(फॉरेस्ट काँझर्व्हेशन). मानवाच्या भावी पिढ्यांच्या गरजांच्या शाश्वत पूर्ततेसाठी, त्यांच्या हितासाठी वनक्षेत्रांचे केले जाणारे नियोजन व व्यवस्थापन म्हणजे वन संधारण. वन संधारणामध्ये मानवाला आणि विविध परिसंस्थेला हितकारक अशा वन साधनांची देखभाल आणि संरक्षण अंतर्भूत असते. पृथ्वीवर वनस्पतींचे नैसर्गिक आच्छादन असून ते मर्यादित आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार या वन संसाधनांचा वापर वाढत आहे. वनस्पती हे नूतनीक्षम संसाधन आहे. या संसाधनाची पुनर्वाढ होते आणि त्याची भरपाई होते. वने मनुष्यजीवनासाठी अत्यावश्यक असतात. ती कार्बनचा संचय करतात आणि हवेतील कार्बन डायऑक्साइडच्या स्वरूपातील कार्बन शोषून घेऊन ऑक्सिजनची निर्मिती करतात. म्हणूनच वनांना पृथ्वीची फुप्फुसे म्हणतात. ती असंख्य सजीवांचे निवासक्षेत्र आहेत आणि पृथ्वीवरचे हवामान, तसेच पर्जन्यचक्र यांचे नियमन करतात. जलविभाजक म्हणूनही वने महत्त्वाची असतात. जमिनीचे व भूजलाचे संरक्षण करणे, सृष्टिसौंदर्य वाढवणे व वन्य जीवांचे संरक्षण करणे ही देखील वन संधारणाची उद्दिष्टे आहेत. मनोरंजन स्थळ म्हणून वनांना महत्त्व आहे. वने ही लाकूड आणि अनेक वनजन्य उत्पादनांचे स्रोत आहेत. भूमिवापरातील बदलामुळे निर्वनीकरण होत राहते आणि राहिलेल्या वनाची अवनती होते. त्यासाठी वन संधारणाची गरज आहे.
वनात आवश्यक असलेले वृक्ष, इतर वनस्पती समूहाचे उत्पादन करणे, त्यांची निगा राखणे हे वन संधारणात अभिप्रेत असते. वनातील एकूण वनस्पती समुदायाच्या पुनरुत्पादनाशी आणि वाढीशी वन संधारण निगडीत असते. जमिनीच्या कमाल उत्पादन क्षमतेचा वापर करून निरंतर उत्पादन साधण्याच्या तत्त्वानुसार व वन व्यवस्थापनाच्या हेतूनुसार वनस्पतींची निर्मिती करणे, त्यांची निगा राखणे आणि विकास करणे हे वन संधारणाचे प्रमुख उद्दिष्ट असते. वनस्पतींचे नैसर्गिक अथवा कृत्रिम रीत्या उत्पादन करणे व निर्माण झालेल्या वनस्पतींची निगा राखणे असे वन संधारणाचे दोन भाग आहेत.
वन पुनरुत्पादन व वनरोपण ही वन संधारणाची प्रमुख तंत्रे आहेत.
वन पुनरुत्पादन : जुने वृक्ष तोडल्यानंतर त्या जागी नवीन वनस्पती निर्माण करणे, याला वन पुनरुत्पादन म्हणतात. पुनरुत्पादित वनाची निगा राखणे याला वन संगोपन म्हणतात. वनातील वृक्षांच्या योग्य वाढीसाठी तण काढणे, साफसफाई करणे, तसेच विरळणी व तोडणी करणे, योग्य वेळी कापणी करणे, शाखा छाटणी इ. विविध क्रियांचा समावेश वन संधारणात होतो.
वनरोपण : नव्याने वृक्षांची प्रत्यक्ष लागवड करणे, याला कृत्रिम पुनरुत्पादन किंवा वनरोपण म्हणतात. कृषी वनरोपण हा कृत्रिम वन पुनरुत्पादनाचाच प्रकार आहे. वनरोपणासाठी असंख्य रोपांची आवश्यकता असते. अशी रोपे रोपवाटिकेत निर्माण करून प्रसारित केली जातात. वनरोपण ही वनांची उत्पादनक्षमता वाढवणारी सक्रिय पद्धत आहे. यात व्यापारी तत्त्वावर वृक्षांची वाढ केली जाते. अस्तित्त्वात असलेल्या नैसर्गिक वनांचा ऱ्हास टाळण्यासाठी आणि त्यांच्या अतिरिक्त वापराला प्रतिबंध घालण्यासाठी वनरोपण प्रक्रिया महत्त्वाची ठरते. नवे वनक्षेत्र निर्माण करण्यासाठी वनरोपण ही प्रक्रिया उपयुक्त ठरते. ज्या प्रदेशात पूर्वी वृक्ष नव्हते अशा प्रदेशात वृक्षारोपण केले जाते.
वन्य जीवांसाठी निवासक्षेत्र उपलब्ध करणे, मनोरंजन क्षेत्र निर्माण करणे, व्यापारी दृष्ट्या वनांचा वापर करणे ही वनरोपण प्रक्रियेची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. हे करत असताना पूर्वी अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक वनांना कोणत्याही प्रकारे बाधा पोहोचणार नाही, हे लक्षात घेतले जाते.
(१) निवडक वृक्षतोड : आर्थिक संसाधने म्हणून वनांचा उपयोग मानवास व्हावा यासाठी निवडक वृक्षतोड करणे, ही आणखी एक पद्धत आहे. वन उत्पादकता व उत्पादक स्थिती ही वृक्षतोडीवर अवलंबून असते. आर्थिक आणि पारिस्थितिकीय दृष्ट्या पूर्ण वाढ झालेले वृक्ष तोडणे योग्य असते.
(२) वणवा नियंत्रण : अनेकदा वनातील वृक्षांना आग लागते. त्यामुळे वनांची खूप हानी होते. वन संसाधनाचे संधारण करण्यासाठी वणव्यावर नियंत्रण करणे गरजेचे असते. वन व्यवस्थापनात वणवा नियंत्रण वापरले जाते. वनातील आग नियंत्रित ठेवणे हे वन परिसंस्थेसाठी हितकारक असते. वनांची सुधारणा करण्यासाठी वनपाल नैसर्गिक आग नियंत्रित ठेवतात. यामुळे वनातील पृष्ठीय वनस्पतींचे नूतनीकरण होते, तसेच वृक्षांच्या अंकुरणासाठी याचा उपयोग होतो.
(३) वन्य जीव व्यवस्थापनक्षेत्र : वनांतील वन्य जीवांचे निवासक्षेत्र विकसित करणे आवश्यक असते. त्यासाठी नैसर्गिक भूमी संसाधनाचे सुद्धा संधारण केले जाते. म्हणून काही वृक्षांच्या जाती तोडणी करण्यास परवानगी देत नाहीत. तसेच वनभूमीच्या स्वरूपातही बदल केला जात नाही.
जगातील बहुतांश लोकांना वन संसाधनाचे महत्त्व कळले आहे. निर्वनीकरणाने पारिस्थितिकीय समस्या उद्भवतात याची जाणीव होत आहे. तरीही लोक, सेवाभावी संस्था, शासन व प्रशासन या सर्वांनी वन संसाधनाचे विविध प्रकल्प राबवण्याची आवश्यकता आहे. वनांचा शास्त्रीय अभ्यास ‘वनविद्या’ (फॉरेस्ट्री) या विद्याशाखेत होतो. या विद्याशाखेद्वारे नवनवीन वने निर्माण करणे, नैसर्गिक व मानवनिर्मित वनांचे संगोपन, संरक्षण व संवर्धन करून त्याचे व्यवस्थापन करणे इ. बाबी अंतर्भूत असतात. महाराष्ट्रात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली-रत्नागिरी येथे वनविद्या शाखेचे अध्ययन करता येते. भारतात वन संधारण आणि त्या संबंधित बाबींकरिता वन संधारण कायदा, १९८० तयार करण्यात आला आहे. प्रत्येक नागरिकाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वन संसाधनाच्या संधारणासाठी विधायक प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.