अब्राहम, एडवर्ड पेनले : (१० जून १९१३ – ८ मे १९९९) एडवर्ड पेनले अब्राहम यांचा जन्म यूके येथे झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण किंग एडवर्ड–VI शाळेत झाले. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या क्विन्स महाविद्यालयात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. येथे विल्सन बेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रसायनशास्त्र शिकले. पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी रॉबर्ट रॉबिनसन यांच्या मार्गदर्शनाखाली डेसॉन पेरीन्स प्रयोगशाळेत प्रथिन रसायनशास्त्र या विषयात डी.फिल ही पदवी प्राप्त केली. त्यांनी कोंबडीच्या अंड्यातील लायसोझाईम या वितंचकाचे (एंझायमचे) प्रथमच स्फटिकीकरण केले. लायसोझाईम या एंझायमचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग याने लावला होता. लॉर्ड डेव्हिड फिलिप याने एक्सरे स्फटिकीकरणाची पद्धत वापरुन या एंझायमची रचनादेखील शोधून काढली होती.

रॉकफेलर फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे ते स्टॉकहोमच्या बायोकेमिस्का संस्थेत दाखल झाले. तेव्हाच युद्धजन्य परिस्थिति निर्माण झाली होती. स्टॉकहोममध्ये अडकून पडू या भीतीने ते एकटेच ऑक्सफोर्ड विद्यापीठातील सर विलियम डन स्कूल ऑफ पॅथॉलॉजी येथे दाखल झाले. या संस्थेत सर हॉवर्ड फ्लोरी हे पेनिसिलीनच्या वैद्यकीय वापरावर संशोधन करीत होते. एडवर्ड यांना पेनिसिलीनचे शुद्धीकरण आणि त्याची रासायनिक रचना शोधून काढायचे काम दिले होते.

त्यांनी पेनिसिलीनला जिवाणू विरोध का करतात याचे कारण पेनिसिलीनेज या एंझामात असल्याचे शोधून काढले. पेनिसिलीनेज हे एंझायम पेनेसिलीन या प्रतिजैविकचा नाश करते. एडवर्ड अब्राहम आणि सर अर्न्स्ट बोरिस चेन यांनी एकीकृत दोन बेंझीन रिंगची  रचना (Fused Two ring system) असलेल्या नावीन्यपूर्ण अशा एका बेटा-लॅक्टम नावच्या रचनेचा शोध लावला. डोरोथी हॉडकिन यांनी एक्सरे स्फटिकीकरण पद्धतीने या शोधावर शिक्का मोर्तब केले. ऑक्सफोर्ड येथील लिंकन कॉलेजमध्ये संशोधन सदस्य असतांना हॉवर्ड फ्लोरी यांनी अब्राहम यांचे संशोधनकार्य हे पहिल्या तीन पेनिसिलीन संशोधकात गणले जाते असे अधिकृतरित्या जाहीर केले.

सेफॅलोस्पोरियम ॲक्रेमोनियम (Cephalosporium acremonium) या बुरशीचे जिवाणूविरोधी गुणधर्म जुसेप्पे ब्रॉत्सू याला आढळून आले. अब्राहम आणि गाय न्यूटन यांनी त्या बुरशीपासून प्रतिजैविक शुद्धावस्थेत मिळवले. त्याचेच नाव सेफॅलोस्पोरिन–सी. पेनिसिलीनेज हे मात्र सेफॅलोस्पोरिन–सी या प्रातिजैविकाचा नाश करत नाही असे लक्षात आले. त्यामुळे पेनिसिलीनला विरोध करणार्‍या जंतूंमुळे झालेल्या संसर्गावर सेफॅलोस्पोरिन–सी हे परिणामकारक ठरले. सेफॅलोस्पोरिन–सीची आण्विक रचना त्यांनी निश्चित केली आणि गाय न्यूटन यांना ती दाखवली. डोरोथी हॉडकिन यांनी एक्सरे स्फटिकीकरण पद्धतीने त्याची खात्री करून घेतली. अब्राहम यांनी या संयुगाचे एकस्व अधिकार घेतले. इलाय लिलि अँड कंपनीने हे अधिकार विकत घेऊन सेफॅलोटीन या व्यावसायिक नावाने ते बाजारात विकले गेले. सध्या पाचव्या पिढीचे सेफॅलोस्पोरिन–सी एमआरएसए (Methicillin resistant Staphylococcus aureus) संक्रमित आजारांसाठी उत्तम उपचार पद्धती म्हणून सिद्ध झाले आहे. सध्या या प्रतिजैवकाचा वापर न्यूमोनिया, ब्रॉन्कायटीस, सेप्टिसेमिय आणि शल्याकर्मानंतरच्या जखमा बर्‍या करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.

सेफॅलोस्पोरिनच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न त्यांनी जैववैद्यकीय संशोधन करण्यासाठी वापरले जावे म्हणून एडवर्ड पेनले अब्राहम सेफॅलोस्पोरिन फंड आणि गाय न्यूटन फंड अशा दोन धर्मादाय संस्था स्थापन केल्या. या संस्थांमध्ये १९४ दशलक्ष डॉलर्स इतका फंड जमा होता. २० व्या शतकाच्या अखेरपर्यंत या संस्थांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठ, लिंकन महाविद्यालय, डन स्कूल ऑफ पॅथॉलॉजी, किंग एडवर्ड–VI शाळा आणि रॉयल सोसायटी यांना ३० दशलक्ष डॉलर्स इतके अनुदान संशोधनासाठी दिले आहे. यातून ऑक्सफोर्ड विद्यापीठात डॉक्टरेट करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते.

ते केमिकल पॅथॉलॉजी या विषयाचे प्राध्यापक म्हणून लिंकन महाविद्यालयात होते. लिंकन युनिटचे ते निवृत्त होईपर्यंत सदस्य होते. त्यांना रॉयल सोसायटीचे सदस्यत्व, रॉयल सोसायटीचे रॉयल मेडल, शिले परितोषिक, नाइट बॅचलर हा किताब, रॉयल सोसायटीचे म्युलार्ड ॲवॉर्ड, अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे परदेशस्थ सदस्यत्व असे सन्मान मिळाले.

ऑक्सफोर्ड, यूके येथे त्यांचा मृत्यू झाला.

संदर्भ :

समीक्षक : नितिन आधापुरे