सिंह, पुरुषोत्तम : (१ जानेवारी १९४० – २२ फेब्रुवारी २०२०). विख्यात भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील भरौली या गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सिंह यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बी. ए. (१९५८), एम. ए. (१९६०) व पीएच. डी. (१९६८) असे शिक्षण पूर्ण केले. प्राच्यविद्या संशोधक, पुरातत्त्वज्ञ अवध किशोर नारायण हे त्यांचे मार्गदर्शक होते.
सिंह यांनी कालीबंगन येथील उत्खननादरम्यान भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे प्रा. बी. बी. लाल यांच्या हाताखाली क्षेत्रीय पुरातत्त्वाचे प्रशिक्षण घेतले. बनारस हिंदू विद्यापीठात व्याख्याता म्हणून रुजू होण्यापूर्वी त्यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणात तांत्रिक साहाय्यक म्हणून काम केले (१९६२-६३). बनारस हिंदू विद्यापीठात त्यांनी सुमारे चार दशके प्राचीन इतिहास व पुरातत्त्वाचे अध्यापन केले (१९६३–२००२). त्यांनी विभागप्रमुख आणि कला विद्याशाखेचे अधिष्ठाता ही पदे भूषवली. याशिवाय प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागाला विद्यापीठ अनुदान आयोगाचा विशेष सहायक कार्यक्रम मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ते भारती या नियतकालिकाचे संपादक होते.
सिंह हे लंडनमधील इन्स्टिट्यूट ऑफ आर्किऑलॉजी येथे कॉमनवेल्थ पोस्ट-डॉक्टरल फेलो (१९७०-७२), आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी, शिमला येथे फेलो (२००२-२००५) होते. त्यांनी १९९१-१९९२ मध्ये कॉनकॉर्डिया विद्यापीठ व माँट्रियल (कॅनडा) येथे अध्यापन केले. ते १९९६ मध्ये चेन्नई येथे झालेल्या इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष (१९९६) आणि इंडियन सोसायटी फॉर प्रिहिस्टॉरिक अँड क्वाटर्नरी स्टडीजचे अध्यक्ष होते (२००२).
सिंह यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत उत्तर प्रदेश येथे अनेक उत्खनने केली आणि त्यांचे विस्तृत अहवाल प्रसिद्ध केले. त्यात नरहन, इमलिदी खुर्द व धुरियापार (जिल्हा गोरखपूर), वैना व भूनादीह (जिल्हा बलिया), आणि अगियाबीर (जिल्हा मिर्झापूर) या महत्त्वाच्या पुरातत्त्वीय स्थळांचा समावेश होता. त्यांच्या उत्खननांमुळे गंगेच्या खोऱ्यातील लोहयुगापूर्वीच्या संस्कृतींचे समग्र चित्र समोर आले. अवध किशोर नारायण यांच्या राजघाट येथील उत्खननातही सिंह यांचा सहभाग होता. सिंह यांनी उत्खननांप्रमाणेच अनेक पुरातत्त्वीय सर्वेक्षणाचे संचालन केले. त्यांच्या सरयूपार व पूर्व उत्तर प्रदेशातील सर्वेक्षणांमुळे या भागांमधील बुद्धपूर्व काळातील समृद्ध समाजजीवन आणि वसाहतस्थळे यांच्यावर नव्याने प्रकाश पडला.
उत्खनन अहवालांखेरीज पुरुषोत्तम सिंह यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यात बरियल प्रॅक्टिसेस इन ॲन्शंट इंडिया (१९७०), निओलिथिक कल्चर्स ऑफ वेस्टर्न एशिया (१९७४), द निओलिथिक ओरिजिन्स (१९९१), द आर्किऑलॉजी ऑफ मिडल गंगा प्लेनः न्यू पर्स्पेक्टिव्हज (२००४) आणि आर्किऑलॉजी ऑफ गंगा प्लेनः कल्चरल-हिस्टॉरिकल डायमेन्शन्स (२०१०) यांचा समावेश आहे.
गंगेच्या खोऱ्यातील पुरातत्त्वातील योगदानाबद्दल सिंह यांना नवी दिल्लीच्या भारतीय पुरातत्त्व परिषदेने गुरुदेव रानडे पुरस्कार दिला (२०१३).
वाराणसी येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- Singh, Ashok Kumar, ‘Prof. Purushottam Singhʼ, Puratattva, 50: ix-x, 2020.
- Singh, Ravindra Nath, ‘Purushottam Singhʼ, Man and Environment, XLV(1): 117, 2020.
समीक्षक : शंतनू वैद्य