भारतात ज्या दैवतांची पूजाअर्चा मोठ्या प्रमाणात चालते, त्यांत शिव किंवा शंकराचे नाव अग्रभागी घ्यावे लागेल. आजचा शिव म्हणजे ऋग्वेदातील रुद्र असे मानले जाते. रुद्र हा शब्द ‘रुद्’ या धातूपासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ रडणे, ओरडणे किंवा प्रकाशणे असा होतो. तो तांबडा रंगही सुचवतो. ऋग्वेदात, यजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेत, अथर्ववेदात, ऐतरेय ब्राह्मणशांखायन ब्राह्मण या वाङ्मयात रुद्रासाठी ‘शिव’ हे विशेषण वापरलेले आढळते. शिव, शंकर, शंभू ही पावित्र्यसूचक व कल्याणकारी स्वरूपाची विशेषणे आहेत.

शिव (जि. बलिया), उत्तर प्रदेश.

रुद्र हा भयप्रद आणि संहारक आहे, त्याचे अवयव दृढ आहेत, त्याचा रंग सोनेरी-पिंगट आहे, तो लांब केसांची वेणी घालतो, सोन्याचे अलंकार घालतो व रथात बसतो असे वर्णन ऋग्वेदात येते. पुढे वाजसनेयी संहिताअथर्ववेद यांनी त्यात भर घालून त्याला ‘नीलकण्ठ’ संबोधले. तो कातडे वापरतो व पर्वतात राहतो, मांसभक्षक कुत्रे त्याच्यासोबत असतात असेही म्हटले आहे. ऋग्वेदातील सूत्रांत रुद्राबद्दल भीती व्यक्त केलेली आहे. ‘तू आमच्या गुराढोरांचे रक्षण कर, आमचे गाव, मुलेबाळे यांना मारू नकोस’ अशा स्वरूपाच्या प्रार्थना आढळतात. प्रार्थना केल्यास तो संकटनाशकही आहे. त्याला औषधांचा स्वामी मानले आहे; यासंबंधी ‘जलाषभेषज’ हे त्याचे विशेषण आढळते. पशुंना वाचविणारा अर्थात पशुपतीही तो आहे. वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट या तीन भयप्रद निसर्गक्रमांचे द्योतक म्हणजे त्र्यंबक-रुद्र होय (त्र्यंबक – तीन डोळे असलेला). म्हणूनच तो स्वत: भयप्रद व संहारक आहे. रुद्राचे एकंदर स्वरूप हे मांगल्य आणि अमांगल्य यांचा संयोग आहे. शत्रूंना रडविणारा (रुद्र), पर्वतांचा अधिपती (गिरीश), निळ्या गळ्याचा (नीलग्रीव), लाल रंगाचा (विलोहित), रात्री फिरणारा (नक्तंचर), पशूंत प्रवेश करणारा (शिपिविष्ट), पिनाक हे धनुष्य धारण करणारा (पिनाकपाणी) असे रुद्राचे वर्णन रुद्राध्यायात आहे.

ब्राह्मणकाळात रुद्राचे उन्नयन झालेले दिसून येते. उपनिषदांतून रुद्र-शिवाची भक्ती आढळते. श्वेताश्वतर उपनिषदाने रुद्राचे महेश्वर असे वर्णन केले आहे. बहुधा याच काळात रुद्र आणि शिव एकरूप झाले असावेत. पुराणात शिवमाहात्म्य सांगणाऱ्या अनेक कथा आहेत. त्यांचा प्रसार सर्व वर्गांत झाला व शिव हे सर्व जातिजमातींचे आराध्यदैवत बनले. तो ब्रह्मा व विष्णूपेक्षा वरचढ समजला जाऊ लागला. त्याचे स्वरूप थोडे सौम्य झाले; पण वैदिक काळातील त्याच्या रौद्र रूपाचे धागेदोरे पौराणिक काळातही टिकून राहिलेले दिसतात. शिवाने ब्रह्मदेवाच्या आणि दक्षाच्या यज्ञांचा विध्वंस केल्याच्या कथांतून हे दिसून येते. तसेच त्याचे स्मशानात राहणे, कातडे नेसणे, वृषभ वाहन व भूतप्रेतादी सहचर, विषप्राशन करणे आणि कौल, कापालिक, पाशुपत या अवैदिक मतांशी शिवाचा संबंध या साऱ्यांतून त्याचे अतिप्राचीन रौद्र स्वरूप जाणवते. विनाश, तीक्ष्णदंष्ट्र, विरूपाक्ष, ऊर्ध्वकेश ही त्याची नावे याला पुष्टी देतात. ब्रह्माविष्णूमहेश या त्रयीत ब्रह्मदेवाकडे सृष्ट्योत्पादन, विष्णूकडे सृष्टीसंवर्धन आणि महेश-शिवाकडे सृष्टीच्या संहाराचे कर्तेपण दिले आहे, हे एका अर्थी त्याच्या उग्र रूपाला साजेसेच आहे.

चतुर्मुख लिंग शिव, जावा.

शिवपूजन हे मुख्यत: शिवप्रतिके, शिवलिंग आणि मूर्ती या तीन स्वरूपांत केले जाते. अश्वत्थाम्याने शिवाचा ‘स्वेतविग्रह’ निर्माण केला होता व होम इ. करून त्याची पूजा केली होती, असा उल्लेख महाभारतात आहे. शिवप्रतिकांमध्ये लिंग हे सर्वांत महत्त्वाचे आहे. लिंगपूजा ही जवळपास सबंध आशिया खंडात प्रचलित आहे. शिवाचे सर्वमान्य प्रतीक म्हणजे वृषभ किंवा बैल. ऐतिहासिक काळात बऱ्याच शिवोपासक राजांच्या मुद्रांवर, नाण्यांवर बैलाचे अंकन आढळून येते. विम, वासुदेव या कुषाण राजांच्या नाण्यांवर त्रिशूळ-परशू ही शिवचिन्हे आहेत. दक्षिण भारतीय अंकनात शिवाच्या हातात फक्त परशू दिसतो; त्रिशूळ नाही. या व्यतिरिक्त मंदिर, लिंग, नंदीपद, अर्धचंद्र असलेला वृषभ इ. चिन्हे गुप्तकालीन मृण्मुद्रांवर मिळाली आहेत. शिवमूर्तीचे प्राचीनत्व मौर्यकाळापर्यंत मागे जाते. भीटा (अलाहाबाद) येथून प्राप्त झालेल्या एका सर्वतोभद्र प्रतिमेच्या एका बाजूस मुकुट घातलेली कलशधारी द्विभुज प्रतिमा आहे. तिच्या पायाशी सिंह व वराह कोरलेले आहेत. या प्रतिमेच्या पाठीशी दुसरी स्थूल, द्विभुज प्रतिमा आहे. हातात कडे व पाठीमागे वळवलेले केस अशी ही प्रतिमा यक्षप्रतिमेच्याजवळ जाते. ही प्रतिमा शिवाची असावी व तिच्यामागे वराह, सिंहासह विष्णू दाखविला असावा, असे मत नी. पु. जोशी यांनी व्यक्त केले आहे. मथुरा येथून अनेक कुषाणकालीन मृण्मूर्ती व पाषाणमूर्ती तसेच लिंगे मिळाली आहेत. दक्षिण भारतातील सर्वांत प्राचीन शिवप्रतिमा तमिळनाडू राज्यातील गुड्डीमलम मंदिरात आहे. येथे पाच फूट उंच शिवलिंगाच्या दर्शनी भागावर उभ्या शंकराची द्विभुज प्रतिमा आहे. गोपीनाथ राव यांच्या मते, ही मूर्ती इ. स. पहिल्या/दुसऱ्या शतकातील असावी.

इ. स. पहिल्या आणि दुसऱ्या शतकातील नाणी उज्जयिनी येथे सापडली आहेत; त्यांवर दंड व कमंडलू घेऊन उभा असलेला शिव आढळतो. कुणिंद नाण्यांवर त्रिशूळ व परशू घेतलेला शंकर आढळतो. तेथे त्याला ‘छत्रेश्वर महात्मा’ असे म्हटले आहे. गोण्डोफरस या इंडो-पार्थियन राजाच्या नाण्यांवर त्रिशूळ व तालशाखा घेतलेला शंकर अंकित केला आहे. त्यावर ग्रीक देव पोसेडॉन याचा प्रभाव दिसतो. येथे राजाच्या ‘देवव्रत’ या विशेषणाने तो कदाचित शैवमताचा असल्याचे सूचित होते. कुषाण राजांच्या नाण्यांवर शंकराचे मोठ्या प्रमाणावर आणि वैविध्यपूर्ण अंकन आढळते. कडफायसिस दुसरा, विम यांच्या नाण्यांवर उजव्या हातात त्रिशूळ व परशू आणि डाव्या हातात घट घेतलेला दिगंबरावस्थेतील शंकर आहे. त्याच्या डाव्या हातावर एखाद्या जनावराचे कातडे लोंबकळत असलेले दिसते. रोझेनफिल्ड यांच्या मते ते सिंहाचे आहे, तर नी. पु. जोशी यांनी ते वृषभचर्म असल्याचे प्रतिपादन केले आहे. बैलाचे चामडे पांघरण्याची शैव पद्धत गुप्तकाळात रूढ होती. विम याच्या मुद्रेवरही वृषचर्म पांघरलेला शिव आढळतो. त्याच्या मस्तकावर अग्निज्वाळा दर्शविलेल्या आहेत. तसेच शिवाच्या डाव्या खांद्यावरून जानव्याप्रमाणे लोंबकळणारी माळ ही त्याचे ‘उपविती’ हे नाव सार्थ करते. विम याच्या नाण्यांवर शंकर विवस्त्र, महालिंगी आणि बैलाला टेकून उभा असलेला दिसतो. त्याच्या डाव्या हातात त्रिशूळ किंवा त्रिशूळ-परशू, तसेच जानव्यासारखा दागिना दिसतात. राजाच्या ‘माहेश्वर’ अभिधानामुळे तो शैव असल्याची खात्री पटते. कनिष्काच्या मुद्रेवर चतुर्भुज शंकर दिसतो. प्रदक्षिणाक्रमाने त्याच्या हातात अधोमुख घट, अंकुश, वज्र, त्रिशूळ, हरीण आहे. त्याने धोतर व जानव्यासारखी माळ परिधान केल्याचे दिसते. याच नाण्यांवर सर्वप्रथम शंकराचे प्रभामंडळ आढळते. आणखी एक तत्कालीन वैविध्य म्हणजे चार हातांचा व तीन शिरांचा शंकर. हुविष्काच्या नाण्यांवर जटाधारी त्रिमुख शिव, त्याच्या हातात घट, वज्र, त्रिशूळ आणि गदा आढळतात. वासुदेवाच्या नाण्यांवरही अशाच प्रकारे त्रिशूळ, घट, पाश, कमळ घेतलेला त्रिमुख शंकर आढळतो. उत्तर कुषाणकालीन शिवप्रतिमा बटबटीत व बेडौल असून शंकराच्या मस्तकावर चंद्रकोर दिसून येते. प्रारंभिक गुप्तकालीन शैव मुद्रांमध्ये बसरा येथील अर्धनारीश्वराचे अंकन असलेली मुद्रा व भीटा येथील ‘भद्रेश्वर’ नावाने ललितासनात बसलेला शिव हे उल्लेखनीय आहेत. वाराणसीहून मिळालेल्या मुद्रेवर ‘श्रीदेवस्वामी’ हा लेख आणि चौथऱ्यावर उभा असलेला द्विभुज शिव दिसतात. या शिवाच्या हातात कलश व दुसऱ्या हातात माळ किंवा पाश आहे. डावीकडे सापही दिसतो. उत्तर कुषाणकालीन व गुप्तकालीन मृत्तिकाफलकांमध्ये रंगमहाल येथून मिळालेले दोन फलक महत्त्वाचे आहेत. त्यांपैकी एकावर चतुर्मुख, द्विभुज व महालिंगधारी शंकर बैलावर स्वार दिसतो. मुख्य मुखांच्या आजूबाजूला एकेक मुख असून मानेकडून एक जटाजूट असलेली सूर्यचंद्रधारी द्विभुज पुरुषी आकृती प्रकट होताना दिसते. शिवाजवळ उत्तर भारतीय पद्धतीचा घागरा घातलेली पार्वती असून हा फलक चौथ्या शतकातील समजतात. दुसऱ्या फलकावर रुद्राचे बकऱ्याचे मुख व हत्तीच्या पायाप्रमाणे दिसणारा एकच पाय दर्शविला आहे. नी. पु. जोशी यांच्या म्हणण्याप्रमाणे हा अजएकपाद रुद्र असून प्रमुख अकरा रुद्रांपैकी एक आहे. तो अहिर्बुध्न्य आणि कुबेरासह धनाचे रक्षण करत असतो. याच काळातील भीटा येथील आसनारूढ शिव-पार्वती, नेवल (जि. उन्नाव, उत्तर प्रदेश) येथील अर्धनारीश्वर आणि अहिच्छत्र येथील महाभैरव फलक महत्त्वाचे आहेत.

गुप्तोत्तर काळात शैव मताचा बराच विस्तार होऊन अन्य मतांचा, त्यांच्या प्रतीकांचा प्रभाव शिवमूर्तींवर पडला. या काळातील शिवमूर्ती दागदागिन्यांनी मढलेल्या दिसतात. मस्तकावरील जटाजूटाचे नीटस जटामुकुटात रूपांतर झालेले असून त्यावरही काही रत्नमाला परिधान केलेल्या आढळतात. वस्त्रप्रावरणे इतर देवतांप्रमाणेच आढळतात. काही अपवाद वगळता तो दिगंबरावस्थेत दिसत नाही. या व पुढील काळातील  शिवाची सर्वमान्य आयुधे म्हणजे त्रिशूळ, सर्प, डमरू, खट्वांग तसेच घट, अक्षमाला, कमळ, वीणा ही  स्थानपरत्वे आढळतात. कुषाणकालीन आडवा त्रिनेत्र गुप्तकाळापासून उभा दाखविला जाऊ लागला.

शिवाच्या परिवारदेवतांमध्ये मुख्य स्थान पार्वतीचे आहे. विविध रूपांत ती शिवासह असते. वृषभस्वरूप नंदीही सर्वत्र आढळतो. काही ठिकाणी तो वृषमुख मानवी रूपातदेखील दिसून येतो. अनेक उमामहेश्वर प्रतिमांमध्ये कार्तिकेय, गणपती आणि हाडांच्या सापळ्याच्या स्वरूपात शिवगण ‘भृंगरिटी’ हाही अंकित केलेला आढळतो. वैविध्यपूर्ण शिवमूर्ती व शिवलिंगे दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर आढळतात. महाराष्ट्रातही देवालयाच्या गणेशपट्टीवर शिवप्रतिमा, लिंग वा प्रतीक कोरले जातच असे. अष्टदिक्पाल आणि सप्तमातृका शिलापट्टांवरही एखाद्या तरी शिवस्वरूपाचे अंकन केलेले आढळते. शिवमूर्तींचे ढोबळमानाने सामान्य व विशेष असे दोन उपवर्ग पडतात. एकटा उभा वा बैठ्या स्वरूपातील, सहकुटुंब शिव या सामान्य मूर्ती होत. विशेष या उपवर्गात सहसा वैदिक व पौराणिक कथांवर आधारित तसेच वैशिष्ट्यपूर्ण शिवमूर्तींचा समावेश होतो. त्यांचे मुख्यत्वे करून अनुग्रहमूर्ती, दक्षिणामूर्ती, संहारमूर्ती, नृत्यमूर्ती व संकीर्ण असे प्रकार आहेत.

संदर्भ :

  • Banerjea, J. N., Development of Hindu Iconography, University of Calcutta, Calcutta, 1941.
  • Kramrisch, S., Manifestations of Shiva, Philadelphia Museum of Art, 1981.
  • Rao, T. A. G., Elements of Hindu Iconography, Vol., II, Part I, Motilal Banarasidas Publishers Pvt. Ltd., Delhi, 1997.
  • खरे, ग. ह., मूर्तिविज्ञान, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, २०१२.
  • जोशी, नी. पु., भारतीय मूर्तिशास्त्र, प्रसाद प्रकाशन, पुणे, २०१३.
  • देगलूरकर, गो. बं., शिवमूर्तये नम.., स्नेहल प्रकाशन, पुणे, २०१४.

                                                                                                                                                                                समीक्षक : मंजिरी भालेराव