हॉट्रे, राल्फ (Hawtrey, Ralf) : (२२ नोव्हेंबर १८७९ – २१ मार्च १९७५). प्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ. राल्फ यांचा जन्म लंडनजवळील स्लॉज येथे सुसंस्कृत व उच्चशिक्षित कुटुंबात झाला. राल्फ यांचे आजोबा इटॉन येथील शाळेत शिक्षक होते. त्यानंतर त्यानी स्वत: सुरू केलेल्या सेंट मिचेल्स या शाळेत राल्फचे वडील जॉर्ज यांनीही शिक्षक म्हणून नोकरी केली. राल्फ यांचे शालेय शिक्षण इटॉन येथे झाले. त्यानंतरचे शिक्षण त्यांनी ट्रिनिटी महाविद्यालय आणि केंब्रिज विद्यापीठ येथून पूर्ण केले. त्यांनी इ. स. १९०१ मध्ये केंब्रिज विद्यापीठातून गणित विषयाची पदवी मिळविली. नंतर सर जी. ई. मूर यांच्या प्रभावामुळे त्यांनी तत्त्वज्ञानाचाही अभ्यास केला. राल्फ यांनी इ. स. १९१५ मध्ये हंगेरीयन पियानो वादक इमिला अर्नियाशी विवाह केला.
राल्फ यांचा जगातील प्रमुख मुद्रावादी अर्थशास्त्रज्ञ म्हणून उल्लेख केला जातो. त्यांनी इ. स. १९०४ पासून ब्रिटिश कोषागारात सनदी कारकून म्हणून नोकरीस सुरुवात केली. तेथेच इ. स. १९१९ ते १९४७ या काळात ते ब्रिटिश कोषागारातील वित्तीय सेवा शाखेचे संचालक होते. ब्रिटिश कोषागारातील सनदी कारकून ते जागतिक कीर्तीचे अनुभवाधारित स्वयंभू अर्थशास्त्रज्ञ असा राल्फ यांचा महत्त्वपूर्ण प्रवास आहे. राल्फ हे इ. स. १९२० ते १९३९ या काळात नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांच्यानंतरचे आपले संशोधनात्मक लेख प्रसिद्ध करणारे प्रमुख समग्रलक्ष्यी अर्थशास्त्रज्ञ होत.
राल्फ यांनी इ. स. १९२८-२९ मध्ये हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राचे अभ्यागत प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. त्यांनंतर इ. स. १९४५ मध्ये रॉयल इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अफेअर्स येथे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी मौलिक योगदान दिले आहे. ते केंब्रिज विद्यापीठाच्या इंटेलेक्च्युअल सिक्रेट सोसायटीचे सभासद होते. व्यापारचक्र विश्लेषण, गुणक तत्त्व, सुवर्ण परिमाण, प्रभावी मागणी, आंतरराष्ट्रीय रोखता, शासन व मध्यवर्ती बँकेची अर्थव्यवस्थेतील भूमिका आणि चलनविषयक सिद्धांत यांविषयी महत्त्वपूर्ण मांडणी करणारे वास्तववादी अर्थशास्त्रज्ञ म्हणून राल्फ यांचा नावलौकिक आहे. जागतिक आर्थिक समस्या व घटकांसंदर्भात इतर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांपेक्षा भिन्न दृष्टिकोणातून विश्लेषण करून त्यांनी उपाययोजना सुचविल्या. त्यांनी पहिल्या महायुद्धानंतर जागतिक महामंदीच्या पार्श्वभूमीवर आपला वेगळा ठसा उमटविला. ते जिनीव्हा येथे इ. स. १९२२ मध्ये पार पडलेल्या अर्थशास्त्र परिषदेचे प्रमुख आयोजक होते. त्या वेळी त्यांनी जगाने व्यवस्थापित सुवर्ण परिमाण पद्धतीकडे वळावे, असे आवाहन केले. इ. स. १९२९-३० च्या जागतिक महामंदीस सुवर्ण परिमाणाची धरसोडवृत्ती जबाबदार ठरल्याने कालानुरूप बदलासह व्यवस्थापित सुवर्ण परिमाण पद्धतीचा इंग्लंड व जगाने स्वीकार करावा अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली. इ. स. १९३१ मध्ये राष्ट्रीय उत्पन्न व गुंतवणुकीतील सहसंबंधाचे विश्लेषण करताना त्यांनी गुणक तत्त्वाची संकल्पना मांडली. मुद्रावादी दृष्टिकोणाची मांडणी करताना व्यापारचक्र नियंत्रणासाठी बँकरेटद्वारे पैशाच्या पुरवठ्यातील बदलास त्यांनी महत्त्व दिले.
राल्फ यांचा रोख शिल्लक दृष्टिकोण व चलनसंख्यामान सिद्धांचाचे मूळ उद्गाते म्हणून उल्लेख केला जातो. चलनसंख्यामान सिद्धांताचे विश्लेषण करताना किंमतपातळी चलनपुरवठ्याबरोबरच चलनभ्रमण वेगावर अवलंबून असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. प्रभावी मागणीच्या हेतूंचे विश्लेषण, पतपैशाला प्राधान्य व नैतिकता हेसुद्धा त्यांच्या विचाराचे प्रमुख पैलू आहेत. व्यापरचक्र ही चलनी घटना असल्याने चलनविषयक धोरणांद्वारे त्याचे नियंत्रण त्यांनी आवश्यक मानले. आर्थिक स्थिरतेसाठी त्यांनी बँकरेट व्यवस्थापन व सार्वजनिक गुंतवणुकीस नकारात्मक शिफारसी केल्या. कोषागार दृष्टिकोणाद्वारे नैतिक, राजकीय व वास्तव घटकांना महत्त्व देताना त्यांनी मंदीच्या काळात महाग पैशाचे धोरण महत्त्वाचे मानले.
राल्फ यांनी अर्थव्यवस्थेमधील शासनाच्या हस्तक्षेपास विरोध दर्शवून मध्यवर्ती बँकेच्या भूमिकेला महत्त्व दिले. मध्यवर्ती बँकेला एकाधिकार असलेल्या चलनपद्धतीची त्यांनी शिफारस केली. बँक ऑफ इंग्लंड, फेडरल रिझर्व सिस्टिम यांच्या ध्येयधोरणांवर राल्फ यांच्या विचारांचा प्रभाव दिसतो. फ्रान्सच्या चलननीतीला विरोध करताना त्यांनी पतपुरवठ्यावरील निर्बंध घातक मानले. आर्थिक क्रिया नियंत्रणासाठी वित्तीय धोरणास महत्त्व दिले. कर हे चलन नियंत्रण व भांडवली खर्च कमी करण्याचे प्रभावी साधन मानले. सध्याच्या काळात भांडवलशाहीचा स्वीकार केलेल्या जगाला आर्थिक समस्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने राल्फ यांचे विचार दिशादर्शक आहेत.
राल्फ यांचा ब्रिटिश कोषागारातील सनदी सेवेच्या चार दशकांचा अनुभव त्यांच्या अर्थशास्त्रीय लेखनाचा आधार आहे. आर्थिक चढउतारास चलनी घटक कारणीभूत असल्याने नियंत्रणासाठी योग्य चलनविषयक धोरण असावे; सुवर्णसाठ्यातील बदलांमुळे चलनघटीचा धोका असल्याने तो टाळण्यासाठी धातूपैशाऐवजी पतपैशाला प्राधान्य देणारे चलन व पतधोरण असावे; सुवर्ण परिमाण पद्धतीतील त्रुटींचे विश्लेषण करून व्यवस्थापित व लवचिक सुवर्ण परिमाण पद्धती असावी अशा अनेक शिफारशी त्यांनी केल्या आहेत. त्याच बरोबर अनुकूल व्यापार व आर्थिक मंदीतून बाहेर पडण्याच्या दृष्टीने आणि मध्यवर्ती बँकांनी जागतिक मंदीचा सामना करण्यासाठी कशी रणनीती अवलंबावी, यांसंदर्भातही त्यांनी उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यांनी बेरोजगारी निवारण, भांडवलसंचय, बचतवृद्धी व पतनियंत्रणासाठी अनुरूप चलनधोरण अगत्याचे मानले आहे.
राल्फ यांनी अनेक ग्रंथ व शोधनिबंध लिहिले आहेत. गुड अँड बॅड ट्रेड (१९१३); करन्सी अँड क्रेडिट (१९१९); दी एक्सचेकर अँड दी कंट्रोल ऑफ एक्सपेंडिचर (१९२१); मॉनेटरी रिकन्स्ट्रक्शन (१९२३); दी इकॉनॉमिक प्रॉब्लेम (१९२६); इकॉनॉमिक ॲस्पेक्ट ऑफ सोव्हेरेंटी (१९३०); ट्रेड, डिप्रेशन अँड दि वे आउट (१९३१); दि आर्ट ऑफ सेंट्रल बँकिंग (१९३२); दि गोल्ड स्टँडर्ड इन थिअरी अँड प्रॅक्टिस (१९३३); कॅपिटल अँड एम्प्लॉयमेंट (१९३७); अ सेंच्युरी ऑफ बँक रेट (१९३८); इकॉनॉमिक रिबर्थ (१९४६); दी बॅलन्स ऑफ पेमेंट्स अँड दी स्टँडर्ड ऑफ लिविंग (१९५०); टुवर्ड्स दी रेस्क्यु ऑफ स्टर्लिंग (१९५४); इंटरनॅशनल लिक्विडिटी (१९६७); दी ट्रेड सायकल (२०१३) इत्यादी.
समीक्षक : मनीषा कर्णे