(सी-स्टार, स्टार फिश). समुद्रतारा हा कंटकचर्मी (एकायनोडर्माटा) संघाच्या ॲस्टरॉयडिया वर्गातील प्राणी आहे. समुद्रताऱ्याच्या जगभर सु.१,५०० जाती आहेत. समुद्रकिनाऱ्यालगतच्या पाण्यात त्याचे वास्तव्य असते. भारतात सामान्यपणे आढळणाऱ्या समुद्रताऱ्याचे शास्त्रीय नाव ॲस्टीरिॲस रूबेन्स आहे. समुद्रताऱ्याला तारामासा, तारामीन अशीही नावे आहेत.
समुद्रतारा हा त्रिस्तरीय, देहगुहा असलेला प्राणी असून त्याचा आकार ताऱ्यासारखा पंचभुजीय असतो. शरीर अरीय सममित असते म्हणजेच पाचपैकी कोणतीही भुजा शरीररचनेच्या दृष्टीने दुसऱ्या भुजेसारखीच असते. व्यास १०–३० सेंमी. असतो; काहींचा व्यास १ मी. एवढा मोठा असू शकतो. तो विविध रंगात आढळतो. शरीर चपटे असून शरीराच्या मध्यभागी एक चकती अथवा तबकडी असते. तबकडीपासून पाच निमुळत्या होत गेलेल्या अरीय भुजा निघालेल्या असतात. काही जातींमध्ये भुजांची संख्या पाचच्या पटीत पन्नासपर्यंत आढळून येते. शरीराच्या ज्या पृष्ठावर मुख असते त्याला मुखपृष्ठ आणि विरुद्ध पृष्ठाला अपमुख म्हणतात. मुखपृष्ठ नैसर्गिक स्थितीत खालच्या बाजूला, तर अपमुख वरच्या बाजूला असते. अपमुखावर अनेक कॅल्शियमयुक्त कंटक असून ते बोथट असतात. कंटकांच्यामधून देहगुहेपासून निघालेले कल्ले अथवा त्वचा क्लोम असतात. कल्ले लहान, पातळ, मऊ आणि पारदर्शक असतात. ते श्वसनाचे आणि उत्सर्जनाचे कार्य करतात. कंटकांभोवती सूक्ष्म चिमट्यासारख्या संदंशिका असतात. लहान प्राणी पकडण्यासाठी आणि शरीराचा ऊर्ध्व भाग स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. अपमुखाच्या मध्याजवळ एक बारीक गुदद्वार असते. त्याजवळ आणि दोन भुजांच्या मध्ये अश्मछिद्र असते. प्रत्येक भुजेच्या टोकावर एक लहान स्पर्शक आणि नेत्रबिंदू असतो. स्पर्शक स्पर्शग्राही, तर नेत्रबिंदू प्रकाशग्राही असतो. मुखपृष्ठाच्या मध्यावर एक लांब खाच असते आणि खाचेच्या दोन्ही कडांवर मोठे कंटक असतात. खाचेपासून नळीसारखे दिसणारे नलिकापाद पुढे आलेले असतात. नलिकापादाच्या दोन अथवा चार ओळी दिसून येतात.
समुद्रताऱ्याचे सर्व शरीर बाह्यत्वचेने आच्छादलेले असते. बाह्यत्वचेखाली मध्यजननस्तर असून त्यात अंत:कंकाल असते. अंत:कंकाल कॅल्शियमच्या अस्थिकांनी बनलेले असते. मध्यजननस्तराखाली उपकला असते. उपकलेच्या खाली देहगुहा असून ती लसिकेसारख्या द्रवाने भरलेली असते. देहगुहेत निरनिराळ्या संस्था असतात. जलवाहिका संस्था अथवा जलाभिसरण संस्था हे समुद्रतारा आणि कंटकचर्मी संघाचे वैशिष्ट्य आहे. या संस्थेत अनेक नलिका अथवा वाहिन्या असून त्यात समुद्राच्या पाण्यासारखा पातळ द्रव असतो. या संस्थेत एक अश्मछिद्र, अश्मनलिका, एक वलय नलिका, पाच अरीय नलिका, अनेक पार्श्वनलिका, अनेक नलिका पाद, पाच अथवा दहा टीडेमान काय आणि पाच तुंबिका असतात. अश्मछिद्र कॅल्शियमयुक्त असून ते गोल व चपटे असते. त्यावर चाळणीसारखी असंख्य सूक्ष्म छिद्रे असतात. अश्मछिद्रपट्टिकेमधून समुद्राचे पाणी आत घेतले जाते व सर्व नलिकांमधून अभिसरून ते नलिकापादांपर्यंत येते आणि पुन्हा खेळविले जाते. नलिकापाद नळीसारखे असून त्यांच्या टोकावर चूषक असतात. नलिकापादांचा उपयोग चालण्यासाठी, आधाराला चिकटण्यासाठी आणि भक्ष्य पकडण्यासाठी होतो. जलवाहिका संस्थेचा उपयोग हालचाल करण्यासाठी होतो. समुद्रतारा खूप हळू (१५ सेंमी./ मिनिट) चालतो.
समुद्रताऱ्याच्या पचनसंस्थेत मुख, ग्रसनी, जठर, आतडे, मलाशय, गुदद्वार ही इंद्रिये आणि यकृत अंधनाल (बाहेरच्या टोकाला बंद असलेली नळी), आतडे अंधनाल या पचनग्रंथी असतात. समुद्रतारा मांसाहारी असून तो खादाड असतो. कवचधारी संधिपाद आणि मृदुकाय प्राणी हे त्याचे खाद्य आहे. समुद्रतारा बहुतकरून मृदुकाय कालवे खातो. कालवाच्या दोन्ही शिंपांवर नलिकापादांच्या चूषकांनी घट्ट पकड घेतली जाते. त्यासाठी अनेक नलिकापाद एकत्र येऊन शिंपा विरुद्ध बाजूंनी ओढल्या गेल्यामुळे शिंपा उघडल्या जातात आणि कालवाचे शरीर उघडे पडते. त्याचवेळी समुद्रतारा मुखातून जठराचा एक भाग कालवाच्या शरीरावर पसरवतो. या दरम्यान कालवाच्या शरीरावर पचनग्रंथींच्या जोड्या पाचकरस स्रवतात. या पाचकरसात विकरे असतात. त्यामुळे कालवाच्या शरीरातील प्रथिने, मेद आणि कर्बोदक यांचे पचन होते. काही वेळाने हे पचलेले अन्न जठरासहित पुन्हा शरीरात ओढून घेतले जाते. अशा रीतीने पचन शरीराबाहेर होते. पचलेले अन्न यकृत अंधनालामार्फत शरीरात नेले जातात. न पचलेले अन्न मुखाद्वारे अथवा गुदद्वारातून बाहेर टाकले जाते. श्वसन आणि उत्सर्जन नलिकापादांद्वारे होते. अभिसरण संस्था काही वाहिन्यांपासून बनलेली असते. चेतासंस्थेत मुखाभोवती परिमुख चेतावलय आणि भुजांमध्ये चेतातंतू असतात.
समुद्रतारा भिन्नलिंगी प्राणी आहे. बाह्यलक्षणांवरून नर व मादी वेगळे ओळखता येत नाहीत. प्रत्येक भुजेत वृषण अथवा अंडाशय यांची एक जोडी असते. शुक्रपेशी आणि अंडपेशी वाहिन्यांद्वारे समुद्राच्या पाण्यात सोडली जातात. मादी एका वेळेस २० लाख अंडपेशी सोडते. अंड्यांचे बाह्यफलन होऊन डिंभ तयार होतो आणि डिंभाचे रूपांतरण नवीन समुद्रताऱ्यामध्ये होते. समुद्रताऱ्याच्या काही जातींमध्ये पुनरुद्भवनाची क्षमता असते. काही कारणांनी एखादी किंवा अनेक भुजा तुटल्या तरी त्याजागी नवीन भुजा निर्माण होतात. एखाद्या मोठ्या प्राण्याने समुद्रताऱ्याची भुजा तोंडात पकडली, तर स्वविच्छेदन घडते व समुद्रतारा भुजा तोडून स्वत:चे रक्षण करतो. अशा समुद्रताऱ्याचे दोन तुकडे झाले, तरी काही दिवसांत तुटलेल्या भागाचे पुनरुद्भवन होऊन नवीन समुद्रतारा तयार होतो. अंगभर कंटक असलेल्या ॲकँथस्टर प्लांकी या समुद्रताऱ्यामुळे प्रवाळाला धोका उत्पन्न होतो. तो प्रवाळाची शुंडके खात असल्याने प्रवाळ मृत होते. प्राणिविज्ञानाच्या अभ्यासात समुद्रताऱ्याचे विच्छेदन केले जाते.