अल्चिन, ब्रिजिट : (१० फेब्रुवारी १९२७–१७ जून २०१७). विख्यात ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म ऑक्सफर्ड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मेजर स्टीफन गॉर्डन आणि आईचे नाव एल्सी कॉक्स. वडील भारतीय सैन्यात डॉक्टर होते. ब्रिजिट बालपणी स्कॉटलंडमधील गॅलोवे येथे त्यांच्या घराण्याच्या शेतीवाडीवर होत्या. त्यांनी लंडनमध्ये युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये प्राचीन इतिहास या विषयात पदवीचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली; परंतु त्यांच्या आईवडिलांनी स्थलांतर करायचे ठरवल्याने त्यांच्याबरोबर त्या दक्षिण आफ्रिकेत गेल्या.

दक्षिण आफ्रिकेत ब्रिजिटनी केप टाउन विद्यापीठात पुन्हा शिक्षण घ्यायला सुरुवात केली. तेथे त्यांना साध्यासुध्या पद्धतीने जगणाऱ्या समाजांच्या अभ्यासात रस निर्माण झाला. मानवशास्त्र आणि पुरातत्त्वशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर त्यांनी इंग्लंडला परतून (१९५०) लंडनच्या इन्स्टिट्यूट ऑफ आर्किऑलॉजीमध्ये डॉक्टरेटसाठी प्रवेश घेतला. विख्यात ब्रिटिश पुराजीववैज्ञानिक आणि भूपुरातत्त्वज्ञ एफ. ई. झॉयनर हे त्यांचे मार्गदर्शक होते. त्यांच्या पीएच.डी. प्रबंधाचा विषय ‘दक्षिण आफ्रिकेतील पाषाणयुगʼ हा होता. झॉयनर यांच्या एका व्याख्यानाच्या वेळी त्यांची स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज या संस्थेत पीएच.डी. करणाऱ्या रेमंड अल्चिन यांच्याशी भेट झाली आणि त्यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या (१९५१). पुढे अल्चिन दाम्पत्याने दक्षिण आशियाई पुरातत्त्वशास्त्रात दीर्घकाळ वाटचाल केली.

ब्रिजिट या रेमंड अल्चिन यांच्याबरोबर पहिल्यांदा भारतात आल्या (१९५१). त्यांनी रेमंड यांना त्यांच्या संशोधनात मदत तर केलीच, पण पुढील दीड दशकात ब्रिजिटनी पाषाणयुगावर स्वतंत्रपणे संशोधन करून दक्षिण आशियातील पुराश्मयुग व मध्याश्मयुगावरील प्रथम श्रेणीची यूरोपीय संशोधक असे स्थान मिळवले. त्यांनी भारतीय पुराश्मयुग कालक्रमाचे संश्लेषण करून अनेक महत्त्वपूर्ण शोधनिबंध प्रकाशित केले.

रेमंड अल्चिन यांच्याशी लग्न झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात ब्रिजिट त्यांच्या संशोधन मोहिमांचे नियोजन व व्यवस्थापन करत असत; परंतु नंतरच्या काळात मात्र आपल्या आवडीच्या प्रागितिहास संशोधनाला त्यांनी सुरुवात केली. ब्रिजिट या कोणत्याही विद्यापीठात नियमित शैक्षणिक पदावर नसल्या, तरी त्यांचा केंब्रिज आणि लंडन विद्यापीठांच्या बाह्यशिक्षण विभागांशी निकटचा संबंध होता आणि त्या दक्षिण आशियातील पुरातत्त्वाबद्दल नियमितपणे अध्यापन करत असत. तसेच त्या संशोधन प्रकल्पांच्या आखणीत व व्यवस्थापनात कुशल होत्या. त्यामुळे त्यांचा भारत, पाकिस्तान व श्रीलंकेतील अनेक पुरातत्त्वीय मोहिमांमध्ये सक्रीय सहभाग होता.

ब्रिजिट यांचे मुख्य योगदान उष्णकटिबंधीय प्रदेशांमधील (आफ्रिका, दक्षिण व आग्नेय आशिया आणि ऑस्ट्रेलिया) मध्याश्मयुगीन शिकारी समाजांच्या तुलनात्मक अभ्यासाशी संबंधित आहे. या अभ्यासावर आधारित त्यांचे द स्टोन-टिप्ड ॲरो (१९६६) हे पुस्तक महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी लोकजीवनशास्त्रीय निरीक्षणांचा भरपूर वापर केला आणि उष्णकटिबंधीय प्रदेशांमधील या मध्याश्मयुगीन शिकारी समाजांच्या जीवनात प्रचंड वैविध्य असल्याचे दाखवले. त्यांचे संशोधन हा दक्षिण आशियातील लोकजीवनशास्त्रीय अभ्यासाचा पहिला मोठा प्रयत्न होता.

ब्रिजिटनी १९७०-८० या दशकात बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाचे के. टी. एम. हेगडे आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे भूगोलतज्ज्ञ अँड्र्यू गौडी यांच्या सहकार्याने राजस्थानच्या वाळवंटात बहुविद्याशाखीय संशोधन प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाचा उद्देश चतुर्थक कालखंडातील पर्यावरणीय इतिहासाची पुनर्रचना आणि मानवी संस्कृतींचे अश्मयुगातील अनुकूलन असा होता. या क्षेत्रीय अभ्यासातून निघालेले निष्कर्ष प्रिहिस्ट्री अँड पॅलिओजिओग्राफी ऑफ द ग्रेट इंडियन डेझर्ट (१९७८) या ग्रंथात प्रसिद्ध आहेत. नंतरच्या काळात वीरेंद्रनाथ मिश्र आणि शरद नरहर राजगुरू यांच्या राजस्थानच्या वाळवंटातील प्रागैतिहासिक संशोधनातून ब्रिजिट यांच्या निष्कर्षांना पुष्टी मिळाली.

दक्षिण आशियाच्या प्रागितिहासात ब्रिजिट यांचे तिसरे मोठे योगदान उत्तर पाकिस्तानशी संबंधित आहे. ब्रिजिट आणि रेमंड अल्चिन यांनी मिळून १९८० ते १९९० या काळात शिवालिक टेकड्यांमध्ये ब्रिटिश पुरातत्त्वीय मोहिमेचे आयोजन केले. या दीर्घ क्षेत्रीय संशोधनामध्ये रॉबिन डेनेल, हेलन रेंडेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डी टेरा आणि पॅटरसन यांनी अगोदर मांडलेल्या सोन संस्कृतीच्या (Soan culture) अनुक्रमाची नव्याने मांडणी केली. या संशोधनात त्यांना १.९ दशलक्ष वर्षांपूर्वीचे रिवात हे पुरातत्त्वीय स्थळ आणि दिना व जलालपूर येथे ०.७ दशलक्ष वर्षांपूर्वींची अश्युलियन स्थळे सापडली.

ब्रिजिट परिषदांच्या आयोजनात अग्रेसर असत. त्यांनी भारतातील सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचा एकत्रित विचार होण्यासाठी १९८२ मध्ये केंब्रिज येथे परिषद आयोजित केली आणि १९८९ मध्ये शोधनिबंधाचे पुस्तकही प्रकाशित केले. त्याचप्रमाणे ब्रिजिटनी १९९४ मध्ये प्रकाशित केलेले लिव्हिंग ट्रॅडिशन्स हे पुस्तक हा १९९१ मध्ये दक्षिण आशियातील लोकजीवनशास्त्रीय संशोधन या विषयावर आयोजित केलेल्या परिषदेचा परिपाक होता. त्यांनी रेमंड अल्चिन यांच्यासह लिहिलेली द बर्थ ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन इन इंडिया अँड पाकिस्तान बिफोर ५०० बी.सी. (१९६८) आणि द राइज ऑफ सिव्हिलायझेशन इन इंडिया अँड पाकिस्तान (१९८२) ही पुस्तके महत्त्वाची आहेत.

ब्रिजिट केंब्रिज येथील एन्शंट इंडिया अँड इराण ट्रस्ट या संस्थेच्या संस्थापकांपैकी एक होत्या. दक्षिण आशिया आणि मध्य आशियातील तरुण पुरातत्त्वज्ञांना शिष्यवृत्ती देऊन अभ्यासाच्या नवीन संधी उपलब्ध करण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली (१९७८). त्यांनी दीर्घकाळ या संस्थेचे विश्वस्तपद सांभाळले.

ब्रिजिट यांनी साउथ एशियन स्टडीज हे नियतकालिक सुरू केले आणि त्याचे दहा वर्षे संपादन केले. त्या केंब्रिजमधील वूल्फसन कॉलेजच्या सन्माननीय सदस्य (फेलो) आणि सोसायटी ऑफ अँटिक्वेरीजच्या सभासद होत्या. लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने सुवर्णपदक देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला (२००४).

ब्रिजिट यांचे नॉरविच (इंग्लंड) येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Coningham, Robin A. E. Biographical Memoirs of Fellows of the British Academy, Oxford University Press, Oxford,  2012.
  • Coningham, Robin A. E. ‘Bridget Allchin Obituaryʼ, The Gurdian, 23 August 2017.
  • Paddayya, K. ‘Obituary : Bridget Allchinʼ, Man and Environment, 42(2): 113-114.

                                                                                                                                                                                            समीक्षक : शंतनू वैद्य