क्लार्क, सर जॉन ग्रॅहम डग्लस : (२८ जुलै १९०७ – १२ सप्टेंबर १९९५). स्टार कार या ब्रिटनमधील मध्याश्मयुगीन स्थळाच्या उत्खननासाठी विख्यात असलेले ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म ब्रॉम्ली (केंट काउंटी) येथे एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव मॉड एथेल शॉ आणि वडिलांचे नाव चार्ल्स डग्लस क्लार्क होते. त्यांचे वडील शेअर दलाल (ब्रोकर) आणि राखीव सैन्यदलात अधिकारी होते.

क्लार्क यांनी विल्टशायरमधील मार्लबरो कॉलेजात सुरुवातीचे शिक्षण घेतले व ते १९२६ मध्ये केंब्रिज विद्यापीठात गेले. त्यांनी पीटरहाउस कॉलेजात इतिहास, पुरातत्त्व आणि मानवशास्त्र यांचा अभ्यास केला. या शिक्षणादरम्यान त्यांना तीन वर्षांसाठी ह्यूगो डी बालशम (Hugo de Balsham) रिसर्च फेलोशिप आणि दोन वर्षांसाठी बाय (Bye) फेलोशिप या प्रतिष्ठेच्या शिष्यवृत्ती मिळाल्या. क्लार्क यांचे द मेसोलिथिक एज इन ब्रिटन हे ब्रिटिश प्रागितिहासावरील अत्यंत महत्त्वाचे पुस्तक १९३२ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यांनी ब्रिटनमधील प्रागैतिहासिक पुरातत्त्वीय अवशेषांचा सखोल अभ्यास करून मध्याश्मयुगीन अवजारांचे आकृतिबंध ओळखण्याची निश्चित दिशा दाखवली. त्यांनी १९३३ मध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली. ‘द मेसोलिथिक, निओेलिथिक अँड अर्ली मेटल इंडस्ट्रीज इन ब्रिटनʼ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय असा होता.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान क्लार्कनी रॉयल एअर फोर्सला हवाई छायाचित्रांचा अर्थ लावण्यात मदत केली. कौन्सिल फॉर ब्रिटिश आर्किऑलॉजी स्थापन करण्यात त्यांचा सहभाग होता (१९४४). ते केंब्रिज विद्यापीठात व्याख्याता झाले (१९४६) आणि डिस्ने प्राध्यापक झाले (१९५२). क्लार्क ॲन्शंट मॉन्युमेंट्स बोर्डाचे (१९५४ ते १९७७) व रॉयल कमिशन ऑन हिस्टॉरिक मॉन्युमेंट्सचे सदस्य (१९५७ ते १९६९) होते. १९७४ मध्ये डिस्ने प्राध्यापक पदावरून निवृत्त झाले; तथापि ते पीटरहाउस कॉलेजात ‘मास्टरʼ (१९७३-१९८०) आणि ब्रिटिश म्युझियमचे विश्वस्त होते (१९७५-१९८०).

सात दशकांच्या कारकिर्दीत क्लार्क यांनी पुरातत्त्वीय संशोधनात मोलाची भर घातली. पुरातत्त्वात वैज्ञानिक सिद्धांत आणि संशोधन पद्धतींचा वापर नियमित होण्याच्या कितीतरी अगोदर क्लार्क यांनी त्याची सुरुवात केली होती. त्यांनी फेनलँड रिसर्च कमिटी (Fenland Research Committee) या नावाने एक संस्था स्थापन केली (१९३२). या संस्थेत बेचाळीस ‘समविचारीʼ संशोधकांचा समावेश होता. यात पुरातत्त्वीय अभ्यासकांप्रमाणेच भूविज्ञान, भूगोल, जीवविज्ञान वगैरेचे अभ्यासक व तज्ज्ञ होते. १९३२ ते १९४० या काळात कमिटीने क्लार्क यांच्या नेतृत्वात, आज ज्याला आपण अनेक बहुविद्याशाखीय म्हणतो, असे संशोधन अहवाल प्रकाशित केले.

प्राचीन पर्यावरणासंबंधी मांडणी करण्यासाठी क्लार्क यांनी वनस्पतिशास्त्रज्ञ सर हॅरी गॉडविन यांच्या सहकार्याने पुरातत्त्वीय स्थळांवरील परागकणांचा उपयोग करून घेतला. आज हे संशोधन पुरापरागविज्ञान या महत्त्वाच्या उपशाखेत विस्तारित झालेले आहे. त्यामुळे विविध प्रागैतिहासिक स्थळांवरील व विविध कालखंडातील परिस्थितिकी (ecological conditions) कळून त्यांच्यात तुलना करणे शक्य झाले. नवपुरातत्त्वाने पुरातत्त्वीय संशोधनात विविध वैज्ञानिक शाखांचा वापर करण्याचा आग्रह धरण्याआधी दोन दशके आधी क्लार्क यांनी तशी सुरुवात केली होती, हे लक्षणीय आहे.

क्लार्क यांनी यूरोपातील इतर भागांत आपल्या संशोधनाचा विस्तार करून काढलेले निष्कर्ष द मेसोलिथिक सेटलमेंट्स ऑफ नॉर्दर्न यूरोप (१९३६) या पुस्तकात मांडले. मानवी समूहांचे पर्यावरणाशी निगडित सांस्कृतिक अनुकूलन आणि पर्यायाने प्रागैतिहासिक मानवी समूहांची उपजीविका व अर्थकारण याबद्दलचे संशोधन आर्किऑलॉजी अँड सोसायटी (१९३९) व प्रिहिस्टॉरिक यूरोपः द इकॉनॉमिक बेसिस (१९५२) या दोन पुस्तकांत आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सी. जे. थॉमसन यांनी अश्मयुग ही संकल्पना मांडल्यापासून, अश्मयुगातील दगडी अवजारे बनवण्याच्या तंत्रातील प्रगती कशी ओळखावी, याबद्दल पुरातत्त्वात चर्चा केली जात होती. ग्रॅहम क्लार्क यांनी १९६९ मध्ये यासाठी एक प्रणाली तयार केली. त्यात तंत्रज्ञानातील प्रगतीच्या आधारे अवजारांचे पाच प्रकारांत वर्गीकरण करण्याची कल्पना असून त्यांनी या प्रकारांना ‘मोडʼ (Mode) असे नाव दिले. या प्रणालीमुळे अश्मयुगातील विविध कालखंडांत आढळलेल्या संस्कृतींमधील दगडी अवजारांच्या तंत्रज्ञानाचे नेमके वर्णन करणे शक्य झाले.

स्टार कार (Star Carr) या इंग्लंडमधील यॉर्कशायर परगण्यातील मध्याश्मयुगीन स्थळाच्या उत्खननासाठी क्लार्क विशेष प्रसिद्ध आहेत. या उत्खननाचा सविस्तर अहवाल त्यांनी १९५४ मध्ये प्रकाशित केला. हे संशोधन मध्याश्मयुग आणि पर्यावरणीय पुरातत्त्वाच्या (Environmental archaeology) क्षेत्रात मैलाचा दगड मानले जाते.

अनेक नामवंत विद्यार्थी घडवण्यात क्लार्क यांचे महत्त्वाचे योगदान होते. आफ्रिकन प्रागितिहासात भरीव कामगिरी करणारे जे. डेसमंड क्लार्क, चार्ल्स हायहॅम, डेव्हिड क्लार्क, केंब्रिज विद्यापीठातील पुराअर्थशास्त्र (Palaeoeconomy) संशोधनाचे प्रणेते एरिक हिग्ज आणि ऑस्ट्रेलियन पुरातत्त्वाचे जनक मानले जाणारे जॉन मुलव्हानी यांची जडणघडण क्लार्क यांच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणामुळे झाली.

पुरातत्त्व आणि प्रागैतिहासिक क्षेत्रातील कार्य आणि योगदानाबद्दल क्लार्क यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यात ब्रिटिश अकॅडमीची फेलोशिप (१९५१), ब्रिटिश साम्राज्यातील कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर म्हणून नियुक्ती (१९७१), सोसायटी ऑफ अँटिक्वेरीज ऑफ लंडन या संस्थेचे सुवर्णपदक (१९७८), इरॅस्मस पुरस्कार (१९९०) आणि नाइटहूड (१९९२) यांचा समावेश आहे.

केंब्रिज येथे त्यांचे झाले.

संदर्भ :

  • Clark, G. World Prehistory: A New Synthesis, Cambridge University Press, Cambridge, 1969.
  • Fagan, B. M. Grahame Clark: An intellectual biography of an archaeologist, Westview Press, Boulder, 2001.
  • Lim, Tse Siang, ‘Clark, John Grahame Douglasʼ, Encyclopedia of Global Archaeology, (Ed., Claire Smith), pp. 2390-2391, Springer, 2020.
  • छायाचित्र स्रोत : cambridge.org/

                                                                                                                                                                             समीक्षक : जयेंद्र जोगळेकर