गुजरातमधील सागरी पुरातत्त्वीय स्थळ. हे गुजरातच्या गीर जिल्ह्यात बारा ज्योतिर्लिंगांमधील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे क्षेत्र सोमनाथ पाटण, प्रभासपाटण व वेरावळक्षेत्र या नावांनीही ओळखले जाते. सोमनाथ परिसरात हडप्पापूर्व काळापासूनच्या मानवी वसाहतीचे पुरावे मिळालेले आहेत.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातर्फे बी. के. थापर (१९२१–१९९५) यांनी १९५० मध्ये सध्याच्या सोमनाथ मंदिराजवळ केलेल्या उत्खननात प्रारंभिक ऐतिहासिक काळातील लाल रंगाची खापरे मिळाली होती. त्यानंतर बडोद्याच्या बी. सुब्बाराव (१९२१–१९६२) व पी. पी. पंड्या यांनी १९५५-५७ मध्ये सोमनाथपासून चार किमी. अंतरावरील प्रभासपाटण येथे उत्खनन केले. या ठिकाणी उत्तर हडप्पा ते प्रारंभिक ऐतिहासिक अशा सांस्कृतिक कालखंडाचे अवशेष मिळाले. गुजरात पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने डेक्कन कॉलेजच्या म. के. ढवळीकर व झैनुद्दिन अन्सारी यांनी सोमनाथला १९७२, १९७३ आणि १९७५ असे तीन वेळा उत्खनन केले. या उत्खननात सिंधू संस्कृतीच्या पूर्वीच्या कालखंडाचा पुरावा मिळाला. तसेच हिरण नदीच्या काठावर एक ताम्रपाषाणयुगीन गोदाम मिळाले. त्यानंतर सोमनाथ मंदिराच्या पूर्वेस २०१४ मध्ये डेक्कन कॉलेजतर्फे आरती देशपांडे-मुखर्जी यांनी उत्खनन केले. त्यात त्यांना प्रारंभिक ऐतिहासिक काळातील विविध पुरावशेष मिळाले. रेडिओकार्बन कालमापनानुसार येथील वस्तीचा कालखंड इ.स.पू. ४० ते इ.स. ८० असा आढळला.
गोव्यातील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानातर्फे एस. आर. राव (१९२२–२०१३), शिल त्रिपति व अनिरूद्धसिंग गौर या पुरातत्त्वज्ञांनी १९९२ पासून अनेकदा सोमनाथच्या परिसरात, किनारी भागात आणि समुद्रात पुरातत्त्वीय सर्वेक्षण केले. सोमनाथ मंदिराच्या नैर्ऋत्येस समुद्रात ५०० × ५०० मी. क्षेत्रात समुद्राच्या तळावर पुरावशेष शोधण्यात आले. या ठिकाणी असलेल्या खडकाळ तळावर विविध प्रकारचे नांगर आढळले. हे सर्व दगडी नांगर वर्तुळाकार असून ते गुजरातच्या किनाऱ्यावर इतर सागरी पुरातत्त्वीय स्थळांवर मिळालेल्या मध्ययुगीन नांगरांप्रमाणेच आहेत. सोमनाथला मिळालेल्या या वर्तुळाकार दगडी नांगराच्या संख्येइतके नांगर अन्य ठिकाणी मिळालेले नाहीत. सर्वेक्षणात पाण्याखाली कसल्याही प्रकारच्या भिंती किंवा तत्सम रचना आढळल्या नाहीत. तसेच सोमनाथला पाण्याखाली ताम्रपाषाणयुगीन, हडप्पा काळातील अथवा आद्य ऐतिहासिक काळातील वसाहत असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही.
संदर्भ :
- Deshpande‐Mukherjee, Arati; Shete, Gurudas; Sengupta, Soumi; Deo, Sushama; Sawant, Reshma; Neha, V. & Joshi, Sachin, ‘Somnath Revisited: Results of the Recent Archaeological Excavation of an Early Historic Coastal Settlement at Somnath, District Gir Somnath, Gujaratʼ, Heritage, 5: 22-46, 2017.
- Dhavalikar, M. K. & Possehl, G. L. ‘The pre‐Harappan period at Prabhas Patan and the Pre‐Harappan Phase in Gujaratʼ, Man and Environment, XVII (1):71‐ 78, 1992.
- Gaur, A. S.; Sundaresh & Vora, K. H. Underwater Archaeology of Dwarka and Somanth (1997‐2002), Aryan Book International, New Delhi, 2008.
समीक्षक : शंतनू वैद्य