होरे, सर रिचर्ड कोल्ट : (१७५८–१८३८). ब्रिटनमधील एकोणिसाव्या शतकातील धनिक जमीनदार, वस्तूसंग्राहक, चित्रकार व पुरातत्त्वविद्येच्या प्रारंभिक कालखंडात योगदान देणारे हौशी पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म इंग्लंडमधील सरे परगण्यातील बार्न्स येथे झाला. होरे घराण्याच्या बँकिंग व्यवसायाचे संस्थापक असलेल्या लॉर्ड मेयर सर रिचर्ड होरे यांचे ते वंशज होत. त्यांचे वडील सर रिचर्ड होरे (१७३५–१७८७) हे फर्स्ट बॅरोनेट असून आईचे नाव ॲन होरे (१७३७–१७५९) होते. त्यांचे शि़क्षण वँड्सवर्थ आणि ग्रीनफर्ड येथे झाले. खासगी शाळांमधून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर होरे त्यांच्या कौटुंबिक बँकिंग व्यवसायात सामील झाले.
सन १७८३ मध्ये होरे यांनी विल्यम लिटेल्टन (फर्स्ट बॅरन लिटेल्टन) यांची मुलगी हेस्टरशी विवाह केला. होरे यांना त्यांचे आजोबा हेन्री होरे (१७०५–१७८५) यांच्याकडून सन १७८५ मध्ये स्टुरहेड (Stourhead) संपत्ती वारसाहक्काने मिळाली. त्यांच्या जमिनी विल्टशायर, डोर्सेट आणि सॉमरसेट या परगण्यांमध्ये पसरलेल्या होत्या; तथापि त्या मिळताना त्यांची देखभाल करण्याची व बँकिंग व्यवसायातून बाहेर पडण्याची अट घालण्यात आली होती. त्यानुसार होरे या कामकाजात लक्ष घातले; परंतु पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी यापासून काही काळ दूर जाण्याचे ठरवले (१७८५). त्या वर्षी त्यांनी फ्रान्स, इटली आणि स्वित्झर्लंड या देशांना भेटी दिल्या.
पहिल्या परदेश प्रवासाहून परत आल्यावर होरे यांनी स्थानिक इतिहासात रस घेतला. त्यांनी ग्लास्टनबरी टोर हा सॉमरसेट परगण्यातील भाग विकत घेतला (१७८६) आणि तेथील चर्च टॉवरच्या जीर्णोद्धारासाठी निधी दिला. सेकंड बॅरोनेट झाल्यानंतर (१७८६) त्यांनी पुन्हा यूरोपातील अनेक देशांमध्ये प्रवास केला. पुढे त्यांनी सॅलिस्बरी पठारावरील (Salisbury Plain) समृद्ध पुरातन वास्तूंच्या व पुरातत्त्वीय अवशेषांच्या संशोधनाला सुरुवात केली (१७८८). त्यांनी विल्टशायर परगण्यातील अनेक दफनांचा (Burrow) अभ्यास केला. प्राचीन काळातील अशा ४६८ दफन टेकाडांचे (Burial mound) त्यांनी उत्खनन केले. या संशोधनाचे निष्कर्ष त्यांनी दोन खंड असलेल्या विल्टशायरचा प्राचीन इतिहास या ग्रंथात मांडले (१८१२-२१). पहिल्या खंडाची पहिलीच ओळ, ‘आम्ही सिद्धांत नव्हे तर तथ्यांवरून बोलतोʼ ही एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला पुरातत्त्वात दुर्मीळ असलेल्या होरे यांच्या वैज्ञानिक विचारसरणीची साक्ष देते.
ब्रिटनमधील सुप्रसिद्ध स्टोनहेंज या वारसास्थळाचे पहिले उत्खनन विल्यम कनिंग्टन आणि रिचर्ड कोल्ट होरे यांनी केले (१७९८; १८१०). होरे यांनी कनिंग्टनच्या उत्खननासाठी भरीव आर्थिक मदत केली. त्यांनी पुरावशेषांचे वर्गीकरण करून या संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित केले. त्या दरम्यान त्रियुग प्रणाली अद्याप मांडली गेली नव्हती, तसेच पुरावशेष कोणत्या काळातले आहेत, हे ठरवण्याचे साधन नव्हते. परंतु प्राचीन काळातील अवशेषांचा अर्थ लावण्याचा होरे यांचा प्रयत्न पुरातत्त्वविद्येच्या इतिहासात महत्त्वाचा मानला जातो.
होरे यांनी आपल्या विविध देशांमधील प्रवासावर आधारित अनेक पुस्तके १८०७ ते १८१९ या काळात प्रकाशित केली. ते रॉयल सोसायटीचे (१७९२), तसेच लंडनच्या सोसायटी ऑफ अँटिक्वेरीजचे फेलो होते. त्यांची विल्टशायरचे हाय शेरीफ (High Sheriff) म्हणून नियुक्ती करण्यात आली (१८०५). त्यांच्या जवळील विविध महत्त्वाचे नकाशे आणि इटालियन इतिहासावरील पुस्तकांचा संग्रह त्यांनी ब्रिटिश संग्रहालयाला दान केला (१८२५).
स्टुरहेड येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- https://www.britishmuseum.org/collection/term/BIOG31653
- https://www.oxfordreference.com/view/10.1093/oi/authority.20110803095939529
- https://www.regencyhistory.net/2014/05/sir-richard-colt-hoare-2nd-baronet-1758.html
समीक्षक : जयेंद्र जोगळेकर