फ्राइडमन, जे. एच. :  (२९ डिसेंबर १९३९ – ) अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील यरेका येथे जेरोम फ्राइडमन यांचा जन्म झाला. तेथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले. चिको राज्य महाविद्यालयात दोन वर्षे अध्ययन केल्यानंतर फ्राइडमन बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात दाखल झाले. त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी व नंतर पदार्थविज्ञानातील उच्चशक्तीकण या विषयात पीएच्.डी. पदवी मिळवली. पीएच्.डी. मिळवल्यानंतरची चार वर्षे फ्राइडमन लॉरेन्स बर्कले राष्ट्रीय प्रयोगशाळेत संशोधक म्हणून कार्यरत होते. १९७२ पासून २००६ पर्यंत स्टॅनफोर्ड रेषीय प्रवेगक केंद्रामध्ये (Stanford Linear Accelerator Center) गणन संशोधन गटाचे प्रमुख म्हणून फ्राइडमन कार्यरत होते. १९८१ साली फ्राइडमन यांची स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. उरलेल्या अर्धवेळात ते प्रवेगक केंद्रात काम पाहात असत.

सिडनी येथील सीएसआयआरओ आणि बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात संख्याशास्त्र विभागात त्यांची अभ्यागत म्हणून नेमणूक होती. २००७ साली फ्राइडमन हे बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात संख्याशास्त्र विभागाचे मानद प्राध्यापक झाले.

उच्चशक्ती पदार्थविज्ञानातील आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीस फ्राइडमन यांचे ३० शोधलेख प्रसिद्ध झाले. त्याशिवाय संगणक, गणन, नमुना चाचणी अशा अनेक विषयांवर त्यांचे ७० पेक्षा जास्त शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्यांची The Elements of Statistical Learning: Data Mining, Inference, and Prediction आणि From Statistics to Neural Networks: Theory and Pattern Recognition Applications ही उल्लेखनीय पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.

त्यांनी विकसित केलेल्या संगणक आज्ञावली आणि प्रणाली व्यावसायिक उत्पादनात वापरल्या जातात, ज्यामध्ये एका शोध इंजिनाचाही समावेश आहे. फ्राइडमन यांनी विकसित केलेल्या पद्धती या आधुनिक संख्याशास्त्र आणि आधारसामग्री खनन, संगणक आज्ञावली सक्षमीकरण यामध्ये आवश्यक म्हणून समाविष्ट आहेत.

फ्राइडमन यांना पुढील काही सन्मान मिळाले आहेत, अमेरिकेच्या कला व विज्ञान अकादमीवर निवड, अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीवर निवड, वर्षातला सर्वोत्कृष्ट शोधनिबंध : जासा; टेक्नोमेट्रीक्स, आधारसामग्री खनन या विषयातील नाविन्यपूर्ण संशोधनासाठी एसीएम जीवनगौरव पुरस्कार, संख्याशास्त्रातील नाविन्यपूर्ण संशोधनासाठी इमॅन्युअल व कॅरोल पारझेन पारितोषिक, आयईईई संगणक संस्थेचे ‘आधारसामग्री खनन’ संशोधनात मोलाची भर घालण्याबद्दल पारितोषिक.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर