निसर्गनियमांवर आधारलेली एक

वैद्यकीय उपचारपद्धती किंवा वैद्यकीय शाखा. होमिओपॅथी पद्धतीला ‘समचिकित्सा पद्धती’ असेही म्हणतात. या उपचारपद्धतीचे सूत्र ‘सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर’ म्हणजेच ‘काट्याने काटा काढणे’ (सम: समं शमयति) हे आहे. होमिओपॅथी उपचार पद्धतीचा शोध क्रिस्टिआन फ्रीड्रिक सॅम्युअल हानेमान (१७५५–१८४३) या जर्मन शरीरक्रियावैज्ञानिकाने लावला. हानेमान यांनीच परंपरागत वैद्यकीय पद्धतीला ‘ॲलोपॅथी’ व स्वत:च्या पद्धतीला ‘होमिओपॅथी’ ही नावे दिली. होमिओपॅथीचा प्रारंभ सिंकोना या वनस्पतीच्या खोडाच्या परीक्षणातून लागला, असे म्हणता येईल. हानेमान हे प्राध्यापक विल्यम कलेन ब्रायंट यांच्या ‘मटेरिया मेडिका’ या ग्रंथाचे भाषांतर करीत होते. त्या वेळेस त्यांना पेरू देशातील स्थानिक वृक्षाच्या (पेरूव्हियन वृक्ष) सालीच्या उपचाराने वरचेवर येणारा ताप बरा होतो, अशा कलेन यांच्या निरीक्षणाने आकर्षित केले. हानेमान यांनी स्वत:वर प्रयोग सुरू केले आणि दररोज ४ ग्रॅ. सिंकोनाची साल खायला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांतच त्यांना हातपाय थंड पडणे, ग्लानी येणे, थकवा जाणवणे, छातीत धडधड होणे, शरीर थरथरणे, मुदतीचा ताप येणे अशी लक्षणे दिसू लागली. या लक्षणांमध्ये आणि हिवतापाच्या लक्षणांमध्ये सारखेपणा होता. हानेमान यांच्या असेही लक्षात आले की सिंकोनाची मात्रा बंद केली, तर लक्षणे जाणवत नाहीत, पुन्हा मात्रा चालू केली तर लक्षणे जाणवतात. या प्रयोगावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की कोणतेही औषध तोच आजार बरा करू शकते, जे निरोगी व्यक्तीला दिले असता त्या आजाराची विशिष्ट लक्षणे निर्माण करू शकते. जसे, कांद्यामुळे डोळ्यांत पाणी येते आणि नाकातून पाण्यासारखा स्राव येतो. ही लक्षणे सर्दीची आहेत. म्हणून सर्दीवरील उपचारांसाठी होमिओपॅथीमध्ये कांदा वापरतात. थोडक्यात, रुग्णाला जे औषध दिले जाते ते औषध निरोगी व्यक्तीला दिले असता, त्या रोगाची लक्षणे उत्पन्न करते.

होमिओपॅथी एक आदर्श उपचार पद्धती आहे; कारण ही उपचार पद्धती सौम्य आहे. याच्या उपचाराने आजार मुळापासून बरा होतो. होमिओपॅथी उपचाराचे दुष्परिणाम होत नाहीत. होमिओपॅथी उपचारात प्रथम रुग्णाच्या आजाराची लक्षणे नोंदवली जातात आणि रुग्णाच्या विस्तृत माहितीवरून व लक्षणांवरून ज्या औषधात रुग्णाची जास्तीत जास्त लक्षणे मिळतीजुळती आहेत, असे औषध रुग्णाला दिले जाते. होमिओपॅथी औषधाची मात्रा सूक्ष्म असते व एकच अलक्षणी वेळी एकच औषध दिले जाते. होमिओपॅथी औषधांचे सिद्धीकरण हे गिनीपिगसारख्या प्राण्यांवर न होता थेट सर्व वयांच्या निरोगी स्त्री-पुरुषांवर केले जाते. त्यामुळे शारीरिक, मानसिक व लैंगिक लक्षणे दिसून येतात.

होमिओपॅथीचे चिकित्सक उपचारापूर्वी रुग्ण कुष्ठ (सोरा – कमतरतेमुळे होणारे आजार), प्रमेह (सायकोसिस – अधिकतेमुळे होणारे आजार) व उपदंश (सिफिलिस – संहारकता, विनाश) या त्रिदोषांपैकी कोणत्या गटातील आहे, ते ठरवून उपचार करतात. होमिओपॅथी औषध पदार्थातील सुप्त औषधी गुण प्रभावन पद्धतीने (प्रभावी करण्याच्या) तयार करतात. हे औषध जिभेवर पडताक्षणीच ते (शरीरद्रव्यात) श्लेष्मल त्वचेवाटे व जठरामार्फत सर्वत्र पोहोचते. केवळ औषध हुंगण्याने देखील किंवा त्वचेवर द्रव स्वरूपाचे औषध घेतल्याने औषध प्रभावीपणे कार्य करू शकते. समान लक्षणानुसार सूक्ष्म औषधाची मात्रा दिल्यानंतर ते समान लक्षण असणाऱ्या नैसर्गिक रोगाचे नियंत्रण करते आणि नैसर्गिक रोग, बाधित भाग बरा होतो. होमिओपॅथीमुळे आजारमुक्ती शरीराच्या आतून होते. जी तक्रार प्रारंभी उद्भवते, ती सर्वांत शेवटी नाहीशी होते. होमिओपॅथी उपचार पद्धतीत उपचार सुरू झाले की, प्रथम रोगाची लक्षणे थोडी तीव्र होतात. औषध रोगलक्षणांशी समगुणी असल्यामुळे असे होणे साहजिकच असते. सुरुवातीला होणारी ही तीव्र लक्षणे कमी होण्यासाठी औषधाची मात्रा कमी दिली जाते. यासाठी साखर किंवा अल्कोहॉल किंवा पाणी अशा पदार्थांशी औषधाचे अवमिश्रण केले जाते.

होमिओपॅथी उपचारात असलेल्या काही औषधांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत; (१) शाकप्रकार : कुचला, अनंतमूळ, ब्रायोनिया इत्यादींसारख्या वनस्पतींचा वापर.  (२) खनिजप्रकार : गंधक, सिलिका, कार्बन इ. खनिज पदार्थांचा वापर. (३) रोगोत्पन्न प्रकार : काही रोगांमध्ये उत्पन्न होणारे पदार्थ; उदा., ट्युबरक्युलिनम हे होमिओपॅथी औषध क्षयरोगात निर्माण झालेल्या पू पासून तयार केले जाते. तसेच रेबिज झालेल्या कुत्र्याच्या लाळेपासून लायसिन हे औषध तयार करतात; (४) जीवरसोत्पन्न प्रकार : प्राण्यांच्या जीवरसापासून उत्पन्न झालेले पदार्थ; उदा., लाचेसिस. होमिओपॅथीची औषधे घेण्यास सुटसुटीत असतात. या पद्धतीत जिभेवर औषधाच्या तीन किंवा चार बारीक गोळ्या (गुटिका) ठेवून औषध देता येते किंवा पाणी पिण्याच्या भांड्यात २/३ पाणी ठेवून त्यात औषधाच्या गोळ्या विरघळवून तयार झालेले औषध पिता येते.

होमिओपॅथीक उपचार पद्धतीत रुग्णाच्या पूर्ण शरीराचा विचार केला जात असल्याने रुग्णाला पूर्णपणे व कायमचे बरे करण्याचा उद्देश असतो. त्यामुळे उपचार चालू केले की मुख्य लक्षणांबरोबर इतर लहानमोठी लक्षणेसुद्धा कमी होतात. ॲलोपॅथी उपचार पद्धतीप्रमाणे प्रत्येक वेगळ्या तक्रारीसाठी निरनिराळ्या डॉक्टरांकडून उपचार करून घेण्याची गरज पडत नाही. होमिओपॅथीमध्ये शरीरातील प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यास मदत होते आणि शरीर निरोगी व निकोप राहते.

सध्याच्या काळात विशेषत: पाश्चात्त्य देशांत होमिओपॅथीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. होमिओपॅथीवर बऱ्याच प्रमाणात टीका होऊ लागली आहे. या टीकाकारांनुसार ज्याप्रमाणे ॲलोपॅथीचा बहुअंगांनी विस्तार झाला आहे आणि अनेक रोगांच्या मूळ कारणांवर संशोधन होऊन औषधांचा व तंत्रांचा विकास झाला आहे, तसे होमिओपॅथीत घडलेले नाही. होमिओपॅथीतील काही गृहीतकांना अजूनही सबळ वैज्ञानिक आधार मिळालेला नाही. विशेषत: औषधाचे विरलीकरण जितके जास्त तेवढी त्याची क्षमता (पोटन्सी) अधिक असे जर होमिओपॅथीनुसार मानले, तर क्षमतेच्या सर्वोच्च पातळीला विरलीकरण इतके असेल की त्यावेळेस मूळ औषधाचा एकही रेणू औषधी द्रावणात नसेल, असा निष्कर्ष काढावा लागतो. म्हणून असे औषध सक्षम कसे असू शकेल, असा प्रश्न होमिओपॅथीचे टीकाकार विचारतात. तसेच अनेक वेळा रुग्णाला प्रत्यक्ष औषध न देता, नुसतेच द्रावण देऊन त्याला औषध दिले जात आहे अशी त्याची धारणा करून दिली गेली, तरी त्याला बरे वाटते असे आढळून येते. याला ‘तोषक परिणाम (प्लासिबो इफेक्ट)’ म्हणतात. होमिओपॅथीच्या टीकाकारांचे म्हणणे असे की, होमिओपॅथीतील औषधांचा परिणाम हा तोषक परिणामांपेक्षा वेगळा नसतो.