मोहरी ही वनस्पती ब्रॅसिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ब्रॅसिका नायग्रा आहे. कोबी व फुलकोबी या वनस्पतीदेखील याच कुलातील आहेत. मोहरी मूळची भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील असून गेली हजारो वर्षे ती तेथे लागवडीखाली आहे. भारतात मसाल्यातील एक पदार्थ म्हणून मोहरीच्या बियांचा वापर केला जातो. ही वनस्पती काळी मोहरी या नावानेही ओळखली जाते.

मोहरी (ब्रॅसिका नायग्रा) : (१) फुले व फळे यांसह वनस्पती, (२) फुलोरा, (३) बिया

मोहरीचे झुडूप १·५–२·५ मी. उंच वाढते. या झुडपाला तळापासूनच अनेक फांद्या फुटलेल्या असतात. पाने साधी, १०–२० सेंमी. लांब, एकाआड एक आणि लवदार असतात. तळाकडची पाने मोठी, तर शेंड्याकडील पाने लहान व अखंडित असतात. फुलोरा समशिख प्रकारचा असून फुले लहान व गर्द पिवळी असतात. फळ कुटपाटिक प्रकारचे असून त्यांना शेंग म्हणतात. शेंग ०·६–१·२ सेंमी. लांब असून ती आरीसारखी अरुंद असते. शेंगा फुलोऱ्याच्या अक्षाला लागून असतात व त्यात ३–१०, गोल किंवा लंबगोल, तपकिरी किंवा काळ्या बिया असतात. बियांच्या आवरणाखालील रंग पिवळा असतो. बियांमध्ये ३०% स्थिर तेल व १% बाष्पनशील तेल असते.

भारतीय मसाल्यात मोहरीच्या बियांचा वापर अनेक वर्षांपासून होत आहे. सामान्यपणे फोडणी देताना तेल तापविल्यावर त्यात मोहरीच्या बिया टाकतात. उष्णतेमुळे बिया तडकतात व त्यांतील तेल फोडणीत मिसळते. त्याचा विशिष्ट गंध फोडणीला येतो. काही वेळा बियांचे आवरण काढून व त्या वाटून स्वयंपाकात वापरतात. वाटलेल्या बिया मधात मिसळून खोकल्यावर देतात. दम्याच्या उपचारांत मोहरीचा लेप छातीवर तसेच पाठीला लावतात.

मराठी भाषेत मोहरी या सामान्य नावाने इतर पिकेही ओळखली जातात. त्यांमध्ये पिवळी मोहरी म्हणजे राई ही वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव ब्रॅसिका जुंसिया आहे. तिच्या बिया पिवळसर तपकिरी असून त्यांपासून तेल काढतात. मोहरीच्या ब्रॅसिका कँपेस्ट्रिस प्रकार यलो सरसू या जातीला पिवळा सरसू म्हणतात आणि ब्रॅसिका कँपेस्ट्रिस प्रकार ब्राउन सरसू या जातीला तपकिरी सरसू म्हणतात. ब्रॅसिका कँपेस्ट्रिस प्रकार तोरिया या जातीला तोरिया म्हणतात. या वनस्पतींच्या बियांपासून तेल काढले जाते व ते बाजारात ‘सरसों का तेल’ या नावाने विकले जाते. भारतात उत्तरेकडील राज्यांत या वनस्पतींची लागवड तेलबियांसाठी केली जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा