नारायण, अवध किशोर : (२८ मे १९२५ – १० जुलै २०१३). आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नाणकशास्त्रज्ञ, विख्यात भारतीय प्राच्यविद्या संशोधक, पुरातत्त्वज्ञ आणि प्राचीन भारतीय इतिहासाचे गाढे अभ्यासक. त्यांचा जन्म बिहारमधील गया येथे झाला. बनारस हिंदू विश्वविद्यालयातून त्यांनी बी. ए. पदवी (१९४५) आणि प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी प्रथम क्रमांकाने संपादन केली. याच काळात त्यांना नाणकशास्त्र या विषयात आवड निर्माण झाली. स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज, लंडन युनिव्हर्सिटी मधून त्यांनी विद्यावाचस्पती (पीएच.डी) पदवी संपादन केली (१९५४). त्यांच्या पीएच.डी प्रबंधावरील दि इंडो ग्रीक (१९५७) हा ग्रंथ महत्त्वपूर्ण समजला जातो.
नारायण यांची पुढे बनारस हिंदू विश्वविद्यालयातील प्रतिष्ठित मणिंद्रचंद्र नंदी या प्राध्यापक पदावर नियुक्ती झाली (१९६०). त्यांनी दीर्घकाळ बनारस हिंदू विश्वविद्यालयातील प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राच्यविद्या विभागाचे मुख्याध्यापक, बनारस हिंदू विश्वविद्यालयातील कला विभागाचे अध्यक्ष इत्यादी प्रशासनिक पदांवर कार्य केले. त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात ‘पुरातत्त्वʼ विषयाकरिता स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण विभागाची निर्मिती केली, तसेच पुरातत्त्व विषयातील विविध संशोधनांच्या प्रसिद्धीनिमित्त राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करून या विषयातील नव्या पर्वाची सुरुवात केली (१९६७). त्यांनी अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठातील भारतीय अध्ययन केंद्रात अतिथी प्राध्यापक म्हणून कार्य केले (१९६६-६७) आणि पुढे याच विद्यापीठातर्फे इतिहास आणि दक्षिण आशिया अध्ययन या विभागात त्यांना प्राध्यापक म्हणून आमंत्रित करण्यात आले (१९७१; १९९०). सोबतच त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयामध्ये अतिथी प्राध्यापक म्हणून अध्ययन कार्य केले.
नारायण यांनी अनेक उत्खनने आणि सर्वेक्षणे केली. त्यांपैकी उत्तर भारताच्या इतिहासातील महत्त्वाचे असलेले वाराणसी शहरातील राजघाटचे उत्खनन त्यांनी निर्देशक म्हणून पार पाडले आणि त्याचा विस्तृत वृत्तांत प्रकाशित केला (१९५७-५८; १९६०-६६). तसेच त्यांनी स्वतंत्ररीत्या आणि संयुक्तिकपणे केलेल्या उत्खननांत बनमिलिआ बेहेरा (१९६२-६३), प्रल्हादपूर (१९६२-६३), कमौली (१९६३-६४), सराई-मोहाना (१९६७-६८), अयोध्या (१९६९-७०) इ. विशेष उल्लेखनीय आहेत.
नारायण यांचे काही महत्त्वपूर्ण ग्रंथ असे : दि कॉइन टाइप ऑफ दि इंडो-ग्रीक किंग्स (१९५५), दि इंडो-ग्रीक (१९५७), दि कॉइन टाइप ऑफ शक-पहलव किंग्स (१९५७), स्टडीज इन दि हिस्टरी ऑफ बुद्धीझम (१९८०), स्टडीज इन बुद्धिस्ट आर्ट ऑफ साउथ आशिया (१९८४). भारतातील पुरातत्त्व व बौद्ध धर्म निगडित अनेक नियतकालिकांचे काही काळ मुख्य संपादक, सहसंपादक, तसेच संस्थेचे अध्यक्ष वा उपाध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांना मिळाला.
बौद्ध धर्म संशोधनाला चालना देण्यासाठी नारायण यांनी ‘भिक्खू ज. कश्यप इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिस्ट अँड आशियाई स्टडीजʼची स्थापना केली (१९८७) आणि बौद्ध अध्ययनाच्या भारतीय आंतरराष्ट्रीय पत्रिकेची सुरुवात केली. भारतीय पुरातत्त्वातील महत्त्वाच्या दि इंडियन आर्किओलॉजिकल सोसायटी आणि त्या मार्फत निघणाऱ्या पुरातत्त्व या नियतकालिकाच्या संस्थापनाचे श्रेय नारायण यांना जाते.
नारायण यांना विविध मानसन्मान देऊन गौरविण्यात आले. बनारस हिंदू विश्वविद्यालयातील प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरात्तत्व विभागातील पदव्युत्तर शिक्षणात प्रथम क्रमांकाचे साहनी सुवर्णपदक (१९४७), लंडनच्या उच्च शिक्षणाकरिता होळकर शिष्यवृत्ती (१९५२-५४), भारतीय नाणकशास्त्र संस्थेचे चक्रविक्रम सुवर्णपदक, रॉकफेलर अनुदान (१९५६), गुगेनहेम शिष्यवृत्ती (१९७३-७४) आणि प्रतिष्ठित एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेचा कॅम्पबेल सुवर्णपदक जीवनगौरव पुरस्कार (२०१०) इत्यादी पारितोषिके प्राप्त झाली. त्याचप्रमाणे रॉयल नाणकशास्त्र संस्था, लंडनचे आजीवन सदस्य; रॉयल एशियाटिक सोसायटी, ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडचे मानद सदस्य आणि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ बुद्धिस्ट स्टडीज इ. प्रतिष्ठीत संस्थांचे मानद सभासदत्वही त्यांना बहाल करण्यात आले.
वाराणसी येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- Sheel, Ranjana & Upadhayay, A. K. The A. K. Narain Omnibus: Writings on Ancient History Culture and Archaeology of South and Central Asia, B. R. Publication, 2018.
- Tripathi, Vibha, ‘Obituaries: Avadh Kishore Narainʼ, Puratattva, 43:VII-VIII, 2013.
- Tripathi, Vibha, ‘Obituaries: A. K. Narainʼ, Man and Environment, 38(2):116-117, 2013.
समीक्षक : मंजिरी भालेराव