अग्नीच्या म्हणजेच चयापचयाच्या विविध क्रियेने निर्माण होणाऱ्या त्याज्य घटकांचे वहन करून हे त्याज्य घटक शरीराबाहेर टाकण्याचे काम मूत्राद्वारे होते. या त्याज्य घटकांना आयुर्वेदीय परिभाषेत ‘क्लेद’ असे म्हणतात.

मूत्र हे गरम आणि तीक्ष्ण गुणाचे तसेच तिखट आणि खारट चवीचे असते. शरीरात अतिप्रमाणात मूत्राची निर्मिती झाली असता ओटीपोटात दुखणे, पुन्हा पुन्हा लघवीला जावेसे वाटणे ही लक्षणे निर्माण होतात. मूत्र निर्मिती कमी प्रमाणात झाल्यास लघवीला साफ होत नाही, मूत्राचा रंग बदलतो, कधी कधी तो रक्तमिश्रित सुद्धा दिसतो. जाणीवपूर्वक फार वेळ लघवी धरून ठेवू नये. कारण तसे केल्यास मूत्राशयाच्या ठिकाणी आणि पुरुषांमध्ये शिश्नाच्या ठिकाणी वेदना होतात. लघवी कष्टाने होते, डोके दुखते तसेच पोटाच्या खालच्या भागात ताण जाणवतो.

आयुर्वेदामध्ये रोग निदानासाठी मूत्र परीक्षण करण्यास सांगितले आहे. याची एक वेगळी पद्धत आयुर्वेदाने विकसित केली आहे. याला ‘तैल बिन्दू’ परीक्षा असे म्हणतात. दोषांच्या प्राधान्यानुसार मूत्राच्या रंगात फरक पडतो. कफ दोषाने दूषित मूत्रामध्ये फेस असतो, तर पित्त दोषाने दूषित मूत्र हे लालसर असते. वात दोषाने दूषित मूत्र किंचित पांढऱ्या रंगाचे असते.

आयुर्वेदामध्ये आठ प्राण्यांच्या मूत्राचे व त्यांच्या गुणधर्मांचे विविध रोगांमध्ये जसे की त्वचा रोग, पोटाचे विकार, स्थौल्य, कफदोषाने होणारे रोग ह्यांत होणारे उपयोग वर्णन केले आहे. ह्या आठ प्राण्यांमधे घोडा, गाढव, गाय, म्हैस, हत्ती, उंट, बकरी आणि मेंढी यांचा उल्लेख आहे. यापैकी गोमूत्राच्या औषधी गुणधर्मांवर बरेच संशोधन झाले असून ह्या गुणधर्मांचे एकस्व (Patent) देखील लोकांनी घेतले आहे.

पहा : मूत्र (पूर्वप्रकाशित नोंद)

संदर्भ :

  • अष्टांग हृदय — सूत्रस्थान, अध्याय ११, श्लोक ४, १३, २२.       
  • चरक संहिता — सूत्रस्थान, अध्याय १, श्लोक ९६; अध्याय ७, श्लोक ६.
  • योग रत्नाकर,  अध्याय १.

                            समीक्षक : जयंत देवपुजारी