ब्लॅक, डेव्हिड्सन (Black, Davidson) : (२५ जुलै १८८४ – १५ मार्च १९३४). प्रसिद्ध कॅनेडियन शरीरशास्त्रज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ. त्यांचे नाव ‘पेकिंग मॅन’ किंवा ‘सिनॅन्थ्रॉपस पेकिनेनिन्स’च्या (सध्याचे होमो इरेक्टस पेकिनेनिन्स) शोधासाठी प्रसिद्ध आहे. ब्लॅक यांचा जन्म कॅनेडातील आँटॅरिओ (टोरांटो) येथे कायद्याच्या संबंधित असलेल्या कुटुंबात झाला. त्यांनी इ. स. १९०३ मध्ये टोरोंटो विद्यापीठातील वैद्यकीय शाळेत प्रवेश घेऊन इ. स. १९०६ मध्ये वैद्यकशास्त्रात पदवी मिळविली. ब्लॅक यांना लहानपणापासून जीवशास्त्र विषयात आवड होती. वैद्यकाच्या पदवीनंतर त्यांनी तुलनात्मक शरीरशास्त्राचा अभ्यास सुरू केला आणि इ. स. १९०९ मध्ये एम. डी. आणि एम. ए. या पदव्या संपादन केल्या. त्यानंतर ते क्लेव्हलँड, ओहायओ येथील केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीमध्ये प्रशिक्षणाचे कार्य केले. त्यांचा विवाह इ. स. १९१३ मध्ये अॅडेना नेव्हिट यांच्याशी झाला.
ब्लॅक यांनी इ. स. १९२० ते १९२५ या काळात पेकिंग युनियन मेडिकल कॉलेजमध्ये शरीरशास्त्राचे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून काम केले. तत्पूर्वी त्यांनी इ. स. १९१७ मधील पहिल्या महायुद्धामध्ये ब्लॅक रॉयल कॅनेडीयन आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये सहभागी होऊन जखमी झालेल्या सैनिकांवर उपचार केले. ब्लॅक यांचा विश्वास होता की, मानवाची उत्पत्ती ही आशियामध्येच झाली आहे. त्यामुळे त्यांनी इ. स. १९२६ मध्ये मानवी जीवाश्मांच्या शोधासाठी आशियामध्ये जाण्याचे नियोजन केले. त्यांना आपल्या संशोधनासाठी रॉकफेलर फाउंडेशनकडून अनुदान प्राप्त झाले. त्यामुळे त्यांनी चीनमधील झौकौडीयन परिसरात मानवी जीवाश्मांच्या शोधास सुरुवात केली. या वेळी पेकिंगजवळच्या चौकौटेन गुहांच्या विविध स्थळांचे सखोल उत्खनन करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. इ. स. १९२७ मध्ये चौकौटेन येथील एका गुहेत ब्लॅक यांच्या एका सहकाऱ्याला एक होमिनिड प्रजातीच्या खालच्या जबड्यातील एक दाढ मिळाली; जी नवीन मानवी प्रजातीशी संबंधित होती. त्यालाच ‘पेकिंग मॅन’ किंवा ‘सिनॅन्थ्रॉपस पेकिनेनिन्स’ असे नाव देण्यात आले होते. संशोधन सुरूच ठेवल्याने त्यांना इ. स. १९२९ मध्ये याच ठिकणी याच अवशेषाची पूर्ण स्वरूपाची कवटी आणि नंतर अनेक दात व इतरही मानवी जीवाश्म मिळाले. सदर जीवाश्म ही अडीच ते चार लाख वर्षांपूर्वीची होती. हे त्यांच्या नावावरील मोठे संशोधन होय.
ब्लॅक यांनी जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ चायना या संस्थेचे चेअरमन म्हणून काम केले. याच काळात या संस्थेचा एक भाग म्हणून सेनोझोईक रिसर्च लेबॉरटरी या संस्थेची स्थापना करून या संस्थेचे पहिले संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. संशोधनाच्या कार्याचा एक भाग म्हणून त्यांनी इ. स. १९३० मध्ये यूरोप दौरा केला. इ. स. १९३२ मध्ये त्यांना रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून नेमण्यात आले. तसेच त्यांना डॅनियल जिरॉड इलियट हा पुरस्कर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आले.
ब्लॅक यांनी इ. स. १९२५ मध्ये लिहिलेला ‘एशियन अँड दी डिस्पर्सल ऑफ प्राइमेट ओरिजिन्स, मॅन वेअर फाउंड इन तिबेट, ब्रिटिश इंडिया अँड तरीम बेसीन ऑफ चायना’ हा शोधनिबंध खूपच गाजला. त्यांनी ऑन ए लोअर मोअर होमोनिड टूथ फ्रॉम दी चौकौटेन डिपॉझिट (१९२७); ए स्टडी ऑफ कान्सु अँड होमन ॲनेओलिथिक स्कुल्स अँड स्पेसिनेन्स फ्रॉम लेटर कान्सु प्रिहिस्टोरिक साइट्स इन कम्पॅरिझन विथ नॉर्थ चायना अँड अदर रिसेंट चायना (१९२८); ऑन ॲन अडॉलसेंट स्कुल ऑफ सिनॅन्थ्रोपस पेकिनेन्सीस इन कम्पॅरिझन विथ ॲन अडल्ट स्कुल ऑफ दी सेम स्पेसिस अँड विथ अदर होमिनिड स्कुल्स, रिसेंट अँड फोसिल (१९३०); फोसिल मॅन इन चायना (१९३३); दी ह्युमन स्केलेटल रिमेन्स फ्रॉम दी शॉ कुओ तून केव्ह डिपॉझिट; सिलेक्टेड पॅलिआअँथ्रोपॉलॉजिकल पेपर्स, १९१५ – १९३७ ही पुस्तके लिहीली.
ब्लॅक यांचे चीनमधील बिजिंग येथे निधन झाले.
संदर्भ :
- Srivastava, R. P., Morphology of the Primates and Human Evolution, New Delhi, 2009.
समीक्षक : सुभाष वाळिंबे