बॅनर्जी, राखालदास : ( १२ एप्रिल १८८५ – २३ मे १९३० ). विख्यात भारतीय पुरातत्त्वज्ञ व पुराभिलेखतज्ज्ञ. राखालदास बंदोपाध्याय म्हणूनही परिचित. हडप्पा संस्कृतीचे एक मुख्य स्थळ असलेल्या मोहेंजोदारोचा (मोहें-जो-दडो) (सांप्रत पाकिस्तानातील स्थळ) शोध त्यांनी लावल्याचे मानले जाते. त्यांचा जन्म पश्चिम बंगाल राज्यातील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेहरमपूर येथे झाला. त्यांनी १९०५ मध्ये कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून इतिहास या विषयात ऑनर्ससह पदवी संपादन केली. काही काळ शिक्षणात खंड पडल्यानंतर त्यांनी १९०९ मध्ये कोलकाता विद्यापीठातून एम. ए. पदवी प्राप्त केली.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बॅनर्जींनी अल्प काळ प्रॉव्हिन्शियल म्युझियममध्ये (सध्याचे राज्य पुरातत्त्व संग्रहालय, लखनौ) काम केले. त्यांचे संस्कृतचे शिक्षक महामहोपाध्याय हरप्रसाद शास्त्री यांनी बॅनर्जींची भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे अधिकारी थिओडोर ब्लॉच (Theodore Bloch) यांची गाठ घालून दिली. बॅनर्जींची हुशारी आणि चमक ओळखून ब्लॉच यांनी त्यांना अनेक उत्खननांमध्ये स्वयंसेवक म्हणून सामील करून घेतले. १९१० मध्ये बॅनर्जींची भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणात नेमणूक झाली व ते कोलकाता येथील इंडियन म्युझियममध्ये काम करू लागले. बॅनर्जींना १९१७ मध्ये बढती मिळून त्यांची पश्चिम वृत्तात (Western Circle) बदली झाली.

पश्चिम वृत्तात अधीक्षक पदावर काम करत असताना बॅनर्जींनी अमरकंटक व सोहगपूर येथे अनेक मंदिरे शोधून काढली. तसेच तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील घारापुरी (एलिफंटा), पुणे, वसई, विजापूर व अहमदनगर येथील पुरातत्त्वीय अवशेषांच्या जतनाचे व संरक्षणाचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांनी सिंधू नदीच्या खोऱ्यात सर्वेक्षण केले आणि १९२१-१९२२ मध्ये सिंधमधील लारकाना जिल्ह्यातील मोहेंजोदारो येथे उत्खनन केले. विस्तृत भागात जुने अवशेष पसरलेले हे स्थळ त्यांच्याअगोदर अनेक पुरातत्त्वज्ञांना माहित होते; तथापि उत्खनन करून हडप्पा या स्थळाप्रमाणेच मोहेंजोदारो सिंधू संस्कृतीचे स्थळ असल्याचे बॅनर्जींनी दाखवून दिले. मोहेंजोदारोचा उत्खनन अहवाल तत्कालीन महासंचालक सर जॉन मार्शल (१८७६–१९५८) यांना सादर केल्यानंतर लगेचच बॅनर्जींची पूर्व वृत्तात बदली करण्यात आली. बॅनर्जींना मोहेंजोदारोच्या शोधाचे श्रेय मिळू नये, म्हणून मुद्दाम असे केले गेले असल्याचे काही संशोधकांचे मत आहे. तसा थेट पुरावा उपलब्ध नाही; पण त्यांची लगोलग बदली झाली हे मात्र स्पष्ट दिसते.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणात पूर्व वृत्ताचे अधीक्षक असताना तेथे बॅनर्जींनी पहाडपूर (सध्या बांगला देश) येथील सोमपुरा महाविहार आणि इतर बौद्ध संकुलांचे उत्खनन केले. या खेरीज बॅनर्जींनी १९२४ ते १९२६ दरम्यान बंगाल व आसाम भागात बिश्नुपूर, रघुरामपूर, मुर्शिदाबाद, देवपाडा, ढाका, शिबसागर वगैरे अनेक पुरातत्त्वीय स्थ्ळांच्या जतनाचे व संरक्षणाचे महत्त्वाचे काम केले. १९२८ मध्ये त्यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणामधील पदाचा राजीनामा दिला आणि ते बनारस हिंदू विद्यापीठात ’मणिंद्रचंद्र नंदी प्राध्यापक’ झाले. ते तेथील प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती विभागाचे अखेरपर्यंत प्रमुख होते.

बॅनर्जी हे पुराभिलेखविद्येत निष्णात होते. त्यांनी अनेक अभिलेखांचे वाचन व संपादन केले. तसेच त्यांनी आहत नाण्यांचा (Punch-marked coins) सखोल अभ्यास केला. त्यांनी पुराभिलेखविद्या, नाणकशास्त्र आणि प्राचीन स्थापत्य या विषयांवर इंग्रजी व बंगाली भाषेत अनेक पुस्तके लिहिली. त्यांतील काही त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाली. त्यात त्यांच्या बहुधा १९२६ मध्ये सादर केलेल्या मोहेंजोदारो उत्खनन अहवालाचाही समावेश आहे.

प्राचीन भारतीय इतिहास, पुराभिलेख, नाणी आणि पुरातत्त्व या विषयांवरील पुस्तकांखेरीज बॅनर्जींनी पक्षांतर (१९२४), ब्यातिक्रम (१९२४) व अनुक्रम (१९३१) या तीन बंगाली कादंबऱ्या प्रकाशित केल्या.

कोलकाता येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • https://catalogue.nla.gov.au/Record/1616405
  • Banerje, R. D. Mohenjodaro: A forgotten Report, Varanasi : Prithvi Prakashan, 1984.
  • Mani, B. R.; Ray, Purnima & Patil, C. B. Remembering Stalwarts, New Delhi : Archaeological Survey of India, 2014.
  • Mishra, P. K. Rakhal Das Banerji : The Forgotten Archaeologist, 2017.
  • Pande, Yama, The Life and the Works of Rakhaldas Banerje, New Delhi : Rajesh Publication, 2016.

                                                                                                                                                                                         समीक्षक : सुषमा देव