शिक्षण क्षेत्रात अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाणारे एक पुस्तक. प्रसिद्ध ऑस्ट्रियन शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि सामाजिक समीक्षक इव्हान इलिच यांचे १९७१ मध्ये डिस्कुलिंग सोसायटी (शाळा विरहित समाज) हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकामध्ये आधुनिक समाजाच्या शिक्षणाकडे पाहण्याच्या संस्थात्मक दृष्टिकोणावर इव्हान यांनी टीका केली आहे. त्यांच्या मते, समाजात खरा बदल घडवून आणायचा असेल, तर शाळा विरहित समाज निर्माण करण्याची नितांत गरज आहे. शाळा विरहित समाजामध्येच मानव हा खऱ्या अर्थाने मुक्त आणि परिपूर्ण असू शकतो. इव्हान हे रुढार्थाने समाजशास्त्रज्ञ नसले, तरी त्यांचे डिस्कुलिंग सोसायटी हे पुस्तक ‘शिक्षणाचे समाजशास्त्र’ या शाखेमध्ये महत्त्वाचे मानले जाते.

शिक्षण हे कोणत्याही व्यक्तीसाठी प्राथमिकतः मुक्तिदायी अनुभव असला पाहिजे. शिक्षण हे अज्ञानाच्या बंधनातून मुक्त करणारे असले पाहिजे. शिक्षणामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये उपजत असलेल्या क्षमता, कौशल्यांचा विकास करण्याच्या संधी मिळाल्या पाहिजे. मूलतः शिक्षण म्हणजे विशेष कौशल्ये आत्मसात करणे होय. उदा., कोणतीही भाषा किंवा हस्तकला. मानवाला मुक्तीदायी अनुभव देण्याचा उदात्त हेतू असो किंवा विशेष कौशल्ये शिकविण्याचा अगदी मूलभूत हेतू असो शाळा ज्या प्रकारे आहेत आणि ज्या प्रकारे चालविल्या जात आहेत, त्यावरून शाळा या शिक्षणाचे वरील दोन्हींपैकी कोणतेही उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत करत नाहीत. याउलट, शाळा एकदम विरुद्ध भूमिका बजावत असतात, असे मत इव्हान यांनी आपल्या डिस्कुलिंग सोसायटी या पुस्तकात मांडले आहे.

कौशल्ये आत्मसात करणे हे शिक्षणाचे एक उद्दिष्ट असले, तरी ते पूर्ण करण्याबाबत शाळा कोणतीच भूमिका बजावित नाही. बहुतेक विद्यार्थी हे विशेष कौशल्ये बहुतांश वेळेस त्यांच्या शाळांबाहेर आत्मसात करतात; कारण विद्यार्थी जीवनात ‘शिकणे’ हे अनौपचारिक रीत्या घडतच असते. ही विशेष कौशल्ये शिकविण्याचे काम हे अशा कुशल लोकांनीच करायला हवे, जे स्वतः रोजच्या जीवनात त्या कौशल्यांचा वापर करतात. हा मुद्दा समजावून देताना ते न्यूयॉर्कमधील स्पॅनिश भाषिक किशोरवयीन मुलांचे उदाहरण देतात. शालेय शिक्षण पूर्ण न केलेल्या स्पॅनिश भाषिक मुलांना शाळेतील शिक्षकांना स्पॅनिश शिकविण्याचे काम देण्यात आले. या मुलांना शिकविण्यासाठी विद्यापीठातील भाषाशास्त्रज्ञांनी तयार केलेली एक अध्यापन पुस्तिका देण्यात आली. केवळ एका आठवड्याच्या कालावधीत या मुलांनी अध्यापन पुस्तिकेतील गोष्टी आत्मसात करून शिक्षकांना स्पॅनिश भाषा शिकविण्याचे काम सहा महिन्यांत यशस्वी रीत्या पूर्ण केले. इव्हान म्हणतात की, शाळांमध्ये अशा प्रकारच्या कुशल शिक्षकांची नियुक्ती करणे गरजेचे आहे; परंतु शाळांमध्ये अशी नियुक्ती होणे अशक्य असते. खऱ्या अर्थाने कुशल शिक्षकांची नियुक्ती शाळांमध्ये केली जात नाही; कारण समाज आणि शिक्षणव्यवस्थेमध्ये अधिकृत रीत्या प्रशिक्षित असलेल्या शिक्षकांनाच नियुक्त केले जाते. बहुतांश वेळा कुशल व्यक्ती अधिकृत रीत्या प्रशिक्षित नसतो. अधिकृत रीत्या प्रशिक्षित असलेल्या व्यक्तींनाच ती कौशल्ये शिकविता येतात, असा समज असतो.

शिक्षणाच्या दुसर्‍या पैलूबाबतसुद्धा शाळा अत्यंत अपयशी ठरतात. व्यक्तींना मुक्त करण्याऐवजी शाळा या दडपशाही संस्था म्हणून काम करतात. शाळा विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि कल्पनाशक्तीला वाव देण्याऐवजी संपविण्याचे काम करतात. एवढेच नव्हे, तर शाळा समाजव्यवस्थेतील सामर्थ्यवान व सत्ताधारी लोकांचे हितसंबंध अबाधित ठेवण्याचे काम करतात. समाजामधील सामाजिक स्थैर्य, समाजातील स्थिती जैसे थे ठेवण्याचे काम करतात, असेही मत लेखक आपल्या पुस्तकात नोंदवतात.  शाळांमध्ये या प्रकारचा ‘छुपा अभ्यासक्रम’ वेगवेगळ्या पातळ्यांवर कसा राबविला जातो, हे इव्हान यांनी आपल्या पुस्तकात स्पष्ट केले आहे. शाळेमध्ये विद्यार्थी काय शिकतात किंवा ते कशा पद्धतीने शिकतात, यावर विध्यार्थांचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. ‘शिक्षक ठरवेल तेच शिक्षण’ अशा एकांगी पद्धतीने त्यांचे शिक्षण होत राहते; परंतु खरे शिक्षण हे अशा एकांगी पद्धतीने नव्हे, तर शिकण्याच्या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या थेट सहभागामुळे होत असते. थोडक्यात, बहुतांश गोष्टी शिकण्यासाठी शिक्षकांची गरज नसते; परंतु शाळेमध्ये शिक्षकांची भूमिका गरजेपेक्षा जास्त मोठी केल्याने व विद्यार्थ्यांचा सहभाग नाकारल्याने,परिणामी समाजातील शिक्षित वर्गाचा वैचारिक दर्जा हा खालावलेला दिसतो, अशी मांडणी इव्हान यांनी केली आहे.

शाळेमध्ये यशस्वी होण्यासाठी तसेच पुढच्या स्तरावर जाण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व नियमांचे नेहमीच पालन करावे लागते. शाळासुद्धा विद्यार्थ्यांकडून त्यांच्या नियमांचे पालन करून घेण्यासाठी आग्रही असतात. शाळांमध्ये जे विद्यार्थी सर्व नियमांचे पालन करतात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे पुरस्कृत व सन्मानित केले जाते आणि पुढील स्तरावर जाण्यासाठी त्यांची निवड होते. विद्यार्थ्यांना सर्व सूचनांचे पालन करण्यास शाळा भाग पाडू शकतात; कारण शाळा ही संस्था विद्यार्थ्यांच्या क्षमता प्रमाणित करीत असते, ज्यामुळे पुढे जाऊन विद्यार्थांना नोकरी व इतर संधी मिळण्यास मदत होते. शाळेने प्रमाणित केलेल्या या शैक्षणिक पात्रतेमुळे नोकरी अथवा व्यवसायासाठी लागणारी कौशल्ये व क्षमता त्या शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये असतीलच असा गैरसमज एकंदर समाजाचा व त्या विद्यार्थ्यांचाही होतो. पुढे विविध ठिकाणी शैक्षणिक पात्रता याच निकषावर विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतात आणि हेच विद्यार्थी कामगार वर्गाचा भाग होतात. समाजातील या संरचनाचे पुनरुत्पादन करण्यास आताची शाळा व व्यवस्था हातभार लावते. त्यामुळे शिकणे-शिकविणे, श्रेणीवाढ बरोबर शिक्षण, पदविका म्हणजेच सक्षमता याची गल्लत व्हायला लागते. एवढेच नाही, तर शाळांमधून पदवी प्राप्त करून नागरिक म्हणून वावरताना हे विद्यार्थी सर्व क्षेत्रांत याच प्रकारचा समान मापदंड वापरताना आढळतात, अशी मांडणी इव्हान यांनी केली आहे.

शाळा या व्यवस्थेमधून शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे हे व्यवहार्य नाही. तसेच आताच्या शालेय व्यवस्थेवर आधारित परंतु पर्यायी संस्थांच्या माध्यमातूनसुद्धा शिक्षणाचे सार्वत्रिकिकरणाचे प्रयत्न केल्यास ते व्यवहारिक ठरणार नाही. शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांबद्दलचा नवा दृष्टिकोण स्वीकारला किंवा शिक्षक त्यांची जबाबदारी समजून विद्यार्थांच्या जीवनात पूर्णकाळ गुंतले, तरीसुद्धा शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होऊ शकत नाही. तथापि शैक्षणिक जाळे या संकल्पनेतून प्रत्येक व्यक्तीला स्वतःमध्ये बदल घडविणे शक्य होईल आणि प्रत्येक क्षणच शिक्षणमय होईल, असे प्रतिपादन इव्हान यांनी आपल्या पुस्तकात केले आहे.

आज समाजाला भेडसाविणाऱ्या सर्व समस्यांच्या मुळाशी सध्याची शिक्षण व्यवस्था आहे, असेही इव्हान ठामपणे सांगतात. सध्याची शिक्षण व्यवस्था बुद्धीहीन, कोणत्याही गोष्टीला फार विचार न करता सहमती देणारे आणि ज्यांना सहज फसविले जाऊ शकते असे नागरिक तयार करीत आहे. असे नागरिक निर्माण करण्यामध्ये शाळा हा पहिला टप्पा आहे. शाळांमध्येच व्यक्ती अधिकाराकडे झुकण्यास, परात्मीकरण स्वीकारण्यास व वेगवेगळ्या संस्थांच्या सेवांचा उपभोग घेण्यास शिकते. स्वतः विचार कसा करावा याचा विसर पडून विविध संस्थांच्या सेवांचे मूल्य मानण्यास शिकतात. त्यांना शिक्षण म्हणजे एक मौल्यवान वस्तू जिचा उपभोग सतत वाढत्या प्रमाणात करायचा असतो असे शिकविले जाते, असे मत पुस्तकात मांडले आहे.

हे सर्व धडे विद्यार्थ्यांना निर्बुद्ध ग्राहक बनवितात. ज्यांच्यासाठी औद्योगिक समाजातील वस्तू आणि सेवांचा निष्क्रीय वापर करत राहणे हाच उद्देश बनतो. जाहिरातींना आणि शक्तीशाली व्यक्तींच्या निर्देशांना प्रतिसाद देऊन ते उद्योगातील उत्पादने मिळविण्यासाठी वेळ, पैसा आणि शक्ती गुंतवतात. डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, वकील यांसारख्या भिन्न व्यावसायीकांच्या सेवा व्यक्ती घ्यायला लागतात. अधिकारात असलेल्यांना इतर व्यक्तींसाठी काय चांगले आहे, हे माहित आहे. त्यामुळे व्यक्तीला सरकारच्या नोकरशाही संस्था आणि व्यावसायीक संस्थांच्या निर्देशांवर अवलंबून राहावे लागते. इव्हान म्हणतात की, आधुनिक औद्योगिक समाज मानवी आनंद आणि समाधानासाठीची चौकट प्रदान करू शकत नाही. कारखान्यांमधून माल सतत वाढत्या प्रमाणात ओतला जात असूनही आणि भिन्न व्यावसायिक सामाजिक समस्या सोडविण्यासाठी अधिक व्यापक कार्यक्रम दिलेले असूनही दुःख, असंतोष आणि सामाजिक समस्या वाढत आहेत. अधिकाधिक वस्तू आणि सेवांचा उपभोग घेणे हा खूपच साधा तोडगा आताची व्यवस्था सांगते. इव्हान यांनी पुस्तकात असा निष्कर्ष मांडला की, जोपर्यंत शाळा अर्थव्यवस्थेचा प्रमुख स्रोत असलेल्या प्रगतीशील ग्राहकाला कसा आकार देते हे कळत नाही, तोपर्यंत आपण वेगळी अर्थ आणि सामाजिक व्यवस्था निर्माण करू शकत नाही. शिक्षणाचे संस्थीकरण समाजाच्या संस्थीकरणास चालना देते, अशा स्थितीला इव्हान यांनी तीव्रपणे निषेध केला आहे. अतिसंस्थीकरण झालेल्या समाजाच्या समस्येवर मात करण्यासाठी अशा व्यवस्थेचा पाया नष्ट करणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी शिक्षणाचे असंस्थीकरण करणे सर्वांत महत्त्वाची गोष्ट असून या सर्व समस्यांवर ‘शाळा विरहित समाज’ हा एक साधा परंतु मूलगामी उपाय इव्हान यांनी आपल्या पुस्तकात सुचविला आहे. थोडक्यात, सध्याची शिक्षण व्यवस्थाच रद्द करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. मानवी मुक्तीच्या कोणत्याही चळवळीच्या मुळाशी शाळा विरहित समाज करणे हे फायद्याचे ठरेल. शाळा विरहित समाजामुळे समाजामधल्या पुनरुत्पादक व्यवस्थेचा नाश होईल आणि लोक खरोखर मुक्त आणि परिपूर्ण होऊ शकतील अशा समाजाची निर्मिती होईल, असे इव्हान यांनी आपले मत व्यक्त केले.

इव्हान यांनी आपल्या पुस्तकात शाळांच्या जागी दोन मुख्य पर्याय सुचविले. (१) कौशल्यांची देवाणघेवाण : यामध्ये प्रशिक्षक आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असलेली कौशल्ये इतरांना शिकवतील. पद्धतशीरपणे सूचनांचा समावेश असलेल्या आवृत्तीद्वारे कौशल्ये उत्तम प्रकारे शिकली जाऊ शकतात.

(२) अध्ययन संकेत : यामध्ये समान रुची असलेल्या व्यक्ती, सर्जनशीलता आणि अन्वेषण पद्धतीने पुढाकार घेऊन अध्यापन व अध्ययन हे चालू राहील. या अध्ययन संकेताबद्दल पुस्तकात त्यांनी सविस्तरपणे मांडणी केलेली आहे.

इव्हान आणि भारत : शिक्षणतज्ज्ञ म्हणून काम करताना इव्हान यांना भारतात दोनदा आमंत्रित केले गेले. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी इव्हान यांचे डिस्कुलिंग सोसायटी हे पुस्तक वाचल्यानंतर १९७२ मध्ये त्यांना पहिल्यांदा भारतामध्ये आमंत्रित केले. त्यानंतर दुसऱ्यांदा १९७८ मध्ये ते भारतात आले आणि त्यांनी दक्षिण भारतात म्हैसूर येथे ‘टॉट मदर टंग’ (शिकवली जाणारी मातृभाषा) या विषयावर व्याख्यान दिले. तसेच सेवाग्राम आश्रमात आयोजित केलेल्या ‘टेक्निक्स फॉर दी थर्ड वर्ल्ड पुअर’ या परिषदेतसुद्धा त्यांनी उद्घाटनपर भाषण दिले. महात्मा गांधींचे प्रमुख अर्थशास्त्रज्ञ जे. सी. कुमारप्पा यांच्या कामाचा इव्हान यांच्यावर प्रभाव होता.

टीका : बॉल्स आणि गिंटिस यांच्यानुसार इव्हान यांनी डिस्कुलिंग सोसायटी या पुस्तकामध्ये एक मूलभूत चूक केली आहे. त्यांच्या मते, इव्हान यांनी शाळांना समाजामधल्या समस्यांचे मूळ म्हणून बघितले आहे जे  योग्य नाही. सामाजिक समस्यांचे मूळ शालेय व्यवस्थेत नव्हे, तर आर्थिक व्यवस्थेच्या कार्यामध्ये आहे. ते असा युक्तिवाद करतात की, इव्हान यांच्या दृष्टिकोणातून शाळा विरहित समाज केवळ ‘व्यवसाय अयोग्य कामगार’ आणि ‘जॉब ब्लूज’ म्हणजे कल्पनेतील नोकरी आणि वास्तविकता यांच्यामधील अंतर निर्माण करेल, जे संपूर्ण समाजात परिवर्तन घडवून आणण्यास फारसे पुरेसे नाहीत. याशिवाय भारतासारख्या विषमताधिष्टित देशात जेथे जाती, प्रादेशिकता, लिंग, वर्ग यांसारख्या असमानतेच्या रचनेत शिक्षणाचे पुनरुत्पादन होते; शाळा विरहित समाजामुळे अशा प्रकारच्या असमानता विशेषत: जातिव्यवस्थेला अधिक बळकटी देणारे शिक्षण व्यवस्था निर्माण होऊ शकण्याचा धोका संभवतो. असे असले, तरी या संकल्पनेच्या गाभ्याशी असलेली प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेची कठोर चिकित्सा ही कोणत्याही काळातील तसेच समाजातील शिक्षण व्यवस्थेचे चिकित्सक विश्लेषण करण्यासाठी दिशा दर्शक ठरते.

संदर्भ : 

  • Haralambos; Holborn, Sociology Themes and Perspectives, New Delhi, 2014.
  • Illich, Ivan, Deschooling Society, New York, 1970.

समीक्षक : मधुरा जोशी