अन्सारी, झैनुद्दिन दाऊद : (१९२३–१८ फेब्रुवारी १९९८). डेक्कन कॉलेजमधील पुरातत्त्व विभागाच्या वाढीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे व भारतातील एक अग्रगण्य क्षेत्रीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे एका विणकर कुटुंबात झाला. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातील जे. पी. जोगळेकर यांच्या हाताखाली छायाचित्रणाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अन्सारी यांची हुशारी प्रा. ह. धी. सांकलिया यांनी ओळखली. अन्सारी छायाचित्रकार-सर्वेक्षक म्हणून डेक्कन कॉलेजमधील पुरातत्त्व विभागात रुजू झाले (१९४८).
सांकलिया यांच्या प्रोत्साहनामुळे नोकरी करतानाच अन्सारींनी बी. ए. (१९५२) आणि प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व या विषयात एम. ए. (१९५४) या पदव्या संपादन केल्या. त्यांना विभागातील संग्रहालयाच्या अभिरक्षक या पदावर घेण्यात आले (१९५७) व १९६३ मध्ये ते क्षेत्रीय पुरातत्त्वाचे व्याख्याता झाले. दरम्यान अन्सारींनी जिऑमेट्रिक अप्रोच टू ॲन्शंट पॉटरी या विषयावर पीएच. डी. संपादन केली. त्यांची प्रपाठक पदावर पदोन्नती झाली (१९६७) व ते निवृत्तीपर्यंत या पदावर कार्यरत होते (१९८३).
डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्त्व विभागात १९५० ते १९८० या काळात योगदान दिलेल्या ह. धी. सांकलिया, शां. भा. देव आणि म. के. ढवळीकर यांच्या उत्खनन आणि क्षेत्रीय कार्यांत अन्सारी यांचा मोठा वाटा होता. या तिघा संशोधकांनी अन्सारींच्या कामाचे योग्य श्रेय त्यांना दिले आहे. अन्सारी यांचा नेवासा, नावडातोली आणि अहाड (सांकलिया व देव यांच्यासह), टेक्कलकोटा आणि संगनकल्लू (सांकलिया व एम. एस. नागराज राव यांच्यासह), चांडोली व आपेगाव (देव व ढवळीकर यांच्यासह), द्वारका (मधुकर श्रीपाद माटे यांच्यासह) आणि कायथा (देव यांच्यासह) या उत्खननांमध्ये सहभाग होता. सांकलिया आणि ढवळीकर यांनी १९६८ ते १९८२ या काळात केलेल्या इनामगाव उत्खननात अन्सारींची मध्यवर्ती भूमिका होती. तसेच पुरातत्त्व विभागात सु. तीस वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांना क्षेत्रीय पुरातत्त्वाचे प्रशिक्षण दिले.
अन्सारींकडे प्रतिकूल वातावरणातही संशोधन मोहिमा पूर्ण करण्यासाठी लागणारी जबरदस्त शारीरिक क्षमता होती. ते एक उत्कृष्ट पुरातत्त्वज्ञ होते आणि त्यांना विविध प्रकारच्या तांत्रिक पैलूंचे संपूर्ण ज्ञान होते. म्हणूनच सांकलियांनी त्यांच्या बॉर्न फॉर आर्किऑलॉजी या आत्मचरित्रात अन्सारींच्या अष्टपैलू गुणांची प्रशंसा केलेली आहे.
पुणे येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- Paddayya, K. ‘Zainuddin Dawood Ansari (1923-1998)ʼ, Man and Environment XXIII (1): 117-119, 1998.
समीक्षक : शंतनू वैद्य