असह्य अशा शारीरिक किंवा मानसिक वेदनांतून वा दु:खांतून मुक्ती मिळण्यासाठी एखादी मरणासन्न व्यक्ती जेव्हा मरणाची इच्छा व्यक्त करते किंवा त्यासाठी न्यायालयास विनंती अर्ज करते, तेव्हा ती व्यक्ती इच्छामरणाची इच्छा व्यक्त करत असते. त्या व्यक्तीची ही इच्छा मान्य होऊन त्या व्यक्तीला जेव्हा मरण दिले जाते त्यास ‘दयामरण’ असे म्हणतात.

एखादी व्यक्ती त्या मरणासन्न व्यक्तीला असह्य अशा शारीरिक किंवा मानसिक वेदनांतून व दु:खातून मुक्ती देण्यासाठी एखाद्या मरणासन्न व्यक्तीची इच्छामरणाची विनंती जेव्हा दयेखातर मान्य करते व त्या व्यक्तीला ह्या जीवनातून मुक्त करते, तेव्हा त्या व्यक्तीने मरणासन्न व्यक्तीला दयामरण दिले आहे, असे मानले जाते. असा मृत्यू प्रत्यक्ष एखादी कृती करून, उदा., विषाचे इंजेक्शन देऊन किंवा अती टोकाची असामान्य उपचारपद्धती नाकारून दिला जातो.

‘The Declaration on Euthanasia’–५ मे १९८० रोजी इच्छामरण/दयामरण ह्या संबंधी ‘The Sacred Congregation for the Doctrine of the Faith’ द्वारे चर्चतर्फे अशी भूमिका मांडण्यात आली की, इच्छामरण/दयामरण हा ‘जीवनाविरुद्ध गुन्हा’ आहे. इच्छामरण/दयामरणाची व्याख्या करताना त्यात असे विशद केले गेले आहे की, मृत्यू ओढवून घेण्याच्या इच्छेने जेव्हा एखादी वैद्यकीय कृती केली जाते किंवा एखादी कृती टाळली जाते, तेव्हा त्यास इच्छामरण/दयामरण असे मानले जाते.

ख्रिस्ती विचारसरणीनुसार कोणतीही व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत एखाद्या निष्पाप व्यक्तीला जिवे मारण्याची परवानगी देऊ शकत नाही, मग तो इवलासा गर्भ असो, चिमुकले बाळ असो, तरुण असो, एखादी थकलेली वयस्कर व्यक्ती असो, असाध्य रोगाने पीडित झालेली व्यक्ती असो किंवा मृत्यूपथाला लागलेली व्यक्ती असो. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या मरणासाठी विनंती करायला कुणालाही परवानगी नाही–मग ती विनंती स्वत:च्या मृत्यूविषयी असो की, एखाद्या व्यक्तीच्या जबाबदारीत असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूविषयी असो. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या स्वत:च्या किंवा इतर व्यक्तीच्या मृत्यूला प्रत्यक्ष रीत्या किंवा अप्रत्यक्ष रीत्या संमती देता येत नाही. कुठलीही अधिकारी व्यक्ती अशा पळवाटेला कायद्याने परवानगी देऊ शकत नाही किंवा त्यासाठी शिफारस करू शकत नाही. कारण इच्छामरण/दयामरणाची कृतीही दैवी कायद्याचा भंग असून तो मानवी प्रतिष्ठा आणि जीवन यांविषयी गुन्हा व मानव जातीवर केलेला हल्ला आहे.

प्रत्येक व्यक्तीचा दर्जा व तिला मिळालेली जीवनाची देणगी ह्या संबंधी चर्चची जी भूमिका आहे त्यातून इच्छामरण/दयामरणाविषयीची ही भूमिका तयार झाली आहे. प्रत्येक व्यक्तीचा दर्जा व तिच्या जीवनाची भेट ह्यांचे पावित्र्य चर्च मान्य करते. त्यामुळे चर्चच्या शिकवणीनुसार १) एखाद्या निष्पाप व्यक्तीच्या जीवनावर हल्ला करणे किंवा त्या व्यक्तीला ठार मारणे ही नैतिकदृष्ट्या अनिष्ट गोष्ट (पाप) आहे. २) प्रत्येक व्यक्तीने देवाच्या इच्छेचा स्वीकार करून, जीवनाची पूर्तता स्वर्गीय जीवनात आहे, ह्याचे भान ठेवून देवाच्या योजनेप्रमाणे जीवन जगणे क्रमप्राप्त आहे व ३) स्वेच्छेने आत्महत्या करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवणे म्हणजे स्वत:चा खून करणे, हे वास्तव त्याच्यामागे असून ते देवाची योजना नाकारण्यासारखे कृत्य आहे. त्यामुळेच दुसऱ्या व्हॅटिकन विश्व परिषदेमध्ये अधोरेखित केले गेले आहे की, ‘जे जे काही जीवनाच्या विरुद्ध आहे–उदा.,  कुठल्याही प्रकारचा खून, जमाव हत्या, गर्भपात, इच्छामरण किंवा स्वेच्छेने स्वत:चा नाश करणे, इत्यादी सर्व कृती व ह्यांसारख्या इतर कृती मानवी प्रतिष्ठेला काळिमा फासणाऱ्या आहेत. ह्या सर्व कृती समाजात विष कालवतात. ह्या कृतींचे जे बळी पडतात त्यांच्यापेक्षा जे अशा कृती समोर ठेवतात, त्यांच्यावर त्या जास्त अनिष्ट परिणाम करतात. शिवाय, त्या कृतींमुळे निर्मात्याचा घोर अपमान होतो.

कॅथलिक ख्रिस्तसभेचा नवा श्रद्धाग्रंथ ह्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे ते असे : ‘‘देवाने मानवाला जीवनाची अनमोल देणगी देऊन सन्मानित केले आहे. प्रत्येक व्यक्ती तिच्या जीवनाचा स्वामी आहे, म्हणून कृतज्ञ मनाने ही देणगी स्वीकारणे, देवाच्या गौरवासाठी तिचे जतन करणे आणि आपल्या आत्म्याचे तारण करून घेणे, ही आपली कर्तव्ये आहेत. आपल्या जीवनाचे आपण मालक नसून रक्षक आहोत. जीवन हे देवाने दिलेले वरदान आहे. ते उधळण्यासाठी नव्हे; तर फुलविण्यासाठी आहे!’’

संदर्भ :

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया