एखाद्या सामाजिक, आर्थिक, राजकीय संदर्भात घडली गेलेली पुरुष म्हणून ओळख म्हणजे पुरुषत्व. पुरुषत्व हे एक समाजरचित आहे. यातून केवळ स्त्री-पुरुष यांच्यातील सामाजिक संबंध प्रतीत होत नसून पुरुष-पुरुष यांच्यातील सामाजिक सत्तासंबंधदेखील प्रतीत होतात. पुरुषत्व आणि स्त्रीत्व या संकल्पना वर्णपटावरील (स्पेक्ट्रम) दोन विरुद्ध टोकाच्या आणि त्यातही उतरंडीवर आधारित संकल्पना आहेत. या सत्तासंबंधांमध्ये व्यक्तीच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्थानांनुसार त्या व्यक्तीस समाजामध्ये मान्यता, प्रतिष्ठा, साधनांची उपलब्धता इत्यादी बाबी अवलंबून असतात. पितृसत्ता या सामाजिक संरचनेमुळे भिन्नलिंगी पुरुषांना (हेट्रोसेक्शुअल मेन) श्रेष्ठत्व प्राप्त होते. पितृसत्ता ही अशी संरचना आहे, जिच्या मार्फत विविध प्रक्रियांमधून भिन्नलिंगी श्रेष्ठ पुरुष (सुपेरिअर मेन) घडविले जातात.

पुरुषत्व नैसर्गिक रीत्या अभिव्यक्त केली जाणारी बाब नसून ती पूर्वनिर्धारित अटी व नियमांवर आधारित समाज रचित आणि सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. यामध्ये सतत पुरुषांवर पुरुषत्वाचे ओझे असते. तसेच घडण – पुनर्घडण, समाजाचे प्रतिनिधित्व, पुरुषत्वाचे दृढीकरण या प्रक्रियांचा समावेश यामध्ये असतो. त्यामुळे जुडीत बटलर अधोरेखित करतात की, लिंगभाव हा सादरीकरणाशी संबंधित आहे. एखादी व्यक्ती स्त्री किंवा पुरुष असेल, तर त्या व्यक्तीला दैनंदिन कृती, हावभाव यांच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक लिंगाधारित ओळखीवर आधारित वर्तणूक करावी लागते. एकदिवस स्त्री आणि दुसऱ्या दिवशी पुरुष अशी लिंगाधारित ओळखीची अदलाबदल करता येत नाही. त्यामुळे पितृसत्ताक समाजामध्ये वावरत असताना स्त्री आणि पुरुषाला सातत्याने स्वतःचे स्त्रीत्व आणि पुरुषत्व सिद्ध करावे लागते.

विविध स्त्रीवादी अभ्यासक असा युक्तिवाद करतात की, लिंगभाव ओळख ही आधुनिक पूर्वकाळात स्थिर अथवा तटस्थ नव्हती; मात्र आधुनिक काळात ती आणखी कठोर करण्यात आली. द इंटिमेट एनीमी या पुस्तकामध्ये आशिष नंदी यांनी असा युक्तिवाद केला की, आधुनिक पूर्व भारतीय समाजात लिंगाची तटस्थ अशी ओळख नव्हती. ती प्रवाही (फ्लुडिटी) होती; मात्र पुरुषी ब्रिटीश साम्राज्यवादी विचारधारेने ही प्रवाही ओळख पुसून टाकली. नजमाबादी अफसाने या आधुनिक काळात स्वतःला आधुनिक ठरविण्यासाठी इराणने काय प्रयत्न केले याविषयी मांडणी करतात. त्या नमूद करतात की, इराणने लिंग बदल शस्त्रक्रियेमार्फत कशाप्रकारे केवळ दोनच (स्त्री आणि पुरुष) लिंग अस्मितांना मान्यता देण्यात आली. त्याच प्रमाणे आर. डब्ल्यू. कोनेल यांनी अधिसत्तात्मक, गौण, सहभागी आणि परिघावरील पुरुषत्वाबद्दल मांडणी केली. त्यांच्या मते, अधिसत्तात्मक पुरुषत्व हे पुरुषत्वाच्या उतरंडीमध्ये सर्वांत श्रेष्ठ आणि सांस्कृतिक दृष्ट्या आदर्श प्रारूप समजले जाते; जे सामाजिक दृष्ट्या इतर लिंगाधारित अभिव्यक्तींना वगळते आणि सर्वश्रेष्ठ पुरुषाची समाजामध्ये स्त्रिया, समलिंगी पुरुष तसेच लिंगभाव वर्णपटावरील विविध अस्मिता, ज्या समाजरचित लिंगभावाच्या फुटपट्टीत बसत नाहीत, या सर्वांवर पुरुषी सत्ता टिकवून ठेवण्यासाठी हातभार लावते. कोनेल यांच्या मांडणीवरून पुरुषत्व हा एकसंध कोटिक्रम नाही, तर यामध्ये विविध अस्मिता आहेत हे दिसून येते.

पुरुषत्वाच्या संकल्पनेमध्ये अनेक भिन्न प्रतिमा आणि वर्तनाचा समावेश होतो. पुरुषत्वाची अखंड अशी व्याख्या करता येत नाही; कारण काही वेळेस ते स्पर्धात्मक, विरोधाभासी असते. पुरुषत्वाचे अनेक संदिग्ध अर्थ आहेत; जे संदर्भ, भौगोलिक प्रदेश, संस्कृती आणि काळानुसार बदलतात. भिन्न समाज स्त्रीत्व आणि पुरुषत्व यांच्या वैशिष्ट्यांचे विविध साचे निर्माण करतात आणि त्यानुसार स्त्री आणि पुरुषाला घडविण्यात येते. उदा., भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात विविध समूह आहेत. प्रत्येक समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांच्या वर्तणूक, गुणधर्म अथवा विशेषता ही वेगवेगळी दिसून येते. उदा., आदिवासी समाजामध्ये लिंगाधारित भूमिका इतक्या तटस्थ नसतात, जितक्या त्या शहरी भागात उच्च अथवा मध्यम जातींमध्ये दिसून येतात. त्यामुळे ठिकाण आणि काळानुसार स्त्रीत्व व पुरुषत्वाच्या धोरणांमध्ये बदल होतो.

भारतीय वर्चस्ववादी आणि श्रेष्ठ पुरुषत्वाच्या प्रतिमा पारंपरिक कायदे व नियम, राज्य व त्याची यंत्रणा, कुटुंब, धार्मिक रूढी व परंपरा, लोकप्रिय संस्कृती, विविध साधने इत्यादी अवकाशामध्ये घडविल्या जातात. तसेच श्रेष्ठ पुरुष बनविण्याच्या पद्धतीमध्ये लैंगिक कल, जात, वर्ग, विवाहसंबंध आणि स्त्रियांचे संरक्षण यांचा समावेश होतो. काही अभ्यासक आधुनिकता आणि सर्वश्रेष्ठ पुरुषत्व यांमध्ये संबंध असल्याचा युक्तिवाद करतात. त्यांच्या मते, आधुनिक युगाने स्त्री आणि पुरुषांची प्रतिमा आणखी कठोर अथवा साचेबंद केली. समाजामध्ये केवळ दोन लिंगभाग अभिव्यक्ती अस्तित्वात आहेत, हे ठसविण्याचा प्रयत्न आधुनिकता तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमांतून करण्यात आला.

पुरुषत्वाच्या घडणीमध्ये कुटुंब ही महत्त्वाची भूमिका बजावते. लहानपणीच मुलीला आणि मुलांना वेगवेगळी वागणूक देऊन लिंगाधारित भूमिका अथवा वर्तणूक करण्यासाठी त्यांना प्रशिक्षित केले जाते. हे करीत असताना लहान मुलांच्या अंगी लिंगाधारित वर्तणूक भिनविण्यासाठी कधी बक्षीस अथवा शब्बासकी, तर कधी शिक्षा दिली जाते. त्यामुळे मुलगा सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेतून जात असताना कुटुंबाची जबाबदारी आणि कर्ता म्हणून मोठा होतो; तर मुलींमध्ये न्यूनगंडाची भावना वाढत जाऊन कुटुंब हीच आपली प्राथमिक जबाबदारी आहे, अशी त्यांची धारणा रूढ होते. पितृसत्ताक समाज स्त्रीत्वाच्या आणि पुरुषत्वाच्या जबाबदाऱ्या अथवा भूमिका ठरवून त्यानुसार वागण्याची सक्ती करीत असतो. ज्या व्यक्ती या जबाबदाऱ्या अथवा भूमिका आत्मसात करण्यास नकार देतात, त्यांना परिघावर ढकलले जाते. त्यामुळे त्यांच्या वाट्याला बहुतांश वेळा मानखंडना अथवा अपमानास्पद वर्तणूक येते.

भिन्न पुरुषत्वाच्या संकल्पना या जात, वर्ग, संस्कृती, लैंगिकता आणि इतर घटकांच्या माध्यमातून आकाराला येते. समाजामध्ये पुरुषत्वाची जी प्रचलित व्याख्या आहे, त्यामध्ये शारीरिक ताकद, सामाजिक मान्यता, श्रेष्ठत्व, लैंगिक क्षमता इत्यादी बाबींचा समावेश आहे. पुरुष जेव्हा स्वतःला मर्द म्हणून सिद्ध करण्यासाठी पुरुषत्वाच्या स्पर्धेत उतरतो, तेव्हा त्याला वेगवेगळ्या जोखीमांना सामोरे जावे लागते. मग ते जीवाची बाजी लावणे असो किंवा शारीरिक ताकद वाढविण्यासाठी घेतलेले विविध प्रकारची औषधे (उदा., स्टिरॉइड इंजेक्शन इत्यादी) असो. सिमोन द बोव्हुआर यांच्या मते, स्त्री व पुरुष हे जन्माला येत नाहीत, तर ते घडविले जातात. पुरुषत्व ही संकल्पना पुरुषांना माणूस म्हणून हिंसक बनविते. त्यांना कधीही स्वतःच्या भावना व्यक्त करू देत नाही. त्यामुळे बहुतांश पुरुष स्वतःला व्यक्त करण्यासाठी हिंसेचा मार्ग पत्करतात. पुरुषत्व आणि स्त्रीत्व यांच्या लिंगाधारित विभागणीमुळे स्त्रियांना कमजोर अथवा कमी लेखले जाते, तर पुरुषांना ताकदवान अथवा तार्किक विचार करणारा म्हणून लेखले जाते. त्यामुळे स्त्रिया या भावनिक, तर्कहीन वस्तू बनतात आणि खाजगी अवकाश त्यांचे जग बनविले जाते; तर पुरुष हे तार्किक, कर्ता बनतात आणि सार्वजनिक अवकाश पुरुषाचे कायदेशीर क्षेत्र बनते.

समकालीन टप्प्यावर काही अभ्यासक पुरुषत्व अभ्यासाचा पुरस्कार करतात. त्यांच्या मते, हा अभ्यास तार्किक रीत्या समाजातील उतरंडीच्या पितृसत्ताक चौकटींना आणि विशेषाधिकार यांना प्रश्न विचारतो; कारण सर्व पुरुष हे समान नसून सर्वांना कमी अधिक प्रमाणात विशेषाधिकार मिळतात. त्यामुळे मर्दानीपणाचा अर्थ आणि त्याच्याशी निगडित असलेल्या सामाजिक भूमिकांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.

थोडक्यात, पुरुषत्वाची एक अशी व्याख्या करता येणार नाही. विविध भौगोलिक आणि सांस्कृतिक अवकाशांनुसार पुरुषत्वाच्या व्याख्येमध्ये बदल असलेला दिसून येतो. त्यामुळे पुरुषत्वाच्या धारणा काय आहेत, त्या कोणत्या टप्प्यावर अधिक बळकट बनतात आणि असे होऊ नये म्हणून काय करता येईल यांवर विचार करणे आवश्यक आहे.

संदर्भ :

  • Bhasin, K., Understanding gender, New Delhi, 2000.
  • Butler, J., Gender Trouble : Feminism and Subversion of Identity, New York 1990.
  • Connell, R., Masculinities, Cambridge, 1993.
  • Menon, N., Seeing Like a Feminist, New Delhi, 2012.
  • Najmabadi, A., Women with Mustaches and men without Beards : Gender and Sexual Anxieties of Iranian Modernity, London, 2005
  • Nandy, A., The Intimate Enemy : Loss and Recovery of Self Under Colonialism, New Delhi 2009.
  • Shrivastava, S., Masculinity Studies and Feminism, Mumbai, 2015.

समीक्षक : वैशाली दिवाकर