वाम (म्युरिनीसॉक्स सिनेरिअस)

(ईल). सापासारखा दिसणारा एक मासा. वाम माशांचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या अँग्विलिफॉर्मिस गणातील म्युरिनीसॉसिडी कुलात केला जातो. या कुलातील म्युरिनीसॉक्स सिनेरिअसम्यु. टॅलॅबोनॉयडीस या दोन जाती वाम नावाने ओळखल्या जातात. हे मासे मलेशियाचा द्वीपकल्प, ऑस्ट्रेलिया आणि भारत या देशांच्या समुद्रात आढळतात. भारतालगतच्या अरबी समुद्रात ते मोठ्या प्रमाणात दिसून येतात आणि समुद्रकिनाऱ्यापासून आत सु. ८०० खोलीपर्यंत समुद्रतळाशी राहतात. महाराष्ट्रात नदीमुखांत, खाड्यांमध्ये व द्वीपकल्पीय भागाच्या गोड्या पाण्यात ते दिसून येतात.

वाम माशांचे शरीर सु. ७४ सेंमी. लांब असून सापासारखे लांब होत गेलेले असते. सु. १५२ सेंमी.पर्यंत लांबीचे वाम आढळून आले आहेत. शरीराचा रंग रुपेरी असून पोटाच्या भागाकडे पांढरा होत जातो. शरीराचे डोके, धड आणि शेपटी असे तीन भाग असून शरीरावर लहान खवले असतात. डोक्याच्या अग्रभागाकडे मुस्कट असून ते लांब असते. तोंड वरच्या व खालच्या जबड्याने वेढलेले असते. दोन्ही जबडे लांब असून दोन्ही डोळ्यांच्या मागेपर्यंत पोहोचलेले असतात. जबड्यांवर मोठे आणि खंजिरासारखे बळकट दात असतात. पृष्ठपर, पुच्छपर आणि गुदपर एकत्र येऊन धडावर झालर तयार झालेली असते. वक्षपर पिवळा किंवा काळा असून लहान असतो. श्रोणिपर पिवळा अथवा काळा असतो.

अस्थिमत्स्यांप्रमाणे वाम माशाचे कल्ले हे कल्लाकक्षात असतात. शरीरात कल्लाकक्षाशी जोडलेली हवेची पिशवी म्हणजे वाताशय असतो. वाम जेव्हा पाण्याबाहेर असतो तेव्हा कल्लाकक्षात हवा साठवली जाते. श्वसनक्रियेत याच हवेतील ऑक्सिजन कल्ल्यांद्वारे रक्तात मिसळला जाऊन कार्बन डायऑक्साइड कल्लाकक्षात विसरित केला जातो. तसेच वाताशयातील हवा देखील कल्लाकक्षात येते. त्यामुळे वाम पाण्याबाहेर अनेक तास जिवंत राहतात आणि मासळी बाजारात जिवंत विकले जातात. वाम माशांचे मांस चविष्ट असल्यामुळे अनेक ठिकाणी ते खातात. काही जलजीवालयांमध्येही वाम ठेवले जातात.

अँग्विलिफॉर्मिस गणातील अहीर (अँग्विला बेंगालेन्सिस) यालाही वाम म्हणतात, परंतु तो गोड्या पाण्यात आढळतो.

इंग्लिश भाषेत साधारणपणे ज्या माशांना ‘ईल’ म्हणतात ते अँग्विलिफॉर्मिस गणातील मासे आहेत. ते सापासारखे लांब असतात. या गणात २० कुले, १११ प्रजाती आणि ८०० जाती आहेत. याखेरीज सिंब्राँकिफॉर्मिस गणातील मॅस्टासेंबिलिडी कुलातील वांब मासेदेखील सापासारखे लांब असतात. त्यांनाही ‘ईल’ म्हटले जाते, परंतु ते खरे ईल नव्हेत.