रौप्य भस्म हे आयुर्वेदात वापरले जाणारे महत्त्वाचे औषध आहे. चांदीला संस्कृतमध्ये रौप्य, रजत, रूप्यक, तारा, पांढरा, वसुत्तम, रुप्य, चंद्रहास तर इंग्रजीमध्ये सिल्व्हर (Silver) असे म्हणतात. दागदागिने, शिल्पे, भांडी इत्यादींसाठी पूर्वापार चांदीचा वापर होत आला आहे. सोन्यासारख्या अमूल्य धातूनंतर सामान्य लोकांद्वारे हा सर्वांत जास्त वापरला जाणारा धातू आहे. त्याचा भस्म किंवा राखेच्या स्वरूपातील औषधी वापर आयुर्वेदात केला जातो आहे.
आयुर्वेदात विभिन्न धातू, हिरे, मोती, शंख इत्यादींपासूनही औषधे बनविण्याची कला अवगत आहे. दुर्धर अशा गतीने शरीरभर पसरून बल कमी करणाऱ्या जीवघेण्या आजारांसाठी आयुर्वेदाची रसशास्त्र ही नवीन शाखा उदयास आली. वनस्पती द्रव्यांपेक्षाही लवकर काम करणारे असे औषधी योग यात निर्माण केले गेले. वनस्पती, धातू व इतर द्रव्यांना वापरात आणण्यासाठी त्यावरील प्रक्रिया, आजारानुसार बनविलेले विशिष्ठ कल्प याचे सविस्तर वर्णन रसशास्त्रात आहे. धातूंना शुद्ध करण्यासाठी त्यांना तापवून वेगवेगळ्या औषधी काढे, तेल व इतर द्रव्यांमध्ये बुडवून थंड केले जाते. नंतर अग्नि संस्काराने भस्म तयार केले जाते. रौप्य भस्म हे एक धातूबल वाढविणारे रसायन औषध आहे, जे शरीराची ताकद वाढवून पुनरुत्थानास मदत करते. उत्तम चांदीची निवड कशी करावी याचे रसग्रंथात वर्णन केले आहे. वजनदार, मऊ, कोमल, उष्णता दिल्यास व तोडल्यास पांढरी दिसणारी, स्निग्ध, चमकदार, लवचिक व दिसण्यास सुंदर अशी चांदी औषधासाठी घ्यावी.
रौप्य शुद्धी प्रक्रिया : शुद्धी करण्यासाठी चांदीचे छोटे छोटे पत्रे अग्निच्या साहाय्याने गरम करून तेल, गोमूत्र, ताक, कांजी (आंबट अशी निवळ) आणि कुल्थीच्या काढ्यांमध्ये वेगवेगळे प्रत्येकी सात-सात वेळा विझविले जातात. या प्रक्रियेने चांदी शुद्ध व दोषमुक्त होऊन भस्मासाठी योग्य मानली जाते.
रौप्य भस्म प्रक्रिया : चांदीच्या शुद्धी प्रक्रियेनंतर त्याच्या पत्र्यांचे छोटे छोटे तुकडे करून चांदीच्या सम प्रमाणात शुद्ध गंधक व हरताळ मिसळून लिंबू व चिंचेच्या रसात त्यास घोटावे. हे मिश्रण मातीच्या वाटीसारख्या भांड्यामधे ठेवून त्यावर दुसरे तसेच भांडे उलटे ठेवावे व दोन्हींचे तोंड कापड व मातीच्या साहाय्याने बंद करावे व त्यास हलका अग्नि द्यावा. स्वत:हून (नैसर्गिकरित्या) थंड झाल्यावर हे मिश्रण कुटावे व त्यात चांदीच्या अर्ध्या मात्रेत शुद्ध गंधक व हरताळ मिसळून लिंबू व चिंचेच्या रसात पुन्हा घोटावे व वरील प्रक्रियेनुसार अग्नि द्यावा व नंतर खलामध्ये घोटावे. ह्या पद्धतीने २१ वेळा घोटणे व अग्नि प्रक्रियेने चांदीचे भस्म तयार होते. या व्यतिरिक्त अन्य दोन पद्धतींद्वारेही भस्म तयार केले जाते.
या प्रक्रियेने बनलेले शुद्ध भस्म वापरासाठी योग्य किंवा अयोग्य हे पुढील परिक्षणाने ठरविण्यात येते.
(१) रेखापुरण : शुद्ध रौप्य भस्म आपल्या बोटावर चोळल्यास ते अतिशय सहजपणे आपल्या बोटांच्या रेषेत पावडरप्रमाणे प्रवेश करेल.
(२) निश्चंद्रिकरण : उजेडात पाहिले असता शुद्ध रौप्य भस्मात अजिबात चमक दिसत नाही.
(३) अपुर्णभाव : भस्म अशाप्रकारे बनवावे की ते धातूच्या पूर्वीच्या रूपात पुन्हा मिळू शकत नाही.
(४) वारितर : आपण स्थिर पाण्यावर शुद्ध राख टाकली तर ती तरंगते, धातूसारखी बुडणार नाही.
योग्य मात्रा : वैद्यांच्या सल्ल्यानुसार साधारण १२० मिली. ग्रॅम चांदीचे भस्म सकाळ-संध्याकाळ अजारानुसार योग्य अशा मध, तूप, मलई, लोणी किंवा साखरे सोबत घ्यावे.
रौप्य भस्म प्रामुख्याने वात-पित्त शामक आहे. हे औषध मूत्रपिंड, नसा आणि मेंदूशी संबंधित विविध रोगांच्या उपचारांमध्ये वापरले जाते. या व्यतिरिक्त, डोळ्यांचा आजार, विषाणूजन्य संसर्ग, अशक्तपणा, गुदद्वारासंबंधीचा आजार, जुनाट खोकला, मधुमेह, कावीळ, अशक्तपणा, प्लीहाचा विस्तार, यकृत वाढ, शुक्र धातूची कमतरता, शारीरिक दुर्बलता, अपस्मार, उन्माद, स्मृतिभ्रंश, निद्रानाश, उदासिनता, त्वचेचे आणि चेहऱ्याचे तेज वाढवणे, स्नायूंमधील वेदना तसेच रक्तवाहिन्यांच्या अडथळ्याच्या उपचारांमध्ये हे फायदेशीर आहे. अशा विविध प्रकारच्या रोगांमध्ये चांदीच्या भस्माचा किंवा राखेचा उत्तम उपयोग होतो.
पहा : भस्मे, आयुर्वेदीय.
संदर्भ :
- आयुर्वेद सारसंग्रह, श्री बैद्यनाथ आयुर्वेद भवन लि. संस्करण प्रकाशन, २००४.
समीक्षक : कौस्तुभ चौंडे