संदर्भ : मुंबई येथील रायटर्स सेंटर या संस्थेने १९७५ मध्ये संदर्भ हे द्वैमासिक सुरू केले. रायटर्स सेंटर या संस्थेची स्थापना १९६२ मध्ये झाली. या संस्थेने प्रारंभीच्या काळात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, मराठीसह भारतीय भाषांतील साहित्यिकांना लेखन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अभ्यासवृत्ती देणे वगैरे साहित्यसंस्कृतीविषयक उपक्रम राबविले. मात्र त्यानंतर काही वर्षे या संस्थेचे कार्य थांबले होते. संदर्भ हे द्वैमासिक मुखपत्र सुरू करून ही संस्था पुन्हा कार्यान्वित झाली. रायटर्स सेंटरचे सचिव रामदास भटकळ हे संदर्भचे प्रकाशक होते. नागपूर येथील अमेय प्रकाशन संस्थेचे प्रमुख मनोहर पिंपळापुरे आणि श्रीपाद मुंजे यांनी संदर्भची व्यवस्थापकीय जबाबदारी स्वीकारली होती. कवी ग्रेस हे संदर्भचे संपादक होते. तर मनोहर पिंपळापुरे हे संदर्भ समितीचे सचिव होते. या द्वैमासिकाचा जानेवारी फेब्रुवारी १९७५ या काळाचा पहिला अंक प्रकाशित झाला. मात्र संदर्भ हे नियतकालिक अल्पजीवी ठरले. पण अगदी अल्पकाळात या नियतकालिकाने वाङ्मयीन आणि कलाव्यवहारात महत्त्वाचे स्थान निर्माण केले होते.
संदर्भच्या पहिल्या अंकाच्या प्रारंभी संपादक ग्रेस यांनी ‘संदर्भेषु दशरूपकं श्रेयः’ या शीर्षकाचे संपादकीय मनोगत लिहिले आहे. सत्यकथेच्या स्वागतशील, प्रयोगशील, संवेदनशील अशा सौंदर्यनिष्ठ जीवनदृष्टीचा गौरव करणाऱ्या ग्रेस यांच्या संपादकीय कार्यशैलीवर सत्यकथेचा थोडा प्रभाव होता. ललितसाहित्याबरोबरच ललितकलांच्या आविष्करणाबाबतही हे नियतकालिक फार सजग होते. संदर्भच्या सर्व अंकांची मुखपृष्ठे चित्रकार सुभाष अवचट यांनी तयार केली आहेत. पहिल्या अंकात सुभाष अवचट, अनिल अवचट, अरुण मेंदुले, वसंत आबाजी डहाके यांची रेखाटने आहेत. अनिल अवचट यांची ‘हत्ती : सात रेखाटने’ ही रेखाचित्र मालिका या अंकाचे एक वैशिष्ट्य होय. संदर्भच्या सर्व अंकांतून चित्रकलेची एक प्रगल्भ जाण व्यक्त झाली आहे. चित्र, संगीत या कलांच्या संदर्भातले लेखन संदर्भमध्ये प्रकाशित केलेले आहे. लेखन चित्र आणि संगीत या कलांविषयीच्या निरोगी चर्चेची गरज अधोरेखित करतानाच वाङ्मयीन नियतकालिकांनी ललित साहित्यासह सर्वच कलाविषयक चर्चा-चिकित्सांना प्रमुख स्थान दिले पाहिजे, ही जाणीवही अधोरेखित करते. एकूण संदर्भच्या सर्वच अंकांतून चित्र, संगीत, साहित्य या कलांच्या परस्परसंवादाचा एक सेतू प्रकट झालेला दिसतो. ललित साहित्य आणि कला यांचे साहचर्य हे संदर्भचे एक वैशिष्ट्य होय.
संदर्भमध्ये कवी कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, इंदिरा संत, नामदेव ढसाळ, अरुण कोलटकर, आरती प्रभू, शंकर वैद्य, ना. धों. महानोर, पु. शि. रेगे, सदानंद रेगे, प्रभा गणोरकर, गुरुनाथ सामंत, शंकर रामाणी, वसंत दत्तात्रय गुर्जर, वृंदा लिमये, वा. रा. सोनार, वसंत पाटणकर, विलास सारंग, नारायण कुलकर्णी कवठेकर यांच्या कवितांसह त्या काळात प्रख्यात असलेल्या अनेक कवींच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत. याशिवाय हृदयनाथ मंगेशकर, सुभाष अवचट, किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे या कलावंतांच्याही कविता आहेत. चंद्रकांत पाटील यांनी अनुवादित केलेल्या विष्णू खरे यांच्या कविता एका अंकात आहेत. शिवाय त्या काळातील काही नव्या कवींच्याही कविता संदर्भमध्ये दिसतात. त्या काळाचे आणि त्या पिढीचे संवेदन या सर्व कवितांमध्ये दडले आहे. सशक्त आशयाच्या दर्जेदार कविता संदर्भच्या प्रत्येक अंकातून प्रकाशित झालेल्या आहेत.
कवितांसह कथनात्म साहित्याच्या बाबतीतही हे नियतकालिक चोखंदळ असल्याचे दिसते. जी. ए. कुलकर्णी, विलास सारंग, कमल देसाई, ना. धों. महानोर, सानिया, आ. ना. पेडणेकर या कथाकारांच्या कथांसह रवीन्द्रनाथांच्या ‘जय पराजय’ या कथेचा दुर्गा भागवत यांनी केलेला अनुवाद आणि कल्याणसेन व तुलसी सेनगुप्त या कथाकारांच्या दोन कथांचे अशोक शहाणे यांनी केलेले अनुवादही संदर्भमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. ‘ मेंदूचा तुकडा ‘ या शीर्षकाचा भालचंद्र नेमाडे यांचा कथनात्म मजकूर, रत्नाकर मतकरी, माधव आचवल, वसंत आबाजी डहाके, जया दडकर यांच्या नाटिका, वीणा आलासे यांनी बंगाली रंगभूमीवरच्या नाटकांचे केलेले विश्लेषण ‘संदर्भ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. भालचंद्र नेमाडे, शांताराम पारपिल्लेवार, य. दि. फडके, एस. कविमंडन यांचे ललित लेख संदर्भमध्ये आहेत. समीक्षा आणि संशोधनाबाबत सजग असणाऱ्या संदर्भने रा. श्री. जोग, नरहर कुरुंदकर, माधव मनोहर, ग. त्र्यं. देशपांडे, द. भि. कुलकर्णी, चंद्रकांत बांदिवडेकर, भा. ज. कविमंडन, रा. ग. जाधव, भा. श्री. परांजपे, म. सु. पाटील, कृ. बा. मराठे, गो. ग. कुलकर्णी, ना. ग. जोशी यांचे समीक्षा, संशोधनपर लेखन प्रकाशित केले. संदर्भमध्ये ‘स्पंदन’ या सदरात जरा वेगळा मजकूर प्रकाशित होत असे. हे लेखन कधी एखाद्या टिपण्यासारखे, कधी ललितबंधासारखे, कधी व्यक्तिचित्रणाचा बाज असलेले तर कधी नोंदींच्या स्वरूपाचे असल्याचे दिसते. गो. नी. दाण्डेकर, हृदयनाथ मंगेशकर, सदानंद रेगे, वा. ल. कुळकर्णी, द. ग. गोडसे, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, द. भि. कुलकर्णी, वा. रा. कांत, प्रभा गणोरकर यांचे विविध विषयांवरचे, वेगवेगळ्या भावस्थितीतले आणि स्वरूपाचे हे लेखन आहे; हे लेखन साहित्य, समीक्षा, कला यांच्या परस्पर संवादाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.
संदर्भने पहिल्या अंकापासूनच सुजाण वाचकांच्या प्रतिक्रियांची योग्य दखल घेतलेली दिसते. वाचकांच्या पत्रलेखांचे स्वागत करून ते योग्य ठिकाणी प्रकाशित करण्याचे धोरण हे संदर्भचे वैशिष्ट्य ठरावे. भा. ल. भोळे, सुधाकर जोशी, रा. ग. जाधव, कृ. बा. मराठे, ना. ग. जोशी, हरिहर चंद्रशेखर घोंगे, यांचे पत्रलेखन संदर्भमध्ये प्रकाशित झाले आहेत. पत्रलेखांसाठीचे आवाहन संदर्भमधून केले जात असे. संदर्भच्या पहिल्या अंकात रायटर्स सेंटर या संस्थेची माहिती आणि या नियतकालिकाविषयीची भूमिका रामदास भटकळ यांनी संक्षिप्तपणे कथन केली आहे. प्रत्येक अंकात सुरुवातीला संपादक ग्रेस यांनी काव्यात्म टिपणे लिहिली आहेत. ती त्या त्या वेळच्या त्यांच्या चिंतनातून आणि भावस्थितीतून लिहिली गेली असावी.
संदर्भचे एकूण सात अंक प्रकाशित झाले. जानेवारी-फेब्रुवारी १९७५ हा पहिला अंक आणि जानेवारी-फेब्रुवारी १९७६ हा शेवटचा अंक. सुमारे सव्वा वर्ष चाललेल्या या नियतकालिकाने साहित्य आणि कलाप्रांतात अल्पकाळातच आपली मुद्रा उमटविली. संदर्भच्या पहिल्या अंकात भास्कर लक्ष्मण भोळे यांनी संदर्भला खरेखुरे संदर्भमूल्य लाभावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. वर्षभरातच संदर्भला खरोखर संदर्भमूल्य लाभले. पण संदर्भ अल्पजीवी ठरले. ललितबंध, कथा, कविता, नाटिका, समीक्षा, संशोधन, या स्वरूपाचा आणि या रूपबंधांच्या चौकटीत न अडकणारा मजकूर संदर्भने प्रकाशित केला. प्रत्येक अंकात मुखपृष्ठानंतरच्या पहिल्या पानावर एक रेखाटन कायम होते. उघडलेल्या खिडकीतून दिसणारे आकाश आणि मुक्त उडणारा पक्षी असे ते रेखाटन होते. साहित्य आणि कलांसंदर्भातील खुला – व्यापक दृष्टिकोन हे या नियतकालिकाचे वैशिष्ट्य होते, ते या रेखाटनातूनही स्पष्ट होते. या रेखाटनाखाली “संदर्भ : निर्मिती आणि निर्मितिवृत्त “असे छापलेले असायचे. निर्मिती आणि निर्मितिवृत्त या दोन्ही शब्दांना न्याय देणारा मजकूर या नियतकालिकाने अल्पकाळात प्रकाशित केला. संदर्भचे संदर्भमूल्य आजही कायम आहे. संदर्भचे संदर्भमूल्य कायम असणे ही ग्रेस यांच्या संपादकीय कौशल्याच्या यशस्वितेची पावती होय.
संदर्भ :
- देशपांडे, अजय, ‘संदर्भमूल्य असलेले संदर्भ’, ललित (मासिक), मुंबई, २०१४.
- गणोरकर, प्रभा, डहाके, वसंत, आबाजी आणि अन्य (संपा), संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (१९२०-२००३) खंड दोन, मुंबई, २००४.