नैसर्गिक हवामान चक्रात वृष्टी (पर्जन्य अथवा हिमवृष्टी) अभावी दीर्घकाळ कोरडा काळ राहणे म्हणजे अवर्षण होय. अवर्षण (अ-नाही, वर्षण-वृष्टी) ही संज्ञा काहीशी सापेक्ष आहे. एखाद्या प्रदेशात दीर्घकाळ, सातत्याने सरासरीपेक्षा खूप कमी किंवा अजिबात पाऊस न पडणे अशा परिस्थितीला अवर्षण असे म्हटले जाते. अवर्षणाचे वातावरणीय, परिस्थितिकीय, जलीय, कृषिविषयक, सामाजिक व आर्थिक अवर्षण असे प्रकार केले जातात. वातावरणीय अवर्षण म्हणजे दीर्घकाळ वृष्टीविरहित परिस्थिती; कृषी अवर्षण म्हणजे पिकांच्या वाढीसाठी पुरेशा पाण्याची किंवा आर्द्रतेची कमतरता भासल्यामुळे कृषिउत्पादनांत प्रचंड घट होणे आणि जलीय अवर्षण म्हणजे भूजलपातळी खाली जाणे किंवा वाहते प्रवाह आटणे होय.

भारतीय वातावरणविज्ञान विभागाच्या व्याख्येनुसार सामान्य पर्जन्याच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त तूट असेल, तर तीव्र अवर्षण आणि २५ ते ५० टक्के तूट असेल, तर मध्यम अवर्षण मानले जाते. अवर्षण ही जरी नैसर्गिक घटना असली, तरी मानवी क्रियाही त्यास जबाबदार ठरतात. वातावरण बदल, जागतिक तापमान वृद्धी, ओझोन स्तराचा र्‍हास, वनांचा र्‍हास, झोत वारा (वातावरणातील १० ते १५ किमी. उंचीवर वाहणारे विशिष्ट प्रकारचे वेगवान वारे), प्रदूषण, अणुचाचण्या, एल निनो (पॅसिफिक महासागरातील दक्षिण अमेरिकेच्या किनार्‍याजवळील उष्ण प्रवाह) इत्यादी अवर्षणाची प्रमुख कारणे आहेत.

उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांखालोखाल अवर्षण ही दुसरी विनाशकारी आपत्ती आहे; परंतु यामध्ये चक्रीवादळ ही अचानक येणारी आपत्ती आहे, तर अवर्षण ही हळूहळू निर्माण होणारी दीर्घकालीन आपत्ती आहे. अवर्षणाचा कालावधी काही महिन्यांपासून काही वर्षांपर्यंतही असू शकतो. काही वेळा तो काही आठवड्यांचाही कालावधी असतो. अवर्षणाचा कालावधी जेवढा अधिक तेवढ्या समस्या अधिक गंभीर बनतात. अवर्षणाची संथगतीने अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांना झळ पोहोचत असते. अवर्षणाचे वेगवेगळ्या प्रदेशांत होणाऱ्या परिणामांचे स्वरूप वेगवेगळे असते.

समस्या : वृष्टीअभावी हळूहळू पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होऊन त्याच्याशी निगडित अनेक समस्या निर्माण होतात.

  • अवर्षण काळात बाष्पीभवन व बाष्पोत्सर्जन अधिक असते.
  • हवा कोरडी असते.
  • जलचक्र असंतुलित झालेले असते.
  • नद्या, ओढे, सरोवरे, तलाव व विहिरी यांच्यातील जलपातळी कमी झालेली असते किंवा ते जलस्रोत कोरडे पडतात.
  • पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते.
  • नागरी पाणीपुरवठ्यावर अतिरिक्त ताण येतो.
  • मृदेतील ओलावा कमी झाल्याने मृदाकण सुटे होऊन तिची धूप वाढते.
  • धुळीची वादळे निर्माण होतात.
  • जलसिंचन धोक्यात येते.
  • कृषी उत्पादनांत घट होते.
  • जीवनावश्यक वस्तुंची टंचाई भासते.
  • उपासमार होते.
  • दुष्काळी परिस्थिती निर्माण होते.
  • गुरांना चारा-पाण्याची टंचाई भासते.
  • मासेमारी घटते.
  • ऊर्जानिर्मितीत घट होते.
  • परिसंस्था विस्कळीत होतात व जैवविविधतेचा र्‍हास होतो.
  • जलवाहतुकीवर परिणाम होतो.
  • पाण्याशी निगडित पर्यटन व्यवसाय धोक्यात येतो.
  • वनस्पती व प्राणिजीवन संकटात येते.
  • अवर्षणामुळे येणार्‍या रोगराईमुळे मृत्युमान वाढते.
  • ज्या कारखान्यांना पाणी अधिक लागते, असे कारखाने धोक्यात येतात. त्यामुळे औद्योगिक उत्पादनांत घट होते. उदा., कागद उद्योग, धातु उद्योग, रसायन उद्योग इत्यादी.
  • महागाई व बेकारी वाढून त्याचा परिणाम त्या प्रदेशाच्या आर्थिक नियोजनावर होतो.
  • उपजीविकेची साधने घटल्याने लोक स्थलांतर करतात.
  • आर्थिक विषमता आणि सामाजिक व आनुषंगिक समस्या निर्माण होतात इत्यादी.

जगातील सर्वाधिक अवर्षणप्रवण क्षेत्र आफ्रिका खंडात आहे. अल्जीरिया, लिबिया, नामिबिया, उत्तर सूदान, उत्तर केन्या, कालाहारी व सहारा वाळवंट आणि नैर्ऋत्य आफ्रिका ही आफ्रिकेतील अवर्षणप्रवण क्षेत्रे आहेत. यांशिवाय अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा दक्षिण भाग, रॉकी पर्वताच्या पूर्वेकडील प्रदेश, पश्चिम मेक्सिको,  दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलचा दक्षिण भाग, पेरू, उत्तर चिली, अटाकामा वाळवंट, आशियाचा खंडांतर्गत प्रदेश, सौदी अरेबिया, इराण, इराक, पाकिस्तानचा पूर्व भाग आणि पश्चिम ऑस्ट्रेलिया हे जगातील प्रमुख अवर्षणप्रवण प्रदेश आहेत. जगातील सर्वांत दीर्घकाळ अवर्षणाची परिस्थिती अटाकामाच्या वाळवंटात राहिली होती. १९७० ते २०१२ या कालावधीत आफ्रिकेत वेळो वेळी निर्माण झालेल्या गंभीर अवर्षणाच्या परिस्थितीमुळे सुमारे ६,८०,००० लोकांचा मृत्यू झाला होता.

भारतातील अवर्षण : जलसिंचन आयोगानुसार भारतात वार्षिक सरासरी ७५ सेंमी. पेक्षा कमी पावसाचा प्रदेश अवर्षणप्रवण म्हणून ओळखला जातो. एकूण पाऊस किती पडला यापेक्षा त्यामधील सातत्य, नियमितता व कालिक वितरण महत्त्वाचे असते. भारतातील एकूण लागवडीखालील क्षेत्रांपैकी सुमारे एक तृतीयांश क्षेत्र अवर्षणप्रवण आहे. अवर्षणाच्या तीव्रतेनुसार देशातील अवर्षणप्रवण क्षेत्राचे तीन भाग पाडता येतात. त्यांपैकी अत्यंत तीव्र अवर्षण क्षेत्रात राजस्थान व गुजरातमधील कच्छ प्रदेश; तीव्र अवर्षणप्रवण क्षेत्रात माळव्याचे पठार व पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील पर्जन्यछायेचा प्रदेश; तर साधारण अवर्षणप्रवण क्षेत्रात कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश या राज्यांतील काही भागांचा समावेश होतो. मॉन्सून पर्जन्याची विचलितता, त्याचे आगमन व निर्गमन यांमधील अनिश्चितता आणि पर्जन्याचे असमान वितरण यांमुळे भारतात वारंवार कोणत्या ना कोणत्या भागात अवर्षणाची स्थिती निर्माण होते. भारतातील साधारण ६७ जिल्हे दीर्घकालीन अवर्षणप्रवण क्षेत्रात येतात. देशातील एकूण अवर्षणप्रवण क्षेत्र सुमारे ५,२६,००० चौ. किमी. असून त्यांपैकी सुमारे ६०% क्षेत्र राजस्थान, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांत आहे.

उपाय : जगभरात अवर्षणाच्या समस्या दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर बनत चालल्या आहेत. त्यादृष्टीने त्यांवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनाही केल्या जात आहेत. उदा., कृत्रिम पावसाचे प्रयोग, नद्याजोड प्रकल्प, नद्यांवरील धरणांची निर्मिती व त्यांतील जलसाठ्यांचा नियोजनपूर्वक वापर, वाहितमल पाण्याचा पुनर्वापर, भूजलसाठा वाढविण्याच्या विविध उपाययोजना, खाऱ्या पाण्यापासून गोड्या पाण्याची निर्मिती, शेततळ्यांची निर्मिती, जलपुनर्भरण किंवा वर्षाजल संचयन प्रणाली (रेन वॉटर हार्वेस्टिंग) इत्यादी. अलीकडच्या काळात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न केले जातात; परंतु ते फारच मर्यादित स्वरूपात यशस्वी होतात. नद्याजोड प्रकल्प हा यावरील एक उत्तम उपाय होऊ शकतो. उदा., दक्षिण भारतात अनेकदा अवर्षणाची परिस्थिती निर्माण झालेली असते; त्याच वेळी उत्तर भारतातून वाहणाऱ्या हिमालयीन बारमाही नद्या दुथडी भरून वाहत असतात आणि ते सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळत असते. गंगा-कावेरी हा अनेक वर्षांपासूनचा प्रस्तावित असलेला अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प कार्यान्वित झाला, तर दक्षिण भारतात निर्माण होणाऱ्या अवर्षणाच्या समस्येवर निश्चितच काही अंशी मात करता येऊ शकते. या उपाययोजनांबरोबर अवर्षणाची समस्या निर्माण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या मानवी कृतींवरही निर्बंध घालणे गरजेचे ठरणार आहे.

जगभरातील पाण्याच्या संदर्भातील समस्यांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यावरणवादी कार्यकर्त्या अ‍ॅलिगझँड्रा कूस्तू या अभ्यास व कार्य करत आहेत. त्यांच्या मते, अवर्षण, वादळ, पूर  आणि खालावात चाललेली पाण्याची गुणवत्ता यांमुळे पृथ्वीवरील पाण्याचे अध:पतन होत चालले आहे. जगात पाण्यावरून अनेक वाद होत आहेत. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पाण्यासाठी स्थलांतर करणाऱ्या ‘जल निर्वासितां’ ची संख्या प्रचंड वाढेल. पृथ्वीवरील पाणी या संसाधनाचे आपण योग्य रीतीने संरक्षण, व्यवस्थापन व पुन:स्थापन केले नाही, तर भविष्यात अनेक गंभीर समस्या निर्माण होतील. तेव्हा पृथ्वीवरील अमूल्य अशा गोड्या पाण्याचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे.

समीक्षक : माधव चौंडे

https://res.cloudinary.com/dtpgi0zck/video/upload/q_auto/vc_vp9/v1/videos/Droughts%20101%20-%205779778129001.webm?_s=vp-1.9.1