निओपिलिना गॅलॅथिया ही मृदुकाय संघातील एककवची (Monoplacophora) वर्गातील निओपिलिनिडी (Neopilinidae) कुलातील सागरी प्रजाती आहे. सुमारे ५-६ हजार मीटर खोलीपर्यंत सागरतळाशी त्यांचे वास्तव्य आढळून येते. ह्या प्राण्यांना ऊर्ध्व बाजूस टोपीसारखा दिसणारा शिंपला असल्याने हे प्राणी लिम्पेट (Limpet) ह्या शंकुपाद प्राण्यासारखे दिसतात. हे प्राणी सुमारे ५५ कोटी ते ३८ कोटी वर्षांपूर्वी वास्तव्य करीत होते. तद्नंतर ते नामशेष झाले असा समज होता. परंतु, ६ मे १९५२ रोजी हेन्रिंग लेमचे (Henning lemcke) या डॅनिश वैज्ञानिकांना सागर मोहिमेदरम्यान कोस्टारिकाजवळच्या प्रशांत महासागराच्या तळाशी निओपिलिना गॅलॅथिया प्राणी जिवंत स्वरूपात सापडले.
पिलीना सोलॅरियम (Pilina solarium) या चाळीस कोटी वर्षांपूर्वी अस्तंगत झालेल्या एककवची प्रजातीची नव्याने सापडलेल्या उपप्रजातीवरून या प्राण्याचे नाव निओपिलिना असे ठेवण्यात आले. इतक्या वर्षांपूर्वींची वैशिष्ट्ये असल्याने यांना जिवंत जीवाश्मे असेही म्हटले जाते. यांचे खंडीभूत शरीर पाहून त्याला वलयी आणि मृदुकाय संघातील जोडणारा दुवा समजले जाते. परंतु, याबद्दल वैज्ञानिकांचे एकमत झालेले नाही.
निओपिलिना गॅलॅथियाचा आकार वर्तुळाकार असून शरीर द्विपार्श्व सममितीचे असते. शरीराच्या ऊर्ध्व भागावर एक टोपीसारखे कॅल्शियमयुक्त कवच असून त्यावर श्लेष्माचा थर असतो. कवचाचे अग्रटोक किंचित वाकलेले असते. कवचावर वाढ वलये दिसतात. अधरभागी पृष्ठभाग व्यापणारा मांसल पाद (Foot) असतो. शंकुपादाप्रमाणे प्रावार गुहिका (Pallial cavity) नसते, मात्र मांसल पाद आणि कवच ह्यामध्ये प्रावार खाच असते. एकसारख्या आकाराच्या जाडीची प्रावार घडी संपूर्ण शरीरभर असते. मांसल पादाच्या कडेने क्लोमांच्या ५ जोड्या असतात. त्याच्या पुढील भागात मुख, तर मागील भागात गुदद्वार असते.
या प्राण्याच्या शरीरात वृक्कके (Nephridia; उत्सर्जन इंद्रिये), हृदय आणि क्लोम (Gills) वलयी संघातील प्राण्यांप्रमाणे खंडीभूत स्वरूपात आढळतात. या प्राण्यांमध्ये लिंग भिन्नता असते. जननग्रंथीची जोडी एकत्र येऊन एकच जननेंद्रिय बनते. त्याला असणाऱ्या दोन वेगवेगळ्या नलिकांतून शुक्रबीज किंवा बीजांड बाहेर पाण्यात सोडले जातात व तेथेच त्यांचे फलन होते. यांमध्ये चेतासंस्था/मज्जासंस्था पूर्ण विकसित नसते.
अधिक संशोधनानंतर निओपिलिनाचा अधिवास प्रशांत महासागर, हिंद महासागर, एडनचे आखात आणि अंटार्क्टिक समुद्रात असल्याचे लक्षात आले. परंतु, अतिशय खोल पाण्यात यांचे वास्तव्य असल्याने ते सहज दृष्टीक्षेपात येत नाहीत. मात्र ५० ते २० कोटी वर्षांपूर्वीची वैशिष्ट्ये टिकवून ठेवणारा हा सागरी जीव उत्क्रांतीविज्ञान व वर्गीकरण विज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. आजपर्यंत निओपिलिना प्रजातीचे अवघे दहा नमुने गोळा करण्यात वैज्ञानिकांना यश मिळाले आहे.
पहा : मृदुकाय संघ.
संदर्भ :
- https://www.britannica.com/animal/monoplacophoran#ref103697
- https://en.wikipedia.org/wiki/Neopilina
- Neopilina galathaeae, Living fossils from ocean by Sukanya Datta Science reporter, November 2010.
समीक्षक : विनय देशमुख