परकीय भाषा परिणाकार रीत्या शिकविण्यासाठी वर्गामध्ये श्रवण उपकरणांची विशिष्ट प्रकारे केलेली रचना व मांडणी म्हणजे भाषा प्रयोगशाळा. भाषा म्हणजे मानवी संप्रेषणाचे एक साधन. शिकण्यासाठी प्रयोगशाळेचा वापर ही अगदी नवीन संकल्पना आहे. सर्वप्रथम अमेरिकेमध्ये भाषा प्रयोगशाळेची स्थापना झाली आणि हळूहळू त्यांचा विस्तार होऊन १९६० पर्यंत त्या प्रसिद्धही झाल्यात. अनेक राष्ट्रांमध्ये त्या कार्यान्वित झाल्या आहेत. दळणवळणामुळे स्वतःच्या मातृभाषेबरोबरच अन्य भाषा येणे, ही आता काळाची गरज झाली आहे. भाषा अध्यापनाच्या पारंपरिक पद्धतीमध्ये भाषा प्रयोगशाळेला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यासाठी भाषा शिकण्याचे विशिष्ट तंत्रही आज विकसित झाले आहे.

भारतात मातृभाषेव्यतिरिक्त आणखी एखादी भाषा शिकणे ही शैक्षणिक गरज असल्याचे लक्षात घेऊन सेंट्रल ॲडव्हायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशनने १९५६ मध्ये त्रिभाषा सूत्र (थ्री लँग्वेज फॉर्म्युला) अंमलात आणायचे ठरविले. देशाच्या हिंदी भाषिक व अहिंदी भाषिक अशा दोन्ही विभागांत भाषा शिकविण्याच्या दृष्टीने समतोल निर्माण व्हावा, असा या सूत्रामागील हेतू होता. १९६१ मध्ये या त्रिभाषा सूत्राला मान्यता देण्यात आली. त्यात प्रादेशिक भाषा, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांचा समावेश होता.

भाषा प्रयोगशाळेची एक स्वतंत्र खोली असते. ऐकण्याच्या व बोलण्याच्या सरावासाठी लागणारी उपकरणे या खोलीत ठेवलेली असतात. भाषा प्रयोगशाळा दोन प्रकारच्या असतात. पहिल्या प्रकाराची प्रयोगशाळा भाषाविषयक संशोधनासाठी तयार केलेली असते. यात भाषेचे विश्लेषण, व्याख्या व नियमांची तपासणी, भाषांची तुलना इत्यादींबाबत संशोधन चालते. स्वर वर्णपटलेखक (साउंड स्पेक्ट्रोग्राफ), दोलनलेखक (ऑसिलोग्राफ) यांसारख्या उपकरणांनी ही प्रयोगशाळा सज्ज असते. दुसऱ्या प्रकारच्या प्रयोगशाळा माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने भाषाविषयक अध्ययनासाठी उपयोगाची असते. या प्रयोगशाळेत एका वेळी साधारणपणे २० ते २५ विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बसण्याची सोय असते. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येकी एक ध्वनिक्षेपक, एक ध्वनिवर्धक, एक ध्वनिमुद्रक, काही ध्वनिफिती इत्यादी बाबी पुरविल्या जातात. प्रत्येक विद्यार्थी कक्षाचा संपर्क मुख्य नियंत्रक कक्षाशी जोडलेला असतो. या प्रयोगशाळेत स्वरविज्ञान महत्त्वाचे असते. या ठिकाणी श्रवण करणे, प्रमाणित उच्चार कसे करायचे हे विद्यार्थी शिकतात. त्यातील स्वराघात समजून घेतात.

भाषा प्रयोग शाळेची वैशिष्ट्ये :

 • भाषा अध्ययनात सरावाला महत्त्व असते. यात सराव सतत होतो.
 • विद्यार्थ्यांस आपल्या गतीनुसार शिकता येते.
 • भाषा प्रयोगशाळेतील विविध साधने व उपकरणे निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना असते.
 • नियंत्रक हा या प्रयोगशाळेतील सर्वांत प्रमुख व प्रभावी घटक असतो. त्यांचे नियंत्रण विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर असते. नियंत्रक वेगवेगळ्या प्रकारच्या कळीच्या साहाय्याने नियंत्रण करीत असतो इत्यादी.

भाषा प्रयोग शाळेचे फायदे :

 • विद्यार्थी भाषेतील प्रमाणित उच्चार ऐकू शकतात.
 • विद्यार्थ्यांच्या बोलण्याचे प्रमाण वाढते.
 • विद्यार्थी स्वतःच्या बोलण्यातील चुका ऐकून त्या दुरुस्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतात.
 • दुसऱ्याला त्रास होणार नाही, अशा पद्धतीने विद्यार्थी पाहिजे तो कार्यक्रम ऐकू शकतात.
 • विद्यार्थी बोलण्यातील उच्चारण, चढउतार, आघात इत्यादी बाबी लक्षात घेऊन स्वतःच्या संभाषणामध्ये सुधारणा घडवून आणतात.
 • भाषा शिक्षकांना इतर भाषा शिक्षकांचा उपयोग यात करून घेता येतो आणि आपले अध्यापन अधिक परिणामकारक करता येते इत्यादी.

भाषेचा वापर : बोलण्याची व लिहिण्याची भाषा ही अनेक प्रतिकांमुळे तयार झालेली आहे. त्यामुळे भाषा हे ज्ञानाचे एक उत्तम माध्यम असते. भाषेतले शब्द अर्थवाही असतात. त्यामुळे त्यांचा उपयोग सूचक चिन्हांसारखा होतो. हे शब्द बोललेले, लिहिलेले, छापलेले किंवा ब्रेल लिपीमध्येदेखील असू शकतात. कित्येकदा अभिनयानेदेखील भाषा तयार होऊ शकते आणि ती इतरांना समजली जाते.

मानवाची भाषा ही प्रगल्भ पातळीवरची असून आज मानव मोठ्या प्रमाणात भाषेचा उपयोग करीत आहे. भाषेची कामे विविध प्रकारची असतात. भाषेद्वारे व्यक्ती व्यक्तींमध्ये विचारांचे संक्रमण होते. याला सामाजिक संदर्भ असतो. भाषेद्वारा इतरांना कार्यप्रवृत्त करता येते, अनुनय करता येते. भाषा ही विचारांचे साधन असून मनातील विचार भाषेतून प्रकट केल्यामुळे ताण कमी होतो. भावनोद्रेक मनुष्य भाषेद्वारा आपल्या भावना प्रकट करतो. वादविवाद, चर्चा, विषयाचे विवेचन/वर्णन यांचा भाषेद्वारा विकास होतो. भाषा नेहमीच शब्दरूप घेऊन येते, असे नाही; तर कित्येकदा आपण आपल्या हावभावांनीदेखील भाषेप्रमाणे अर्थाची अभिव्यक्ती करीत असतो. प्रतिक रूपाने भाषा ही मेंदू-पेशींमध्ये साठविलेली असते.

संदर्भ :

 • ओक, सुमन, शैक्षणिक तंत्रविज्ञान, पुणे, २००७.
 • जगताप, ह. ना., प्रगत शैक्षणिक तंत्रविज्ञान आणि माहिती तंत्रविज्ञान, पुणे, २००७.
 • पाटील, प्रशांत, शैक्षणिक तंत्रविज्ञान आणि माहिती तंत्रविज्ञान, पुणे, २००७.

समीक्षक : रघुनाथ चौत्र