आयुर्वेद शास्त्रानुसार दोष, धातु आणि मल यांची शरीरातील विषमता म्हणजे शरीरामध्ये त्यांचे प्रमाण वाढणे अथवा कमी होणे किंवा त्यांच्यामध्ये काही विकृती होणे म्हणजेच ‘व्याधी’ होय. व्याधीची उत्पत्ती होण्याकरिता जे हेतु (कारणे) कारणीभूत ठरतात, त्या हेतुंमुळे दोषादिंमध्ये बिघाड होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून ते प्रत्यक्ष व्याधी उत्पत्ती होईपर्यंत सहा प्रकारच्या क्रिया शरीरामध्ये घडतात, यालाच ‘षट्क्रियाकाल’ असे म्हटले जाते. ज्या क्रियेमुळे शरीरात विषम स्थितीत असलेल्या दोष, धातु व मल यांना समस्थितीत आणले जाते, त्या प्रक्रियेला ‘चिकित्सा’ असे म्हणतात. चिकित्सा उपक्रम करताना सर्वप्रथम व्याधी उत्पन्न होण्याचे मूळ कारण म्हणजेच व्याधीचे हेतु काय आहेत याचा विचार केला जातो आणि त्यानुसार रोगाचे निदान केले जाते. व्याधीचे अचूक निदान होण्यासाठी शरीरात असणाऱ्या दोष आदींची नेमकी अवस्था याचे संपूर्ण ज्ञान चिकित्सकास होणे आवश्यक असते. याचे विस्तृत वर्णन सुश्रुताचार्यांनी संहितेत दिलेले आहे. षट्क्रियाकालांच्या ज्ञानाने शोधन चिकित्सा किंवा शमन चिकित्सा करणे सोयीचे होते.
(१) संचय : त्रिदोष (वात, पित्त, कफ) सर्व शरीरभर व्याप्त आहेत. त्यांची प्रत्येकाची शरीरामध्ये स्थाने सांगितली आहेत. जेव्हा दोष प्रकोपक हेतुंचे सेवन होते, तेव्हा ते दोष स्वस्थानात गरजेपेक्षा अधिक उत्पन्न होतात. याच अवस्थेस ‘चयावस्था प्रथम क्रियाकाल’ असे म्हणतात. संचयाचे दोन प्रकार पडतात — कालस्वभावानुसार स्वाभाविक संचय आणि आहारविहार हेतुजन्य वैकृत संचय.
संचय लक्षणे : (i) वातदोष : स्तब्धपूर्ण कोष्ठता; उदा., मध्य शरीराच्या अवयवांच्या ठिकाणी स्तब्धता जाणवणे. (ii) पित्तदोष : मंद उष्णता; उदा., त्वचेच्या ठिकाणी पिवळसर वर्ण जाणवणे. (iii) कफदोष : जडपणा व आळशीपणा जाणवणे.
दोषांचा संचय होत असताना वरील लक्षणे प्रत्येक रुग्णात कमी अधिक प्रमाणात जाणवत असतात. दोषांचा संचय होताच त्यांचा प्रतिकार करावा. प्रकोप होईपर्यंत वाट पाहू नये. ज्यावेळी शरीरात दोषांमध्ये विषमता निर्माण होते, तेव्हा सर्वप्रथम शरीराचाच असा प्रयत्न असतो की ते सम्यावस्थेत यावेत. समान द्रव्य-गुण-कर्माने वृद्धी होते, तर विपरित द्रव्य-गुण-कर्माने ह्रास होतो. म्हणूनच ज्या कारणांमुळे दोषाचा चय (एकाच ठिकाणी साठून राहणे) झालेला असतो. त्याच्या गुणसमान आहारविहार नकोसा वाटतो. परंतु, या इच्छेचे त्याचवेळी आचरण झाले तर पुढे दोषांचा प्रकोप न होता ते परत समअवस्थेत येतात.
(२) प्रकोप : द्वितीय क्रियाकाल. संचय अवस्थेत योग्य चिकित्सा न केल्यास दोषांचा प्रकोप होतो. दोषांची अधिक प्रमाणात वृद्धी झाल्याने दोष या अवस्थेत स्वस्थान सोडून बाहेर पडण्यास प्रवृत्त होतात. ऋतुच्या प्रभावानुसार देखील दोषांचा स्वाभाविक प्रकोप होत असतो. जसे वर्षा ऋतुत वात दोषाचा, शरद ऋतूमध्ये पित्त दोषाचा आणि वसंत ऋतुमध्ये कफ दोषाचा प्रकोप होतो.
प्रकोप लक्षणे : (i) वात प्रकोप : उदरशूल, कोष्ठामध्ये वात संचार होणे. (ii) पित्त प्रकोप : घशाशी आंबट पाणी येणे, अधिक तहान लागणे व सर्वांगाचा दाह होणे. (iii) कफ प्रकोप : अन्न खाण्याची इच्छा न होणे, मळमळणे.
प्रकोपावस्थेत शोधन किंवा शमन या चिकित्सा करण्यास सांगितले आहे. कारण या अवस्थेत दोष वृद्धीकडे दुर्लक्ष केल्यास दोष पुढील प्रसर अवस्थेत जातात. म्हणूनच योग्यप्रकारे दोषांचा अभ्यास करून शक्य झाल्यास मुख्यत्वे शोधन चिकित्सा (वात दोषासाठी बस्ति, पित्त दोषासाठी विरेचन आणि कफ दोषासाठी वमन) करावी अन्यथा शमन चिकित्सा करावी.
(३) प्रसर : तृतीय क्रियाकाल. उपरोक्त दोन क्रियाकालांमध्ये वातादी दोषांची वृद्धी फक्त स्वस्थानातच असते. परंतु, प्रसरवस्थेत दोष स्वस्थानातून बाहेर जाण्यास सुरुवात होते, याला दोषांचे विमार्गगमन होणे असे म्हणतात.
प्रसर लक्षणे : (i) वातप्रसर : पोट फुगल्याप्रमाणे वाटणे.(ii) पित्तप्रसर : सर्वांगदाह, तोंडातून वाफा निघल्याप्रमाणे वाटणे. (iii) कफप्रसर : तोंडाला चव नसणे, थकवा, उलटी होणे.
याप्रकारे दोषांचा प्रसर ज्या ज्या स्थानामध्ये होईल त्यानुसार विविध लक्षणे या अवस्थेत उत्पन्न होतात. स्वत:चे स्थान सोडून गेलेल्या दोषांमुळे रुग्णाला अतिशय क्लेश उत्पत्ती होते. म्हणून रुग्णाची शारीरिक अवस्था लक्षात घेऊन शमन चिकित्सा करावी किंवा स्नेहन-स्वेदन करून दोषांना जवळच्या मार्गाने बाहेर काढावे.
(४) स्थानसंश्रय : चतुर्थ क्रियाकाल. प्रसर अवस्थेत दोषांची योग्य चिकित्सा केली गेली नाही तर ही अवस्था प्राप्त होते; या अवस्थेत व्याधीची अभिव्यक्ती होते. या अवस्थेमध्ये स्वस्थान सोडून गेलेल्या दोषांमुळे भविष्यात उत्पन्न होणाऱ्या व्याधीबाबत सूचना प्राप्त होते, त्याला पूर्वरूप असे म्हणतात.
व्याधीच्या पूर्वरूपात जी चिकित्सा केली जाते ती चिकित्सा या अवस्थेत करावी. याला दोष-दुष्य प्रत्यनिक चिकित्सा असे म्हणतात.
(५) व्यक्ती : हा पाचवा क्रियाकाल आहे. या अवस्थेत व्याधी व्यक्त होतो व व्याधी विनिश्चिय करता येतो. कारण या अवस्थेत लक्षणे स्पष्ट होतात, व्यक्त होतात, म्हणूनच या अवस्थेला ‘व्यक्ती’ असे म्हटले आहे.
या अवस्थेत वैद्याला व्याधीची सुनिश्चिती झालेली असते. त्यामुळे या अवस्थेत व्याधी-प्रत्यनिक चिकित्सा करावी म्हणजेच त्या त्या व्याधीची जी चिकित्सा सांगितलेली आहे त्यानुरूप चिकित्सा करावी.
(६) भेद : हा सहावा क्रियाकाल आहे. व्यक्ती या अवस्थेत फक्त व्याधी सुनिश्चित होतो. परंतु, भेद या अवस्थेत व्याधीतील दोष, अंशाश कल्पना, हेतु, व्याधीमार्ग इ. सूक्ष्म भाव जाणले जातात; त्यामुळे चिकित्सेमध्ये अचुकता येते. या अवस्थेत व्याधीचे सूक्ष्म ज्ञान होते, म्हणून यावरून व्याधी साध्य आहे की असाध्य आहे याचे सुद्धा ज्ञान वैद्याला होते व त्यानुसार चिकित्सा करणे वैद्याला सोईचे जाते. या अवस्थेत व्याधीचे सूक्ष्म भाव जाणून त्यानुरूप अचूक चिकित्सा वैद्याने करावी व व्याधी असाध्य असल्यास चिकित्सा करू नये.
अशाप्रकारे अवस्थेनुसार व्याधीची चिकित्सा करण्यासाठी तसेच व्याधीची सुनिश्चिती करून त्यानुरूप चिकित्सा करण्याकरिता व व्याधीच्या साध्यासाध्यतेचे ज्ञान प्राप्त होण्यासाठी षट्क्रियाकालाचे महत्त्व आहे. संचयावस्थेत जर दोषांना साम्यावस्था प्राप्त करून दिली, तर प्रकोपादी उत्तरोत्तर अवस्थेत दोष जाणार नाहीत व यामुळे व्याधी उत्पत्ती टाळण्यास मदत होते.
पहा : दोषधातुमलविज्ञान (पूर्वप्रकाशित नोंद).
संदर्भ : सुश्रुत, दृष्टार्थ सुश्रुतचिंतन, सूत्रस्थान २१, गोदावरी पब्लिशर्स, २००८.
- https://www.carakasamhitaonline.com/index.php/Shatkriyakala
समीक्षक : कौस्तुभ चौंडे