संरचनावाद (भाषावैज्ञानिक) : भाषाशास्त्र ज्ञानशाखांमधील सिद्धांतनाची पद्धत.भाषावैज्ञानिक संराचनावादाची पहिली मांडणी फेर्दिना द सोस्यूर यांनी आपल्या couzs de linquistique generate (1916) या भाषाविज्ञानविषयक व्याख्यानामधून केली आहे. भाषाविज्ञानापलीकडे मानववंशविज्ञान, समाजविज्ञान, साहित्यसमीक्षा, मनोविज्ञान, मनोविश्लेषण या विषयांतील विविध सिद्धांतनाच्या पद्धती या भाषावैज्ञानिक संरचनावादाचा प्रेरणेतून विकसित झालेल्या आहेत. त्यात पाठ्य, मानवीय वर्तन, समाजगत समूहांची उतरंड, साहित्यांची संरचना  इ. अंगांना संरचनावादी तत्त्वे लावून एक अभिनव विश्लेषणाची पद्धती विकसित झालेली आहे. पुढे उत्तरसंरचनावाद, विरचनावाद इ. विचारव्यूहांच्या माध्यमातून संरचनावादाचा विकास आणि खंडन दोन्ही झाल्याचे दिसते.    सोस्यूरप्रणीत भाषाविज्ञानाच्या संकल्पनेत चिन्हविज्ञान किंवा चिन्हमीमांसा या ज्ञानशाखेची उपशाखा म्हणून भाषाविज्ञान अभ्यासले जावे आणि भाषाविज्ञान व चिन्हविज्ञान दोन्ही ज्ञानशाखा म्हणून प्रस्थापित व्हाव्यात अशी कल्पना होती.  संरचनावादाच्या गाभ्यात हे चिन्हविज्ञान आहे, यात कोणत्याही घटिताला, मग ते घटित हे भाषा असो, समाज असो, साहित्य असो किंवा इतर काही त्यास एक चिन्ह व्यवस्था म्हणून समजून घेतले जाते. या चिन्हांच्या एका विशिष्ट जुळणीतून जी ती व्यवस्था कार्य करीत असते. सोस्यूरच्या भाषेसंबंधीच्या संरचनात्मक मांडणीत खालील चार गोष्टी मूलभूत स्वरूपाच्या आहेत व त्यांचा विस्तार आणि उपयोजन इतर अभ्यासकांनी आपापल्या अभ्यासक्षेत्रात करून घेतला आहे:

  • लाङ्‍ म्हणजे भाषिक व्यवस्था.यात भाषेच्या अमूर्त संरचनात्मक अंगाचा अंतर्भाव होतो. पारोल म्हणजे वाचिक वर्तन. यात भाषा जशी बोलली जाते व त्यात जे भौतिक आणि मूर्त स्वरूपाचे प्रकटीकरण होते त्याचा समावेश होतो. या द्वैतातून भाषिक संरचना प्रकटत असते. ही भाषिक व्यवस्था व वाचिक वर्तन या दोहोंना मिळून मानवी वाचिक व्यवहार (लाङाज, langage) साकारत असतो. भाषिकव्यवस्था ही एक कालिक आणि कालक्रमिक स्वरूपात अभ्यासता येते. सोस्यूरप्रणीत भाषाविज्ञानात कालक्रमिक अभ्यास गौण आणि एककालिक अंग हे प्रधान स्वरूपाचे ठरते. किंबहुना एककालिक अभ्यासाला प्राधान्य मिळाले तेच मुळी संरचनावादी मांडणीमुळे. अशाच प्रकारचे दुसरे द्वैत हे चिन्हक आणि चिन्हित या संकल्पनांद्वारे विकसित करून चिन्हाची कल्पना सोस्यूर यांनी मांडलेली आहे.
  • भाषिकचिन्हे, अर्थात शब्द हे यादृच्छिक स्वरूपाची असतात, म्हणजेच शब्दात जे ध्वनी अंतर्भूत असतात ते काही वस्तुतः त्याच्या अर्थाचे सूचक नसतात. शब्दगत ध्वनी आणि अर्थ हे रूढसंकेतांमधून प्रस्थापित होत असतात, त्यांच्यात कोणताही तार्किक, अर्थानुगामी संबंध नसतो. याला भाषिकचिन्हाचे यादृच्छिक स्वरूप असे म्हणतात.
  • अंगभूत अर्थ चिन्हांना नसल्याने त्यांचा अर्थ विचारात घेताना एका चिन्हाचे इतर चिन्हांशी असलेले संबंध यातून अर्थभेद उपस्थित होत असतो हे लक्षात घ्यावे लागते. थोडक्यात चिन्हांची अगर शब्दांची अर्थव्यवस्था ही मूलतः त्यांच्यातील भेदावर, भिन्नतेवर अवलंबून असते, अंगभूत अर्थ निर्देशावर नव्हे. अशाप्रकारे भाषा ही केवळ एक भेद व्यवस्था असते.
  • एमिक-एटिकचे द्वैत म्हणजे उदाहरणार्थ, स्वनिमिक आणि स्वनात्मक यांतील द्वैत. अधिक विस्ताराने समजून घेण्यासाठी मराठी आणि अरबी या भाषांचे उदाहरण घेऊ. मराठी प – पळीचा आणि ब – बदकाचा. हे दोन स्वतंत्र स्वनीम आहेत. कारण त्यांचा एकमेकांच्या ऐवजी वापर केल्यास अर्थभेद होतो, उदा. पळ आणि बळ हे वेगळ्या अर्थाचे शब्द आहेत. तसेच प आणि फ हे देखील वेगळे स्वनिम आहेत; कारण पळ आणि फळ हे वेगळ्या अर्थाचे शब्द आहेत. परंतु अरबी भाषेत प आणि ब हे स्वन कोणताही अर्थभेद घडवून आणत नाहीत. त्यामुळे पाकिस्तानचा उच्चार बाकिस्तान असा करताना अरबी भाषकांची गल्लत होत नाही. थोडक्यात प आणि ब हे स्वतंत्र स्वनिम म्हणून अरबीत गणता येत नाही. तसेच इंग्रजी प आणि फ हे स्वतंत्र स्वनिम नाहीत. पिन किंवा फिन असा उच्चार केला तरीही  pin  याच शब्दाचा निर्देश होतो इ.

ही चार आणि इतर तत्त्वे इतर अभ्यासकांनी आपापल्या  ज्ञानशाखांना लावली आणि त्या त्या अभ्यासक्षेत्रात संरचनावादी पद्धतीचा विस्तार झाला. समाजाला भाषेप्रमाणेच एक व्यवस्था मानून विश्लेषण करता येईल हे सर्वप्रथम क्लाउड लेवी-स्ट्रॉस या मानववंशविज्ञानाच्या अभ्यासकाने नोंदवले. पुढे मनोविज्ञानात भावना या संरचित असतात. याची मांडणी लॅंगर (१९५३) यांनी केली. साहित्य आणि साहित्यव्यवहार यातही संरचनावादी पद्धतीचा शिरकाव झाला.

संदर्भ: 1. Culler,Jonathan, Structuralist Poetics: Structuralism, Linguistics and the Study of Literature, London, 1875. 2. Saussure, Ferdinand de, Course in General Linguistics, London, 1983.