केन्स, जॉन नेव्हिल (John Neville Keynes) : ( ३१ ऑगस्ट १८५२ – १५ नोव्हेंबर १९४९ ). प्रसिद्ध ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ, अर्थतशास्त्रज्ञ आणि जगप्रसिद्ध अर्थतशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांचे ते वडील. त्यांचा जन्म इंग्लंडमधील सॅलिसबरी, व्हिल्टशर येथे व्यापारी जॉन केन्स व ॲना मेनॉर्ड नेव्हिल या दांपत्यापोटी झाला. त्यांचे शालेय शिक्षण ‘ॲमरशम हॉल स्कूल’ येथे झाले. त्यांनी इ. स. १८७५ मध्ये नीतिशास्त्र विषयात बी. एससी., इ. स. १८७९ मध्ये एम. ए. आणि इ. स. १८९१ मध्ये डी. एससी. या पदव्या प्राप्त केल्या. त्यांना इ. स. १८६९ मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडनची गिलख्रिस्ट शिष्यवृत्ती आणि इ. स. १८७२ मध्ये प्रेम्ब्रोक कॉलेज, केंब्रिजची गणित विषयाची शिष्यवृत्ती मिळाली होती.

केन्स हे प्रेम्ब्रोक कॉलेजमध्ये शिकत असताना प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ ॲल्फ्रेड मार्शल यांच्यापासून प्रभावीत होऊन त्यांना अर्थशास्त्रा विषयात रुची निर्माण झाली. ते मार्च १८८१ मध्ये केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या स्थानिक परीक्षा व व्याख्याने या कार्यकारी समितीचे साहाय्यक सचिव आणि इ. स. १९१० मध्ये तेथेच कुलसचिव म्हणून निवृत्तिपर्यंत (इ. स. १९२५) ते कार्यरत होते. पदभार सांभाळत असतानाच त्यांनी इ. स. १८८४ ते १९११ या कालावधीदरम्यान विद्यापीठातच नीतीशास्त्र व राजकीय अर्थशास्त्र या विषयांचे अध्यापनही केले.

केन्स यांचे इ. स. १८८४ मध्ये लिहिलेले स्टडीज ॲण्ड एक्झरसाइजेस इन फॉरमल लॉजिक  हे पुस्तक त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या व्याख्यानांवर आधारित असून ते विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण होते. या पुस्तकात विद्यार्थी कार्य करू शकतील अशा प्रकारच्या औपचारिक तर्कावर आधारित अत्यंत मनोरंजक आणि कल्पक समस्या दिल्या होत्या. त्यात त्यांनी प्रसिद्ध तत्त्वज्ञ इमॅन्युएल कांट व जॉर्ज व्हिल्हेल्म फ्रीड्रिख हेगेल यांच्या तात्त्विक तर्क आणि जॉन स्ट्यूअर्ट मिल यांच्या आनुभविक तर्क प्रभावाविरुद्ध शुद्ध स्वरूपातील औपचारिक तर्काचे समर्थन केलेले दिसून येते.

केन्स यांनी इ. स. १८९१ मध्ये स्कोप अँड मेथड ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी  हा आपल्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामुळे त्यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (एससी. डी.) ही पदवी प्राप्त झाली. या ग्रंथात त्यांनी इ. स. १८७० ते १८८० या दशकांत अभ्यासकांमध्ये सुरू असलेल्या आगमन व निगमन अध्ययन पद्धतीमधील श्रेष्ठत्त्वाच्या वादावर समाधान शोधण्याचा प्रयत्न केला आहे. ऑस्ट्रीयन संप्रदाय हे कार्ल मेंगरप्रणित अर्थशास्त्रीय निगमनात्मक अध्ययनपद्धतीचे समर्थन करत होते; तर जर्मन ऐतिहासिक संप्रदाय  हे गुस्ताव स्मॉलरप्रणित अर्थशास्त्रीय आगमनात्मक अध्ययनपद्धतीला महत्त्व देत होते. मात्र, केन्स यांनी समन्वयवादी संमिश्र भूमिका स्वीकारून अध्ययनपद्धतीमधील श्रेष्ठत्त्वाचा वाद सोडविण्यासाठी एकीकृत प्रारूप विकसित केले. आर्थिक क्रियांच्या आकलनाकरिता दोन्ही पद्धती आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादीत केले.

केन्स यांच्या आर्थिक अध्ययन पद्धतीची समीक्षा करताना उपरोधीकपणे असे म्हटले जाते की, त्यांच्या अध्ययन पद्धतीची ही तत्त्वे त्यांचा मुलगा जे. एम. केन्स यांच्या वैचारिक संपत्तीपुढे खूप पंगू आहेत. ज्याच्या निर्हस्तक्षेप तत्त्वविरुद्धच्या धोरणात्मक अभिमुखतेद्वारे पुढे राजकीय अर्थशास्त्राची एक नवीन व्यवस्था तयार झाली. मुळात अर्थशास्त्राची व्याप्ती व पद्धतीबद्दल अर्थतज्ज्ञानी कसा विचार करायला पाहिजे व ते वास्तवात कसा करत नाहीत या संदर्भात जॉन नेव्हिल केन्स यांनी एका तर्कतज्ज्ञाच्या दृष्टिकोनातून लिखाण केले. त्यामुळे त्यांच्या या दृष्टिकोणाचे काही गुण तसेच उणिवा देखील आहेत.

केन्स यांनी इ. स. १८८२ मध्ये फ्लोरेन्स ॲडा ब्राऊन हिच्याशी विवाह केला. फ्लोरेन्स या एक प्रभावी सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी केंब्रिज बोरो कौन्सिलच्या पहिल्या महिला कौन्सिलर आणि इ. स. १९३२ मध्ये मेयर या पदव्या भूषविल्या होत्या.

संदर्भ :

  • Keynes, John Neville, Studies and Exercises in Formal Logic, London, 1884.
  • Keynes, John Neville, The Scope and Method of political Economy, 1891.
  • Moore, Gregory, John Neville Keynesˡs Solution to the English Method enstreit, 2003.
  • Read, C., Keynesˡs Scope and Method, 1891.
  • Venn, J., Review of Keyneˡs Studies and Exercises, 1884.

समीक्षक : अनील पडोशी