आंध्र प्रदेशाच्या पूर्व किनारपट्टीवरील एक महत्त्वपूर्ण बौद्ध स्थळ. घंटाशाला येथे प्राचीन काळातील बौद्ध स्तूप अवशेष मसुलीपाटनपासून २० किमी. पश्चिमेस स्थित आहे. स्तूपाच्या टेकाडाला स्थानीय भाषेत ‘लांजा डिब्बाʼ असे संबोधले जाते. या परिसराचे सर्वप्रथम सर्वेक्षण बॉसेल्ल याने केले (१८७०-७१) आणि उत्खनन अलेक्सझांडर री याने केले (१८८२). आंध्र प्रदेशातील अन्य स्तूपांप्रमाणे घंटाशाला येथील स्तूपाचे स्थापत्य अवशेष जसे अंड, हर्मिका, छत्रयष्टी, वेदिका इत्यादी काळाच्या ओघात नष्ट होऊन केवळ स्तूपाच्या पायाचा भाग शिल्लक होता.

घंटाशाला येथील स्तूप, आंध्र प्रदेश.

घंटाशाला येथील स्तूप विटांनी निर्मित असून बांधकामांची रचना वैशिष्ट्यपूर्ण होती. स्तूपाच्या केंद्रभागी विटांचा चौरस असून मध्यभागी यष्टी करिता मोकळी जागा होती. या केंद्राकृती चौरसभोवती चार चौकोन, त्याच्या बाहेर दोन वर्तुळाकार विटांचे बांधकाम आतल्या बाजूने सम आकारात विभाजित केले होते. हा संपूर्ण भाग आतून पोकळ असून ही जागा मातीचा भराव टाकून मजबूत केली होती. वर्तुळाकार बांधकामाच्या सभोवताल ५.५ मीटर रुंदीची भक्कम विटांची भिंत असून याद्वारे स्तूपाचा आतील मातीचा भराव उत्कृष्टपणे सरंक्षित केला गेला होता.

घंटाशाला येथील उत्खननातून प्राप्त शिल्प, आंध्र प्रदेश.

स्तूपाच्या मध्यभागातील उत्खननात अलेक्झांडर री याला तुटलेल्या छत्रयष्टीचे अवशेष, एक शिशाचे नाणे, पंचकोनी आकाराचा स्फटिक मणी इत्यादी अवशेष प्राप्त झाले. खालच्या स्तरातील उत्खननात री याला मातीचे करंडक आढळले. या पात्राच्या आत लहान आकाराची चमकदार दगडी मंजुषा व्यवस्थित ठेवली होती. या मंजुषेच्या आंत षट्कोनी स्फटिक मणी, पाच अर्ध-मौल्यवान दगडी मणी, मोत्यांचे मणी, सुवर्ण-पुष्प आणि अस्थी अवशेष इत्यादी प्राप्त झाले.

उत्खननातून प्राप्त अवशेषांनुसार असे निदर्शनास येते की, घंटाशाला येथील स्तूपाचा दर्शनी भाग अलंकृत होता. स्तूपाच्या सभोवताली प्रदक्षिणा पथ असून चार दिशेस आयकस्तंभ होते. स्तूपाच्या भोवताली विखुरलेल्या शिल्पांवरून घंटाशाला स्तूपाला दगडी वेदिका असावी, असे अलेक्झांडर री याचे मत आहे. स्तूपाच्या उत्खननात प्राप्त अलंकृत वेदिका स्तंभ आणि आयकस्तंभाचे अवशेष अमरावती शैलीप्रमाणे असून कोरीव आणि रेखीव अलंकरणाने परिपूर्ण आहेत. उत्खननात अनेक अलंकृत दगड़ी स्तंभअवशेष प्राप्त झाले. या स्तंभाचा दर्शनी भाग उठावदारपणे कोरला असून स्तंभावर पूर्णकुंभामधून कमळपुष्प, पाने आणि लता इत्यादी अत्यंत सूक्ष्मरीतीने अलंकृत केले आहेत. अष्टकोनी आकाराच्या दुसऱ्या स्तंभावर संभवत: राजसिंहासन, त्यावर दोन बाजूंस दोन कमळपुष्प दाखविले आहेत. राजसिंहासनाच्या मागे एक स्तंभ आणि स्तंभावर दोन प्राणी दोन दिशेस तोंड करून बसले आहेत. स्तंभावरील रेखीव धर्मचक्र दक्षिणेतील बौद्ध कला आणि अमरावती शैलीचे यथार्थ चित्रण प्रस्तुत करते. घंटाशाला स्तूपा नजीकच्या जलाटेश्वर मंदिरातून प्राप्त झालेला एका षट्कोनी आकाराच्या स्तंभाचा भाग संभवत: स्तूपाच्या वेदिकेचा भाग असावा. या स्तंभावर अर्ध-कमळपुष्प अंकित आहेत. घंटाशाला येथील अलंकरण सांची स्तूपसदृश्य असावे, असे उत्खननकर्त्यांचे मत आहे.

बुद्धीपाद शिल्प, घंटाशाला, आंध्र प्रदेश.

उत्खननात एक दगडी अलंकृत बुद्धपाद शिल्प प्राप्त झाले. शिल्पाचा संपूर्ण भाग कमळपुष्पांनी नक्षीकृत असून मध्यभागी पदचिन्ह आहे. या पदचिन्हांवर रेखीव धर्मचक्र सुशोभित असून अन्य बौद्ध चिन्हे अलंकृत आहेत. हे शिल्पदेखील अमरावती येथील महास्तूपातून प्राप्त शिल्पासारखे आहे. आंध्र प्रदेशातील अन्य स्तूपांप्रमाणे घंटाशाला येथील स्तूपाचा दर्शनीय भाग शुभ्र हस्तिदंती रंगाच्या चुनखडी दगडांनी अलंकृत केला होता.

घंटाशाला येथील स्तूपातून मिळालेले करंडक, आंध्र प्रदेश.

काळाच्या ओघात स्तूपाची दुरवस्था होऊन स्तूपाची दगडी शिल्पे स्थानिक गावकऱ्यांनी विविध कामांत उपयोगी आणल्याचे दिसून येते. स्थानिकांनी घरांच्या बांधकामासाठी लागणाऱ्या चुन्याकरता येथील शिल्पे वापरल्याने स्तूपाचे अलंकरणीय अवशेष पूर्णपणे नष्ट झाले. त्याचप्रमाणे उर्वरित स्तूपाचे आयकस्तंभ, वेदिकेचे स्तंभ, स्तूपावरील आच्छादलेले शिल्प इत्यादींवर उत्तर-मध्ययुगीन काळातील शिल्पे कोरल्याचे परिसरात ठिकठिकाणी दिसून येते.

घंटाशाला येथील स्तूप आंध्र प्रदेशातील महत्त्वपूर्ण स्तूपांपैकी एक होता. हा स्तूप पूर्वी समुद्र किनाऱ्याजवळ स्थित असल्याने सातवाहन काळात या स्थळाला व्यापारी भेट देत असावेत. प्राचीन काळात घंटाशाला हे दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध बौद्ध क्षेत्र होते. घंटाशाला येथील शिल्पांच्या विषयवस्तूवरून हा स्तूप संभवतः इ. स. द्वितीय शतकात निर्माण झाला असावा, असे वाटते.

 

 

 

 

संदर्भ :

  • Rea, Alexander, ‘South Indian Buddhist Antiquities; including the Stupas of Bhattiprolu, Gudivada and Ghantasala and Other Ancient Sites, in Krishna District, Madras Presidencyʼ, Archaeological Survey of India, New Imperial Series, Volume XV, Government Press, Madras, 1894.

                                                                                                                                                                              समीक्षक : मंजिरी भालेराव