बाष्पयुक्त वाऱ्याच्या वाहण्याच्या मार्गात येणाऱ्या पर्वतीय अडथळ्यामुळे त्या पर्वताच्या वाताभिमुख उतारावर जी पर्जन्यवृष्टी होते, तिला ‘प्रतिरोध पर्जन्य’ किंवा ‘गिरिलिख पर्जन्य’ असे म्हणतात. उबदार सागराकडून वारे भूपृष्ठाकडे वाहू लागतात, तेव्हा ते बाष्पभारित असतात. अशी हवा किंवा वारे भूपृष्ठरचनेनुसार मार्गात येणाऱ्या पर्वताच्या वाताभिमुख बाजूवरून वर चढू लागतात. वातावरणात वाढत्या उंचीनुसार वातावरणीय तापमान व हवेचा दाब कमी होत जातो. त्यामुळे ही बाष्पयुक्त हवा थंड व विरळ बनत जाते. परिणामत: या बाष्पयुक्त हवेची सापेक्ष आर्द्रता वाढत जाऊन तिच्यातील आहे त्या बाष्पानेच ती बाष्पसंपृक्त बनते. त्यामुळे संद्रवण किंवा संघनन (बाष्पकणांचे जलकणांत रूपांतरण होण्याची प्रक्रिया) होऊन मेघकण तयार होतात व मेघनिर्मिती होते. संद्रवण प्रक्रियेत जलकणांचे आकारमान व वजन वाढत जाऊन ते जलकण पुरेसे मोठे झाले की, पर्जन्यरूपाने जमिनीवर कोसळतात. अशा प्रकारे पर्वताच्या अडथळ्यामुळे पर्वताच्या वाताभिमुख बाजूस भरपूर पर्जन्यवृष्टी होते. अशा प्रकारे पर्वताच्या अडथळ्यामुळे हा पाऊस पडत असल्यामुळे त्यास ‘प्रतिरोध पर्जन्य’ असे म्हणतात. पर्वताच्या वाताभिमुख उतारावर या पर्जन्याचे प्रमाण पर्वतपायथ्याकडून पर्वतमाथ्याकडे वाढत जाते. घाटमाथ्यावर पर्जन्याचे प्रमाण सर्वाधिक असते.
पर्वताच्या वाताभिमुख बाजूवर भरपूर पाऊस पडून गेल्यामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झालेले असते. त्यानंतर ही हवा मागील वाऱ्याच्या रेट्यामुळे पर्वताच्या वातविमुख बाजूवरून खाली उतरते; पण अशा वेळी ती हवा वातावरणाच्या विरळ थरातून दाट थरात ढकलली गेल्यामुळे तिचे तापमान वाढते. तापमान वाढल्यामुळे तिची बाष्पधारणशक्ती वाढते आणि ती हवा कोरडी बनत जाते. परिणामत: संद्रवण होण्यास आणि पाऊस पडण्यास प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे त्या पर्वताच्या वातविमुख बाजूवर व त्यापुढील प्रदेशात पावसाचे प्रमाण ठळकपणे कमीकमी होत जाते. पर्वताच्या वातविमुख बाजूकडील अशा कमी पर्जन्याच्या प्रदेशाला ‘पर्जन्यछाया प्रदेश’ असे म्हटले जाते. ही परिस्थिती प्रतिरोध प्रकारच्या पर्जन्यामध्येच आढळून येते.
भारतातील सह्याद्री (पश्चिम घाट) हे प्रतिरोध पर्जन्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. नैर्ऋत्य मॉन्सूनच्या काळात (पावसाळ्यात) अरबी समुद्रावरून वाहत येणाऱ्या आर्द्रतम नैर्ऋत्य मॉन्सून वाऱ्याच्या मार्गात प्रलंब दिशेने सह्याद्रीच्या रांगा येत असल्यामुळे या पर्वताच्या वाताभिमुख पश्चिम उतारावर प्रतिरोध प्रकारची फार मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होते. त्यामुळेच भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वार्षिक सरासरी २०० ते ३५० सेंमी. पाऊस पडतो. सह्याद्रीच्या वातविमुख बाजूवर मात्र पर्जन्याचे प्रमाण बरेच कमी होऊन तेथे पर्जन्यछाया प्रदेश निर्माण झालेले आहेत. परिणामत: सह्याद्रीच्या पूर्वेस निर्माण झालेल्या विस्तीर्ण दक्षिणोत्तर पर्जन्यछाया प्रदेशात वार्षिक पर्जन्याचे प्रमाण अवघे ५० सेंमी. इतके अत्यल्प आहे.
महाराष्ट्रात अरबी समुद्रावरून वाहत येणाऱ्या नैर्ऋत्य मॉन्सून वाऱ्याचा प्रभाव मोठा आहे. नैर्ऋत्य मॉन्सून वाऱ्यापासून महाराष्ट्रातील कोकणच्या किनारपट्टीवर वार्षिक सरासरी २०० ते २५० सेंमी. पाऊस पडतो. कोकणच्या किनारपट्टीवरून सह्याद्रीच्या घाटमाथ्याकडे येताना पर्जन्यात वाढ होत जाते. त्यामुळेच सातारा जिल्ह्यात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर स्थित असलेल्या महाबळेश्वर येथे वार्षिक सरासरी सुमारे ६२५ सेंमी. पाऊस पडतो. महाबळेश्वरच्या पूर्वेकडील म्हणजेच सह्याद्रीचा वातविमुख भाग पर्जन्यछाया प्रदेशात येतो. त्यामुळेच महाबळेश्वरपासून पूर्वेस रस्त्याने अवघ्या १९ किमी. वर असलेल्या पाचगणी येथे १८६ सेंमी., तर पाचगणीपासून रस्त्याने अवघ्या १३ किमी. पूर्वेस असलेल्या वाई येथे केवळ ७१ सेंमी. पाऊस पडतो. हेच प्रमाण पूर्वेस फलटण तालुक्यात ४७ सेंमी. पर्यंत खाली
आलेले आहे. नैर्ऋत्य मॉन्सून हंगामातच बंगालच्या उपसागरावरून उत्तरेकडे वाहत जाणारे आर्द्रतायुक्त वारे हिमालयाच्या पर्वतरांगांकडून अडविले जातात. त्या रांगांच्या वाताभिमुख बाजूवर प्रतिरोध प्रकारचा भरपूर पाऊस पडतो. जगातील बहुतेक खंडांत पश्चिमेच्या बाजूने उंच पर्वतरांगा निर्माण झालेल्या आहेत. महासागरांवरून भूखंडांकडे येणारे आर्द्रतायुक्त वारे या पर्वतरांगांमुळे अडविले जातात. त्यामुळे त्यांच्या वाताभिमुख पश्चिम उतारांवर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो, तर पूर्वेकडील भागांत पर्जन्यछायेचे प्रदेश निर्माण झालेले आढळतात.
समीक्षक : नामदेव स. गाडे