बेल्झोनी, जिओव्हान्नी : (५ नोव्हेंबर १७७८ – ३ डिसेंबर १८२३). प्रसिद्ध इटालियन शोधक, अभियंता व हौशी पुरातत्त्वज्ञ. त्याचा जन्म इटलीतील पदुआ (तत्कालीन व्हेनिस गणराज्य) येथे झाला. तेरा भावंडे असलेल्या बेल्झोनीचे कुटुंब रोममध्ये राहात असल्याने त्याचे बालपण रोममध्ये गेले. वयाच्या सोळाव्या वर्षी बेल्झोनीने धर्मगुरू होण्यासाठी एका ख्रिश्चन मठात प्रवेश घेतला. परंतु १७९८ मध्ये नेपोलियनच्या फौजांनी रोम ताब्यात घेतल्यानंतर तो मठ सोडून पदुआला गेला आणि तेथे पाणी खेचणाऱ्या यंत्रासंबंधी अभियांत्रिकी शिक्षण घेतले. पुढे तो हॉलंडला गेला (१८००) आणि १८०३ मध्ये इंग्लंडला पोहोचला.

इंग्लंडमध्ये बेल्झोनीने सारा बान (Sarah Banne) हिच्याशी विवाह केला. जवळजवळ दोन मीटर उंच असलेल्या बेल्झोनीने त्याच्याप्रमाणेच धिप्पाड असलेल्या बायकोबरोबर निरनिराळ्या जत्रांमध्ये सर्कशीत आणि लंडनच्या रस्तोरस्ती कसरतीचे खेळ करायला सुरुवात केली. त्यांचे हे विलक्षण जीवन दहा वर्षे चालू होते. या काळात तो ‘द ग्रेट बेल्झोनीʼ या नावाने प्रसिद्ध होता.

सर्कशीतील काम सोडून बेल्झोनी माल्टा येथे गेला (१८१२) आणि तेथून आधुनिक इजिप्तचा निर्माता महंमद अली पाशा (१७६९–१८४९) याला आपण शोधलेले पाणी खेचणारे यंत्र विकण्यासाठी तो कैरोला गेला (१८१५). परंतु पाशाला हे यंत्र फारसे न आवडल्याने बेल्झोनी उपजीविकेसाठी अन्य साधन शोधू लागला. या काळात त्याची ब्रिटिश काउन्सल जनरल हेन्री सॉल्ट (१७६०–१८२७) याच्याबरोबर ओळख झाली. सॉल्ट इजिप्तमध्ये वैध-अवैध अशा सर्व मार्गांनी मिळवलेल्या कलाकृती व पुरातत्त्वीय वस्तू ब्रिटिश म्युझियमला पाठवण्याचे काम करत होता.

सॉल्टच्या मदतीने बेल्झोनीने थेब्ज येथे जाऊन दुसरा रामसेस (Ramesses II) याच्या पुतळ्याचे सात टनापेक्षा जास्त वजनाचे मस्तक मिळवून ते इंग्लंडला पाठवण्यात यश मिळवले. त्याचप्रमाणे त्याने लुक्झर येथून दुसरा रामसेस याचे दोन अवाढव्य पुतळे ब्रिटिश म्युझियमला रवाना करण्याचे अवघड काम पार पाडले. १८१७ मध्ये तो ‘राजांच्या दरीतʼ (Valley of Kings) गेला आणि तेथे त्याने पहिला रामसेस (Ramesses I), तिसरा अमेनहोतेप (Amenhotep III), मर्मेनप्ताह (Merneptah) आणि आय (Ay) यांची थडगी शोधून काढली. तसेच तो सु. सहा मीटर खोलीवर असलेले पहिला सेती (Seti I) याचे थडगे शोधण्यात यशस्वी झाला. त्याने शोधलेले हे थडगे ‘बेल्झोनीचे थडगेʼ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याने या थडग्यातील शवपेटी लंडनमधील धनिक वास्तुविशारद सर जॉन सोन (१७५३–१८३७) याच्या खासगी संग्रहालयासाठी पाठवून दिली. त्याच वर्षी त्याने नाइल नदीतील फिली बेटावरील आयसिस देवतेच्या मंदिरातील मनोरा (Obelisk) सुटा करून तो धाडसी इंग्लिश शोधक विल्यम जॉन बॅन्क्स (१७८६–१८५५) याच्यासाठी इंग्लंडला रवाना केला.

बेल्झोनी गिझा येथील खाफ्रे पिरॅमिडमध्ये (Pyramid of Khafre) प्रवेश करणारा आधुनिक काळातला पहिला माणूस ठरला (१८१८). त्याच वर्षी बेल्झोनीने लाल समुद्राच्या काठी असलेल्या बेरिनिके (Berenicke) या प्राचीन बंदराचा शोध लावला.

बेल्झोनी १८१९ मध्ये इंग्लंडला परतला आणि त्याने आपले नॅरेटिव्हज ऑफ द ऑपरेशन्स अँड रिसेंट डिस्कव्हरीज इन इजिप्त अँड नुबिया (१८२०) हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाने तो प्रसिद्ध झाला. त्याने १८२० ते १८२३ या काळात इंग्लंड आणि पॅरिसमध्ये त्याने आणलेल्या प्राचीन वस्तूंची प्रदर्शने भरवली.

पश्चिम आफ्रिकेतील तिबुंक्तू (Timbuktu) या शहराकडे जात असताना हगवणीमुळे आजारी पडून ग्वाटो या गावाजवळ बेल्झोनी मरण पावला (१८२३).

पुरातत्त्वविद्येच्या सुरुवातीच्या काळातील बेल्झोनीसारख्या अनेकांना पुरातत्त्वविद्येच्या इतिहासात फक्त शोधक व पुरावस्तूसंग्राहक एवढेच स्थान दिले जाते. इजिप्तमध्ये बेल्झोनीने अनेक उत्खनने केली असली, तरी ती केवळ पुरातत्त्वीय वस्तू व कलाकृती लुटण्यासाठी होती. त्याच्या काळातच अशास्त्रीय पद्धतीच्या उत्खननामुळे तो बदनाम झाला होता, म्हणूनच पुरातत्त्वविद्येचे इतिहासकार त्याला पुरावस्तू लुटारू मानतात.

संदर्भ :

  • Belzoni, Giovanni B. Belzoni’s Travels: Narrative of the Operations and Recent Discoveries in Egypt and Nubia, British Museum Press, 1820 (Reprint 2001).
  • Mayes, Stanley, The Great Belzoni: The Circus Strongman Who Discovered Egypt’s Ancient Treasures, Tauris Parke Paperbacks, 2006.
  • McLeish, John L. Belzoni’s Discoveries, Freemason Pub. Co., 1916.

                                                                                                                                                                                समीक्षक : जयेंद्र जोगळेकर