे मध्याश्मयुगीन कालखंडातील आहेत, हे त्यांनी भूपुरातत्त्वीय पद्धती वापरून दाखवून दिले.

सुब्बाराव बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात व्याख्याता पदावर रुजू झाले (१९५०). त्यांनी माही नदी परिसराच्या पुरातत्त्वीय सर्वेक्षणाची सुरुवात केली. या सर्वेक्षणात अनेक पुराश्मयुगीन व सूक्ष्मास्त्रे असलेली स्थळे सापडली. त्यांनी मध्य गुजरातमधील सूक्ष्मास्त्र स्थळांची (microlithic sites) वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी आम्रपुरा येथे छोट्या प्रमाणावरील उत्खनन केले. तसेच बडोदा येथील अकोटा भाग व वैद्यकीय महाविद्यालयाच्या भागात केलेल्या उत्खननामुळे बडोदा शहराची प्राचीनता सिद्ध झाली.

सुब्बाराव यांच्या नेतृत्वाखाली महाराजा सयाजीराव विद्यापीठ आणि सुब्बाराव यांचे गुरू ह. धी. सांकलिया यांच्या नेतृत्वाखाली डेक्कन कॉलेजने एकत्रितपणे मध्य प्रदेशातील महेश्वर आणि नावडातोली येथे अत्यंत महत्त्वाकांक्षी उत्खनन कार्यक्रम हाती घेतला (१९५२-५३). पुढे या उत्खननाचे निष्कर्ष प्रकाशित झाले (१९५८). याखेरीज सुब्बाराव यांनी केलेल्या वडनगर (१९५२), आमरा (१९५६), लखाबावळ (१९५६) आणि सोमनाथ (१९५६-५७) अशा अनेक उत्खननांमुळे भारतीय पुरातत्त्वविद्येत महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाची वेगळी ओळख तयार झाली. सुब्बाराव यांचे विशेष योगदान असे की, त्यांना सौराष्ट्रातील हडप्पाकालीन पुरातत्त्वीय स्थळांवर प्रादेशिक अथवा ताम्रपाषाणयुगीन थर नेमके ओळखता आले. प्रारंभी त्यांच्या या निरीक्षणाकडे फारसे लक्ष गेले नव्हते; तथापि नंतर हे मत सिद्ध झाले.

सुब्बाराव यांच्यावर एफ. जे. रिचर्डस यांच्या भारतीय पुरातत्त्व आणि भौगोलिक घटक यांची सांगड घालण्याच्या कल्पनेचा प्रभाव होता. त्यांनी या कल्पनेचा उपयोग करून आंध्र प्रदेशाच्या इतिहास आणि पुरातत्त्वामधील भौगोलिक घटक या विषयावर शोधनिबंध प्रकाशित केला. तसेच या कल्पनेचा विस्तार करून त्यांनी त्यांच्या पर्सनॅलिटी ऑफ इंडिया (१९५६) या गाजलेल्या पुस्तकात भारतीय उपखंडातील प्रागैतिहासिक काळापासून ऐतिहासिक काळापर्यंतच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक विकासासाठी प्रथमच स्पष्टीकरण दिले.

सुब्बाराव १९५९ मध्ये पूर्णवेळ प्राध्यापक पदावर नियुक्त झाले. त्याच वर्षी त्यांनी उत्तर गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील देवनीमोरी येथे उत्खनन हाती घेतले. या उत्खननामुळे गुजरातच्या आद्य ऐतिहासिक पुरातत्त्वात एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली. या स्थळावर गांधार स्थापत्य शैलीशी साधर्म्य असलेला आणि भारतातील विटांनी बांधलेल्या सर्वांत मोठ्या स्तूपांपैकी एक असा स्तूप आढळला. तसेच या उत्खननात भगवान बुद्धांच्या शरीराचे अवशेष असलेला अस्थिकरंडक (relic casket) प्राप्त झाला.

ब्रिटिश कौन्सिलमार्फत सुब्बाराव यांना कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटी इंटरचेंज योजनेमधून लंडन विद्यापीठाच्या ’इन्स्टिट्यूट ऑफ आर्किऑलॅाजी’ या संस्थेत प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली.  तेथील प्रशिक्षण व संशोधनाचा आणि संशोधनातील अनुभवाचा परिणाम त्यांच्या नंतरच्या लेखनात दिसून येतो. ‘आपण या संस्थेच्या धर्तीवर आपला विभाग पुरातत्त्व वैज्ञानिक प्रयोगशाळांनी सुसज्ज करू’, असे त्यांनी एका पत्रात लिहिले होते.

अन्नामलाईनगर येथे १९५५ मध्ये झालेल्या ’ऑल इंडिया ओरिएंटल कॅान्फरस’ मधील पुरातत्त्व विभागाच्या अध्यक्षपदाचा सन्मान त्यांना लाभला.

वयाच्या चाळीसाव्या वर्षी वॅाल्टेअर ते वडोदरा या रेल्वेप्रवासात सुब्बाराव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सर मॅार्टिमर व्हीलर यांनी “मला कृतज्ञतेने सांगायचे आहे की, प्राध्यापक सुब्बाराव हे एकेकाळी माझे विद्यार्थी होते, परंतु मी त्यांना शिकवण्यापेक्षा त्यांनीच मला जास्त शिकवले आहे”, असे गौरवाने लिहिले होते.

संदर्भ :

  • SoundaraRajan, K. V. ‘Obituary’, Journal of Oriental Institute, M. S. University of Baroda, 3 : 304-305, 1962.
  • Subbarao, B. The Stone Age Cultures of Bellary, Deccan College Dissertation Series, No. 7, Pune, 1948.
  • Subbarao, B. Baroda Through the Ages, M. S. University Archaeology Series, No. 1, Baroda, 1953.
  • Subbarao, B. The Personality of India, M. S. University Archaeology Series, No. 3, Baroda, 1958.

                                                                                                                                                  समीक्षक : सुषमा देव