न्याय, सत्य, सुसंगती आणि एकोपा ह्यांच्याशी संबंधित असलेली एक प्रमुख ईजिप्शियन स्त्रीदेवता. माएट, मेईट असेही तिच्या नावाचे उच्चार केले जातात. ‘माआट’ हे तत्त्वज्ञानाच्या संकल्पनेचे दृश्य रूप असल्याने ती सर्वांत कमी पौराणिक व काल्पनिक मानली जाते. माआटचे शब्दश: अर्थ ‘सरळ’ असा आहे. एका हातात अंख (प्राचीन ईजिप्शियन लिखाणाचे प्रतिक), दुसऱ्या हातात राजदंड आणि मस्तकावर शहामृगाचे पीस असे ह्या देवतेचे मूर्त स्वरूप आहे. मस्तकावरील संतुलित असलेले शहामृगाचे पीस हे तिच्या संतुलित न्यायवृत्तीचे प्रतिक मानले जाई. माआट ही सूर्यदेव रा या देवतेची कन्या असून निर्मितीच्या वेळेस रा देवतेबरोबरच वैश्विक जलातून तिची निर्मिती झाली, असे मानले जाते.

इ. ए. वॉलीस बज यांच्या मते माआट म्हणजे प्राचीन काळी ईजिप्तमध्ये प्रचलित असलेली भौतिक आणि नैतिक न्यायव्यवस्थेची सर्वोच्च योजना; तर सीजफ्रीड मोरेन्झ यांच्या मते माआट म्हणजे सृष्टीने प्रस्थापित केलेली निसर्ग आणि समाजाची योग्य कायदेव्यवस्था होय.

माआट देवतेने ताऱ्यांना आकाशात स्थित केले आणि ऋतूंचे नियमन केले, असे मानले जाते. मृत्युनंतर ओसायरिसच्या दरबारात मृतात्म्यांच्या परीक्षेच्या वेळी ही देवता सत्याचे पीस (Feather of Truth) ह्या स्वरूपात हजर राहून त्यांचा न्यायनिवडा करते. मृतात्म्याच्या हृदयाचे वजन करताना दुसऱ्या पारड्यात या देवतेचे शहामृगाचे पीस ठेवले जात असे.

मृतात्म्याने जर सुसंगती आणि एकोप्याच्या तत्त्वानुसार आयुष्य घालवले असेल, तर तो पवित्र, पुण्यवान मृतात्मा होऊन मृत्युनंतर देवतांबरोबर राहून ॲपेप नावाच्या सर्पाशी झगडण्यात देवांची मदत करतो, असे मानले जाई. थडग्यावरील एका लेखानुसार एकदा थकलेल्या वृद्ध रा देवतेने जोम आणि नवजीवनासाठी नन(नू)कडे सल्ला मागितला असता ननने त्याला माआटला आपल्या जवळ घेऊन तिचे चुंबन घ्यायला सांगितले.

बुक ऑफ डेड (मृतांचे पुस्तक) या ग्रंथामधल्या उल्लेखानुसार रा देवतेच्या सूर्यनौकेत हॉरसबरोबर थोथ आणि माआट उपस्थित असतात आणि ते दिवसाचा मार्ग आखतात. रा देवता माआटच्या तत्त्वांना म्हणजेच अपरिवर्तनीय आणि शाश्वत कायदाव्यवस्थेला अनुसरूनच जगतो, असे म्हटले आहे. धार्मिक विधींवर माआटचा पहारा असे आणि मर्त्य मानवांच्या हालचालींवर ती लक्ष ठेवीत असे.

संदर्भ :

  • Armour, Robert A. Gods and Myths of Ancient Egypt, Cairo, 1986.
  • Oakes, Lorna; Gahlin, Lucia, Ancient Egypt, Pennsylvania, 2007.
  • https://www.ancient.eu/article/885/egyptian-gods—the-complete-list/

                                                                                                                                                                   समीक्षक : शकुंतला गावडे