(इंडियन बनियान ट्री). वड हा मोरेसी कुलातील वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव फायकस बेंगालेन्सिस आहे. उंबर, पिंपळ, अंजीर, पिंपळी हे वृक्ष सुद्धा मोरेसी कुलातील आहेत. फायकस प्रजातीत सु. ८५० जाती असून त्यांपैकी भारतात ८९ जाती आढळतात. वड हा दक्षिण आशियातील भारत, बांगला देश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान व म्यानमार येथे आढळणारा मोठा वृक्ष आहे. मुख्यत: सावलीसाठी रस्त्याच्या दुतर्फा, शेताच्या कडेला, बागेमध्ये तो लावला जातो. वडाचा बीजप्रसार पक्षांच्या विष्ठेमधून होतो. त्यामुळे वडाची रोपे बऱ्याचदा मोकळ्या, पडक्या इमारती किंवा भिंतीमधील भेगांमध्ये वाढलेली दिसतात. भारतात हा वृक्ष सर्वत्र आढळतो. वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष असून त्याला ‘वटवृक्ष’ असेही म्हणतात.

वड हा अतिविशाल, प्रचंड विस्ताराचा सदापर्णी वृक्ष असून सर्वसाधारणपणे १५ ते ३० मी. उंच वाढतो. वडाचे खोड, अति

वड (फायकस बेंगालेन्सिस) : (१) वृक्ष, (२) पाने, (३) वडाच्या पारंब्या, (४) फळे.

शय मजबूत, गुळगुळीत व चीकयुक्त असते. चीक दुधी रंगाचा असून त्यात रेझीन असते. फांद्या जमिनीला समांतर वाढतात आणि फांद्यापासून फुटलेली मुळे जमिनीपर्यंत पोहोचतात. अशा मुळांना पारंब्या म्हणतात. एकदा मुळे जमिनीला टेकली की, त्यांचे काष्ठीय बुंध्यात रूपांतर होते. पाने जाड, कातडीप्रमाणे चिवट, १०–२० सेंमी. लांब व ५–७.५ सेंमी. रुंद, अंडाकृती व दीर्घवर्तुळाकार असतात. पानांचा वरील पृष्ठभाग गुळगुळीत, चकचकीत व गर्द हिरवा असून खालचा पृष्ठभाग फिकट हिरवा, लवयुक्त असून त्यावरील शिरा ठळक दिसतात. वडाची मुळे दोन प्रकारची असतात; सोटमुळे व अवस्तंभ मुळे (पारंब्या). जमिनीला टेकलेली मुळे वडाला आधार देतात आणि या वृक्षाचा पसारादेखील वाढवितात. फुले पानांच्या दुबेळक्यात येत असून ती कुंभासनी फुलोऱ्यात येतात. ती फळांसारखी गोल व पोकळ असतात. फुलोरे सुरुवातीला लहान व हिरवे असतात; फलनानंतर त्यांचे रूपांतर फळामध्ये होते, तेव्हा ती लाल व मऊ होतात. फुलात अनेक लहान नर-फुले, मादी-फुले आणि वंध्य-फुले असतात. नर-फुले फुलोऱ्याच्या तोंडाजवळ व संख्येने जास्त असून प्रत्येक नर-फुलामध्ये एक पुंकेसर असतो. मादी-फुले व वंध्य-फुले कुंभासनाच्या खालच्या भागात असतात. परागण गॉल किटकांद्वारे होते. परागण, फलन झाल्यावर फुलोऱ्याचे रूपांतर संयुक्त फळामध्ये होते. त्याला औदुंबरिक फळ म्हणतात. फळे मार्च ते जून या कालावधीत तयार होतात. पक्षी, खारी, माकडे ही फळे खातात. त्यांच्या विष्ठेतून बिया सर्वत्र पसरतात आणि रुजतात. अशा प्रकारे वडाचा प्रसार होतो.

वडाच्या पानांपासून पत्रावळी व द्रोण तयार करतात. वडाच्या प्रत्येक भागाचा म्हणजे चीक, मुळे, पाने, फुले, साल यांचा औषध म्हणून उपयोग होतो. जखम भरण्यासाठी व दातातील वेदना थांबविण्यासाठी चीक वापरतात. वडाच्या कोवळ्या पारंब्या घालून केशवर्धक तेल तयार करतात. तसेच पारंब्या शिकेकाईत उकळून अशा पाण्याने केस धुतल्यास केस वाढतात, लांब होतात, मऊ व काळे होतात, चमकदार दिसतात असे आयुर्वेदात मानले जाते. वड शीतल, मधुर, तुरट व स्तंभक आहे; पित्त, कफ, दाह, ओकारी, सूज, व्रण यांवर गुणकारी आहे. तसेच योनिविकार, ताप, त्वचा रोग (कुष्ठरोग) यांवरही उपयुक्त आहे. खोडातून बाहेर पडणारा चीक दुग्धरस व औषधी आहे. पूर्ण वाढलेले वडाचे एक झाड दर तासाला सु. ७०० किग्रॅ. इतक्या प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन वातावरणात सोडतो. तसेच उन्हाळ्यात दिवसाला भरपूर पाणी बाष्परूपात बाहेर फेकतो.

वडाच्या मुळांचे लाकूड लचविक व मजबूत असते. तंबूचे खांब, बैलगाड्यांचे जू व दांडे तयार करण्यासाठी ते वापरतात. खोडाचे लाकूड किरकोळ वस्तू तयार करण्यासाठी होतो. वडाच्या लाकडापासून कागदाचा लगदा तयार करतात. सालीच्या धाग्यापासून दोर तयार करतात. सालीत ११% टॅनीन असते. सालीचा रस आमांश व अतिसार यांवर उपयोगी आहे.

भारतात वडाची आणखी एक जाती आढळते. तिचे शास्त्रीय नाव फायकस कृष्णी असून तिला सामान्यपणे ‘कृष्णवड’ म्हणतात. त्याची पाने पात्याच्या तळाकडे दुमडलेली असल्याने ती द्रोणासारखी दिसतात. इंग्रजी भाषेत त्याला ‘कृष्णाज बटरकप’ म्हणतात.

वड हा अतिप्राचीन काळापासून परिचित असल्याचे दिसते. वेदांमध्ये (न्यग्रोध नावाने) तसेच रामायण, महाभारत, चरकसंहिता इ. अनेक ग्रंथांमध्ये वडाचा उल्लेख आहे. गया (अक्षयवट) व प्रयाग (श्यामवट) येथील वडाचे वृक्ष प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहेत. गुजरातमधील भडोचजवळ नर्मदा नदीच्या एका बेटावर कबीरवड हा पुरातन वृक्ष आहे. सिबपूर (कोलकाता) येथील जगदीशचंद्र बोस वनस्पती उद्यानातला वड सु. ४.६ एकरावर पसरलेला असून तो सु. २५० वर्षे जुना आहे. सद्यस्थितीला वडाचा जगातील सर्वांत मोठा वृक्ष आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे असून त्याला ‘थिम्माम्मा मरीमनू’ असे म्हणतात. तेलगू भाषेतील ‘मरि’ याचा अर्थ ‘बनियान अर्थात वड’ आणि मनू याचा अर्थ ‘खोड’ म्हणजेच ‘थिम्माम्माचे वडाचे खोड’ असा त्याचा अर्थ आहे. त्याचा वृक्षसंभार सु. ४.७ एकरावर पसरलेला असून तो सु. ५५० वर्षे जुना आहे.