समष्टीय अथवा समग्रलक्ष्यी अर्थशास्त्रातील एक सैद्धांतिक प्रवाह. इ. स. १९३६ मध्ये जॉन मेनार्ड केन्स यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या समष्टीय यंत्रणेबाबत मूलभूत सैद्धांतिक मांडणी केली, ज्यास ‘केन्सीय क्रांती’ असे संबोधले जाते. ‘नवअभिजात अर्थशास्त्रीय तत्त्वे’ आणि ‘सार्वत्रिक समतोल सिद्धांत’ या अर्थशास्त्राच्या मुख्य प्रवाहातील प्रचलित सैद्धांतिक चौकटींच्या दृष्टीकोनातून केन्स यांच्या या सैद्धांतिक मांडणीचा अर्थ लावण्याचे, आकारिक स्वरूपातील मांडणी करण्याचे, तसेच केन्स यांच्या मूळ विश्लेषणास विकसित व विस्तारित करण्याचे जे प्रयत्न इ. स. १९३७ ते १९७० या कालावधीत विविध अर्थतज्ज्ञांनी केले, त्यांस एकत्रित रीत्या नवकेन्सीय अर्थशास्त्र किंवा नवअभिजात समन्वय किंवा नवअभिजात-केन्सीय समन्वय असे संबोधले जाते.

भांडवलशाही बाजाराधारित अर्थव्यवस्था या मूलतः अस्थिर असून पुनरुत्थानाच्या किंवा पूर्णपणे कोसळण्याच्या स्पष्ट प्रवृत्तीविना अर्थव्यवहाराच्या अवसामान्य (सब-नॉर्मल) आणि अप-इष्टतम (सब-ऑप्टीमल) पातळीला स्वस्थ स्थिती गाठू शकतात, असा दावा केन्सीय विश्लेषणाचा गाभा आहे. केन्स यांच्या मते, या अस्थिरतेच्या मुळाशी समग्र मागणीमधील चढउतार असून हे चढउतार भांडवलाच्या सीमांत कार्यक्षमतेमध्ये चक्रीय बदल होण्यातून गुंतवणूक खर्चामध्ये घट होण्यामुळे संभवतात. या अस्थिरतेतून निर्माण होणारी बेरोजगारी ही अनैच्छिक असून समग्र मागणीची कमतरता त्यास कारणीभूत असते. अर्थव्यवस्थेला समतोलाकडे नेण्याची बाजारयंत्रणेची शक्ती कमकुवत असल्याने ही अस्थिरता कमी करण्यामध्ये, तसेच अर्थव्यवस्थेला पूर्ण रोजगार स्थितीकडे नेण्यामध्ये राजकोषीय आणि चलनविषयक धोरणे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असा केन्सीय विश्लेषणाचा अर्थ होता. स्पर्धात्मक बाजारातील स्वहित साधण्याच्या हेतूने प्रेरित असंख्य अभिकर्त्यांच्या निर्णयांमधून समष्टीय पातळीवरील इष्टतम निष्पत्ती होत असते, या प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ ॲडम स्मिथ यांच्यापासून सार्वत्रिक समतोल सिद्धांतापर्यंत चालत आलेल्या विश्लेषणात्मक वारशाला केन्सीय विश्लेषणाने आव्हान दिले.

सर जॉन रिचर्ड हिक्स, पॉल अँटनी सॅम्युएल्सन, फ्रांग्को मोदिल्यानी, फेलिक्स क्लाइन, जेम्स तोबीन,  ॲल्व्हिन हार्वे हॅन्सेन इत्यादी अर्थतज्ज्ञांनी केन्स यांच्या सैद्धांतिक विश्लेषणाला सार्वत्रिक समतोल सिद्धांत आणि नवअभिजात अर्थशास्त्र या प्रचलित सैद्धांतिक चौकटित बसविण्याचे जे प्रयत्न केले, त्यातून नवअभिजात समन्वय उदयास आला. या समन्वयाने केन्सीय विश्लेषण हे सार्वत्रिक समतोल सिद्धांताच्या व्यापक अधिक्षेत्रातील एक खास अथवा विशिष्ट उदाहरण आहे असे सिद्ध करणे, हा एक महत्त्वाचा प्रकल्प साध्य करण्याचा प्रयत्न केला.  नवअभिजात समन्वयातील प्रतिमानांनी केन्सीय विश्लेषणाला ‘वेतन-किंमत ताठरता’ या गृहीताभोवती मर्यादाबद्ध करून अनैच्छिक बेरोजगारीचे सैद्धांतिक स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला. टीकाकारांच्या मते, हे गृहीतक केन्सीय विश्लेषणाचा गाभा नसून पैसा, अपेक्षा, भविष्यातील अनिश्चितता इत्यादी बाबतींतील केन्सच्या क्रांतिकारी आणि नाविन्यपूर्ण विश्लेषणाला नवअभिजात समन्वयामधील प्रतिमानांनी वगळलेले असल्याने ‘सार्वत्रिक समतोल सिद्धांताने आणि नवअभिजात अर्थशास्त्राने केन्सीय क्रांती गिळंकृत केली’ असा आभास निर्माण झाला.

केन्सीय विश्लेषण अमेरिकेत अध्यापनशास्त्रीय दृष्ट्या प्रचलित करण्याचे श्रेय सॅम्युएल्सन यांना दिले जाते. त्यांनी महायुद्धोतर काळातील अमेरिकेतील कम्युनिझमविरोधी वातावरणात (मॅकार्थिझम) केन्सीय क्रांतीचा अध्यापनशास्त्रीय व पाठ्यपुस्तकीय आधार नष्ट होण्यापासून वाचविला, असे कोलँडर आणि लँड्रेथ यांनी मांडले आहे. सॅम्युएल्सन यांनी केन्सीय विश्लेषणास नवअभिजात अर्थशास्त्रीय तत्त्वांशी समन्वयीत केल्याचा दावा केल्यामुळे केन्सीय विश्लेषणाची सॅम्युएल्सनप्रणीत आवृत्ती अमेरिकेमध्ये स्वीकारार्ह बनली.

केन्सीय विश्लेषणाच्या सॅम्युएल्सनप्रणीत आवृत्तीमध्ये केन्सीय विश्लेषणाचा क्रांतिकारी सैद्धांतिक पायाच वगळला असल्याने केन्सीय विश्लेषणाचे क्रांतिकारी स्वरूप सॅम्युएल्सन यांनी नष्ट केले. तसेच मूळ केन्सीय विश्लेषणाशी सैद्धांतिक दृष्ट्या सुसंगत नसलेला नवअभिजात समन्वय, त्यातील व्यष्टीय पाया व समष्टीय धोरणात्मक शिफारशी यांमधील तार्किक विसंगतींवर बोट ठेवून केन्सीय विश्लेषणाचे क्रांतिकारी स्वरूप मुद्रावाद्यांना सहज रीत्या नष्ट करता आला, असे पॉल डेव्हिडसन या उत्तर-केन्सीय अर्थशास्त्रज्ञाने मांडले आहे.

अर्थतज्ज्ञ मिल्टन फ्रीडमन यांनी पैशाच्या स्थिर मागणीबद्दल केलेली मांडणी, मुद्रावादाचा उदय, अपेक्षांचा अंतर्भाव असलेला फिलिप्स वक्र यांची मांडणी, फेल्प्स आणि फ्रीडमन यांनी बेरोजगारीच्या नैसर्गिक दराबाबत केलेली मांडणी, १९७० च्या दशकातील पुरवठा धक्क्यांमुळे कोलमडलेला फिलिप्स वक्र आणि विवेकी अपेक्षा परिकल्पना अंतर्भूत करणाऱ्या नवीन अभिजात मांडणीचा उदय इत्यादी कारणांमुळे नवकेन्सीय अर्थशास्त्रास सैद्धांतिक आव्हाने निर्माण होऊन समष्टीय अर्थशास्त्रातील सहमती संपुष्टात आली. त्यात अभिप्रेत असलेल्या राजकोषीय धोरणाच्या सढळ वापरास विरोध करणाऱ्या धोरणात्मक शिफारशी मांडण्यास सुरुवात झाली.

नवकेन्सीय अर्थशास्त्र या सैद्धांतिक प्रवाहातील विवाद, मुख्य उपप्रवाह आणि त्या अंतर्गत विकसित झालेल्या विविध सिद्धांतांची व प्रतिमानांची स्थूल निर्देशात्मक मांडणी. अ) नवअभिजात समन्वय : (१) हिक्स व हॅन्सेन यांची ‘आय. एस. – एल. एम. प्रतिमान’ मांडणी : हे नवकेन्सीय अर्थशास्त्राचे मूलभूत प्रतिमान आहे. केन्सच्या विश्लेषणामध्ये गुंतवणूक खर्च हा समग्र मागणीचा महत्त्वाचा घटक व्याजदरावर अवलंबून असतो (व्याजदर –> गुंतवणूक –> समग्र मागणी –> उत्पन्न आणि रोजगारपातळी). व्याजदर आणि गुंतवणूक यांमध्ये व्यस्त संबंध असतो; मात्र व्याजदर निर्धारण हे पैसाबाजारात पैशाला असणारी मागणी (रोखता पसंती) आणि पैशाचा पुरवठा यांमधील समानतेतून साधले जाते; परंतु पैशाला असणारी मागणी ही उत्पन्नपातळीवर अवलंबून असते. त्यामध्ये धनसंबंध असतो (उत्पन्नपातळी  –> पैशाला असणारी मागणी –> व्याजदर). उत्पन्नपातळी निर्धारित करणारा वस्तुबाजार आणि व्याजदर निर्धारित करणारा पैसाबाजार या प्रस्तुत चलांचा इतर बाजारामधील चलांवर होणारा परिणाम (गुंतवणूक व्याजदरावर अवलंबून, तर पैशाला असणारी मागणी उत्पन्नपातळीवर अवलंबून) यांतून व्यक्त होणारे दोन्ही बाजारांमधील आंतरसंबंध केन्स यांच्या विश्लेषणात अभिप्रेत होतेच. आय. एस. – एल. एम. प्रतिमानामध्ये ते अधिक स्पष्ट स्वरूपात आणि सार्वत्रिक समतोल सिद्धांताच्या तत्त्वचौकटीत मांडण्यात आले.

आय. एस. म्हणजे बचत-गुंतवणूक (इन्व्हेस्टमेंट-सेव्हिंग) वक्र आणि एल. एम. (लिक्विडीटी प्रिफरन्स-मनी सप्लाय) म्हणजे रोखता पसंती किंवा पैशाला असणारी मागणी किंवा पैशाचा पुरवठा वक्र होय. उतरता आय. एस. वक्र व्याजदर आणि उत्पन्नपातळी यांमधील अशा विविध जोड्या दर्शवितो. ज्यामध्ये वस्तुबाजार समतोल स्थितीत असतो (बचत = गुंतवणूक). चढता एल. एम. वक्र व्याजदर आणि उत्पन्नपातळी यांमधील विविध जोड्या दर्शवितो. ज्यामध्ये पैसाबाजार समतोल स्थितीत असतो (पैशाला असलेली मागणी = पैशाचा पुरवठा). आय. एस. वक्र आणि एल. एम. वक्र यांच्या छेदनबिंदुला वस्तुबाजार व पैसाबाजार एकत्रित रीत्या समतोल साधतात आणि व्याजदर व उत्त्पन्नपातळीचे निर्धारण होते. तसेच हा छेदनबिंदू समग्र मागणीची पातळी ठरवितो.

आय. एस. – एल. एम. या प्रतिमानामध्ये हिक्स यांनी केन्स यांच्या गुंतवणूक फलाबाबतच्या मांडणीचा संकुचित अर्थ स्वीकारला आणि त्यातील दीर्घकालीन अपेक्षांचे महत्त्व वगळून नवअभिजात मांडणीतील भांडवलाच्या सीमांत उत्पादकतेच्या संकल्पनेशी समतुल्य मानलेले आहे. तसेच बचत आणि गुंतवणूक ही दोन्ही चले हिक्स यांनी सममितीय मानलेली आहेत. केन्स यांच्या विश्लेषणात ही दोन्ही चले असममितीय आहेत; कारण भिन्न हेतूंनी प्रेरित भिन्न अभिकर्ते बचत आणि गुंतवणूक करित असतात. तसेच गुंतवणूक व्याजदरावर अवलंबून असते, तर बचत उत्पन्नावर अवलंबून असते. हिक्स यांनी केन्स यांचा रोखता पसंती सिद्धांत आणि कर्जदेय रक्कम सिद्धांत (लोनेबल फंड्स थिअरी) यांमध्ये आकारिक समतुल्यता मानलेली आहे. या दोन्ही सिद्धांतांमधील व्याजदर निर्धारणाबाबतची तसेच सैद्धांतिक घटनाक्रमाबाबतची भिन्नता हिक्स यांनी मान्य केलेली असली, तरी हे दोन्ही सिद्धांत सार्वत्रिक समतोल सिद्धांत चौकटीच्या संदर्भात व्याजदर निर्धारणाचे आकारिक दृष्ट्या समतुल्य आणि समांतर दृष्टीकोन आहेत, असे मत मांडले आहे. सार्वत्रिक समतोल सिद्धांताच्या चौकटीत व्याजदर निर्धारण हे इतर बाजार किमतींप्रमाणेच परस्परावलंबी बाजारांच्या व्यवस्थेतच साध्य होत असते. त्यामुळे वॉलरसच्या नियमानुसार वस्तुबाजार, श्रमबाजार आणि कर्जबाजार या तिन्ही बाजारांत मागणी आणि पुरवठा समान होऊन समतोल साध्य होत असेल, तर पैसाबाजारातदेखील मागणी-पुरवठा समान होऊन समतोल आपोआपच साध्य होईल. तसेच इतर सर्व बाजार समतोलस्थितीत आहेत, असे गृहीत धरून पैसाबाजारात मागणी-पुरवठा समान होऊन समतोल साध्य होत असेल, तर कर्जबाजारात कर्जाऊ रकमेसाठी असणारी मागणी-पुरवठा समान होऊन आपोआपच समतोल साध्य होईल. त्यामुळे व्याजदर निर्धारणाच्या दोन्ही उपरोक्त सिद्धांतांपैकी कोणताही सिद्धांत योग्य मानला, तरी सार्वत्रिक समतोल चौकटीला धक्का बसत नाही.

केन्सीय सिद्धांत आणि पूर्वकेन्सीय सिद्धांत यांतील विविध चलांमधील आकारिक समतुल्यता अधोरेखित करण्यातून केन्सीय ‘अभिजात’ सिद्धांताचेच एक विशिष्ट अथवा खास उदाहरण आहे, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. हे आय. एस. – एल. एम. प्रतिमानाच्या आधारे सिद्ध करताना हिक्स यांनी दोन्ही सिद्धांतांमधील मुख्य फरक एल. एम. वक्राच्या आकाराबाबतचा आहे, असे मत मांडले. त्यानुसार (१) एल. एम. वक्र डाव्या बाजूला आडवा असतो; कारण अशी किमान व्याजदर पातळी असते, ज्यामध्ये पैशाला असणारी मागणी किंवा रोखता पसंती अनंत असते. (२) एल. एम. वक्र उजव्या बाजूला उभा असतो; कारण पैशाच्या विशिष्ट पुरवठ्यातून ठराविक महत्तम शक्य उत्पन्नपातळी साध्य होते. आय. एस. वक्र एल. एम. वक्राच्या उभ्या भागात छेदत असल्यास ते अभिजात सिद्धांताशी सुसंगत ठरते; कारण गुंतवणूक खर्चातील वाढीमुळे आय. एस. वक्र उजवीकडे सरकल्यास मुख्यतः व्याजदरात वाढ होईल; मात्र उत्पन्नपातळी आणि रोजगारपातळी यांमधील वाढ गौण असेल.

याउलट, आय. एस. वक्र एल. एम. वक्राच्या आडव्या भागात छेदत असल्यास ते केन्स यांच्या विश्लेषणाशी सुसंगत ठरते; कारण गुंतवणूक खर्चातील वाढीमुळे आय. एस. वक्र उजवीकडे सरकल्यास व्याजदर स्थिर राहून केवळ उत्पन्न आणि रोजगारपातळीमध्ये वाढ होईल. एल. एम. वक्र आडवा असताना अर्थव्यवस्था रोखता सापळ्यामध्ये अडकल्यामुळे न्यूनरोजगारी (अंडरएम्प्लॉयमेंट) पातळीला समतोल स्थितीत असेल. पूर्ण रोजगार पातळीशी संबंधित व्याजदरापेक्षा अधिक व्याजदराला पैशाला असणारी मागणी किंवा रोखता पसंती पूर्णपणे लवचिक असल्याने केवळ पैशाच्या पुरवठ्यामधील वाढीमुळे व्याजदर कमी होणार नाही. अशाप्रकारे केन्स यांचे विश्लेषण ‘मंदीचे अर्थशास्त्र’ असून अभिजात सिद्धांताचे विशिष्ट अथवा खास उदाहरण आहे, असे हिक्स म्हणतात.

अभिजात सिद्धांतानुसार पैसारूपी वेतन ताठरतेमुळे बेरोजगारी निर्माण होते, तर केन्सीय विश्लेषणामधील अनैच्छिक बेरोजगारीच्या अस्तित्वाचे मूळ व्याजदर ताठरतेमध्ये आहे, या दोन्ही स्पष्टीकरणांमध्ये तार्किक सादृश्य आहे. बेरोजगारीचे केन्सीय स्पष्टीकरण अभिजात सिद्धांतातील स्पष्टीकरणाप्रमाणेच किमतीच्या समायोजक भूमिकेवर आधारलेले आहे आणि व्याजदरासारख्या पैसारूपी चलाची निम्नगामी ताठरता केन्सीय बेरोजगारीसाठी कारणीभूत असते, असा प्रमुख निष्कर्ष हिक्स यांनी मांडला.

(२) मोदिल्यानी यांची मांडणी : मोदिल्यानी यांनी अभिजात सिद्धांताचा अर्थ हिक्स यांच्यापेक्षा अधिक अचूक लावला. ज्यानुसार अभिजात सिद्धांतामध्ये स्थिर पैसारूपी वेतनदर आणि बेरोजगारी ही दीर्घकालीन समतोल स्थितीपासून तात्पुरती विचलने असतात. मोदिल्यानी यांच्या मांडणीनुसार केन्सीय सिद्धांत आणि अभिजात सिद्धांत यांमधील मुख्य फरक वेतनदर आणि श्रमाचा पुरवठा यांमधील संबंधाबाबत आहे. मोदिल्यानी यांच्या मते, अभिजात सिद्धांतानुसार श्रमिकांचे वर्तन तर्कसंगततेच्या गृहीताशी सुसंगत असून श्रमाचा पुरवठा हा केवळ वास्तव वेतनावर अवलंबून असतो. याउलट, कामगारांच्या तर्कविसंगत वर्तनामुळे पैसारूपी वेतन ताठरता परिणत होते, हे विश्लेषण केन्स यांचे प्रमुख योगदान आहे. केन्स यांच्या मते, न्यूनरोजगारी परिस्थितीत ऐतिहासिक दृष्ट्या प्रचलित पैसारूपी वेतनदराला श्रमाचा पुरवठा पूर्णपणे लवचिक असतो. यावरून ‘आर्थिक व्यवस्थेच्या समतोलस्थितीतील अनैच्छिक बेरोजगारीचे अस्तित्व’ हा केन्स यांच्या विश्लेषणाचा मुख्य निष्कर्ष केन्स यांच्या ‘रोखता पसंती’बाबतच्या मांडणीवर आधारलेला नसून ‘वेतन ताठरता’ या गृहितावर आधारलेला आहे, असा निष्कर्ष मोदिल्यानी यांनी काढला. वेतन ताठरता असणाऱ्या व्यवस्थेत वास्तव चले वास्तव घटकांनी निर्धारित न होता पैसारूपी घटकांनी निर्धारित होतात. तसेच पैसारूपी वेतनदर ताठर असतानाच रोखता पसंती हा घटक महत्त्वपूर्ण बनतो. म्हणूनच रोखता पसंती अभिजात सिद्धांतातील दीर्घकालीन स्थितीपासूनचे केवळ अल्पकालीन विचलन असते, जे अभिजात पद्धतीशी सुसंगतच आहे, असे मोदिल्यानी म्हणतात.

मोदिल्यानी यांनी व्याजदर निर्धारणाच्या पारंपारिक सिद्धांताला पुनर्स्थित केले. त्यांच्या मते, बचतप्रवृत्ती आणि गुंतवणुकीची सीमांत कार्यक्षमता ही वास्तव चले दीर्घकाळामध्ये व्याजदर निर्धारित करतात, तर रोखता पसंती आणि पैशाचा पुरवठा ही पैसारूपी चले केवळ अल्पकाळामध्ये व्याजदर प्रभावित करतात. या मांडणीनुसार एल. एम. वक्र अल्पकालीन समतोल दर्शवितो, तर आय. एस. वक्र दीर्घकालीन समतोल दर्शवितो. दोन्ही वक्रांचा छेदनबिंदू अल्पकालीन समतोल आणि दीर्घकालीन समतोलाच्या अटी पूर्ण करणारा परिपूर्ण समतोल ठरतो.

(३) सॅम्युएल्सन यांची मांडणी : सॅम्युएल्सन यांनी अभिजात प्रतिमानाला मूल्यसिद्धांत आणि दीर्घकालीन सार्वत्रिक समतोलाची चिकित्सा करणारे व्यष्टीय अर्थशास्त्रीय विश्लेषण मानले, तर केन्सीय विश्लेषणाला समुच्चयित चले आणि अल्पकालीन असमतोलाची चिकित्सा करणारे समष्टीय अर्थशास्त्रीय विश्लेषण मानले. (१) व्यष्टीय अर्थशास्त्रीय तर्काच्या आधारे योग्य समष्टीय अर्थशास्त्रीय निष्कर्ष काढता येतीलच असे नाही, (२) अनेक समष्टीय मुद्द्यांचे विश्लेषण लाभ महत्तमीकरणाच्या व्यष्टीय तत्त्वाच्या आधारे करता येईलच असे नाही, ही सॅम्युएल्सन यांच्या व्यष्टीय-समष्टीय अर्थशास्त्राबाबतच्या वर्गीकरणाची वैशिष्ट्ये आहेत; मात्र हिक्स यांच्या प्रमाणेच बचत आणि गुंतवणूक या चलांना सममितीय मानून सॅम्युएल्सन यांनी केन्स यांच्या विश्लेषणाला अभिजात सिद्धांताचे एक विशिष्ट उदाहरण मानले. सॅम्युएल्सन यांच्या मते, उत्पन्नाच्या माध्यमातून बचत आणि गुंतवणूक यांमध्ये समतोल साधला जातो, हा विचार केन्स यांच्या सिद्धांताचा महत्त्वपूर्ण पैलू आहे. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी सॅम्युएल्सन यांनी ‘साधारण केन्सीय प्रतिमान’ मांडले.

उत्पन्न = उपभोग खर्च + गुंतवणूक

उपभोग खर्च उत्पन्नावर अवलंबून असतो, तर गुंतवणूक तात्पुरती स्थिर मानता येईल.

उत्पन्न – उपभोग खर्च = गुंतवणूक

किंवा

गुंतवणूक = बचत.

बचत आणि गुंतवणूक ही दोन्ही कार्ये विभिन्न व्यक्ती विभिन्न प्रयोजनार्थ करतात, त्यामुळे ही दोन्ही चले स्वतंत्र असतात, हे सॅम्युएल्सन अधोरेखित करतो. त्याच्या मते, बचत उत्पन्नावर निष्क्रिय रीत्या अवलंबून असते, तर गुंतवणूक हा स्वायत्त आणि अनिश्चित चल असून तो तांत्रिक प्रगती, लोकसंख्या वाढ आणि सरकारी हस्तक्षेप आदी बाह्य चलांवर अवलंबून असतो. तसेच गुंतवणूक सद्यकालीन उत्पन्न व उपभोगावरदेखील अवलंबून असू शकते (उत्प्रेरीत गुंतवणूक). अशाप्रकारे बचत आणि गुंतवणूक ही दोन्ही चले अंशतः स्वायत्त असतात, तर अंशतः उत्पन्नाने प्रेरित असतात.

बचत आणि गुंतवणूक समान होऊन उत्पन्नाची समतोल पातळी गाठली जाण्याची समायोजन प्रक्रिया तत्क्षणीय (इंस्टंटेनियस) नसते. लोकांपर्यंत नवीन उत्पन्न पोहोचण्याचा क्षण आणि लोकांनी त्या उत्पन्नाचा वापर उपभोगासाठी करण्यामध्ये काही वेळ जाऊ शकतो. अशाप्रकारे केन्सीय विश्लेषण अल्पकालीन असमतोलाचे विश्लेषण ठरते. त्यामुळे सॅम्युएल्सनच्या मते, अभिजात व्यष्टीय अर्थशास्त्र आणि केन्सीय समष्टीय अर्थशास्त्र यांमधील अंतर केवळ समतोलस्थितीपासूनच्या विचलनामध्येच (मंदीचा काळ/बेरोजगारी) अस्तित्वात असते. पूर्ण रोजगाराच्या स्थितीत हे अंतर पूर्णपणे नाहीसे होते आणि ‘व्यष्टीय’ अर्थशास्त्रामध्ये अभिप्रेत असणारी गुणवैशिष्ट्ये अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येतात. त्याचप्रमाणे योग्य धोरणात्मक साधने वापरून हे अंतर कमी करणे हे नवअभिजात समन्वयाचे मुख्य कार्य आहे, असे सॅम्युएल्सनने मांडले.

(४) क्लाईन यांची मांडणी : क्लाईन यांनी हिक्स आणि सॅम्युएल्सन यांच्याप्रमाणेच बचत आणि गुंतवणूक या दोन्ही चलांमधील आकारिक सममिती स्वीकारली. जर सर्व बचत गुंतवणुकीत रूपांतरीत नाही झाली, तर रोजगाराची उच्च पातळी निर्माण होण्यात अपयश येते, हा निष्कर्ष क्लाईन यांच्या मते केन्सचे मुख्य योगदान आहे. केन्सीय व्यवस्थेमध्ये बचत आणि गुंतवणूक यांच्या व्याजदर अलवचिकतेमुळे बेरोजगारी निर्माण होते, असे त्याने मांडले. इतर नवअभिजात समन्वयामधील प्रतिमानांप्रमाणेच बेरोजगारीचे हे स्पष्टीकरण एखाद्या चलाच्या ताठरतेवर आधारलेले आहे.

(५) पॅटीनकिन यांची मांडणी : पॅटीनकिन यांनी अभिजात ‘व्यष्टीय’ अर्थशास्त्र आणि केन्सीय ‘समष्टीय’ अर्थशास्त्र या सॅम्युएल्सनच्या वर्गीकरणास नाकारले. त्यांनी अभिजात प्रतिमान समुच्चयित चलांच्या स्वरूपात मांडले आणि केन्सीय प्रतिमान अभिजात सैद्धांतिक तत्त्वांवर आधारलेले आहे, असे प्रतिपादन केले; मात्र समष्टीय प्रतिमान व्यष्टीय पाया (मायक्रोफाउंडेशन्स) अंतर्भूत करणाऱ्या नवीन सिद्धांतांना विचारात घेऊन बांधले पाहिजे, असे त्यानी मत मांडले. पॅटीनकिन यांनी नवअभिजात समन्वयामधील बचत आणि गुंतवणूक यांमधील सममिती नाकारून वस्तुबाजार समतोलाची अट ‘बचत = गुंतवणूक’ ही नसून ‘समग्र मागणी = उत्पन्न’ ही असते, असे मांडले.

पॅटीनकिन यांनी पैशाच्या मागणीसंदर्भात नाविन्यपूर्ण मांडणी करून ‘वास्तव शेष परिणाम’ (रियल बॅलेन्स इफेक्ट) अभिजात प्रतिमानात अंतर्भूत केला आणि अर्थव्यवस्थेची समतोलात्मक यंत्रणा स्पष्ट केली. ज्यानुसार निरपेक्ष किंमत पातळीतील बदल अर्थव्यवस्थेला एका समतोल स्थितीकडून दुसऱ्या समतोल स्थितीकडे नेतात. त्यांच्या मते, व्यक्तींची पैशाला असणारी मागणी ही पैशाच्या अंगी असणाऱ्या क्रयशक्तीला असते, त्यातील प्रतिकत्वाला नसते. उपभोग आणि गुंतवणूक फल हे पैशाच्या वास्तव साठ्यावरदेखील अवलंबून असल्यामुळे समग्र मागणी आणि किंमतपातळी यांमध्ये व्यस्तसंबंध असतो, असे त्यांनी मांडले. त्यानुसार जर किंमत आणि वेतनपातळी समप्रमाणात कमी झाली, तर वास्तव वेतन दर स्थिर राहील; मात्र किंमतपातळी कमी झाल्यामुळे रोख साठ्याच्या वास्तव मूल्यात वाढ होईल (धन वास्तव शेष परिणाम). उपभोग व गुंतवणूक फल पैशाच्या वास्तव साठ्यावर अवलंबून असल्यामुळे समग्र मागणीमध्ये वाढ होईल.

अभिजात सिद्धांतामध्ये पैसा फक्त विनिमयाचे माध्यम आणि मूल्य मोजण्याचे परिमाण म्हणून वागवला जातो; मात्र जर पैसा मूल्याचा साठा करण्याचे साधन मानले, तर पैशाची अतिरिक्त मागणी शक्य होते. असा पैसा सार्वत्रिक समतोल चौकटीत अंतर्भूत करण्याचे प्रयत्न पॅटीनकिन यांनी केले. सार्वत्रिक समतोल चौकटीअंतर्गत मूल्यसिद्धांताबरोबरच पैसाविषयक सिद्धांत अंतर्भूत करण्यासाठी त्यांनी ‘से’चा नियम नाकारून ‘वॉलरस’चा नियम स्वीकारला. ज्यानुसार अर्थव्यवस्थेतील सर्व बाजारांमधील अतिरिक्त मागण्यांच्या (किंवा अतिरिक्त पुरवठ्यांच्या) मूल्यांची बेरीज शून्य असते. अशाप्रकारे पॅटीनकिन यांनी पैशाला असणारी अतिरिक्त मागणी सार्वत्रिक समतोल सिद्धांतात अंतर्भूत करून दाखवली. जी उत्पन्न आणि व्याजदराबरोबरच पैशाच्या साठ्याच्या वास्तव मूल्यावर अवलंबून असते.

केन्सीय सिद्धांत हा अभिजात सिद्धांताचेच एक विशिष्ट उदाहरण आहे, हे सिद्ध करण्यासाठी पॅटीनकिन यांनी असे मत मांडले की, केन्सचे विश्लेषण लाभ हेतुसाठीच्या (स्पेक्युलेटीव्ह मोटिव्ह) पैशाच्या मागणीमध्ये आभासी पैसा (मनी इल्युजन) गृहीत धरते. पैशाच्या पुरवठ्यातील दुप्पट वाढ वस्तुबाजारातील किंमतपातळी दुप्पट करून व्यवहार हेतुसाठीच्या (ट्रँझॅक्शन मोटिव्ह) पैशाच्या मागणीवर परिणाम करेल; मात्र लाभ हेतुसाठीच्या पैशाच्या मागणीवर परिणाम करणार नाही. त्यामुळे पैशाची एकूण मागणी दुप्पट होणार नाही. परिणामी, पैशाच्या पुरवठ्यातील सर्व वाढ स्थिर व्याजदराला शोषली जाणार नाही. वाढलेल्या पैशाच्या पुरवठ्यातील उरलेला भाग रोखे विकत घेण्यासाठी वापरला जाईल आणि व्याजदर घटायला सुरुवात होईल. घटलेल्या व्याजदराला लाभ हेतुसाठीच्या पैशाच्या मागणीमध्ये वाढ होऊन उर्वरित पैशाचा पुरवठा पूर्णपणे शोषला जाईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील.

वरील उदाहरणात पैशाच्या पुरवठ्यातील वाढीमुळे किंमतपातळीमध्ये प्रमाणशीर वाढ गृहीत धरलेली असल्याने ही स्थिती पूर्ण रोजगारोत्तर स्थिती आहे, हे स्पष्ट आहे; मात्र न्यूनरोजगारी आणि अनैच्छिक बेरोजगारीच्या स्थितीमध्येदेखील केन्सीय सिद्धांत अभिजात सिद्धांताचेच एक विशिष्ट उदाहरण आहे, हे पॅटीनकिन यांनी सिद्ध केले. त्यांच्या मते, श्रमाचा पुरवठा वक्र वास्तव वेतन दराच्या विविध पातळ्यांना श्रमिक किती श्रमाचा पुरवठा करतील हे दर्शवतो. प्रचलित वास्तव वेतन दराला श्रमिक पुरवण्यास तयार असलेल्या सर्व श्रमाची विक्री होऊ शकत असेल (म्हणजेच सर्व श्रमिक त्यांच्या पुरवठा वक्रा’वर’ असतील), तर अर्थव्यवस्थेत पूर्णरोजगार स्थिती अस्तित्वात असते. जर श्रमिक पुरवठा वक्रावर नसतील, तर ते अनैच्छिक वर्तन असेल. म्हणजेच, अर्थव्यवस्थेतील अनैच्छिक बेरोजगारीचे प्रमाण हे प्रचलित वास्तव वेतन दराला असलेल्या श्रमिकांच्या अतिरिक्त पुरवठ्याशी संबंधित असते. वेतन दर लवचिक (फ्लेक्झिबल) असतील, तर श्रमाच्या अतिरिक्त पुरवठ्यामुळे पैसारूपी वेतन दर घटतील; मात्र समतोलस्थिती म्हणजे कोणताही बदल न होण्याची प्रवृत्ती वा स्थिती. त्यामुळे पॅटीनकिन यांनी अनैच्छिक बेरोजगारीची स्थिती ही असमतोलाची स्थिती आहे, असे मत मांडले आहे.

पॅटीनकिन यांच्या मते, अनैच्छिक बेरोजगारीची स्थिती निर्माण होण्यासाठी दोन अटी पूर्ण व्हाव्या लागतात. (१) अपुऱ्या परिणामकारक मागणीमुळे किंमतक्षयात्मक तफावत (डीफ्लेशनरी गॅप) निर्माण होणे. (२) स्वयंचलित समायोजन प्रक्रियेतील बिघाडामुळे ही किंमतक्षयात्मक तफावत टिकून राहणे. जर समग्र मागणी पुरेशी व्याजदर लवचिक आणि किंमत लवचिक नसेल, तर प्रारंभिक किंमत पातळी कमी होण्यातून निर्माण होणाऱ्या धन वास्तव शेष परिणामाला आणि व्याजदर कमी होण्याला प्रतिसाद देण्यात ती अयशस्वी ठरते. त्यामुळे अंतिमतः उत्पादनाला वर्तमान विक्रीस्थितीशी जुळविण्यासाठी आणि मालसाठा टाळण्यासाठी उद्योगसंस्था उत्पादन आणि रोजगार कमी करतात. पॅटीनकिन यांच्या मते, समग्र मागणी पुरेशी व्याजदर लवचिक आणि किंमत लवचिक असल्याने लवचिक निरपेक्ष किंमती अर्थव्यवस्थेला सतत पूर्ण रोजगार स्थितीकडे नेतात असे अभिजात सिद्धांत मांडतो, तर समग्र मागणी व्याजदर अलवचिक आणि किंमत अलवचिक असल्याने गतिशील समतोलात्मक यंत्रणा अर्थव्यवस्थेला पूर्ण रोजगार स्थितीकडे नेण्यात अयशस्वी ठरते, असे केन्सीय सिद्धांत मांडतो. त्यामुळे केन्सीय विश्लेषण असमतोलाचे अर्थशास्त्र ठरते. अशाप्रकारे केन्सीय सिद्धांत आणि अभिजात सिद्धांत यांमधील फरक स्वयंचलित समायोजन यंत्रणेच्या (ऑटोमॅटीक ॲड्जस्टमेंट मेकॅनिझम) अस्तित्वाबाबत नसून या यंत्रणेच्या यशापयशाच्या शक्यतेबाबत आहे. त्यामुळे केन्सीय सिद्धांत अभिजात सिद्धांताचेच विशिष्ट उदाहरण ठरते.

आ) समुच्चयित चलांचा व्यष्टीय पाया : केन्स यांनी व्यष्टीय वर्तनावर आधारलेल्या उपभोग फल आणि गुंतवणूक फल यांसारख्या प्रमुख चलांबाबत समुच्चयित स्वरूपातील मांडणी केलेली होती. १९५० च्या दशकात केन्स यांच्या समष्टीय प्रतिमानामधील समुच्चयित चलांना व्यष्टीय पाया पुरविण्याचे प्रयत्न झाले.

(१) उपभोगाचे सिद्धांत : केन्स यांच्या उपभोग फलाच्या विश्लेषणानुसार सरासरी उपभोग प्रवृत्ती ही सीमांत उपभोग प्रवृत्तीपेक्षा अधिक असते. तसेच उत्पन्नातील वाढीबरोबर सरासरी उपभोग प्रवृत्ती कमी होत जाते (उपभोगाचा केवल उत्पन्न सिद्धांत). अमेरिकेतील दीर्घकालीन उपभोगाबाबत कुझनेट्सने केलेल्या संशोधनामधून असे सूचित झाले की, दीर्घकाळामध्ये सीमांत उपभोग प्रवृत्ती आणि सरासरी उपभोग प्रवृत्ती समान आणि स्थिर असतात (‘उपभोग फलाचे कोडे’). ड्यूसनबरी यांनी असे मत मांडले की, उपभोग हा व्यक्तीच्या केवल उत्पन्नावर आधारलेला नसून तौलनिक उत्पन्नावर (सामाजिक उत्पन्न वितरणातील स्थानावर) अवलंबून असतो. या सिद्धांतानुसार उपभोग व्यक्तीच्या भूतकालीन उत्पन्नावर आणि त्या व्यक्तीच्या सामाजिक वर्गातील इतर व्यक्तींच्या उत्पन्नावर अवलंबून असतो. व्यक्तीचे केवल उत्पन्न वाढले, तरी त्याचे तौलनिक उत्पन्न स्थिर राहिल्यास सरासरी उपभोग प्रवृत्ती स्थिर राहील (उपभोगाचा तौलनिक उत्पन्न सिद्धांत). मोदिग्लिआनी यांच्या प्रतिमानात कोणत्याही काळातील उपभोग व्यक्तीच्या त्या काळातील सद्यकालीन उत्पन्नावर अवलंबून नसून संपूर्ण जीवनातील अपेक्षित उत्पन्नावर अवलंबून असतो. काम करण्याच्या वयात व्यक्ती बचत करतात (उत्पन्न > उपभोग) आणि बचतीचे रूपांतरण संपत्तीत/मत्तेत करून जेव्हा उत्पन्न उपभोगापेक्षा कमी असते, तेव्हा त्याचा भविष्यात उपभोग घेतात. अशाप्रकारे व्यक्तीचा उपभोगप्रवाह उत्पन्नप्रवाहापेक्षा अधिक स्थिर असतो (उपभोगाचा जीवनचक्र सिद्धांत). फ्रीडमन यांच्या प्रतिमानात उपभोग निर्धारण ही आंतरकालिक पर्याप्तीकरणाची समस्या आहे. ज्यामध्ये भविष्यातील सर्व उत्पन्नाच्या सद्यकालीन मूल्यावरील परतावा हा संरोध (बजेट कन्स्ट्रेंट) असतो. फ्रीडमन यांच्या मते, व्यक्तीचा सद्यकालीन उपभोग हा सद्यकालीन उत्पन्नावर अवलंबून नसून स्थायी/कायमस्वरूपी उत्पन्नावर (दीर्घकालीन सरासरी उत्पन्न) अवलंबून असतो. उत्पन्नातील तात्पुरते बदल उपभोगावर फारसा परिणाम करत नाहीत; मात्र दीर्घकालीन सरासरी उत्पन्नावर परिणाम करणारे उत्पन्नातील बदल उपभोगाला प्रभावित करतात. अशाप्रकारे व्यक्तीच्या भविष्यकालीन उत्पन्नाबद्दलच्या अपेक्षा सद्यकालीन उपभोग निर्धारित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात (उपभोगाचा स्थायी/कायमस्वरूपी उत्पन्न सिद्धांत).

(२) पैशाच्या मागणीबाबतचे सिद्धांत : जेम्स तोबीन यांनी लाभ हेतुसाठीच्या पैशाच्या मागणीबाबत रोखासंग्रह दृष्टीकोनातून (पोर्टफोलिओ अप्रोच) मांडणी केली. ज्यानुसार व्यक्तीच्या रोखासंग्रहात सुरक्षित आणि धोकायुक्त मत्तांचा समावेश होतो. व्यक्ती अशा विभिन्न धोकापातळी असणाऱ्या मत्ता जवळ बाळगून रोखासंग्रहाचे विविधीकरण करतात. बाऊमोल यांनी व्यवहार हेतुसाठीच्या पैशाच्या मागणीबाबत साठा व्यवस्थापन दृष्टीकोनातून (इन्व्हेंटरी मॅनेजमेंट अप्रोच) मांडणी केली. ज्यानुसार व्यवहार हेतुसाठी जो पैसा जवळ बाळगला जातो, त्यावरील शक्य व्याज व्यक्तीला गमवावे लागते. व्यक्तीला उत्पन्न विशिष्ट काळाच्या अंतराने मिळत राहते; मात्र खर्च नियमितपणे करावा लागतो. पैसा जवळ बाळगल्यामुळे गमवावे लागणारे व्याज (साठ्यावरील खर्च) आणि पैसा जवळ बाळगल्यामुळे उत्पन्न आणि खर्च यांमधील तफावत दूर होऊन होणारा लाभ यांची तुलना करून व्यक्ती पर्याप्त रकमेचा पैसा जवळ बाळगते.

इ) फिलिप्स वक्र : केन्स यांचे विश्लेषण आणि नवअभिजात समन्वयामधील केन्सीय प्रतिमानांनी न्यूनरोजगारी आणि अनैच्छिक बेरोजगारीच्या स्थितीच्या विवेचनावर लक्ष केंद्रित केलेले असल्याने, या प्रतिमानांमध्ये किंमत फुगवटा किंवा भाववाढीच्या विवेचनाचा अभाव होता. बेरोजगारीची पातळी आणि वेतन फुगवटा यांमध्ये दीर्घकालीन व्यस्त संबंध असतो, असा निष्कर्ष काढणाऱ्या फिलिप्स यांच्या सांख्यिक विश्लेषणाने ही उणीव भरून काढली. लिप्से यांनी या व्यस्त संबंधाला सैद्धांतिक आधार पुरवला. फिलिप्स वक्रामुळे केन्स यांच्या उत्पादन आणि रोजगार निर्धारण सिद्धांतामध्ये किंमत निर्धारण आणि भाववाढ यांचे स्पष्टीकरण अंतर्भूत होण्याची शक्यता निर्माण झाली. तसेच धोरणकर्त्यांसाठी भाववाढीचा दर आणि बेरोजगारीचा दर यांच्या विविध जोड्या निवडीसाठी उपलब्ध झाल्या. त्यामुळे केन्सीय अर्थतज्ज्ञांनी हे विवेचन स्वीकारले.

ई) आर्थिक वृद्धीचे विश्लेषण : (१) हॅरॉड-डोमर वृद्धी प्रतिमान : या प्रतिमानानुसार (तांत्रिक प्रगती वगळल्यास) अर्थव्यवस्थेचा महत्तम शक्य वृद्धीदर = बचत किंवा गुंतवणुकीचा दर/भांडवल-उत्पादन गुणोत्तर, तर नैसर्गिक वृद्धीदर = श्रमिकसंख्येचा वृद्धीदर. जोपर्यंत महत्तम शक्य वृद्धीदर = नैसर्गिक वृद्धीदर, तोपर्यंत अर्थव्यवस्थेत अविचल वृद्धी होत राहील. जर महत्तम शक्य वृद्धीदर < नैसर्गिक वृद्धीदर, तर अर्थव्यवस्थेतील बेरोजगारी वाढत्या दराने वाढत जाईल. याउलट, महत्तम शक्य वृद्धीदर > नैसर्गिक वृद्धीदर, तर अर्थव्यवस्थेतील बेरोजगारी कमी होत जाऊन श्रमिकांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे वृद्धीप्रक्रिया संपुष्टात येईल.

(२) सोलो-स्वॉन वृद्धी प्रतिमान किंवा वृद्धीचे नवअभिजात प्रतिमान : सोलो आणि स्वॉन यांनी असे दाखवून दिले की, हॅरॉड-डोमर वृद्धी प्रतिमानाचे निष्कर्ष स्थिर तंत्रज्ञानाच्या गृहितावर आधारलेले आहेत. जर उद्योगसंस्था उत्पादन घटकांच्या सापेक्ष किमतीनुसार आदाने समायोजित करू शकल्या, तर वाढत्या बेरोजगारीच्या दराबरोबर वास्तव वेतन दर कमी होऊन भांडवल-उत्पादन गुणोत्तर घटेल आणि अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर वाढून नैसर्गिक वृद्धीदराला अविचल स्थिती वृद्धीमार्ग साध्य होईल.

(३) रॉबिन्सन, कॅल्डोर आणि पासीनेट्टी आदींची वृद्धी प्रतिमाने : या प्रतिमानांनी वृद्धीची नवअभिजात स्पष्टीकरणे नाकारली आणि केन्सीय प्रतिमानाला अंतर्भूत करणारे उत्पन्न वितरणाचे मार्क्सवादी वा नव-रिकार्डीय पद्धतीने विश्लेषण केले.

संदर्भ :

  • सोवनी, नी. वि., अर्थवेध : निबंधपंचक, ठाणे, १९७९.
  • Ahuja, H. L., Macroeconomics : Theory and Policy, New Delhi, 2011.
  • Econometrica, Vol. 5, 1937.
  • Snowden, Brian, A Macroeconomics Reader, London, 1997.
  • Togato, Teodoro, Keynes and the Neoclassical Synthesis: Einsteinian versus Newtonian macroeconomics, London, 1998.

समीक्षक : विनायक देशपांडे