(अँटिलोप). एक सस्तन शाकाहारी प्राणी. स्तनी वर्गातील समखुरी गणाच्या बोव्हिडी कुलातील बोव्हिनी उपकुलात हरिणांचा समावेश केला जातो. गाय, म्हैस, मेंढी, गवे, शेळी इत्यादी प्राणी बोव्हिनी उपकुलात येतात. हरिणांच्या सु. ३१ प्रजाती असून सु. १०० जाती आहेत. ते आफ्रिका, यूरोप व आशिया खंडात आढळतात. भारतात हरिणांच्या नीलगाय, चिंकारा, काळवीट, तिबेटी हरिण आणि चौशिंगा या जाती दिसून येतात. हरिण आणि मृग यांच्या शरीरात साम्य असल्याने बहुधा ते एकच समजले जातात; परंतु त्यांच्यात काही फरक आहेत. जसे हरिणांची शिंगे एकदा उगवली की, ती शेवटपर्यंत कायम राहतात; तर मृगांची शिंगे ठराविक काळानंतर गळून पडतात आणि पुन्हा वाढतात.

इलँड हरिण

हरिणे दिसायला आकर्षक असून त्यांच्या सर्व जातींच्या नरांना शिंगे असतात. शिंगांच्या वैशिष्ट्यांनुसार त्यांची जाती ओळखता येते. त्यांच्या काही जातीच्या माद्यानांही शिंगे असतात; परंतु ती पातळ आणि नराच्या शिंगांपेक्षा आखूड असतात. नरांच्या शिंगांना शाखा नसून ती लांब व सरळ, स्क्रूसारखी पीळ असलेली, कोयत्याच्या किंवा विळ्याच्या आकाराची असून पोकळ असतात. शिंगांवर केरॅटिनाचे कठीण आवरण असते. सर्व हरिणांना शिंगांची एक जोडी असते; परंतु चौशिंग्याला शिंगांच्या दोन जोड्या असतात.

हरिणांच्या आकारमानात विविधता असते. उदा., ईलँड जातीच्या हरिणाच्या नराची खांद्याजवळ उंची सु. १७८ सेंमी. व वजन सु. ९५० किग्रॅ. असते, तर रॉयल अँटिलोप (पिग्मी हरिण) नराची उंची सु. २४ सेंमी. व वजन सु. १.४ किग्रॅ. असते. हरिणांचे पाय लांब व मजबूत असतात. ते लांब टांगा टाकतात आणि वेगाने पळू शकतात. काही हरिणे तर मागच्या पायांवर उभे राहून बाभळीची पाने, झाडांचा पाला खातात. नीलगाय, ईलँड, कुडू यांसारखी हरिणे २.४ मी. किंवा त्यापेक्षाही उंच उडी मारतात.

रॉयल अँटिलोप (पिग्मी हरिण)

हरिणांच्या रंगात विविधता दिसून येते. शरीरावरील फर आखूड केसांची, परंतु दाट असते. बहुतेक जातींमध्ये त्वचेचा रंग करडा असून पोटाकडचा भाग फिका किंवा पांढरा असतो. काही थोड्या हरिणांचे रंग वेगळे असतात. उदा., वाळवंटी हरिणांचा रंग फिकट करडा ते पांढरा किंवा चांदीसारखा असतो. गॅझेल हरिणांचा पार्श्वभाग पांढरा असतो. मळसूत्री शिंगांच्या हरिणांच्या पाठीवर फिकट उभे पट्टे असतात.

हरिणे रवंथी असल्याने त्यांच्या दाढा चांगल्या विकसित झालेल्या असतात. वरच्या जबड्यात सुळ्यांऐवजी कठीण हिरड्या असतात आणि त्यांद्वारे ते अन्न चावून खातात. इतर शाकाहारी प्राण्यांसारखे त्यांची ज्ञानेंद्रिये संवेदनशील असतात आणि भक्षकापासून त्यांना संरक्षण मिळवून देण्यात उपयोगी पडतात. डोळे डोक्याच्या दोन्ही बाजूंना असल्याने त्यांना चोहीकडचे दिसते. कान लांब असतात. गंधक्षमता आणि श्रवणक्षमता चांगली असल्याने रात्रीच्या काळोखात ते भक्षकाचा अंदाज घेतात. एकाच जातीतील हरिणे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी डोके, कान, पाय, पार्श्वभाग इत्यादींचा वापर करतात. हरिणाच्या काही जाती आपल्या अधिवासाच्या सीमा ठरविण्यासाठी किंवा नातेवाईकांशी संपर्क ठेवण्यासाठी गंधखुणा करतात. उदा., काळविटे डोळ्याखालच्या ग्रंथीतून स्रवणारा स्राव गवताच्या शेंड्यावर घासून आपला अधिवास निश्चित करतात.

हरिणांच्या काही जातींमध्ये नर-मादी ठळकपणे वेगवेगळे दिसतात. काही जातींमध्ये नर-मादी दोघांनाही शिंगे असतात. अशा जातींमध्ये नर हे मादीपेक्षा मोठे असतात. याउलट, बुश ड्युकर, ड्वार्फ अँटिलोप, केप ग्रिसबोक आणि बहुतकरून लहान आकारांच्या हरिणांमध्ये माद्या नरापेक्षा मोठ्या असतात. काळवीट, न्याला या जातींच्या हरिणांमध्ये नर आणि मादी यांच्या त्वचेवरील फरचा रंग वेगवेगळा असतो.

हरिणे सामान्यपणे कळपाने आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अधिवासात राहतात. घनदाट वने, मैदानी प्रदेश, वाळवंटी प्रदेश, दलदलीचे प्रदेश तसेच पर्वतालगतच्या पायथ्याचे प्रदेश अशा ठिकाणी त्यांचा वावर असतो. त्यांच्या काही जाती उदा., वन्य हरिणे, अतिशीत प्रदेशातील सैगा, सहारा वाळवंटातील पांढरी हरिणे, क्लिपस्प्रिंजर जातीची हरिणे, दलदलीच्या प्रदेशातील सीटाट्यूंगा जातीची हरिणे एकांतात राहतात. ते शाकाहारी असून झुडपांचे शेंडे, कोवळ्या फांद्या आणि गवत खातात. सस्तन प्राण्यांप्रमाणे त्यांचे उदर चार कप्प्यांचे असते. नर व मादी यांचे कळप वेगवेगळे असतात. प्रजननासाठी नर व मादी एकत्र येतात.

हरिणांच्या काही जातींमध्ये प्रजननकाळ ठरावीक असतो, तर काही जातींमध्ये वर्षभर प्रजनन होते. माद्यांना स्तनांच्या दोन जोड्या असतात. गर्भावधी १६७–२७७ दिवसांचा असून एका वेळी एकच पिलू होते. काळविटाला क्वचित दोन पिले होतात. वयात येण्याचा कालावधी जातींनुसार वेगवेगळा असतो. ड्वार्फ अँटिलोपमध्ये तो ६ महिने, तर ईलँडमध्ये ४८ महिने असतो. कातडी आणि मांस यांसाठी हरिणांची शिकार केली जाते; मात्र अनेक देशांत त्यांना संरक्षण मिळावे, यासाठी वने राखून ठेवण्यात आलेली आहेत.

काळवीट (अँटिलोप सर्व्हिकॅप्रा)

काळवीट म्हणजेच एण. ही भारतात आढळणारी हरिणांची एक मुख्य जाती आहे. तिचे शास्त्रीय नाव अँटिलोप सर्व्हिकॅप्रा असून भारतात तिच्या अँ. . सर्व्हिकॅप्रा आणि अँ. . राजपुतानी या दोन उपजाती दिसून येतात. काठेवाड आणि पंजाबपासून पूर्वेकडे बंगाल आणि दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंत काळविटे आढळतात. नेपाळ, पाकिस्तान या देशांत त्यांची हीच जाती आढळते; परंतु बांगला देशात ती विलुप्त झालेली आहे.

काळविटाच्या डोक्यासह शरीराची एकूण लांबी सु. १.२ मी., तर शेपूट सु. २० सेंमी. लांब असते. खांद्यापाशी उंची सु. ७४–८४ सेंमी. असते. मादी ही नरापेक्षा लहान असते. काळविटाची वरची बाजू, पार्श्व बाजू आणि पायांची बाहेरची बाजू गडद तपकिरी किंवा काळी असते. मादीच्या वरच्या बाजूचा आणि डोक्याचा रंग पिवळसर करडा असतो. नर-मादी दोघांचीही पोटाकडची बाजू, पायांची आतली बाजू आणि हनुवटी व डोळ्यांभोवतालचा भाग पांढरा असतो. वयानुसार काळविटाचा रंग जास्त गडद होत जातो. शिंगे फक्त नराला असून ती ३५–७५ सेंमी. लांब असतात. शिंगांच्या बुडाला वलये असून ती मळसूत्राप्रमाणे पिळवटलेली असतात. मादीला शिंगे नसतात; परंतु क्वचित वाढू शकतात. आकर्षक रंग, वलयाकृती शिंगे, टपोरे व चंचल डोळे आणि सडपातळ व बांधेसूद शरीर यांमुळे सर्व हरिणांमध्ये काळवीट डौलदार व आकर्षक दिसतो.

एका कळपात १५–५० काळविटे असतात. कधीकधी शेकडोंचेही कळप असतात. एखादी वयस्कर व दक्ष मादी कळपाची प्रमुख असते. माद्या अतिशय जागरूक असून धोक्याचा इशारा प्रथम त्या देतात. इशारा मिळताच सबंध कळप वेगाने धावत सुटतो आणि सुरक्षित ठिकाणी एकत्र येतो. काळवीट वेगाने पळणारे असल्यामुळे शिकारी कुत्रेही त्यांना पकडू शकत नाहीत.

काळविटे प्रामुख्याने दिनचर आहेत. ते दिवसभर चरत फिरतात; परंतु दुपारच्या कडक उन्हात ते सावलीत विश्रांती घेतात. झुडपे अथवा पिके असलेल्या मैदानी प्रदेशांत आणि मोठाली गवताळ मैदाने असणाऱ्या उघड्या रानांत ते राहतात. गवत आणि निरनिराळी धान्ये ती खातात. सतत पाण्याची गरज असल्याने ते पाणवठ्यालगतच्या भागात वावरतात. लांडगे, कोल्हे, रानटी कुत्रे, चित्ते इत्यादी काळविटांची शिकार करतात. काळवीटांची वीण सबंध वर्षभर होत असली, तरी प्रजननाचा काळ ऑगस्ट ते ऑक्टोबर किंवा फेब्रुवारी ते मार्च असतो. या काळात काळवीट आपल्या प्रतिस्पर्ध्यापासून कळपाचे रक्षण करतो. सु. १८० दिवसांच्या गर्भावधीनंतर मादी एक किंवा क्वचित दोन पिलांना जन्म देते. पिले जन्मानंतर लगेच चालू शकतात. काळविटांचा आयु:काल सु. १५ वर्षे असतो.