मेर्काती, मिकेले : (८ एप्रिल १५४१–२५ जून १५९३). पुरातत्त्वविद्येच्या उगमकाळात दगडी अवजारांचे महत्त्व ओळखणारे इटालियन पुराजीवशास्त्रज्ञ, वनस्पतिशास्त्रज्ञ, वैद्य व वस्तूसंग्राहक. त्यांचा जन्म इटलीतील सान मिनिआतो (टस्कनी) येथे झाला. त्यांचे कुटुंब इटलीतील एक प्रतिष्ठीत घराणे होते. मिकेलेंचे आजोबा प्रसिद्ध वैद्य होते, तसेच वडील पिएर्तो मेर्काती हे पोप पाचवे पायस (Pious V) व पोप तेरावे ग्रेगरी (Gregory XIII) यांचे डॉक्टर होते. लहानवयातच वडिलांच्या हाताखाली वैद्यकीचा अनुभव घेतल्यानंतर मिकेलेंनी पिसा विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथून एम. डी. आणि वैद्यकी व तत्त्वज्ञान या दोन विषयांमध्ये पीएच. डी. या पदव्या घेतल्या. विख्यात इटालियन वनस्पतिशास्त्रज्ञ व वैद्य आंद्रेआ सिसाल्पिनो (१५२४–१६०३) हे त्यांचे मार्गदर्शक होते.

वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी मिकेले मेर्काती यांची पोप पाचवे पायस यांनी व्हॅटिकनच्या वनस्पती उद्यानाचे (Botanical Garden) संचालक म्हणून नेमणूक केली. त्यांनी पोप तेरावे ग्रेगरी, पोप पाचवे सिक्टस (Sixtus V) आणि पोप आठवे क्लेमंट (Clement VIII) यांच्या काळापर्यंत दीर्घकाळ हे पद भूषवले. मेर्काती यांनी प्लेग या विषयावर इस्टिट्यूटो सोप्रा ला पेस्टे हा ग्रंथ लिहिला (१५७६).

मिकेले मेर्काती यांनी रेखाटन केलेली दगडी अवजारे.

मेर्काती यांना खनिजे आणि जीवाश्म यांच्या अभ्यासात रस होता. त्यांनी जमवलेल्या नमुन्यांवरील टिपणे पुढे शंभर वर्षांनंतर मेटालोथेका व्हॅटिकाना (Metallotheca Vaticana) या नावाने प्रकाशित (१७१७). मेर्कातींनी खनिजे व जीवाश्मांबरोबरच इतर अनेक वस्तू जमा केल्या होत्या. त्यात फ्लिंट दगडाची काही अवजारे होती. त्यांना मेर्कातींनी सेरायुनिया (Ceraunia) अथवा थंडरस्टोन (Thunderstone) असे नाव दिले होते. हे दगड विजांच्या गडगडाटातून तयार होतात, अशी त्या काळात समजूत होती; तथापि या दगडांचा सूक्ष्म अभ्यास करून मेर्कातींनी त्यांच्यावरील काही छिलके मुद्दाम दुसरा दगड वापरून काढले असल्याचे अचूकपणे ओळखले. ही अवजारे असून ती कशामध्ये तरी बसवून (hafting) धातू उपलब्ध नव्हते तेव्हा वापरली जात असावीत, हे त्यांनी नमूद केले. त्यासाठी त्यांनी बायबलमधील काही उताऱ्यांचा आधार घेतला होता. परंतु दीर्घकाळ त्यांचे लेखन प्रसिद्ध न झाल्याने त्यांच्या निरीक्षणांचे महत्त्व कळू शकले नाही. पुढे विसाव्या शतकात पुरातत्त्वविद्येचा इतिहास लिहिताना डेव्हिड क्लार्क यांनी भौतिक विज्ञानात गॅलिलीओचे जे स्थान आहे, ते स्थान मेर्काती यांचे पुरातत्त्वविद्येत असल्याचे नमूद केले आहे.

रोम येथे त्यांचे निधन झाले.

 

 

संदर्भ :

  • Clarke, David L. Analytical Archaeology, Routledge, London, 1968.
  • Goodrum, Matthew R. ‘Questioning Thunderstones and Arrowheads: The Problem of Recognizing and Interpreting Stone Artifacts in the Seventeenth Centuryʼ, Early Science and Medicine, 13 (5): 482-508, 2008.
  • Murray, Tim, Milestones in Archaeology: A Chronological Encyclopedia, ABC-CLIO, 2007.

                                                                                                                                                                                समीक्षक : जयेंद्र जोगळेकर